देवश्री अंभईकर धरणगांवकर
‘साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले?’ हा डिसेंबर-२०२२चा म्हणजेच समारोपाचा विषय मिळाला आणि सर्व वर्षच डोळ्यांपुढून चित्रफितीप्रमाणे सरकून गेले. खरेतर या स्पर्धेने मला काय दिले? हे पटकन ‘ठळक मुद्दे’ या स्वरुपातही मला सांगता येईल पण या शेवटच्या लेखासाठीसुद्धा साडेसातशे ते हजार शब्द मिळाले आहेत तेव्हा जरा सविस्तर लिहावे असे वाटले…
वर्षभरापूर्वी म्हणजे जानेवारीचा पहिला लेख पाठवला तेव्हा ‘बारा महिने बारा लेख’ हे ‘आव्हान’ मी स्वीकारले आहे! हे स्वतःलाच सांगितले. होय, आव्हानच होते माझ्यासाठी. स्पर्धेपेक्षा प्रत्येक महिन्यात नियमितपणे एक लेख लिहायचा आणि वेळेत पाठवायचा हे माझ्यापुढचे आव्हान होते कारण त्यावेळी व्यक्तिगत आयुष्यात एक सुखद पण महत्त्वाची जबाबदारी आली ती म्हणजे आम्ही नुकतेच आई-वडील झालो होतो. साहित्योन्मेष स्पर्धा सुरु होत होती तेव्हा आमचा बाल-सुपुत्र अगदी आठ-नऊ महिन्यांचा तान्हा! आज वर्षभरानंतर स्पर्धेसोबत मोठा होत तोसुद्धा एकवीस महिन्यांचा झाला आहे. बाळाला सांभाळून लेखन करायचे, ते अनेकवेळा तपासून, चुका दुरुस्त करून, नीट टाईप करून वेळेत स्पर्धेसाठी पाठवायचे हे माझ्यापुरते तरी एक आव्हानच होते. साहित्योन्मेष स्पर्धेमुळेच अशावेळी मी लेखन पुन्हा सुरु करू शकले अन्यथा इतर छंदांसारखे हेसुद्धा बंदच पडले होते.
गेली दोन वर्षे २०२०-२०२१ ही कोरोनाची जीवघेणी साथ, लॉक-डाऊन, त्यामुळे सतत घरात बंदिस्त राहणे, सगळी कामे-अर्थाजन आणि घरकाम सर्वच घरी यामुळे जशी बहुसंख्य लोकांची खडतर गेली तशीच आमचीही (माझी व नवऱ्याची) ती वर्षे अवघड गेली. त्यात कोरोना टाळण्यासाठी आरोग्य सांभाळण्याची व परिसराची सतत काटेकोरपणे स्वच्छता राखण्याची कसरत बऱ्यापैकी दमवणारी होती. माझे असे झाले होते की कोरोनाच्या लॉक-डाऊनमुळे सततचे घरकाम, नंतर बाळाच्या चाहुलीने नऊ महिने प्रकृतीची काळजी घेणे आणि बाळजन्मानंतर त्याचे संगोपन यात वाचन, लेखन, इतर छंद जोपासणे, सर्व खूप मागे पडल्यासारखे, अगदी बंदच झाल्यासारखे झाले होते. नाही! मी माझी रडकथा सांगत नाही किंवा सहानुभूती मिळण्यासाठी तर मुळीच सांगत नाही! तर साहित्योन्मेष स्पर्धा येण्याआधीचा काळ कसा होता ते सांगते आहे कारण स्पर्धेने मला काय दिले ते सांगायचे आहे… तर अशा वेळी नेमकी साहित्योन्मेष स्पर्धा जाहीर झाली आणि तिने जणू “चल उठ, कागद-पेन घे आणि पुन्हा लिहायला सुरुवात कर!” ही उमेद, हा उत्साह मला दिला. “व्यस्त असल्याचे कारण सांगून स्वतःला साहित्याच्या सुंदर विश्वापासून दूर करायचे नाही. कुणास ठाऊक कदाचित नवे काही सुचेल! असा विचार करून स्पर्धेत भाग घे!” अशी जणू आज्ञाच अदृश्यपणे साहित्योन्मेष स्पर्धेने मला केली आणि अखेर मी माझे नाव स्पर्धेसाठी नोंदवले. साहित्योन्मेष स्पर्धेने मला लेखनासाठी प्रोत्साहन व उत्साह दिला.
मोठ्या उत्साहाने स्पर्धेत भाग घेतला तरीही लेखनासाठी कितपत वेळ मिळेल आणि स्पर्धेत दिल्या जाणाऱ्या विविध विषयांवर लेखन कितपत जमेल अशी शंकाही मनात हळूच डोकावत होतीच. पहिले तीन महिने तसे पटकन सरले. तेव्हा स्वतःच्या आवडीचे कोणत्याही विषयावरचे, कोणत्याही साहित्यप्रकारातले लेख द्यावयाचे होते. तीन महिन्यातच महिनाभर लिहायचे व महिन्याअखेरीला लेख द्यायचे अशी सवय लागायला लागली होती. खरी परीक्षा सुरु झाली ती चौथ्या महिन्यापासून म्हणजे एप्रिलपासून! दर महिन्याला वेगवेगळे विषय लेखनासाठी मिळू लागले आणि महाविद्यालयानंतर अनेक वर्षांनी पुन्हा परीक्षेला बसल्यासारखे वाटू लागले. स्पर्धा आता महत्त्वाच्या टप्प्यावर आली होती. परिच्छेदावरून कथाविस्तार, विनोदी विषय, वैचारिक विषय, पत्रलेखन, प्रवासवर्णन, ललित, काव्य इत्यादी विविध साहित्यप्रकार मिळायला लागल्यावर स्वतःला लेखनप्रांतात नेमकी कशात गति आहे, कोणता प्रकार जमतो आहे, कोणता कठीण वाटतोय ते स्वतःला स्वतःचेच कळायला लागले. स्वतःच्याच लेखनासंदर्भात असे आत्मपरीक्षण करण्याची संधी मला साहित्योन्मेष स्पर्धेने दिली.
प्रत्येक महिन्याचा ‘सनविवि’चा अंक प्रसिद्ध झाल्यावर बाकीच्या स्पर्धकांचे लेखनही वाचनात येत होते. एक छान असे साहित्यिक वर्तुळ साहित्योन्मेष स्पर्धेने दिले. एकाच विषयावर अनेक लोक जसा वेगळा विचार करू शकतात तसा एकसारखासुद्धा विचार करू शकतात. प्रत्येकाची भाषा, शैली, व्यक्त होण्याची पद्धत मात्र निराळी असते. त्यामुळेच लेखनाची/वाचनाची रंगत वाढते हे जाणवले. साहित्योन्मेष स्पर्धेने हा एक छान अनुभव दिला.
स्पर्धेमुळे शाळेनंतर कैक वर्षांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा अभ्यास नव्याने करता आला. व्याकरण, शुद्धलेखन, अधिकाधिक मराठी शब्दच वापरणे स्पर्धेमुळे क्रमप्राप्त होते. शुद्धलेखनामुळे भाषेच्या अनेक नियमांची उजळणी करता आली तर काही नियम नव्याने कळले. कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा प्रयत्न करताना प्रमाण भाषेचा अभ्यास करणे किती आवश्यक असते तसेच बोलीभाषेतील काय घ्यावे, काय लिहावे ह्याचेही तारतम्य बाळगावे लागते. भाषाविषयक अशा अनेक बाबी स्पर्धेत लिखाण करता करता लक्षात आल्या. शिकता आल्या.
स्पर्धेत शब्दमर्यादा घालून दिलेली असल्याने सुरुवातीला तेवढ्याच शब्दांत अर्थपूर्ण लिहण्याची चांगलीच धडपड होत असे. नंतर मात्र आपल्याला जे म्हणायचे आहे त्यासाठी आपल्या मायबोलीने-मराठीने अतिशय समृद्ध असे शब्दभांडार दिले आहे तेव्हा नीट विचार केला असता नेमके, संयुक्तिक किंवा चपखल बसणारे शब्द सापडतात हे लक्षात आले. तसे लिहिण्याचा आपोआप प्रयत्न होऊ लागला. कोणत्याही विषयावर भारंभार शब्द खर्च न करता कुठे आटोपशीर लिहावे, कुठे तपशीलवार लिहावे याचे तंत्र हळूहळू जमू शकते असे मला जाणवले. साहित्योन्मेष स्पर्धेच्या शब्दमर्यादेच्या नियमामुळे माझे शब्दभांडार वाढले.
साहित्योन्मेष स्पर्धेमुळे विनोदी लेखन करण्याची संधी मिळाली. तोपर्यंत पद्यलेखन, ललित, पत्रलेखन, महाविद्यालयात असताना कार्यक्रमांचे वृत्तलेखन, माहितीपर लेख, कविता, चारोळ्या, हायकू, निबंध इत्यादी लिहिले होते पण विनोदाच्या वाटेला जाण्याची कधी स्वतःहून हिंमत झाली नव्हती कारण करूण रसाने ओतप्रोत लेखन करता येते. रडवणे सोपे असते पण हसवणे तेही लेखनातून! महाकठीण असते! असे मला वाटते. इथे तर दोन वेळा विनोदी लेखन करणे अनिवार्य होते. ते विषय सोडावेसे वाटले नाहीत कारण मुळात ते विषय छान होते शिवाय स्पर्धा असल्याने लेखनसातत्याचेही गुण होतेच म्हणून केला प्रयत्न विनोदी लिखाणाचा! तो कितपत जमला ही बाब निराळी. साहित्योन्मेष स्पर्धेमुळे एरव्ही हात न लावलेल्या विषयांवरही लिहिण्याची संधी मिळाली. ‘केल्याने होत आहे रे|आधी केलेची पाहिजे|’ हे साहित्योन्मेष स्पर्धेमुळेमुळे लेखनाच्या बाबतीत तरी चांगलेच पटले.
बारा महिन्यांत बारा लेख लिहिणे एरव्ही ठरवूनही शक्य झाले असते की नाही माहित नाही. हे केवळ साहित्योन्मेष स्पर्धेमुळे शक्य झाले. ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे| प्रसंगी अखंडित वाचीत जावे|’ ह्या समर्थवचनाचे वारंवार स्मरण झाले. व्यवस्थित विचारमंथन करण्यासाठी आणि कोणतीही चांगली सवय लागण्यासाठी एक वर्ष हा तसा चांगला कालावधी आहे. वर्षभर स्पर्धा असल्याने प्रत्येक महिन्यात काही ना काही लिहिण्याची सवयच लागली. स्पर्धा या महिन्यात समाप्त जरी होत असली तरीही ती दीर्घकाळ सुरूच राहणार आहे असे मानून सातत्याने लिहीत राहण्याची प्रेरणा साहित्योन्मेष स्पर्धेतून मला मिळाली आहे. कुठल्याही परिस्थितीत लेखन-वाचनाचा नेम आता पाळायाचाच! बंद पडू द्यायचे नाही! असा विचार साहित्योन्मेष स्पर्धेने मला दिला.
मला वाटते कोणत्याही बाबतीत स्पर्धा ही स्वतःशीच असावी तरच स्वतःत सुधारणा होऊ शकते. ध्येय गाठण्याइतकेच त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवासही महत्त्वाचा असतो. साहित्योन्मेष स्पर्धेने हाच सुंदर अनुभव दिला की स्पर्धेचा निकाल काहीही लागो त्या निमित्ताने इतक्या वेगवेगळ्या विषयांवर लिहायला मिळाले तसेच ते ‘सनविवि’ मासिकातुन प्रसिद्ध होऊन वाचकांपर्यंत पोहोचले. हेही नसे थोडके! आपले लिखाण एका माध्यमातून प्रसिद्ध होते आहे व कोणीतरी वाचते आहे, त्यावर प्रतिक्रिया मिळतात आहेत हे समाधान साहित्योन्मेष स्पर्धेने दिले.
या स्पर्धेच्या शेवटच्या लेखाचा शेवट करताना केशव मेश्राम यांच्या ‘ऋणाईत’ मधल्या शेवटच्या दोन ओळी आठवल्या…
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो…
प्रारब्धाच्या प्रकाशधारांत ऋणाईत गाणे गातो.
