—पुरुदत्त रत्नाकर—
मित्रहो, तुम्हाला तर माहितीच आहे. मी आत्मनिर्भर भारतातला स्वयंमान्य कवी आहे.
गतवर्षी मी माझ्या पन्नास कविता घेऊन प्रकाशक मित्राकडे गेलो होतो.
“कवितांना तू एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची प्रस्तावना आण. त्यांच्या नावावर किमान चार-पाच हजार लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे… तर एखादी आवृत्ती खपेल.” नाभीकमलावर दाब देऊन ढेकर काढत त्याने मला सांगितलं होतं.
एवढा अफाट जनसंपर्क असणारा प्रतिष्ठित समाजघटक म्हणजे करोनालस देणारा डॉक्टर. माझा जिगरी मित्र सुघोष असा डॉक्टर आहे. मी रुग्णसेवेच्या वेळेतच त्याला भेटायला गेलो.
“काय, सगळं ठीक ना?”
“हो. हो. ठीकच. तुला एक कविता ऐकवावी म्हणतो.”
“तुझी कविता ऐकणं म्हणजे मला सुवर्णसंधीच की!”
रक्तदाब, रक्तशर्करा, ठोके वगैरे तपासत त्याने सहजच संमती दिली. मी ‘आई’ नावाची कविता काढली.
‘आई म्हणजे आई असते, असता दिसता नाहीशी होते;
मग ती डोळे मिटल्यावर समोर येते, आई म्हणजे आई असते.’…..
या शेवटच्या ओळी पोटतिडकीने वाचून मी वर पाहिलं. तो औषधं लिहून देत होता.
“तशी तुझी प्रकृती उत्तम आहे. पण आईच्या आठवणींनी तू नैराश्यग्रस्त झाला आहेस. तुला निद्रानाशही जडलायसं दिसतं. मनात तेचतेच विचार आल्यामुळे तुझं मानसिक संतुलन ढासळलय. महिनाभराच्या गोळ्या लिहून दिल्यात. डोस संपेपर्यंत लिखाण बंद. बरोब्बर एका महिन्याने ये.” मी त्याचं शुल्कसुवर्ण भरलं. मी औषधं घेतली नाहीत पण काव्यप्रस्तावनेला अफूची गोळी मिळाली.
अशी आणखी वल्ली कोण शोधायची? विचार चालू होता एवढ्यात माझा गल्लीतला सवंगडी घरी आला. हा जागा खरेदी-विक्रीत दलाली करतो. ह्याने नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता.
“काळजीत दिसतोस. पालिकेतून काही काम करून हवं असेल तर लग्गेच तडीला नेऊ.” मी त्याला पालिकेची नाही तरी काव्यप्रस्तावनेची कैफियत सांगितली.
“एवढंच? झालं समज.” त्याचे नेत्रकमल प्रफुल्लित झाले. त्याने आडोशाला जाऊन पटापट काही भ्रमणध्वनिसंपर्क जोडले.
“सगळी योजना ठरवूनच आलो. ‘यज्ञघोष बिल्डर’ तुला पुढच्या शनिवारी प्रस्तावना देतील. सप्टेंबरमध्ये तू संग्रह छापून घ्यायचा.”
अरे वा! यज्ञघोष अख्ख्या महाराष्ट्रात गाजणारं नाव! मी हुरळून गेलो. देवासारखा भेटला हा. गल्लीतला उडाणटप्पू म्हणून मी त्याच्यापासून दूरच राहायचो. पण अडचणीत असेच मित्र कामाला येतात. तो पुढे म्हणाला,
“मग ऑक्टोबरमध्ये आपण तुझ्या या जागेचा व्यवहार करून टाकू. बाजारभावाच्या वर दोन लाख रोख देतील यज्ञघोषसर.”
“पण रहाती जागा विकून मी कुठे जाऊ !?”
“तुला मी भाड्याचं घर मिळवून देतो.” एका प्रस्तावनेच्या बदल्यात वडीलोपार्जित जागेशी प्रतारणा करायचा प्रस्ताव विदारक होता.
तो निघून गेला आणि मला शक्कल सुचली. यज्ञघोष नाही तर अनंतविजय आहेतच की. एका बाकावर बसायचो आम्ही. ते भाऊ खान्देशापुरतं का असेना, पण बांधकाम व्यावसायिक म्हणून बडं प्रस्थ झालेत. गेलोच मी अन्याकडे.
“तू लिही आणि माझं नाव लाव, काय?”
“हो, हो. अन्या, तुझे आभार कसे मानू समजत नाही.”
“आभार कसले रे. प्रकाशक कोण, आपला पंचू ना?” त्याने लगेच पंचूला भ्रमणध्वनीसंपर्क केला.
“हां… कोण? पंचू ना? बाकी सगळं ठीक. मी काय म्हणतो आपल्या कविराजांचा संग्रह लगेच छापून टाक. मी स्वतः प्रस्तावना देतोय. पाचशे-एक प्रति मला पाठवून दे. घरं विकतांना कागदपत्रांबरोबर गिर्हाईकाला ही अभिरुचिसंपन्न भेट सप्रेम देईन.”
“अन्या, पाचशे प्रति तुझ्या गिर्हाईकांसाठी मी फुकट पाठवल्या तर छापखाना आणि प्रकाशनव्यवसाय विकून तुझ्या इमारतीभोवती गुरखा बनून फिरावं लागेल मला.” …परत एकदा प्रस्तावनेला चुना लागला.
काही दिवसांनी आणखी एक मित्र कौटुंबिक शुभकार्याचं बोलावणं करायला आला. हा बहुराष्ट्रीय उद्योगात मातब्बर अभियांत्रिकी व्यवस्थापक आहे. त्याच्या संपर्कात हजारो कंत्राटदार, दुकानदार, गिर्हाईकं असावीत. म्हंटलं सावज आयतं चालून आलं आहे. काव्यसंग्रह खपवायलाही मदत करेल. आधी एक कविता ऐकवून खुलवूया याला.
“नीट ऐक हं देवदत्त.”
“हो, हो, पण आत्ता एकच हं. आणखी बरीच आमंत्रणं करायची आहेत…”
‘बरं’ म्हणून मी त्याला,
‘वाटे मज,
कोसळत्या धारेतला चुकार तुषार व्हावे,
अवखळ वार्यासंगे खुशाल पसार व्हावे’
ही निसर्गकविता पूर्ण ऐकवली आणि आशाळभूत नजरेने त्याच्या मुखकमलाकडे बघितलं. कमळ कोमेजल्यासारखं वाटत होतं.
“तेवढीशी जमून आली नाहीये का?”
“हः ss.. तसं नाही.” व्यवस्थापकमहोदय उसासा टाकून म्हणाले,
“तुषार होऊन कायकाय करावं वाटतंय ते ठीक आहे. पण आत्ता काय अडचणी आहेत म्हणून तुषार व्हायचंय? तुषारच का, पराग का नाही? …आणि तुषार नाही होता आलं तर ‘फॉलबॅक प्लॅन’ काय? याचे उल्लेख असायला हवेत. शिवाय हिमालयापासून अरबी समुद्रापर्यंत उंडारून हाती काहीच लागत नाही. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”…… काव्यप्रस्तावनेचा प्रस्ताव कोरा करणे हेच ‘पर्यायी नियोजन’ मी अवलंबले.
एकदा माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातल्या मित्र मणीने त्याच्या शेकडोमधल्या एका मेजवानीला मला बोलावलं होतं. तो मला बाजूला घेऊन म्हणाला,
“फार विचारमग्न दिसतोस.” …वचने किं दरिद्रता? त्याचे करकमल घट्ट पकडून मी काव्यप्रस्तावनेबद्दल बोललो.
“तुझ्या कविता ठेवून दे.”
“…आणि?”
“…आणि माझं ‘काव्यरवी’ हे सॉफ्टवेअर विकत घे.”
“काव्यरवी?”
“हो. २०२० पर्यंतच्या मराठीतल्या सर्व कविता त्यात आहेत. तुला ‘ए’कारांत कविता करायची असेल तर तू ‘काव्यरवी’ला एकारांत कविता वेगळ्या काढायला सांगायच्या. मग ‘घुसळ’ म्हणायचं. की काव्यरवी निवडलेल्या सगळ्या कवितांमधल्या ओळी घुसळून खालीवर करून देईल. मग तू त्यातल्या कुठल्याही हव्या तेवढ्या ओळी निवडायच्या. त्या ओळींच्या अधल्यामधल्या कुठल्यातरी ध चा मा केला की तुझं स्वतःचं काव्य’नवनीत’ तयार! शिवाय ज्या प्रसिद्ध कवीच्या जास्त ओळी तुझ्या कवितेत येतील त्याचा प्रभाव तुझ्या कवितेवर जाणवेल. त्याची प्रसिद्धी माझा चमू करेल.”
“अरे पण या सरमिसळीमुळे अर्थाला विरजण लागेल…”
“अर्थ नाही हे कळायलासुद्धा आधी वाचावं लागतं आणि काव्यरवीवर इतरांनी वाचलं की तुझं अर्थार्जन झालं. हल्लीचे वाचक साक्षर असतील. ते सुशिक्षितही आहेत असा किंतु मनात आणू नकोस.” मला गरगरलं.
“मला फक्त प्रस्तावना हवी आहे रे मित्रा.” म्हणत मी तिथून काढता पाय घेतला आणि काव्यप्रस्तावनेचा अर्थाअर्थी फज्जा उडाला.
काही कामाने पुण्याला जायचा योग आला. तिथे आमचे एक पितृतुल्य मित्रवर्य रहातात. ते पुरस्कारप्राप्त साहित्यिक. त्यांच्या चरणकमलांवर डोकं ठेवलं. ‘समानशिले व्यसनेषु सख्यम’ हे स्मरून, माझं शीलही साहित्यच आहे हे दाखवायला गेलो. घरच्या कृष्णधवल मुद्रकावर एक कविता छापून नेली होती. ती आवडली तर काव्यप्रस्तावनेला उषःकाल दाखवायचा विषय काढला असता. लिखाणाच्या पार्श्वभूमीवर कवितेला साजेसं छायाचित्रं होतं. त्यांनी वाचल्यासारखं केलं आणि म्हणाले, “गडद्द पार्श्वभूमीवर गडद्द छपाई.. छ्या छ्या छ्या. सादरीकरण कसं नेत्रदीपक हवं. हा बघ, माझा ताजा काव्यसंग्रह. डोळ्याचं पारणं फेडणारी बहुरंगी छायाचित्रं यात आहेत. काही जुन्याच कविताही एकत्र करून घातल्या आहेत. खुश्शाल घेऊन जा. प्रकाशनपूर्व मूल्य लावतो. हाच भ्रमणध्वनि यूपीआयला आहे. वडिलकीचा कानमंत्र देतो. आधुनिक काळात माणसं आणि पुस्तकं, दोन्हीही, वाचली जात नाहीत; फक्त न्याहाळली जातात.”

तुमची मिश्कील लिखाण शैली आवडते! तुमच्या साहित्याला बर्याचदा संवादांचा छान ओघ असतो. तुम्ही नाटिका / एकांकिका लिहून पाहिली आहे का? तो फॉर्म तुमच्या शैलीला खूप अनुकूल आहे असे वाटते. ते नाही तर एखादी शॉर्ट फिल्मची पटकथा लिहिलीत तर महाराष्ट्र मंडळातील काही समविचारी आणि समरसिक कलाकार मंडळींना घेऊन एखादा लघुपट प्रकल्प हाती घेऊया? तुम्ही खरोखर कवी वगैरे असाल तर मात्र मी जरा जपूनच राहीन! 🙂