सनविवि माहितीपूर्ण लेख वनौषधी- पानफुटी….. (पत्थरचट्टा)

वनौषधी- पानफुटी….. (पत्थरचट्टा)

सौ. विद्या चिडले

आज पानफुटी ह्या वनस्पतीची मागणी वाढत आहे. ह्या वनस्पतीचे पारंपरिक आयुर्वेदिक औषधीगुण पाहता ही वनस्पती आपल्या घरच्या छोटेखानी बागेत असावी असे नक्कीच वाटेल.  ह्या वनस्पतीला बियाणांची गरज नसते. रोप मोठं झालं की त्याची पानं लोंबकळतात. जमिनीला टेकलेल्या पानातून दुसरे झाड फुटते. म्हणूनच ह्या रोपाला पानफुटी असे म्हणतात. खाली पडलेल्या पानातून जीवन उभे करण्याची एक अफलातून किमया निसर्गाने ह्या वनस्पतीला दिली आहे. पानाचे नुसते काठ जरी तोडून मातीत टाकले तरी त्यातून झाड उगवते. आर्द्र मातीत पान खोवले की काही दिवसातच रुजते आणि वाढायला लागते.
सदाबहार अशी ही वनस्पती मूळची मादागास्कर मधील असली तरी आज भारतात बहुतेक सर्वत्र आढळते. उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण भागात ही वनस्पती वाढते. पानफुटी, घायमारी, जख्मेहयात, व्रणशोधक,  रक्तवर्धक, व्रणरोपक म्हणून ओळखलेली ही वनस्पती महाराष्ट्रातील डोंगराळ भागात व बागांमधेही आढळते. हिंदीत हिला पत्थरचट्टा असं म्हणतात. तर Bryophyllum pinnatum हे वनस्पतीशास्त्रातील नाव आहे. ही वनस्पती बागेत लागते तशी घरातही चांगली बहरते.
कोणत्याही ऋतुत लावली तरी लागणारी व टिकणारी ही वनस्पती बाराही महिने हिरवी राहते. दिवसभराचे चारपाच तास ऊन ह्या झाडाच्या वाढीला पुरेसे असते. घरातील झाडाला फिल्टरचे पाणी जास्त चांगले ठरते. ह्याची पाने चवीला थोडी आंबट थोडी गोडसर असतात त्यामुळे स्वादिष्ट लागतात. मांसल व दंडगोलाकार पोकळ देठांवर लाल रंगाची छटा असते. लालसर हिरव्या रंगाचे हे झाड तीन चार फूट ऊंच वाढते. पाने जाडी, रसाळ व दूरदूर असतात. दहा ते वीस सेंटिमीटर लांब असलेल्या  ह्या पानांच्या कडांवर दाते असतात. रोपावर क्वचितच कुठला रोग येतो. पानेही दोन तीन इंच लांब असतात. ह्या रोपाला लाल रंगाच्या शेंगा लागतात त्यात अनेक बिया असतात. ह्या पानाच्या कडांवरील दातांमधे बीजशक्ती असते. 
मातीत थोडी रेती व कोकोपीट मिसळून कुंडी भरली तर उत्तमच. पण नुसती रेती माती मिसळून टाकली तरी चालते. कुंडी भरताना नेहमीप्रमाणेच पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी लागते. म्हणजे पाणी साचून राहू नये म्हणून कुंडीला खाली भोक पाडून त्यावर एक दगड किंवा खापराचा तुकडा ठेवावा म्हणजे जास्तीचं पाणी निघून जाईल पण माती वाहून जाणार नाही. 
भष्मपथरी, पाषाणभेद, पणपुट्टी, पर्णबीज, पत्थरचट्टा अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या रोपाची उपयोगिता बघता तिला airplant, magic leaf, lifeplant असेही म्हणतात. 
पानफुटीमधे कॅल्शियम, सल्फेट, ऑक्झीलेट, टार्टरीक ॲसिड असते. ह्या वनस्पतीच्या पानाचा अनेक आजारांवर उपयोग होतो. 
१] पारंपरिक औषधात पानाचा रस वापरतात.  
२] डोकेदुखीवर पानफुटीच्या पानांचा रस नारळाच्या तेलात मिसळून कपाळावर लावतात. 
३] मुतखडा/पित्तखडा यावर पानफुटीच्या पानाचा रस उपयोगात येतो. 
४] पानफुटी वात-पित्ताचे शमन करते. 
५] फोडं, लाल त्वचा व सूज असेल तर पाने हलके गरम करून त्याचा लेप लावतात. 
६] पानफुटीमुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो. 
७] रक्तशुध्दीसाठी पानाचा चारपाच थेंब रस किंवा अर्क वापरतात. 
८] पथरीवर दोन पानं गरम पाण्यासोबत अनुशापोटी खातात. 
९] पोट दुखत असेल तर सुंठ व पाने एकत्र करून त्याचे सेवन करतात. 
१०] तसेच पोटातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यात उपयोगी ठरते.
११] दातांचे दुखणे कमी होण्यास मदत करते.
१२] थांबून थांबून लघवी होणे, आग होणे ह्यावर काढा घेतात. 
१३] रक्ताची संडास होत असेल तर  रसाचा वापर योग्य ठरतो.
१४]  antifungal गुणधर्मामुळेच पानफुटीचा लेप खाजेवर उपयुक्त ठरतो.  
१५] anti-bacterial गुणधर्मामुळे तोंडाची निगा राखण्यास पानांची मदत होते. 
१६] पानाचे सेवन मूळव्याध दूर होण्यास मदत करते. 
१७] पानामुळे जखम भरण्यास मदत होते. 
चारपाच पानं वाटून पाण्यात उकळून काढा करून त्याचे सेवन करतात किंवा दोन पानं चावून चावून खातात तसेच पानांचा रस काढून ज्यूस घेतात. पानफुटीच्या पानाचे भजे किंवा भाजी करून खातात. 
परंतु पानफुटीचेही काही वाईट परिणाम होतात. 
१] ह्या पानाच्या सेवनाने इतर औषधांचा असर कमी किंवा जास्त होऊ शकतो.
२] गर्भावस्थेत पानफुटीच्या पानाचे सेवन करत नाहीत. 
३] पानामुळे ॲलर्जी होऊ शकते.
४] तसेच शरीराची आगही होते. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेऊनच पानाचा वापर करणे योग्य ठरेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *