वाटे मज…

— पुरुदत्त रत्नाकर —

कोसळत्या धारेतला चुकार तुषार व्हावे

अवखळ वार्‍यासंगे खुशाल पसार व्हावे

गवताच्या पात्यावर अलगद उतरावे

बिन्दु दवाचा होऊन चांदण्यात पहुडावे

येता किरण कोवळे धरणीला बिलगावे

बिन्दु बिंदूंना स्पर्शून प्रवाहपतित व्हावे

पाट इथलेतिथले येता ते निर्झर व्हावे

झुळझुळ झुळझुळ सप्त सुरात म्हणावे

झरे झर्‍यास मिळता फेसाळती नदी व्हावे

गावोगावी खळखळ्ळ करत वाहत जावे

पार होऊन किनारा सागरमिलन व्हावे

लाट ललाटी शिळांशी धुंवाधार द्वंद्व व्हावे

ऊनऊन उन्हे येता ऊर्ध्वगामी बाष्प व्हावे

नभातला पिंजलेला घोर घनःशाम व्हावे

कडकड कडाडत आगमन कळवावे

झोत विद्युत टाकून कोठे कोरडे बघावे

रथ वार्‍याचा रोखून रिमझिम बरसावे

हिम होत नगावर शांत ध्यानस्थ बसावे

पाझरत पसरत जल गंगेतले व्हावे

मातीमध्ये झिरपून बिजासवे अंकुरावे

7 thoughts on “वाटे मज…”

  1. खूपच सुंदर कविता. विद्युत झोताची उपयुक्तता कल्पना छान.

  2. कल्पना आणी शब्दांकन दोन्ही ही सुरेख

  3. फार सुंदर निसर्ग वर्णन कवितेत गुंफलय.

  4. सुंदर शब्दांकन… मनास चिंब करणारी कविता!!

Leave a Reply to मकरंद भिडे Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *