सनविवि अनुभव साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले?

साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले?

माणिक

असे दांडगी इच्छा ज्याची,मार्ग तयाला मिळती सत्तर,

असे जगावे दुनियेमध्ये ,आव्हानाचे लावून अत्तर

नजर रोखुनी नजरेमध्ये,

आयुष्याला द्यावे उत्तर—“

किती सुरेख ओळी ह्या विंदांच्या—

सनविवी ने घेतलेल्या स्पर्धेने आम्हाला काय दिले तर एक आव्हान दिले—दिलेल्या विषयावर लेखन करण्याचे आव्हान, वैविध्यपूर्ण  विषयांवर विचार करून ते आव्हान पेलण्याचे आव्हान—- . “देणारे हात” अनंत असतात; पण “घेणाऱ्याचीच ” झोळी अपुरी पडते, असेही घडते कैकदा. प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक प्रसंगातून आणि प्रत्येक व्यक्तिकडून काहीतरी शिकण्यासारखे असते हे नक्की. त्यात “स्पर्धा” म्हटली की तुलना आलीच, चढाओढ आलीच. पण ह्या स्पर्धेने अगदी मैत्री म्हणता येणार नाही पण  परिचयाचे क्षेत्र वाढवले. अगदीच अनोळखी असणारे सह स्पर्धक, कालांतराने खूप दिवसांचे परिचित असल्यासारखे वाटायला लागले.

छान नवीन ओळखी झाल्यात. एकमेकांचे विचार समजून घेता आले,तर कधी त्या विचारांचे व्यक्तिगत “शेअरिंग” देखील  करता आले.आणि प्रत्येकाचा एकाच विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगवेगळा असू शकतो हे देखील लक्षात आले. विशेषतः “दिलेल्या मुद्द्यांवरून जेव्हा कथा गुंफायला ” सांगितली गेली,त्यावेळी हे प्रकर्षाने जाणवले. आणि आठवला, तो दृष्टांत—बाणभट्ट नावाच्या एका सांस्कृतिक साहित्यिकाने आपला साहित्यिक वारस नेमण्याच्या उद्देशाने आपल्या दोन मुलांची परीक्षा घेतली. बाहेर पडलेल्या एका लाकडी ओंडक्याकडे बोट दाखवून त्यांनी दोघांना विचारले, ह्याविषयी तुम्हाला काय वाटते? मोठया मुलाने उत्तर दिले, “शुष्कक,काष्ठक, तिष्ठत,त्यगरी “

धाकट्याने उत्तर दिले,” निरस, तरुरीह, विलसती,पुरत:—“

आणि बाणभट्टानी धाकट्या मुलाला आपला साहित्यिक वारस घोषित केले. म्हणजे एकाच गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन किती वेगळा असू शकतो हेच यावरून सिद्ध होते. असो. सनविवी ने “पत्र–लेखन” सारखा कालबाह्य प्रकार ( व्यवहारातून बाद झालेला,अर्थात ) देखील हाताळायला  दिला. ज्यामुळे जुन्या दिवसातील काही सुखद आठवणी जाग्या झाल्या. “जीवनातील

अविस्मरणीय प्रसंग” हा विषय देऊन घडून गेलेल्या  घटनांचे पुनश्च स्मरण करून दिले. काही आनंदाचे प्रसंग आपल्याला आठवणीत का असेना, पुन्हा पुन्हा अनुभवायला आवडतात कारण ते पुन : प्रत्ययाचा आनंद देऊन जातात. वाईट प्रसंगातूनही काहीतरी धडा मिळतच असतो.

काहींना तर दुःखद आठवणीतही रमायला आवडते. त्यामुळे देखील सनविवी चे आभारच. “बिघडले ते, घडले कसे” यासारख्या विषयातून विनोदनिर्मिती चा आनंद देण्यात आणि घेण्यात आला. फक्त  माझ्या मते एक प्रकार राहून गेला—“एखाद्या विषयावर छोटीशी नाट्यकृती( नाटक) . आणि विशेषतः “कोरोना काळातील अनुभव” असा विषय हवा होता. अर्थात, हे माझं व्यक्तिगत मत झालं. आयोजकांनी जे विषय दिले त्याचे स्वागत आणि त्यांच्या मर्यादा जाणून घेऊन आम्ही आमच्यापरीने पुरेपूर प्रयत्न केलाय. खरं सांगायचं तर “लेखन”  हे व्यक्त होण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. बरेचदा काही गोष्टी आपण प्रत्यक्षात किंवा समोरासमोर बोलू शकत नाही, तिथे लेखणी उत्तम काम करू शकते.  कुणाच्याही भावना न दुखावता, कुठल्याही संघर्षाला वाव न देता केलेले लिखाण योग्य तो परिणाम साधू शकते, असे मला वाटते. म्हणूनच सनविवी चे विशेष आभार. आम्हाला “व्यक्त होण्याची संधी” दिल्याबद्दल.

ह्या स्पर्धेने “सातत्य” शिकवले. नियमितपणे, न कंटाळता,न खचता लिखाण करण्याचे बंधन  स्वतःवर घालून घेण्याची सवय लावली. एक प्रकारची जबाबदारी पार पाडण्याचे कसब शिकवले. “शिस्त आणि काटेकोरपणा”  ह्या महत्वाच्या गोष्टींची सवय लावली, शब्द  आणि वेळेची मर्यादा देऊन. —सनविवी च्या प्रत्येक  महिन्यातील अंकाची प्रतीक्षा, त्यात स्वतःसोबत इतरांचेही लेखन वाचण्याची उत्सुकता, आयोजकांनी घेतलेल्या आणि यशस्वीपणे पार पाडलेल्या नवनवीन उपक्रमांची माहिती, रेवती मॅडम च्या कविता, विद्या चिडले ह्यांची वनस्पती औषधांवरील उपयुक्त माहिती, मुखपृष्ठावर असणारे अंकाचे मोहक रूप बघणे—–काय नाही दिले ह्या स्पर्धेने? एकीकडे स्पर्धकांची बौद्धिक कुवत तपासत असताना दुसरीकडे वैचारिक खाद्य देखील पुरवले.  महाराष्ट्राबाहेर राहून महाराष्ट्राची परंपरा जपत, मराठी अस्मितेचा सार्थ अभिमान बाळगत जे कार्य सनविवी ने  हाती घेतले आहे, त्याबद्दल आम्ही स्पर्धक सनविवी चे कायम ऋणी रहाणार आहोत. आम्हाला तर  सरळ एका राज्याच्या सीमा ओलांडून  दुसऱ्या राज्याशी जोडून घेतले.😊🙏

स्पर्धेचा निकाल काय लागायचा तो लागेल,पण हे मात्र नक्की की अशा स्पर्धांमुळे “आत्मभान” जागृत होते. आपल्या आत असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळू शकतो. “आत्म–परीक्षण” करण्याची संधी मिळते. “आपण नेमके कुठे आहोत” हे जाणून घेता येते.स्वतःला स्वतःची “नव्याने ओळख” होते म्हटले तर वावगे ठरणार नाही.”yes, I can do it” –हा विश्वास येतो.

“बक्षीस” मिळावं ही तर प्रत्येकाचीच इच्छा असणार.

मला विचाराल तर मी हेच म्हणेन,

” मी कुठे म्हणाले, पहिलेच मिळावे—फक्त पहिल्या तिनात मिळावे

नाही, प्रयत्न मनापासून आहेत,

मग किमान एक तरी मिळावे

स्वप्नात तर नेहमीच मिळते

कधीतरी—खरेखुरे मिळावे— “( पाडगावकरांची क्षमा  मागून)

शेवटी हेही तितकेच खरे की,

” उंची न आपुली वाढते फारशी,वाटून हेवा

श्रेय ज्याचे त्यास द्यावे,एव्हढे लक्ष्यात ठेवा—“( विंदा)

सनविवी ने आम्हाला वर्षभर लिहिते ठेवले त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते आणि पाडगावकरांच्याच ओळींनी शेवट करते.

” आहात तुम्ही सावरायला

म्हणून पडायला आवडते

आहात तुम्ही समजवायला

म्हणून चुकायला आवडते

आणि

आहेत  तुमच्यासारखे  प्रेरणा द्यायला

म्हणून लिहायला आवडते.

धन्यवाद! माझ्या सर्व प्रिय सह–स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा! भेटीचा योग लवकरच येवो, ह्या अपेक्षेत.🙏

 

माणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *