सत्यम एव जयते
हा मंत्र, नुसता मानू नका तर जाणा !
–पंकज पंडित
सत्यम एव जयते:सत्याचाच विजय होतॊ ; असं मांडुक् उपनिषदातील ब्रह्मवाक्य आहे. परंतु कधी कधी सूर्य जसा झाकोळतो तसं सत्य अवगुंठीत होते; निराशेचे ढग भोवती जमा होतात .मात्र अशा वेळेस , आत्मविश्वास कायम असेल, तर सत्याचाच विजय होतो ; जगात न्याय कायम आहे याची प्रचिती येते. अशा निर्णायक वेळेस, आत्मविश्वास कमी पडला तर मात्र पराभुत व्हावें लागते. म्हणुन अशा वेळेस कोणीतरी आपल्याला धीर देण्याची गरज असते .असा मनाला उभारी देणारा संदेश आपल्याला एखाद्या गाण्यातून किंवा आत्मसंवादांतून मिळू शकतो ; जर अंतर्मनाची कवाडं उघडी असतील तर ! वा , कोणी अनोळखी व्यक्तीसुद्धा, अभवितपणे असा संदेश आपल्याला देऊ शकते .अशा संकेताचा योग्य अन्वयार्थ लावणें आवश्यक असते .
आयुष्यात सत्याच्या कसोटीचे प्रसंग येतात जसे, नोकरीमध्ये आत्मसन्मानाला धक्का बसतो किंवा जवळच्या लोकांना जीवघेण्या आजार ग्रासतो ; कधी भावनिक, आर्थिक कोंडी होऊ शकते. धीर न सोडल्याने . त्यातुन प्रत्येक वेळी सत्याचाच विजय होतो.
सार्वजनिक मालकी उपक्रम(PSU) असलेल्या विमान कंपनीच्या मुख्यालयात मी नोकरी करत होतो. केवळ एक बौद्धिक आव्हान म्हणून स्वीकारलेल्या, माझ्या कामाच्या चाकोरीबाहेरच्या, एका मोठ्या प्रकल्पाला शेवटपर्यंत यशस्वी केल्यामुळे , खरे तर माझा मोठा सन्मान होईल अशी माझी अपेक्षा होती . पण तो मिळायचा सोडून , माझी “शिक्षा म्हणून बदली”, मुख्यालयातून हकालपट्टीच करण्यात आली ; त्याचे दुःख मला खूप सलत होते अशा वेळेस, काय करावे ते सुचत नव्हते.
सिंहावलोकन : माझ्या मनाविरुद्ध बदली केलेल्या , कामाच्या जागेवर रुजु तर झालो पण घडलेल्या प्रसंगाच्या कडवट स्मृती पुसल्या जात नव्हत्या . एका कामाच्या जागेतून, दुसऱ्या जगात, आकस्मिक बदली म्हणजे मृत्यूचाच अनुभव असतो! आपल्या comfort झोनला तडा जातो.रोजच्या दैनंदिन सवयीना फाटा बसतो. काही काळापुरती का होईना, जगाकडे बघण्याची , एक “नवीन दृष्टी” लाभते .या नवीन दृष्टीने भारतातील माहिती तंत्रज्ञान या उदयाला येत असलेल्या क्षेत्राकडे, मी बघू लागलो .मात्र ज्या कंपनीने अशी अन्याय वागणूक दिली, ती कंपनी सोडावी अशी इच्छा मात्र अजून झाली नव्हती. कारण सरकारी नोकरी कोणी अभावानेच सोडतात.
अचानक एका दिवशी, आमच्या कार्यालयाच्या स्वागत कक्षामध्ये , एका राजकीय पक्षाचे सन्मान्यनीय उच्च पदाधिकारी आले; एका अनामिक ओढीने , मी त्यांना अभिवादन करायला गेलो . त्या वर्षी नुकत्याच मिळालेल्या कोऱ्या करकरीत रोजनिशीत, त्यांना संदेश लिहायला सांगितला, त्या महोदयांनी, “With Best Wishes for a bright future” असा संदेश लफ्फेदार सही करून लिहिला नंतर तो “दिनविशेष” होता, हे माझ्या ध्यानात आला; तारीख होती ०३-०३-०३ सोमवार, फाल्गुन चंद्रमासाची प्रतिप्रदा ! खाली पहा
हा ईश्वरी संकेत आहे अशी माझी मनोमन धारणा झाली.झाकोळलेल्या आत्मविश्वासाला नवीन प्रेरणा मिळाली. नवीन चंद्र, उन्मिलित मन, देऊन गेला! या कलाटणीनंतर. प्रतिकूल वाटणाऱ्या परिस्थितीतून, सर्व चांगलेच निष्पन्न होण्याचा अनुभव पदोपदी येऊ लागला.
कर्मधर्मसंयोगाची साखळीच सुरु झाली अवघ्या दोन महिन्यात, बंगलोरमधील नीतीमूल्यांना विशेष महत्व देणाऱ्या, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उदयोन्मुख होत असलेल्या अग्रगण्य कंपनीत, मोठया पदाची नोकरी मिळाली. स्वेच्छानिवृत्तीची घसघशीत सवलत घेऊन, मी सरकारी विमान कंपनीला रामराम ठोकला.
भाग्योदय:-यश-कीर्ती-लक्ष्मी : पुढील सहा वर्षात, माझ्या कोत्या मनाच्या कल्पनेपेक्षा , अधिक पैसे अडकाच नव्हे तर मानसन्मान, प्रतिष्ठा आणि अधिकाराच्या जागा मिळाल्या. बंगलोरसारख्या सुंदर शहरात, जयनगरच्या शांत परिसरात, आमचे छान बस्तान बसले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम,परदेश गमन, अमेरिकेत वास्तव्य अशा इच्छासुद्धा पूर्ण झाल्या.
सात वर्षांनी काव्यात्म न्याय आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या कामासाठी , सरकारी विमान कंपनीने माझी अपमानास्पद बदली केली होती, त्याच कामासाठी , त्यांनी एका जगद्विख्यात बहुराष्ट्रीय कंपनीची निवड केली आणि पुर्वानुभवाच्या जोरावर, त्या बहुराष्ट्रीय कंपनीत , “प्रोजेक्ट लीडर” म्हणून माझीच निवड झाली! सात वर्षांपूर्वी अर्धवट सोडलेले काम, मी नेटाने पूर्ण केले. आता माझ्यामागे एका मोठया बहुराष्ट्रीय कंपनीची सर्व ताकद होती.
“मेल्यानंतरच स्वर्ग दिसतो” म्हणे: म्हणजे आधी मरायला तयार पाहिजे ना ? त्याला तर कोणीच तयार नसतो “जगाच्या पाठीवर” चित्रपटातील “जग हे बंदिशाला” या गाण्यात “गदि माडगूळकर म्हणतात, “सुटकेलाही मन घाबरते” कोत्या मानसिक बंदिशाळेतून मुक्ती म्हणजे मरण. म्हणून अशी मुक्ती जो आपल्याला देतो, त्या व्यक्तीला, दोष न देता, आभारच मानायला पाहिजेत. पुढे मुक्त अर्थव्यवस्थेत, मी २००३ मध्ये सोडून आलेल्या, सरकारी विमान कंपनीची आणि कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय झाली ; पगार महिनोंमहिने मिळत नसे दुसरी नोकरी मिळनेसुद्धा दुष्प्राप्य. मानहानिपूर्वक बदलीचा कटु व्यक्तिगत अनुभव आला नसता तर? तर ती कंपनी सोडायचा विचारदेखील, माझ्या मनात आला नसता.
“आयुष्यात बदल” हे कायम होत राहणार. बदल(Change) हा मरणासारखा यातनामय असतो. तरीही जीवनातील बदल हे मृत्यूसारखेच अंतिम, अपरिहार्य सत्य, जो स्वखुशीने स्वीकारतो त्याच्या आयुष्यचं “चीज” होते “Who moved my cheese “? या पुस्तकात हेच तत्व, चार उंदरांच्या उदाहरणावरून सिद्ध केले आहे. (Accept change, wholeheartedly, instead of resisting it )
महर्षी व्यास यांनी “हा जय नावाचा इतिहास आहे” असं नाव महाभारताला दिले होते जगात शोकांतिकेची जास्त वाहवा, चर्चा होते, दुःखाचे भांडवल केले जाते. अभिजात साहित्य, शोकांतिकाच असतात. कारण निर्मितीमागची प्रेरणा दुःखापोटी झालेली असते. बहुसंख्य लोक , “दुःखाला का आतुर” असतात?
सत्याचा विजय म्हणजे सुखांतिका “त्या दिवशी”, “त्या अनोळखी व्यक्तीतर्फे”(जे नंतर भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती झाले ) अनाहूतपणे आलेला संदेश, जर “माझ्यापर्यंत” पोहोचला नसता तर?-तर मग “कलियुगात खऱ्याला वाली नाही”, “चांगल्या कामाची कदर नाही” असा कडवटपणा सर्व कुटुंबाच्या आयुष्यात आला असता. कारण कुटुंब प्रमुखाच्या यशापयशाची छाया , कुटुंबच्या सर्व सदस्यावर पडते.
हिरण्मयेन पात्रेण, सत्यस्यापिहितं मुखम् ।( इति ईशावास्य उपनिषद) म्हणजे भ्रामक असत्य हे चकचकीत सोन्याच्या भांड्यासारखे. असते.सत्याचा चेहेरा अशा “मोहक असत्याने” लपविला. असतो खऱ्या सत्याचा शोध घ्या.सत्याची कासोटी सोडू नका.
“गहना कर्मणो गति” इति श्रीकृष्ण त्याने सांगितलेला निष्काम कर्मयोग म्हणजे फलाषेचा , संकुचित स्वार्थाचा त्याग करून, चांगले कर्म करत राहा णे . केलेले कर्म फुकट जात नाही, जरी त्याचे फळ लगेच मिळत नसले तरी.
“सत्यम एव जयते, हे भारताचं आदर्श, राष्ट्रीय बोधवाक्य आहे “सत्यम एव जयते”, हा मंत्र, नुसता मानू नका. तर जाणा आणि जगा”. आताच्या कलियुगात, “सत्य, धर्म, न्याय शिल्लक राहिला नाही” असे निराशावादी विचार प्रसृत करून, कोणाचा बुद्धीभेद करू नका.
१ सत्यावरचा विश्वास म्हणजे ईश्वरावरील विश्वास आहे.
२ प्रत्येक सत्याच्या पाठीराख्याला यशस्वी झालेले ईश्वराला पाहायचे असते.
३ सत्यासाठी तडजोड करायची नाही.
अशा ठाम धारणा, स्वानुभावातूनच उमगल्या पाहिजेत . “सत्यम एव जयते”, ची अनुभूती घेण्याचा सुयोग सर्वांच्याच आयुष्यात येऊ दे, ही सदिच्छा !——————————————–Email panditpank@gmail.com
