— विशाखा पेंडसे-पंढरपुरे —
“आई, डबा दे ना लवकर..रिक्षावाले काका आले.”
किमयाने घाईघाईने बूट चढवत हाक मारली.
“आई…आई..”
काहीच उत्तर येईना तेव्हा किमया तशीच बूट घालून घाईघाईने स्वैपाकघराच्या दाराशी आली. पाहते तर क्षितिजा डायनिंग टेबलजवळ उभी राहून विचारात मग्न होती. किमयाचा डबा समोरच टेबलवर होता.
“आई..” किमयाने जरा जोरातच हाक मारली. क्षितिजा एकदम दचकली.
“डबा दे ना”
“हो हो”
डबा घेऊन आईला बाय करून किमया भुर्रकन निघून गेली आणि क्षितिजा भानावर आली. आज सकाळपासून हे असंच चालू आहे आपलं. सकाळी केदारही म्हणत होता, आज लक्ष कुठाय तुझं?
काल संध्याकाळी स्टेशनजवळ साकेतला बघितल्यापासून ही अस्वस्थता आली आहे आपल्याला. तो साकेतच होता ना नक्की? मग त्याने मला ओळख का दिली नाही? आणि ती मवाली दिसणारी माणसं कोण होती त्याच्याबरोबर? सख्खा चुलतभाऊ आपला, पण असा तुटक का वागतो? आपल्या घरापासून इतक्या जवळ रहायला आलाय, पण स्वतःहून फोनही नाही केला त्याने. दोन महिन्यांपूर्वी अचानक बाजारात भेटला म्हणून कळलं तरी इथे राहतो ते. हल्ली एकलकोंडा झालाय, काकाकाकूंशीही जास्त संपर्क ठेवत नाही असं आई म्हणाली होती खरी, पण माझं आणि त्याचं लहानपणी किती छान जमायचं. सारखा ’ताई, ताई’ करत माझ्या मागे असायचा. या मधल्या काळात आपणही त्याच्याशी फारसा संपर्क ठेवला नाही हे खरं. पण म्हणून इतका तुटकपणा? फोन केला तरी उचलत नाही. कधी अचानक फोन करतो आणि घाईघाईत ठेवतोही. घरी ये म्हटलं तर येत नाही. त्या दिवशी खनपटीलाच बसले म्हणून त्याच्या घरी घेऊन गेला. पण किती अस्वस्थ होता! एकाही प्रश्नाचं सरळ उत्तर दिलं नाही. आणि ते घर तरी कसलं..केवढी जुनाट बिल्डिंग. भाडं कमी आहे म्हणे तिथलं. नोकरी शोधतोय असं एकीकडे म्हणतो पण केदारला बायोडाटा देऊन ठेव म्हटलं तर टाळाटाळ करतो. काल तर हद्द झाली.
विचार करकरून क्षितिजाचं डोकं भणभणायला लागलं. तो काही चुकीच्या मार्गाने जर जात नसेल?
आज या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा..तिने ठरवलं. ती गाडीवरून त्याच्या घरी जायला निघाली. पुढच्या दहा मिनिटांत ती तिथे पोचली. दाराची बेल वाजवली. काहीच प्रतिसाद नाही म्हटल्यावर तिने दार जरा जोरातच वाजवलं आणि तिच्या लक्षात आलं की दार नुसतं लोटलेलंच आहे. तिने हलकेच ते ढकललं. दार उघडताच आतलं दृश्य पाहून ती दचकलीच. खुर्चीवर साकेत वाकडातिकडा पडला होता. क्षितिजा धावतच आत गेली. त्याला सरळ बसवण्याचा प्रयत्न करत ती एकीकडे त्याला हाका मारत होती. पण त्याचा काहीच प्रतिसाद येत नव्हता. मनातली भीती दाबून टाकत क्षितिजाने स्वैपाकघराकडे धाव घेतली आणि बाटलीतलं पाणी आणून साकेतच्या तोंडावर मारलं. त्याने थोडी हालचाल केली तेव्हा तिच्या जिवात जीव आला. त्याच्या चेहर्यावर माराचे वळ होते, दंडातून थोडं रक्तही आलेलं दिसत होतं. तो अर्धवट शुद्धीवर आला होता. क्षितिजाने आधी जवळच्या हॉस्पिटलला फोन करून ॲंब्युलन्स बोलावली आणि ती येईपर्यंत केदारला फोन करून हा सगळा प्रकार थोडक्यात सांगितला. एकीकडे ती साकेतला हाका मारत शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतीच.
दुसर्या दिवशी..
क्षितिजा हॉस्पिटलमधे साकेतच्या बेडजवळ बसली होती. त्याला झोप लागली होती. तो आता आदल्या दिवशीपेक्षा बराच चांगला दिसत होता. जखमा जास्त गंभीर नव्हत्या, पण डॉक्टरांनी तो ड्रग्स घेत असल्याची शंका बोलून दाखवली होती, त्यामुळे त्यासाठी त्याचं रक्त तपासायला पाठवलं होतं. त्याचे रिपोर्ट्स आज मिळणार होते. त्याच्या अंगावरच्या माराच्या खुणा पाहून त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवायला लावली होतीच. काल तो बोलण्याच्या स्थितीत नव्हताच, त्यामुळे पोलीस आज येऊन त्याचा जबाब घेणार होते.
साकेतकडे पाहता पाहता क्षितिजाचे डोळे भरून आले. कसल्या जंजाळात फसलाय हा? ड्रग्स कधीपासून घ्यायला लागला असेल? त्यासाठी पैसे कुठून आणतो? चोर्यामार्या तर करत नसेल? काहीही करून याला यातून बाहेर काढलं पाहिजे. पण त्यासाठी तो आपल्याशी बोलायला तर हवा.
पुढच्या दोन दिवसांत तिने, डॉक्टरांनी आणि पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे विचारून, प्रसंगी धमकावूनदेखील साकेतने काहीच सांगितलं नाही. त्याला पोलिसांकडे कुणाविरुद्ध तक्रारही करायची नव्हती. तो अमली पदार्थ घेत होता हे रक्ताच्या चाचण्यांवरून स्पष्ट झालंच होतं. दोनतीन दिवसात ते न मिळाल्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. डॉक्टरांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा सल्ला दिला. केदारने मित्रांकडे, ऑफिसमध्ये वगैरे चौकशी करून एका केंद्राची माहिती काढून आणली. पण तिथे फोन केल्यावर असं कळलं की त्यांच्याकडे आठ दिवसांची वेटिंग लिस्ट होती! या केंद्राबद्दल खूप जणांनी अतिशय चांगलं मत दिल्यामुळे साकेतला तिथेच ठेवायचं हे क्षितिजाने नक्की केलं होतं. प्रश्न होता, तो या आठ दिवसांचा. त्याला तिने आपल्या घरी ठेवलं असतं, पण व्यसन लागलेली माणसं नशा मिळाली नाही तर हिंसक होतात, असं तिने ऐकलं होतं. तसं काही झालं असतं तर किमया घाबरली असतीच, शिवाय बिल्डिंगमधल्या शेजार्यापाजार्यांनीही कदाचित तक्रार केली असती. विचारांती तिने साकेतला त्याच्याच घरी ठेवण्याचं ठरवलं.
रोज सकाळी किमया शाळेत गेली, की क्षितिजा साकेतकडे येऊन बसत होती. दिवसभर ती त्याच्याबरोबर थांबायची. घरून आणलेलं जेवण त्याला जेवायला लावायची. त्याच्याशी बोलायची. त्याच्या मनात काय आहे, ते जाणून घ्यायचा प्रयत्न करायची. सुरुवातीला साकेत बोलायला फार उत्सुक नसायचा, पण क्षितिजाने मायेने त्याला बोलतं केलं आणि तो मोकळा होत गेला. कॉलेजच्या होस्टेलला असताना मित्रांबरोबर त्याने अधूनमधून दारू प्यायला सुरुवात केली होती. हळूहळू त्याला त्या नशेची चटक लागली. क्वचित कधीतरी पिण्याचं व्यसनात कधी रूपांतर झालं ते त्याला समजलंच नाही. सुरुवातीला चांगले असणारे मार्क्स प्रत्येक सेमिस्टरबरोबर घसरत गेले. तिसर्या वर्षी तर तो नापासच झाला. सुरुवातीचे सहा महिने तो घरी राहिला, पण मग ’घरी अभ्यास होत नाही’ या सबबीखाली कॉलेजजवळच खोली घेऊन राहिला. त्याचे पेपर्स तर सुटले नाहीतच, उलट तो व्यसनात अधिकच बुडाला. सिगारेट तो अधूनमधून ओढत होताच, पण आता त्याची अमली पदार्थांशीही ओळख झाली. घरून बाबा पाठवत असलेले सगळे पैसे तो यातच उडवत होता. बाबा त्यांच्या कारखान्यात व्यग्र असायचे. एकुलता एक मुलगा, त्यामुळे तो मागेल तेवढे पैसे ते सुरुवातीला पाठवत होते. पण मग त्यांनी पैसे पाठवणं कमी कमी केलं. त्यामुळे तरी त्याचं दारूचं व्यसन कमी होईल अशी आशा त्यांना वाटत असावी. पण तसं काही झालं नाही. मित्रांकडून पैसे उधार घेऊन याची व्यसनं सुरूच राहिली. पैसे परत करण्यासाठी मित्रांचे तगादे वाढत गेले आणि हा इकडे पळून आला. इथेही कर्ज करून ठेवलं. त्या दिवशी त्याला मार पडला होता, तो अशाच एका मवाल्याकडूनच, उसने पैसे परत न केल्यामुळे. शेवटी साकेतची अंगठी आणि घड्याळ तो घेऊन गेला होता.
हे सगळं ऐकता ऐकता क्षितिजाच्या अंगावर काटा आला. चांगल्या घरात वाढलेला हा हुशार मुलगा. आज काय वाटोळं करून बसलाय आयुष्याचं? डॉक्टरांनी त्याला काही औषधं दिली होती. त्यामुळे त्याला होणारा त्रास जरा कमी व्हायचा, पण तरी शरीराला लागलेली अमली पदार्थाची सवय, ती सहजासहजी कशी सुटणार? शरीराची मागणी पूर्ण झाली नाही, की ते असहकार पुकारायचं. साकेतला दरदरून घाम फुटायचा. छातीत धडधड व्हायला लागायची. अशा वेळी क्षितिजा स्वतःचा धीर एकवटून साकेतला धीर द्यायची. रात्री त्याला झोप लागली की मगच ती घरी जायची. या काळात केदार आणि किमयानेही क्षितिजाला पूर्ण सहकार्य केलं. शेवटी ते आठ दिवस एकदाचे संपले. क्षितिजाने काकांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यांना साकेतची ही परिस्थिती अगदीच अनपेक्षित होती असं नाही, पण तो दारूबरोबर ड्रग्जही घेतो हे मात्र त्यांना माहिती नव्हतं. व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर आल्यावर ते साकेतला घरी घेऊन जाणार होते.
व्यसनमुक्ती केंद्रात साकेतला दाखल करून बाहेर आल्यावर क्षितिजाने एक निःश्वास सोडला.पुढचा प्रवास सोपा नव्हताच. साकेत व्यसनातून जरी बाहेर आला, तरी त्याचं अर्धवट राहिलेलं शिक्षण, करून ठेवलेलं कर्ज, दुखावलेली माणसं, गमावलेला आत्मविश्वास हे सगळे प्रश्न आ वासून समोर उभे होते. पण व्यसनमुक्ती केंद्रातल्या डॉक्टर ताईंचे आधार देणारे शब्द तिला आठवले.. “आत्ता आपण फार पुढचा विचार करायचाच नाही. आत्ता महत्त्वाचं आहे, ते त्याचं व्यसन सुटणं. हे पहिलं पाऊल. ते नीट पडलं, की पुढचं पाऊल टाकायचं. आपल्यासमोर प्रश्नांचे डोंगर उभे आहेत, पण आपण आधी डोंगराच्या माथ्याकडे बघायचंच नाही. फक्त आधीचं पाऊल घट्ट रोवून ठेवून पुढचं पाऊल टाकत रहायचं. एक ना एक दिवस हे डोंगर पार होतातच!”
ही दीर्घ लढाई आपण सुरू केलेली आहे, ती जिंकण्यासाठीच, हा आत्मविश्वास घेऊन क्षितिजा घरी आली.