स्वयंसिध्दा

— डॉ. सौ.अनुराधा भागवत —

दर्शनी भागात,’ स्वयंसिध्दा महिला उत्कर्ष संस्था ‘अशी पाटी मिरवणाऱ्या त्या दुमजली इमारतीत सकाळपासूनच उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते, कारण होतं,संस्थेची संस्थापक अध्यक्ष ‘ अनिता वालावलकर ‘यांची ‘उंच माझा झोका ‘या पुरस्कारासाठी निवड झाली होती हे. महिला दिनानिमित्त होणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार होता.ही संस्थेसाठी मोठी गौरवाची, अभिमानाची गोष्ट होती. सर्वच आनंदात होते.संस्थेच्या मालकीची ही सर्व छोटेखानी इमारत बांधून झाली तेव्हापासूनच संस्थेच्या नांवाचा व कामाचा बोलबाला वाढला होता. किशोरी बालिकांसाठी सरकारने विशेष कार्यक्रम सुरू केला तेव्हाच पल्लवीने एक मोठा प्रोजेक्ट संस्थेसाठी मिळवला.आसपासच्या पंचवीस गांवातून व शहरांतील पंचवीस गरिबवसतिंमधून काम सुरु झाले. संस्थेच्या इमारतीत पल्लवीने प्रशिक्षण केंद्र सुरू केले. तिथे सतत कांही ना कांही कार्यक्रम चालू असत.संस्थेचं नांव होऊ लागलं आणि अनिताताईंना सभा-समारंभातून निमंत्रणे येऊ लागली. त्यांंची साधीसुधी पण प्रामाणिक व तळमळीची भाषणे लोकांना आवडू लागली. संस्थेबरोबर अनिताताईंचंही खूप नांव झालं आणि आज हा पुरस्कार!

आज संस्थेच्या आवारांत वार्ताहर, फोटोग्राफर, दूरदर्शनचे मुलाखतकार यांची गर्दी झाली होती. पुरस्काराच्या व मुलाखतीच्या विचारांनी अनिताचं मन मात्र संकोचत होतं. मी या संस्थेची संस्थापक आणि अध्यक्ष आहे, संस्थेच्या उंच जाणाऱ्या झोक्यावर मी बसलेली सर्वांना दिसते आहे.मी आज यशस्वी आहे पण अशी उंच भरारी घेणारी मी कधी होते?मनातली जुनी न्यूनगंडाची भावना त्यांना छळत होती पत्रकारांच्या चहापाण्याची व बसायची व्यवस्था एका खोलीत केली होती. पल्लवी तेथील व्यवस्था पहात होती. पण मुलाखतीला सामोरे जायच्या विचारांचे अनिताच्या मनावर दडपण येत होते. रोजच्या कामात लक्ष लागत नव्हते, भूतकाळ आठवत होता, डोळ्यांसमोर जीवनपट उलगडत होता.

माहेरी आम्ही चार बहिणी, एक भाऊ.बेताच्या परिस्थितीतच वाढलो.आई खूप काटकसरीने संसार करी.चैन,वायफळ खर्च याला अजिबात थारा नव्हता कुठल्याही कामाला नोकर नव्हते, कुठचीही गोष्ट वाया जाऊ नये म्हणून आई काळजी घेई व आम्हाला पण तसंच शिकवे.सर्व कामे सांभाळून आईचे शिवण-टिपण,विणकाम, भरतकाम सतत चालू असे. त्यातून थोडी कमाईपण होई.आई म्हणे, ‘ तेवढीच मदत, घरच्या पिठांत मीठ मिसळण्यापुरती ‘       माझे वडिल आईच्या कामाचं खूप कौतुक करत,कदर करत.मलाही या सर्व गोष्टींची आवड,मी आणि आईला खूप मदत करी.माझंही कौतुक होई,मी पण खूप चांगला संसार करेन असे म्हणून सर्व मला नांवाजत.

माझं लग्न एका गर्भश्रीमंत परिवारातील मुलाशी झालं. त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता, स्पेअर पार्टस् बनवायचा कारखाना होता, परदेशी कंपन्यांशी व्यवसाय जुडलेला होता. माझे पति स्वतः इंजिनिअर होते व कारखान्यात खूप मोठा विभाग व जबाबदारी सांभाळत होते. घरांत मोठं एकत्र कुटुंब होतं, मोठं आलिशान घर व आवार,नोकर-चाकर,माणसं सामान सुमान,पैसा सगळंच खूप, मोठं खटलं,व सर्वांच्या व्यवहारात पदोपदी जाणवणारा श्रीमंतीचा तोरा व बडेजाव. सर्वांनी माझ्या भाग्याचा हेवा केला, मी मात्र पार बुजून गेले होते. माझ्या ज्या कलागुणांचं  आजपर्यंत कौतुक होतं, त्यांची इथे गरजच नव्हती. गरज नव्हती हे मी समजू शकते पण त्याची कदर नव्हती, किंमतच नव्हती, हे मनाला टोचत असे.लग्नानंतर लगेचचीच गोष्ट, एका साडीला मी फॉल लावत होते, माझ्या नणंदेने ते पाहिले, म्हणाली, ‘ ईss हे काय? तू घरी कां फॉल लावतेस?लग्नाच्या सगळ्या साड्यांना तर फॉल पिको झालेलाच असेल ना. मग? “

” आहेरात आलेली आहे.” मी

” कुणी दिली? केवढ्याची आहे ? “साडी हातात घेऊन बघत तिने विचारले.

” कां? “मी

“साडी महागांतली असेल ना तर दुकानदार फॉलपिको करूनच देतात. स्वस्तातली वाटते आहे. मग वहिनी, नकोच एवढे कष्ट घेऊ,देऊन टाकू कुणाला तरी.”

खूप वाईट वाटलं मला. माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीने दिली होती ती मला. तिची अशी का किंमत करायची.

असाच आणखी एक प्रसंग. माझी मंगळागौर होती सासूबाई सर्वांसमोर म्हणाल्या,

” रुपगुणांचं विशेष नाही हो,पण सून गरिबाघरची करावी असं म्हणतातच ना आपल्याकडे, आम्ही तेच पाहिलं “

मी माझी कामं नोकरांवर सोपवत नसे,कष्टाची कामेही स्वतःच करी,कांही वाया जाऊ नये, अनाठायी खर्च होऊ नये म्हणून जपे,या सर्वांचा संबंध माझ्या माहेरच्या गरिबीशी,दरिद्री विचारांशी जोडला जाई तसं बोलूनही दाखवत, मन अगदी मिटून जाई अशावेळी. प्रविण, माझे पति,दिवसभर कामांत व्यस्त पण त्यांच्यापासून मनाची ही उदासी लपत नसे.

” काय झालं?कुणी मारतंय,छळतंय कां तुला? खायला प्यायला कशाला कमी पडतंय कां? “ते विचारत.

” नाही तसं कांही नाही ” मी संकोचून म्हणे.

” मग चेहरा कां असा पडलेला? मस्त मजेत रहावं ना.”प्रविण “ मी गप्पच राही. माहेरी कधी विषय निघाला तर आई म्हणे,” काय गं हे असं? तुझं म्हणजे ना ‘सुख दुखतं ‘म्हणतात ना तसं आहे.”

मला आश्चर्य वाटे,आजपर्यंत मला हे सर्व शिकवणारी हीच ना माझी आई!

घरांतील अडगळीच्या खोलीत मला जुना लाकडी झोपाळा सांपडला, तो मी आमच्या खोलीच्या सज्जात लावला.करकरणारऱ्या जाडजूड कड्यांबरोबर हळुहळु मागेपुढे हलणारा–खरंतर हाच माझा झोका  होता, माझ्यासारखाच घरांत न शोभणारा, सर्वांनी नाकारलेला. घरांत सर्वत्र पसरलेल्या श्रीमंतीच्या खुणांमधे मी जपत होते माझ्या आईची शिकवण, कष्ट–काटकसरीची संवय,शिवण-टिपण, घरगुती कामांतील कुशलता, तत्परता,—कारण हे सर्व म्हणजेच ‘मी ‘होते, माझं अस्तित्व होतं. काळ पुढे सरकत होता, जगरहाटीप्रमाणे माझा संसारही फुलत होता. यातच मला एक वाट दिसली. आमच्याकडे घरच्या, दुकानातल्या, कारखान्यातल्या सर्व नोकरांना सणासुदीला, मंगलप्रसंगी भेटवस्तु, आहेर दिले जात. मी स्वतः कपडे शिवून, विणून, भरतकाम करून, पिशव्या, पर्सेस, बैग्ज बनवून आकर्षक पैकिंग करून देऊ लागले. सासूबाई ही आकर्षक भेट देतांना अभिमानाने मिरवतांना माझं नांव घेऊ लागल्या, कौतुक  करु लागल्या. त्यांच्या उच्चभ्रू समाजांत ही माझं नांव पोचलं व मीनाक्षीने आवर्जून माझ्याशी ओळख करून घेतली.

मीनाक्षी एक प्रसिद्ध समाजकार्यकर्ती होती. सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाची ती होतीच शिवाय पिढीजात पुढारीपण तिच्याकडे चालत आलेलं होतं.गरिब वसतितील बायकांचे ‘ बचतगट ‘समूह बनवून त्यांच्या आधारे त्या बायकांच्या मदतीसाठी, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ती काम करी.जुजबी, व्यवसायोपयोगी शिक्षणाचे वर्ग ती चालवी.त्यासाठी माझी मदत ती घेऊ लागली. मी त्यांना शिकवू लागले, मदत करू लागले. आईकडून मिळालेली ठेव मी त्यांच्यात वाटू लागले, पेरु लागले.माझ्या या कामाकडे, खरंतर मीनाक्षीशी असलेल्या माझ्या ‘ जवळीकी ‘कडे आता घरांतही कौतुकाने पाहिले जाऊ लागले. साहजिकच आहे, ती पार्षद तर होतीच पुढचा रस्ताही स्पष्ट होता.

मोटर अपघातात मीनाक्षीचं अकालीच निधन झालं आणि बचतगटाच्या सर्व महिलांनी मलाच धरून ठेवले. मदतीसाठी, कुठचीही अडचण आली तरी त्या माझ्याचकडे येऊ लागल्या. मी खरंतर भांबावूनच गेले. प्रविणने त्यावेळी मला धीर दिला. काम चालू ठेवण्यासाठी नुसतं प्रोत्साहनच दिले नाही तर सरकारच्याC.S.R.योजने अंतर्गत आपल्या कंपनीतर्फे आर्थिक मदत करायची तयारी दाखवली. आम्ही सर्व समूहाच्या बायकांना एकत्र आणून ‘ स्वयंसिध्दा महिला उत्कर्ष संस्था ‘स्थापन केली, रजिस्टर केली. माझी मुले आता मोठी होती त्यांनीच ह्या कामात पुढाकार घेतला विशेषतः पल्लवीने.M.S.W.ची पदवीधर ती होतीच, तिनेM.B.A.पण पूर्ण केले व पूर्णवेळ संस्थेचे काम करु लागली. बदलत्या काळाच्या गरजा ओळखून तिने भविष्याकडे वाटचाल सुरु केली. तिच्यामुळेच आज संस्थेची स्वतःच्या मालकीची जागा आहे.पल्लवीमुळे सरकारी अनुदान प्राप्त प्रकल्प, प्रायोजित सांस्कृतिक कार्यक्रम, सतत कांही ना कांही चालू असते, डोनेशन्स मिळतात. मी सुरवातीला निरनिराळया ठिकाणी जाऊन शिकवत असे आता आमच्या प्रशिक्षण केंद्रात विविध शैक्षणिक कार्यक्रम चालू असतात.

समाजकार्याच्या या विशाल क्षेत्रांत उघड्या माळरानावर उंच फांदीला हा झोका पल्लवीने टांगला–माझ्यासाठी, पण तीसुद्धा झोक्यावर माझ्या पाठीशी उभी आहे आणि म्हणूनच झोका उंच उंच जातो आहे. खरंतर पल्लवी हे माझंच रूप आहे. मी अशीच होते. आईच्या प्रत्येक कामांत लुडबुडणारी, आईचा उजवा हात बनलेली. बेताच्या परिस्थितीतील घरगुती रूप होते ते. पल्लवी हे आजच्या युगातील उच्चशिक्षणाने अलंकृत, आत्मविश्वासाने उजळलेले रूप आहे.अनिताच्या मनांतील संकोच या विचाराने गळून पडला, मनांतील मरगळ दूर झाली. मुलीचं कौतुक, अभिमान, मनात येऊन मनाला उभारी आली. स्वतःबद्दलचा सार्थ अभिमान व आत्मविश्वासाने चेहरा उजळला.

मुलाखतीसाठी पल्लवी त्यांना बोलवायला आली, प्रसन्न मुद्रेने त्यांनी तिच्याबरोबर पत्रकारांचे स्वागत केले आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *