संवाद 

— राधिका मराठे, संपादक मंडळ,स.न.वि.वि.–

सप्रेम नमस्कार विनंती विशेष..

        सर्व रसिक वाचकांना आमच्या टीमकडून नमस्कार. नुकताच आपण 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला. ‘मायबोलीचा’ गौरव ही कल्पनाच मनाला नवीन ऊर्जा देते. ह्या निमित्ताने आपण मराठी लिखाणाची आणि वाचनाची आवड जपण्याचा दृढ निश्चय करूया!!

अशाच उद्देशाने स.न.वि.वि. तर्फे *मला आवडलेला दिवाळी अंक* ह्या विषयी अभिप्राय मागवलेला आहे.महाराष्ट्र मंडळाच्या कुठल्याही विभागीय वाचनालयातून आपण दिवाळी अंकाची नाममात्र फी भरून बरेचसे अंक वाचू शकता आणि आमच्या ईमेल आयडीवर तुमचा अभिप्राय देखील पाठवू शकता. आपल्या अभिप्रायामुळे आणखी काही वाचक सक्रिय होतील/ व्हावेत हीच आमची अपेक्षा! महाराष्ट्र मंडळाच्या मुख्य तसेच विभागीय वाचनालयात इतर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. कृपया अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या शाखेला संपर्क करावा.

जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने समस्त स्त्री शक्तीला आमचा मानाचा मुजरा!!

याच महिन्यात 12 मार्च  रोजी   संगीताचा सुश्राव्य कार्यक्रम होणार आहे.  मी अर्थातच ‘Chowdaiah Memorial Hall’ मध्ये होणार्‍या *वसंतोत्सव* विषयी सांगत आहे. त्याविषयीची सविस्तर माहिती पोस्टरमध्ये दिलेली आहे.

ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल आपल्याला आता ठायीठायी मिळत आहे; त्याप्रमाणेच ‘साहित्योन्मेष’च्या स्पर्धकांच्या  प्रतिभेलाही दिवसेंदिवस नवनवीन धुमारे फुटत आहेत. त्यांचे वैविध्यपूर्ण लेख वाचून तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल. साहित्योन्मेष’ मधील लेखांविषयी आपले अभिप्राय स.न.वि.वि. कडे जरूर पाठवा.

ह्या महिन्याच्या  स.न.वि.वि.मध्ये  सौ.विद्या चिडले यांच्याकडून वनौषधी सदरांतर्गत *पुदिना* ह्या सहजपणे वाढू शकणार्‍या वनस्पती विषयी वाचकांना माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे श्री. राजेंद्र पडतुरे यांचा ‘समर्थ रामदासांची शिकवण’ हा अभ्यासपूर्ण लेख आहे. शिवाय सौ. रेवती कुलकर्णी यांनी  महाशिवरात्रीवर मुक्तछंदात रचलेली कविता देखील वाचावयास मिळेल.

एकूणच अंक कसा वाटला हे जर कळवत राहिलात तर आम्हाला खूप समाधान वाटेल.

सालाबादप्रमाणे पुढील महिन्यात महाराष्ट्र मंडळातर्फे ‘अभिमान आणि योगदान पुरस्कार’ देण्यात येणार आहे. या वर्षीचे मानकरी कोण असतील या विषयीची सर्व माहिती लवकरच देण्यात येईल. या आणि अशा अनेक बाबींवर पुढच्या वेळेस संवाद साधू..तोपर्यंत आपली रजा घेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *