— वैशाली प्रसन्न सुळे —
पाण्याचा शेवटचा घडा भरून घेतला खरा, परंतु पायवाट लांब वाटायला लागली. तसे तर बरोबरीच्या सगळ्या पुढे गेलेल्या..ही वाट झाडाझुडपातून जाणारी.. पुढच्या खेपेला एखादी काठी किंवा जाड काटकी सोबत ठेवलेली बरी ..निदान दारचं कुत्रं तरी..झपाझप पावले उचलत ती चालू लागली. बाजूच्या जाळीत खसखस आवाज आला कोणीतरी रोखून पाहत आहे असे वाटू लागले. देवाचा धावा करत ती एकटक पाहू लागली.
डोळ्याचे पाते लवते न लवते तोच एक काळी आकृती तिच्यासमोर ,अगदी पुढ्यात येऊन ठेपली. रोखलेला श्वास तसाच होता. मिट्ट काळोखात शक्य तितके डोळे विस्फारून ती बघू लागली. क्षणार्धात त्या आकृतीने पांघरलेली काळी घोंगडी दूर सारली अन रमाच्या हातात काहीतरी कोंबलं .”तुम्ही ?इथे, असे अचानक?” रमाच्या डोळ्यात अन् चेहर्यावर प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह यांची दाटी झाली.” बोलू नको, फक्त ऐक, वेळ फार कमी आहे”. तो एका दमात म्हणाला.” हे बघ ,गोऱ्यांना संशय आला आहे आमचा ,काही जणांवर गुप्त पाळत ठेवून आहेत ते. मी कसातरी लपून छपून हे द्यायला आलो आहे .दोन-तीन दिवसांनी एक जण येईल. माझं नाव सांगेल. त्याच्याकडे हे द्यायचं.” ” बरं”. तिने मान डोलावली .इतक्या अंधारातही त्याची कृश होत चाललेली देहयष्टी, त्यावर पडलेले ओरखडे तिच्या नजरेने टिपले .डोळ्यात पाणी येतं आहे तोच,” चल मी निघतो, मुलांना, स्वतः ला जप.”तुम्ही पण जपा”.रमा पुटपुटली.” “थोडेच दिवस राहिलेत , आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश येणार! हा अंधार जाईल. स्वातंत्र्याचा सूर्य दूर नाही!” त्याचे डोळे लकाकले. आला तसा तो समोरच्या काळोखात दिसेनासा झाला. ” पुन्हा केव्हा—-“रमाचे शब्द हवेतच विरले. हातातलं बाड लुगड्यात व्यवस्थित लपवून ती झपझप चालू लागली .मुलं वाटेकडे डोळे लावून बसली असतील. आज उशीरच झाला पाणी आणायला तसा. पण बरं झालं ,त्यामुळे यांची भेट, भेट कसली, दृष्टीभेट तर झाली .पण हेही नसे थोडके! महिनोन् महिने नजरेस पडत नाहीत .कुठून तरी कधीतरी एखाद्या वेळी खुशाली कळते. फक्त खुशाली !त्यावरच समाधान .आता यानंतर कधी कुठे आणि कसे भेटतील कुणास ठाऊक? विचारांच्या तंद्रीतच रमा घराजवळ आली .मुलांच्या पोटातली भूक मात्रु हृदयात पोहोचली .पती जनार्दननं दिलेलं बाड तिने कपड्यांच्या गाठोड्यात व्यवस्थित लपवलं. आधी ती असलं काही धान्याच्या कोठ्यां मध्ये लपवायची. आता कोठया आहेत पण—–धान्य? लपवण्या पुरतही धान्य—-. रमानं सुस्कारा सोडला.पीठ मळायला घेतलं. भराभर भाकरी थापून पोरांची भूक शमवली .”आई तू पण आमच्या सोबत जेव नं! मागून एकटीच जेवतेस नेहमी”. मुलांनी हट्ट धरला .”नको बाळांनो ,आज उशीर झाला आहे ना! उद्या लवकर भाकरी करीन मग आपण तिघेही सोबतच जेऊ.”रमानं मुलांची समजूत काढली. मुलं झोपल्यावर उरलेली अर्धी भाकरी पाण्यासोबत पोटात ढकलून ती पण आडवी झाली. तेही केवळ उपचार म्हणूनच .नाही तरी तिची झोप जनार्दन आपल्या सोबत घेऊन गेला होता .पडल्यापडल्या रमाच्या डोळ्यांसमोरून सगळा जीवनपट सरकला .कळू लागलं तसं भारत, आपला देश पारतंत्र्यात आहे, आपल्यावर इंग्रजांचं राज्य आहे याची जाणीव रमाला झाली होती .माहेरी वडील, भाऊ ,काका सगळे भारतीय स्वातंत्र्यावर जोरजोराने चर्चा करायचे. पोटतिडकीनं बोलायचे. सभांना जायचे .कुण्या मोठ्या नेत्याचं भाषण ऐकलं की घरी येऊन सगळ्यांना सांगायचे. हळूहळू भावंडेही क्रांतिकार्यात उतरली. त्यांचं मधेच गायब होणं, रात्री-अपरात्री चोरून घरी येणं, गुप्त खलबते हे नित्याचंच झालं होतं.रमा याच वातावरणात लहानाची मोठी होत होती. कधीतरी कुणीतरी बातमी आणी ,एखाद्या क्रांतिकारकाच्या अटकेची नाहीतर फाशीची. घरातल्या बायका कळवळत. डोळ्यात पाणी आणत. अशावेळी बाबा ,काका त्यांना ओरडत ,”टिपं गाळू नका, असेच एकेक क्रांतिकारक तयार होतील तेव्हा स्वातंत्र्य मिळेल!”. अशाच एका उमद्या, स्वातंत्र्याच्या ध्येयाने भारलेल्या तरुणाशी, जनार्दनशी बाबांनी रमेचं लग्न लावून दिलं होतं .सुरुवातीला जनार्दन तयारच नव्हता लग्नाला. पण म्हाताऱ्या आई-वडिलांना आधार म्हणून त्यानं रमाला स्वीकारलं .लग्न करून रमा जनार्दनच्या घरी आली ,तरी तिच्या जीवनात फारसा काही फरक पडलाच नाही .माहेरच्याच सारखं क्रांतीने भारलेलं वातावरण ! बैठकी, गुप्त खलबतं ,चर्चा .रमा या सगळ्यात जनार्दनला मुक पण खंबीर साथ देत होती. जे मिळेल त्यात भागवत होती. ना तक्रार, ना कुरकुर. म्हाताऱ्या सासू-सासर्यांची सेवा, दोन मुलांचं करता करता काळ भुरकन उडून गेला. सासू-सासर्यांनी स्वातंत्र्य आणि जनार्दनची वाट बघत बघतच डोळे मिटले. रमा मुलांना सांभाळत दिवस ढकलत होती. इंग्रजांना संशय आला की घराची झडती ,जप्ती ,चौकशी हे नित्याचं झालेलं .नातेवाईक सगेसोयरे कित्येकांनी दूर्याव्यालाच जवळ केलेलं !सगळं, सगळं आठवत होतं .आता फक्त एकच प्रश्न तिच्या मनात येई,,हे सगळं संपून सुरळीत जगणं कधी सुरू होईल? संसाराचा हा त्रिकोण आहे तो चौकोन कधी होणार? लवकर मिळणार म्हणतात स्वातंत्र्य !पण नक्की कधी? अजून किती वाट बघायची? स्वतःची ,मुलांची किती समजूत काढायची ?रात्र उलटत होती .रमाच्या विचारांनी जोर पकडला होता. अचानक दारावर थाप पडल्यासारखी वाटली. रमा सावध झाली .दोन्ही मुलांच्या अंगावरचं पांघरूण नीट केलं. तोच पुन्हा थाप! बहुदा ते संध्याकाळी जनार्दननं दिलेलं बाड न्यायला कोणीतरी आलं असेल. मनात विचार करत रमा दाराशी गेली. हातातला कंदिल उंचावून तिने दार किलकिलं केलं.” कोण?”” वहिनी, घाबरू नका मी सूर्यकांत.”” सूर्यकांत भाऊजी?” ते बाड—“.” नाही, नाही ते बाड न्यायला उद्या दुसरा कोणीतरी येईल. मी वेगळं सांगायला आलो होतो—“. सुर्यकांत थबकला .”वेगळंच? काय?” रमाच मन शंकित झालं. “ते —जनार्दन —“.”काय? काय झालं यांना?”” जनार्दन पकडला गेला आहे रंगेहाथ”.” रंगेहाथ? पण ते बाड तर—-“. रमा स्वतःशीच बोलल्यासारखं म्हणाली.” बरं झालं ते बाड तरी तुमच्याकडे सुरक्षित आहे .ते तुम्हाला देऊन जनार्दन आमच्या अज्ञातवासाच्या ठिकाणी आला .आम्ही मुक्काम हलविण्याच्या तयारीतच होतो, तोच—“” तोच काय भाऊजी? सांगा ना पटकन?”” तोच गोरे तिथे आले, पिस्तुलं ,काही कागदं सगळं पकडलं गेलं “”.अरे देवा! आता पुढे?”” पुढे काय वहिनी, खोटी आशा नाही लावत तुम्हाला. बहुतेक काळं पाणी—-“.”काळं पाणी?” रमा मटकन खाली बसली. तिला हाताला धरून उभा करत सूर्यकांत म्हणाला,” वहिनी धीराने घ्या .मुलांना सांभाळा .आम्ही आहोतच .काही बातमी मिळाली की कळवतोच .”आला तसा सूर्यकांत दिसेनासा झाला .रमाच्या डोळ्यांसमोर अंधारी आली .तिला आत्तापर्यंत ऐकलेल्या काळंपाणी झालेल्यांच्या छळाच्या कहाण्या आठवल्या. ते ऐकूनच अंगावर काटा येई. आता जनार्दनलाही तिथंच—-. देवा— रमाने धावत जाऊन दोन्ही मुलांना उराशी घट्ट कवटाळले .मुलंअर्धवट झोपेतून दचकून उठली .गोंधळली. “काय झालं?” रमाने त्यांना जनार्दन च्या अटके बद्दल सांगितलं. थोरला समजूतदार झाला होता. त्यांनं रमाला धीर देण्याचा प्रयत्न केला .रमाच्या खोपटयात काळया पाण्याचा काळोख करून बाहेर उजाडलं होतं. असे किती दिवस गेले कुणास ठाऊक! रमाला अन्नपाणी गोड लागेना .जनार्दनाची कुठून तरी काही तरी खुशाली कळावी म्हणून तिचं मन आणि कान आसुसले होते .आधीचीच समजूतदार मुलं अधिकच समजूतदार झाली होती .रमाला सांभाळण्याचा प्रयत्न करीत होती. अशातच एक दिवस कुणीतरी वार्या सारखा येऊन जनार्दनाच्या फाशी बद्दल सांगून गुडूप झाला. ती काळ रात्र कशीतरी ढकलली रमानं.दुसऱ्या दिवशी एका निर्धारानं रमा उठली .थोरल्याला तिने पुढ्यात बसवलं .काहीतरी सांगीतलं .धाकट्याला शेजार्यांकडे ठेवून ती झपझप चालू लागली .पुढे थोरला, मागे रमा! काटे कुटे तुडवून एका ओसाड वाड्यातल्या मागच्या खोलीसमोर रमा थांबली .पाठोपाठ थोरला. रमानं दारावर थाप दिली .आतून सावध हालचाल आणि मग दार किलकिलं झालं. “कोण?”. “मी रमा ,जनार्दनची —-“”अरे वहिनी तुम्ही ?इतक्या रात्री ?काय झालं?”आतून चार-पाच डोकी दाराजवळ गोळा झाली.” मी जनार्दन ला दिलेल्या वचनाची पूर्ती करायला आले आहे–“. “कुठलं वचन?” रमानं थोरल्याला त्यांच्या पुढ्यात उभं केलं. “आता यापुढे हा बापाचं अर्धवट राहिलेलं काम पुर्ण करेल. याला तुमच्यात घ्या.”” वहिनी कालच तर जनार्दनला—-” “हो ,मला माहित आहे .म्हणूनच त्यांना जाऊन 24 तास व्हायच्या आतच याला तुमच्याकडे घेऊन आले. याचा जन्म झाला तेव्हाच जनार्दननी माझ्याकडून तसं वचनच घेतलं होतं!” सगळे स्तब्ध झाले! कुणाला काय बोलावं काहीच सुचेना! थोरला पटकन आईच्या पायाशी वाकला.” यशस्वी भव!” रमाने त्याला आशीर्वाद दिला., अन् ती झटकन बाहेर पडली. मागे वळून न बघताच झरझर वाट कापत घरी पोहोचली .मध्यरात्र उलटली होती .पहाटेच धाकटयाला घेऊन रमानं गाव सोडलं.
———————————-
15 ऑगस्ट 1947!! भारतमाता स्वतंत्र झाल्याचा सुदीन. कमरेत वाकलेली रमा नातवाचा हात धरुन पटांगणात आली .केवढी गर्दी जमली होती !ज्याच्या त्याच्या मनातून आनंद नुसता ओसंडून वाहत होता! सगळीकडे उत्साह आणि चैतन्य! थाटात तिरंगा फडकला .मिठाई वाटली गेली.फुलांची उधळण सुरु झाली. रमानं ताठ उभं राहण्याचा प्रयत्न करत तिरंग्याला सलाम ठोकला. कुठूनशी दोन फुलं रमाच्या डोक्यावर येऊन पडली. जणू काही तिनं केलेल्या वचन पुर्तीसाठी आज जनार्दन स्वर्गातून तिच्यावर पुष्पवृष्टी करत होता!!!.

दिलेल्या संकल्पनेत राष्ट्रभक्तीपर कथा गोवणं हे आव्हान तुम्ही पेललं आहे. अभिनंदन.