मेथी…..Fenugreek…..
कडवट असली तरी बहुतेक सर्वांच्या जिभेची चव वाढवणारी, तसेच कुठल्याही पदार्थाला अफलातून रंग रूप व चव देणारी, हिरवी पालेभाजी म्हणजे मेथी. पश्चिम आशिया व दक्षिण युरोप हे मेथीचे उत्पत्ती स्थान आहे असे मानतात.
पालेभाजी आणि मेथी दाणा ज्याला आपण मेथ्या म्हणतो, हे दोन्ही औषधीगुणयुक्त आहेत. ही भाजी आपल्या परसबागेत नक्कीच लावावी. कारण ताज्या हिरव्या कोवळ्या मेथीच्या पानांचा स्वाद काही विचारायलाच नको. डाळीचं पीठ पेरून केलेली कोरडी भाजी असो वा डाळभाजी, मेथी-बटाटा वा पनीर-बटाटा असो, मेथीचे पराठे असो वा पुर्या असोत वा कोवळ्या ताज्या पानांचं काकडी गाजर फुलकोबी व लिंबू घालून केलेलं कुडमुडं असो ह्या कोवळ्या ताज्या पानाची मजा काही औरच.
मेथीचे दोन प्रकार आहेत. एक आपण नेहमी खातो ती व दुसरी म्हणजे कसुरी मेथी. नेहमीच्या मेथीचे बी पेरल्यानंतर तीन-चार दिवसात उगवते आणि तीस ते पस्तीस दिवसात खुडणीला येते. ही मेथी लवकर वाढते. फांद्या भरपूर येतात. पाने लंबगोल किंवा गोलाकार असतात. फुले पांढरी व शेंड्याकडे पानाच्या बेचक्यातून येतात. शेंगा लांब असतात. बी मोठे असते. बरेच ठिकाणी स्थानिक वाण लावतात. कोवळी करकरीत पाने, लवकर फुलावर न येणे व कोवळेपण जास्त दिवस टिकणे ही ह्या स्थानिक वाणाची वैशिष्ट्ये आहेत. आता पुसा अर्ली बचींग ही जात विकसित केली आहे.
खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात तर रबी हंगामात सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात मेथीचे बी पेरतात. तीस पस्तीस दिवसात खुडणीला आल्यावर दोन तीनदा खुडणी करतात व नंतर फुलोर येण्यास सोडतात. ही मेथी कोणत्याही हवामानात येत असली तरी थंड हवामानात जास्त चांगली वाढ होते. समशीतोष्ण हवामान व नियमित पाणी मेथीला पूरक ठरते. कमी दिवसात येणाऱ्या ह्या भाजीला मध्यम रेताड व पाण्याचा निचरा होणारी जमीन चालते. घराच्या छोट्या बागेत, मोठ्या लांबोळ्या किंवा गोलाकार कुंडीत मेथ्या पेरताना रेतीयुक्त पाण्याचा निचरा होईल अशीच माती भरतात. बी पेरल्यानंतर थोडे पाणी टाकून मातीत ओलावा निर्माण करतात. मेथीला पाणीही खूप लागत नाही. जैविक खत, नत्रयुक्त खत गांडूळखत अधूनमधून टाकले की भाजी चांगली वाढते.
दुसरी मेथी म्हणजे कसुरी मेथी. ह्या मेथीची पाने, नेहमीच्या मेथीपेक्षा लहान व गोलसर असतात. वाढ हळू व झुडूप वजा होते. फांद्या व देठ नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. फुले आकर्षक पिवळ्या रंगाची व लांब दांड्यावर येतात. शेंगा बारीक व कोयत्यासारख्या बाकदार आकाराच्या असतात. तर बियाही नेहमीच्या मेथ्यांपेक्षा बारीक असतात. ही कसुरी मेथी सुगंधित व स्वादिष्ट असते आणि सहा-सात दिवसात उगवते व दोन महिन्यातच तयार होते. ह्यातही पुसा जातीची मेथी थोडी उशीरा तयार होणारी आहे व तिचे अनेक खुडवे घेता येतात. पुसा मेथी थंड हवामानात चांगली वाढते. ही भाजी पण परसबागेत लावता येते. ही मेथी कोणत्याही भाजीवर, वरणात नुसती कुस्करून वरून भुरभुरवली तरी छान सुगंध येतो व स्वाद वाढतो.
मेथीची भाजी जशी सर्वसमावेशक आहे तसे मेथीचे दाणे म्हणजेच मेथ्या, मसाल्यातील एक पदार्थ म्हणून खास आहे. कढी, वरण, भाज्यांच्या फोडणीत थोडे मेथीचे दाणे घातले की सुगंध वाढतो. मेथ्यांची पीठ किंवा कणिक पेरून केलेली सुकी भाजी किंवा आलं लसूण कांदा घालून केलेली सैलसर भाजी छान होते. पालेभाजी प्रमाणेच मेथ्यांमधेही कमालीचे औषधीगुण आहेत. थोडे मेथीच्या दाण्याचे पीठ गायीच्या तुपात चार पाच दिवस भिजत घालून ठेवतात. नंतर कणिक चांगली भाजून व गुळ आणि सुका मेवा घालून लाडू करतात.
१] पचन संबंधी अनेक समस्यांचे निराकरण ही भाजी व मेथ्या करतात.
२] भूक लागत नसेल तर मेथीचे सेवन करतात .
३] आतड्यांवरील सूज मेथ्याच्या सेवनाने कमी होते.
४] मासिक पाळीसंबंधीत विकारांवर मेथ्याचे पाणी उपयुक्त ठरते. रात्री पाचसहा मेथ्या भिजत घालून सकाळी ते पाणी प्यायल्यास व भिजलेल्या मेथ्या खाल्ल्यास अनेक फायदे होतात.
५] ह्या बियांमध्ये ॲमिनो ॲसिड असते, ज्यामुळे पोटातील इन्सुलिन डिस्चार्ज वाढतो. त्यामुळेच मधुमेह कमी होण्यास मदत होते व टाईप 2 डायबेटिसपासून दूर ठेवतो.
६] मेथ्यांच्या सेवनाने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. वजन आटोक्यात राहते.
७] मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्याने पचन सुधारते.
८] मेथी दाणे केसांशी संबंधित अनेक विकारांवर उपयोगात आणतात. नैसर्गिक कलप म्हणून केस काळे करण्यास वापरतात.
९] पाॅलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमवर मेथीदाणा उपयुक्त ठरतो.
१०] मेथी यकृत व प्लीहा यांची कार्यक्षमता वाढवते.
११] मेथीत ‘अ’ व ‘क’ जीवनसत्वे, प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फाॅस्फोरस ही खनिजे भरपूर प्रमाणात आहेत.
१२] मेथीच्या सेवनाने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
१३]मेथीत अँटी-ऑक्सिडेंट,
अँटी-बॅक्टेरिल गुणधर्म आहेत.
१४] ह्यातील फायबर्समुळे पोट साफ होते.
१५] आयर्नच्या उपलब्धेमुळे मेथ्यांच्या सेवनाने हिमोग्लोबीन वाढते.
१६] मेथ्या व भाजीमुळे बाळंतिणीचे दूध वाढते.
१७] मेथीदाणा स्तन व आतड्याच्या कँसरपासून रक्षण करतो.
१८] हिवाळ्यात मेथीचे लाडू किंवा इतर कुठल्याही रुपात मेथ्या खाल्ल्यास हाडांना व सांध्यांना फायदा होतो. सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
१९] मेथ्यांमुळे थंडीच्या दिवसांत शरीरातील उष्णता वाढते.
टीप….. हे सगळे औषधीगुण असले तरी मेथ्यांचे अति सेवन काही वेळेस अपायकारक ठरते.
टीप….१] गर्भवती स्त्रियांनी मेथ्यांचे अति सेवन केल्यास गर्भस्त्राव वाढून अकाली प्रसूतीचा धोका असतो.
२] पोटदुखी वाढू शकते.
३] ब्लडशुगर एकाएकी कमी होऊन वेगळीच समस्या उद्भवू शकते.
४] अतिसार होऊ शकतो.
५] ॲलर्जी होऊ शकते.
६] पित्त भडकते.
७] उष्णता वाढते.
ह्या कारणाने मेथीची भाजी विशेषतः मेथ्यांचे अति सेवन करू नये. तसेच वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय रोज सेवन करू नये.
सौ. विद्या चिडले.
बेंगळूरु
२५|१|२०२३.
