–पुरुदत्त रत्नाकर–
मी बंगळूरला आल्याला दोन आठवडे झाले होते. दुपारी माझ्या कुटुंबाला घेऊन पुण्याहून विमान हवेत झेपावलं त्यावेळी मी बंगळूर विमानतळावर त्यांना घ्यायला पोहोचलोही होतो.
गेले २ महिने मी नोकरी बदलण्याच्या विचारात आहे हे उघड केल्यापासून वडिलांनी नेहेमीप्रमाणे बदल अमान्य केला होता. खडाजंगी झाली होती. बाबांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना जळगावहून चिंचवडला उचलून आणून आम्ही एकत्र रहात होतो. एंजिओप्लास्टीनंतर काही महिन्यांनी ‘आता काही त्रास झाला तरच दवाखान्यात या’ अशी वैद्यकीय परवानगी मिळाली होती. तरीही बाबा दरमहा किमान एकदा, ‘मला जळगावला नेऊन सोड’ असा धोशा लावत. वाद टाळायसाठी मी दर खेपेला त्यांना दवाखान्यात नेऊन “हे एकटे राहू शकतात का?” असं डॉक्टरांना विचारत असे. बाबा खणखणीत बरे असले तरी कोणतेही डॉक्टर या प्रश्नावर नकार देणार याची मला खात्री होती.
पण बंगळूरला जायचं म्हंटल्यावर बाबा ईरेला पेटले. ‘चार माणसं आणलीस तरी मला उचलून नेऊ शकणार नाहीस. तेवढी रग आहे माझ्यात. बघच..’ असा सुर काढून झाला होता. माझा मुलगा केदार अजून चालू, बोलू शकत नव्हता. बायको बंगळूरमध्ये यायला उत्सुक होती. आईचा मला पाठिंबा होता, पण पिताश्री अडून बसले तर नव्या नोकरीवर सावट येईल इतके दिवस ते वाद वाढवू शकतात असं तिला वाटत होतं.
“आपण सगळे इथे रहातो तसं बंगळूरला रहाण्यात काय अडचण आहे?”
“मला प्रवासात काही झालं तर काय?”
“… तर सगळी जबाबदारी माझी.”
आत्याबाईला मिशा असत्या तर… स्वरूपाचे प्रश्न आणि त्याला तेवढीच हास्यास्पद उत्तरं. बोलण्यातला जोश आणि तर्क प्रकृति उत्तम असल्याची खूण होती. एका विमानप्रवासाने काही होणार नाही याची मला प्रश्नागणिक खात्री होत होती.
चिंचवडमधल्या नोकरीचा राजीनामा दिल्याने माझे परतीचे दोर कापलेले होते. मी बाबांशी दूरभाषवर बोलायचा प्रयत्न रोज केला. पण, ‘तू आधी समोर ये’ म्हणत त्यांनी बोलायचं साफ नाकारलं. बर्याच विचाराअंती, बाबांशी समोरासमोर पुरेशी चर्चा झालेली आहे; आता चर्चेसाठी नवीन मुद्दे नाहीत, हे माझ्या लक्षात आलं. बंगळूरमधे नोकरी सुरू झालेली. सगळे बंगळूरला येणं हे उद्दीष्ट आहे आणि बाबांशी बोलायला मी गेलो तर चिंचवडमध्येच मोठ्ठा बखेडा होणार; त्यात त्यांचा रक्तदाब वगैरे वाढला तर ती अडचण आहे. हे लक्षात घेऊन, मी त्याप्रमाणे योजना केली. मी नकळतपणे अपत्याच्या भूमिकेतून व्यवस्थापकाच्या भूमिकेत गेलो होतो.
योजना दूरभाषवर बायकोला समजावली. तिने आईला सांगितली. स्थलांतराचा खर्च मला कंपनीकडून मिळणार होता. मोठी मालवाहक गाडी पूर्णभार बंगळूरमधून विम्यासकट आरक्षित केली. दुसर्या दिवशी सामानाचा अंदाज घ्यायला मालवाहतूकदार चिंचवडच्या घरी गेले. बाबांनी आईला, बायकोला, काहीही प्रश्न विचारला तर त्या त्यांना माझ्याशी बोलायला सांगत. या कोंडीत बाबा पुरते अडकले. कधीतरी मी समोर येईनच आणि मग मला चांगला फैलावर घेता येईल अश्या विचारात बाबा चेव खाऊन तयार होत.
मी प्राथमिक इयत्तांमध्ये असतांना सायकलच्या पुढच्या दांड्यावर छोट्टसं आसन लावून, त्यावर बसवून बाबा मला शाळेत न्यायचे. त्यांना विमानात शेजारी बसवून बरोबर घेऊन फिरण्याचं स्वप्न आता गाडलं गेलं. बंगळूरमधूनच मी त्या चौघांचे विमानप्रवासाचे परवाने काढून बायकोला ईमेल केले. तिसर्या सकाळी लवकर बाहेर जाऊन तिने ते छापून आणले. आई आणि बायकोने वैयक्तिक सामानाच्या थैल्या भरायला घेतल्या. तो बंगळूरहून कधी येणार? याचा खुलासा न करता दोघींनी त्यांनाही तेच करायला सुचवलं. त्या सरळ माणसाची कुठल्या कृतीवर प्रतिक्रिया काय असणार ह्याचे अंदाज बांधून त्याप्रमाणे योजना केलेली! ती सफल होते आहे ह्याची बित्तंबातमी मला अधूनमधून पोहोचत होती. १० वाजेनंतर मालवाहू कामगार गेले आणि सामान खोक्यांमध्ये बांधून ट्रकमध्ये भरू लागले. आई आणि बायको त्यांना सूचना देत होत्या आणि मदतही करत होत्या. बाबांना त्यांना थांबवणं शक्य नव्हतं. त्यांच्याकडे सोपवलेला नातू त्याची भूमिका चोख पार पाडत होता!
संध्याकाळी सामान रवाना झालं. संध्याकाळनंतर बाबा त्यांच्या बायको आणि सुनेला एक चकार शब्द बोलले नाहीत. पुढच्या सकाळी ११ वाजता विमानतळाकडे निघायचं आहे हे त्यांना सांगितलं गेलं. आईला प्रचंड दडपण आलं होतं. पण बाबा चवथ्या सकाळी ७ वाजताच बाहेर जायचे कपडे घालून तयार होऊन बसले म्हणे. त्या चौघांमध्ये आईने पूर्वी विमानप्रवास केलेला होता. त्यामुळे विमानतळावर सगळं सुरळीत पार पडलं. दुपार टळता टळता विमान बंगळूरला पंखउतार झालं.
मी आता सगळ्यांना सामोरा गेलो.
आईला प्रवास म्हंटला की चिंताग्रस्तता येत असे. हा घटनाक्रम तर थरारक होता. त्यामुळे आता तिचे डोळे मोठ्ठ्या आजारपणातून बाहेर आल्यासासारखे तेजस्वी झाले. सात महिन्याचा नातू, तेवढ्याच वयाची आई असलेली सून आणि अंगाला धक्का लागला तरी आत्मा मुक्त होईल अशा प्रकृतीची बायको यांच्यासह तो सत्तरीचा, हृदयरोगाचा मानसिक बाऊ केलेला कुटुंबप्रमुख आयुष्यातला पहिला विमानप्रवास करून माझ्यासमोर सुखरूप उभा होता. कोण कोणाला घेऊन आलं? सांगणं खरंच कठीण होतं; पण महत्वाचं नाही! महत्वाचे होते ते माझ्यासकट सगळ्यांचे या अग्निदिव्यातून पार पडल्यावर उजळलेले चेहेरे!! महानगरवासीयांना, ‘यात काय विशेष?’ असं वाटेल. पण सत्तरी गाठलेल्या व्यक्तिच्या मनाविरुद्ध स्थित्यंतर घडवणं आणि प्रकृतीअस्वास्थ्याच्या परिस्थितीत विमानप्रवास करून कायमचं रहायला परप्रांतात जाणं, हे खूप मोठं आव्हान होतं. तारुण्य सरल्यावर बदल नाकारण्याकडे कल होतो याची चुणूक मलाही जाणवते आहे.
तीर्थरूपांच्या खांद्याला आल्यापासून मतभेदाच्या प्रसंगात मी त्यांच्या नजरेला नजर न देणं हा सामोपचाराचा मार्ग अनुसरत होतो. पण या प्रसंगात आपसूकच नजर भिडली. त्यांच्या चेहेर्यावर दुर्लभ स्मित तरळलं. ते म्हणाले, “साला तू भलता चलाख निघाला…”.

मस्त!
खूप छान
एक टाकी लिहिलेला
मस्त