— देवश्री अंभईकर धरणगांवकर —
सुगीचे दिवस होते. पिकं चांगली तरारली होती. कापणी जवळ आली होती. दिवसभर शेतमजूर कामं हाकीत. रात्री गडीमाणसं शेकोट्या करून राखण करीत. अचानक गावात आवई उठली की वाघ दिसला… सरपंचाने लगेच सभा घेऊन नदीजवळच्या शेतांत मचाण बांधून टेहळणीसाठी गड्यांची नेमणूक केली. तिसऱ्या दिवशी वाघाची बातमी खरी असल्याचे कळले.
नदीवरून सकाळ-संध्याकाळ पाणी आणणाऱ्या बायाबापड्यांना वाघाच्या भीतीने ग्रासले. चांगुणाही त्यातलीच एक. सर्जा-चांगुणा दिवसभर शेतमजुरी करत. घरचं काम सासू पाहायची. चांगुणा बोलक्या स्वभावाची होती. बोलत बसली की वेळेचं भानच नसे.
आजही ती नदीवर मैत्रिणीशी बोलत होती. उशीर झाल्याचे लक्षात येताच तिने भराभर घडे भरले. पाण्याचा शेवटचा घडा भरून घेतला खरा परंतु पायवाट लांब वाटायला लागली. तसेच तर बरोबरीच्या सगळ्या पुढे गेलेल्या…ही वाट झाडाझुडपातून जाणारी… पुढच्या खेपेला एखादी काठी किंवा जाड काटकी सोबत ठेवलेली बरी…निदान दारचं कुत्रं तरी…झपाझप पावले उचलत ती चालू लागली. बाजूच्या जाळीत खसखस आवाज आला कोणीतरी रोखून पाहत आहे असे वाटू लागले. देवाचा धावा करत ती एकटक पाहू लागली… तिला कोणी दिसले नाही. दिवस कलला होता… सूर्यास्त जवळ येत होता. कंबरेवर आणि डोक्यावर घडे घेऊन ती जमेल तितके जलद चालत होती. मधुनच झाडीकडे पाहत होती. का? कोण जाणे पण मनात अनामिक भीतीने जन्म घेतला होता. दहा पावलं आली असेल… पुन्हा झाडीत कोणीतरी असल्याचा भास झाला. ती न थांबता चालत राहिली. थोडे पुढे ती वाट तिठ्याला मिळत होती.
आपण उगीचच त्या पाटलांच्या गंगीशी बोलत बसलो. तिला काय वाड्यावर जायला दहाजणी सोबत होत्या. आपल्यासाठी मात्र कोणी थांबली नाही. सगळ्यांना घरी भाकरी थापायची घाई… तिला स्वतःचा आणि इतर बायकांचा राग आला. तेवढ्यात कुठूनतरी बकरीचा आवाज आला. तिने कान टवकारले. आवाज जवळ येत होता…
एखादं कळपातून हरवलेलं कोकरू असेल. असं तिला वाटलं पण लगेच तिला आठवलं… वाघाला आमिष म्हणून गावकरी बकरी बांधणार होते. अगं बाई, म्हणजे ही ती बकरी असेल आणि वाघ तिच्या वासाने आसपास असेल तर… जाळयात न अडकता वाघाने बकरीऐवजी आपलीच शिकार केली तर… भीतीने तिला धडधडायला लागलं.
पुन्हा बकरीचे केविलवाणे बें बें ऐकू आले. चांगुणाने कसाबसा तिठा गाठला. आता पटकन गावची वाट धरू म्हणून तिला हायसे वाटले पण ते वाटणे फोल ठरले. तीन वाटा जिथे एकत्र आल्या होत्या तिथे ती आली तेवढ्यात मागच्या झाडीतून खसखस आवाजासह हालचाल स्पष्ट जाणवली. तिने थबकून मागे वळून पाहिले. बकरी झाडीतून धडपडत रस्त्यावर आली… दुसऱ्याच क्षणी त्याच झाडीतून वाघाने बकरीवर झडप घातली…
चांगुणा जागच्याजागी थिजल्यासारखी उभी राहिली. भीतीने तिला एकदम काही सुचलेच नाही. तिच्या डोळ्यांसमोर काही फुटांवर वाघ होता. त्याच्या पंज्यांखाली बकरी जखमी होऊन तडफडत होती. वाघनखं तिच्या मानेत खोलवर घट्ट रुतली होती. काहीच क्षणांपूर्वी चांगुणा त्याच ठिकाणी होती जिथे आता वाघाने त्याचं सावज धरलं होतं. भीतीने तिने आवंढा गिळला. वाघालाही तिची चाहूल लागली. चांगुणा इतकी घाबरलेली होती की घडे घट्ट धरल्याने हातांना कळ लागल्याचेही तिला समजलं नाही. वाघ तिच्याकडे रोखुन पाहत होता. घाबरलेली असली तरी तीही वाघाच्या डोळ्यांत पाहत होती. बकरी सोडून वाघाने कोणत्याही क्षणी तिच्यावर झडप घातली असती. तिने धीर एकवटला. तिला सर्जाचं सांगणं आठवलं… “लक्षात ठेव चांगुणे, वाघाच्या डोळ्यांत डोळं घालून पाहायचं म्हंजी त्यो लगेच हल्ला करीत न्हाई. आपल्याला तेवढाच येळ मिळतो. आस्ते आस्ते येकेक पाऊल मागं घेत पसार व्हायाचं. वाघाला लगेच पाठ दावायची न्हाई की नजर हटू द्यायची न्हाई.” वाघाच्या बातमीनंतर सर्जाने तिला सावध राहायला सांगितले होते.
दृष्टी वाघावर ठेवत तिने एकेक पाऊल मागे टाकलं. वाघाच्या पंज्यांखाली अजूनही धुगधुगी असलेली बकरी क्षीणपणे तडफडत होती. बकरीच्या हालचालीमुळे वाघाने मान बकरीकडे वळवली… ती संधी साधून चांगुणा गर्रकन मागे वळली आणि जीव मुठीत धरून पळत सुटली. तिच्याजवळचे भरलेले घडे धपकन खाली पडले. पाण्याने वाटेवर चिखल झाला. त्या आवाजाने वाघही दचकला. त्याने पळणाऱ्या मनुष्याकडे-चांगुणेकडे पाहिले…
चांगुणा तिथून जी पळत सुटली ती कितीतरी वेळ थांबलीच नाही. वाघ पाठलागावर आहे की नाही हेही तिने पाहिले नाही. ती जीव घेऊन वाट फुटेल तिकडे धावत होती. काही वेळाने ठेचकाळत, धडपडत तीची गती मंदावली. घशाला कोरड पडली. उर धपापत होता. घामाघूम झाली होती. पदर काटाकुट्यात अडकून फाटला होता. जेव्हा एक पाऊलही पुढे टाकवेना तेव्हा ती थांबली. तिने मागे वळून पाहिले. वाघाचा मागमूस नव्हता. तिने दम घेतला. तिची नजर आजूबाजूला भिरभिरली… तिला आजूबाजूला ओळखीचे काही दिसेना. तिथे फक्त रान होते. सूर्यास्त कधीच झाला होता. संधीप्रकाशही काळोखात मिसळत होता. रातकिड्यांची किरकिर सुरू होत होती. वटवाघळे बाहेर पडली होती. सर्वच भयप्रद होते. स्वतःला वाघापासून वाचवून पळण्याच्या प्रयत्नात ती वाट चुकली होती… त्या तिठ्यावरून नेमकी जंगलाकडे जाणारी वाट तिने घेतली होती. चांगुणा आता पुन्हा घाबरली. तेव्हड्यात तिला काही अंतरावर दिव्याचा प्रकाश दिसला…
मानवी वस्तीची ती खूण पाहून तिला जरा हायसे वाटले. कोणीतरी आपल्याला गावात नीट पोहोचवून दिले किंवा रात्रीचा सुरक्षित आसरा मिळाला तर बरं, असा विचार करत ती त्या दिव्याच्या रोखाने निघाली. अजूनही ती वाघाचा कानोसा घेत चालत होती. चांगुणा दिव्याजवळ पोहोचली. तिला दिसले की एका झोपडीबाहेर दिवटी जळत होती. झोपडीतही पणतीचा मिणमिणता उजेड होता. फट ठेऊन दार लोटलेले होते… वाघाची इतकी दहशत तिच्या मनात होती की इतक्या निर्जन, भयाण जागी झोपडे बांधून कोण राहत असेल? असा प्रश्नही तिला पडला नाही.
मदतीसाठी तिने आवाज दिला, “कोणी हाय का?”
खांद्यावर कुऱ्हाड घेतलेला एक उंच, आडदांड, मध्यमवयीन माणूस बाहेर आला. तो एकटाच दहा वाघांशी झुंजायला पुरेसा होता. तो चांगुणेचे रक्षण नक्कीच करू शकला असता.
“काय गं बाई, कोण तू? हितं कशापायी आलीस?” खरखरित आवाजात त्याने चांगुणेला विचारले.
“म्या…म्या ते वाघ दिसला म्हणून पळाले अन् रानात वाट चुकले. तुम्ही मला गावाकडे सोडता का दादा?” चांगुणेंने चाचरत विनंती केली.
ती बोलत असताना तो माणूस तिला एकटक निरखत होता.
“दादा न्ह्याय, दगड्या म्हनत्यात मले!” डोळे तिच्यावर रोखत तो म्हणाला. दगड्याच्या मनात तिला पाहून वासना निर्माण झाली. त्यात तिने त्याला “दादा” संबोधल्याने आणखी चीड आली होती. मनात आलेलं पाप झाकत वरकरणी साळसूदपणे तो तिला म्हणाला, “एव्हढंच ना! अगं आत चल की, इथं वाघ न्हाय येणार. झोपडीत थांब. भाकर तुकडा खा, सकाळच्याला जाऊ गावात. तसं बी तू आता कुठं जाशील?”
हे बोलताना तो दोन पावलं पुढं आला… त्या क्षणी चांगुणेंने ताडलं इथं येऊन चूक केली. इथं येण्यापरीस वाघाचा घास झालो असतो तर बरं झालं असतं, तिला वाटून गेलं. ती मागे सरकली. त्याने सरळ पुढे येत तिचा हात धरला… तिच्या हातातल्या बांगड्या टिचल्या. मनगट काचांनी रक्ताळले. चांगुणा सुटकेसाठी धडपडू लागली…
पाण्याचा स्पर्श चेहऱ्यावर होताच चांगुणा शुद्धीवर आली. “सोड मला, सोड!” अर्धवट डोळे उघडत ती किंचाळली.
“चांगुणे, अगं म्या सर्जा!” नवऱ्याचा आवाज ऐकून ती सावरली. आपण घरी आहोत, मनगटाला मलमपट्टी केलेली आहे हे बघून तिला कृतज्ञतेने गलबलून आलं.
“तू ठीक हायेस ना? त्यानं तुला काही केलं न्हाय ना?” सर्जाने विचारले.
तिला आठवलं… दगड्याशी झटापट करत असताना अचानक रानातून लोकांचा गोंगाट व मशालींचा उजेड दिसला. ते पाहून दगड्याची पकड ढिली झाली व चांगुणा त्याच्या पकडीतून सुटून धावली. ती नेमकी सर्जावर आदळली व बेशुद्ध झाली होती.
“म्या ठीक हाये! धनी, देवासारखं येऊन वाचवलं तुमी!” ती म्हणाली.
जेव्हा चांगुणा वाघासमोर होती नेमके तेव्हा मचाणावरच्या एका गड्याने आमिष म्हणून बांधलेली बकरी सुटल्याचे व नंतर वाघ तिकडे गेल्याचे पाहिले. त्याने इतरांना कळवले तसे वाघाला जेरबंद करायला पथक निघाले. दुसरीकडे सर्जाला शेजारणीकडून चांगुणा नदीवर एकटी राहिल्याचे कळले… सर्जाने काही लोकांना घेऊन ताबडतोब तिठा गाठला. मशालींच्या उजेडात वाघाचे ठसे आणि वाटेवरचे घडे दिसले. चिखलावर उमटलेल्या चांगुणाच्या पावलांची दिशा धरून त्याने तिला शोधून काढले.
इकडे त्या मनुष्यप्राण्यापासून आपल्या बकरीच्या शिकारीला काही धोका नाही हे कळल्याने वाघाने खरंतर चांगुणेचा पाठलाग केलाच नव्हता. तो वाघ नरभक्षक नव्हता.
वाघाने नव्हे तर माणसानेच तिच्यावर झडप घातली होती… एकाच संध्याकाळी जिवावरच्या आणि अब्रूवरच्या संकटातून चांगुणा वाचली होती… तो थरार आठवुन तिला अजूनही भरून येत होतं… सासूने तिला मायेने कुरवाळले तसे चांगुणा हुंदके देऊ लागली. सासू म्हणाली, “उगी बाळा, संकट टळलं न्हवं! आता रडू नगंस! ध्यानात ठेव पोरी, सर्वात वाईट शिकारी माणूस असतोय. प्राणी तरी पोटापूरती शिकार करत्यात पण माणूस स्वार्थासाठी शिकार करतो अन् वंगाळ म्हंजी माणूस माणसाचीच शिकार करतो. माणसानं माणसापासूनच जपून राहावं हेच खरं!!”