सनविवि अनुभव साहित्योन्मेष’ने मला काय दिले!

साहित्योन्मेष’ने मला काय दिले!

विशाखा पेंडसे-पंढरपुरे

’साहित्योन्मेष’ स्पर्धेचं एक वर्ष पूर्ण झालं, हे खरंच वाटत नाही. 

ही स्पर्धा वाटण्याऐवजी उपक्रम वाटावा, इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात ’साहित्योन्मेष’चं वर्ष संपलं. याचं सगळ्यात जास्त श्रेय आयोजकांचं आहे. सुस्पष्ट नियम, तत्परतेने शंकासमाधान करण्याचा सतत प्रयत्न आणि एकंदरीतच आयोजकांची स्पर्धकांप्रती असलेली सहकार्याची भावना यांमुळे हे शक्य झालं. अशा दीर्घकाळ चालणार्‍या स्पर्धेचा इतका चांगला अनुभव मला मिळाला हा साहित्योन्मेषमध्ये भाग घेतल्याचा एक महत्त्वाचा लाभ म्हणता येईल.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पहिला लेख पाठवला होता, तेव्हा मनात अशी शंका होती की दर महिन्याला वेळेवर लेख पाठवायला आपल्याला नक्की जमेल का? कारण याआधी अशा प्रकारे नियमित लेखन कधी केलेलं नव्हतं. प्रत्यक्षात बाराही लेख मी वेळेवर पाठवू शकले, याचा आज आनंद होत आहे. त्यामुळे साहित्योन्मेषने मला नियमितपणे लेखन करण्याचा आत्मविश्वास दिला हे नक्की. 

पहिले तीन लेख स्वतःला आवडेल त्या विषयावर लिहायचे होते. हे तुलनेने सोपं होतं, कारण जे विषय माझ्या मनात काही काळापासून घोळत होते, ते मला मांडता आले. आमच्या गावी येणार्‍या पदयात्रेचं वर्णन, ’शाळा’ या माझ्या आवडत्या पुस्तकावरचं फॅन फिक्शन आणि माझे एक अतिशय आवडते शिक्षक श्री. भावे सर यांच्याबद्दलचा लेख लिहिण्याची संधी ’साहित्योन्मेष’ मुळे मला मिळाली. यापैकी दोन विषयांवर आधीपासून विचार केलेला असल्यामुळे हे लेख लिहिणं अवघड वाटलं नाही. ’शाळा’वरचा लेख लिहिणं मात्र जरा कठीण होतं. मूळ कादंबरीतल्या भाषेची नक्कल होता कामा नये, पण त्या भाषेची आठवण मात्र व्हायला हवी, असं मला वाटत होतं. शिवाय नकळतपणे आपल्याकडून कादंबरीची, तिच्या भाषेची, तिच्यातल्या पात्रांची चेष्टा अजिबात होता कामा नये, हेही भान ठेवणं आवश्यक होतं. तसं झालं असतं, तर फॅन फिक्शन लिहिण्यामागच्या मूळ उद्देशालाच सुरुंग लागला असता!  

त्यानंतरचे विषय आणखीनच आव्हानात्मक होत गेले. मी ’साहित्योन्मेष’ मध्ये सहभागी होण्यापूर्वी इतरत्र जे काही थोडंफार लेखन केलं होतं, ते प्रवासवर्णन, ललितलेखन, विज्ञानविषयक ललित, विज्ञानकथा अशा स्वरूपाचं होतं. मला सुचलेल्या विषयांवर, मला आलेल्या अनुभवांवर, मला सोप्या वाटणार्‍या लेखनप्रकारात केलेलं हे लेखन होतं. दुसर्‍या कुणीतरी दिलेल्या विषयांमधला एक विषय निवडणे आणि त्यावर विशिष्ट प्रकारातच लिहिणे (उदा. पत्रलेखन) हा अनुभव शालेय वयात परीक्षेसाठी आणि स्पर्धांसाठी निबंध लिहिताना घेतलेला असला, तरी त्यानंतर कधीच घेतला नव्हता. दिलेल्या परिच्छेदावरून संपूर्ण कथा लिहिणे हे काम मला सर्वाधिक आव्हानात्मक वाटलं. दिलेल्या परिच्छेदांमधून एक परिच्छेद मनात निवडला आणि त्याभोवती कथा रचायला सुरुवात केली, की दुसरा परिच्छेद सोपा वाटायला लागायचा! इतरही काही विषयांच्या बाबतीत असं झालं, की विषय कुठला निवडायचा, या विचारातच बराच वेळ खर्च व्हायचा! 

पण जे काम सोपं नसतं, तेच करण्यात खरी मजा असते. आपल्या ’कम्फर्ट झोन’च्या बाहेर पडून काहीतरी नवीन प्रयोग करायला मिळाला, की भले तो प्रयोग अयशस्वी झाला, तरी प्रयत्न करण्यातला आनंद आपल्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. शिवाय, आपल्याला काय जमतं, काय नाही, याबद्दलच्या आपल्याच कल्पना कधीकधी चुकीच्या ठरू शकतात. जे जमणारच नाही, असं वाटत असतं, ते करायला गेल्यावर थोड्या प्रयत्नांनी जमून जातं आणि जे काम सहज जमेल असं वाटत असतं, ते अनपेक्षितपणे कठीण जातं. ’निसर्गातल्या एखाद्या घटकाला पत्र’ हा विषय मला सुरुवातीला असाच कठीण वाटला होता. स्वतःहून मी असा विषय, हा लेखनप्रकार कधी निवडला नसता असं मला वाटतं. काव्यमय, भावनाप्रधान लिहिणं हे माझ्या सवयीचं नाही. पण लिहायला घेतल्यावर मात्र अगदी सहजतेने मी ते पत्र लिहीत गेले. 

 

’साहित्योन्मेष’ने मला असे प्रयोग करण्याची संधी दिली. ते प्रयोग यशस्वी झाले की नाही हे मला सांगता येणार नाही, पण यापुढेही असे प्रयोग करून बघण्याची इच्छा नक्कीच माझ्या मनात निर्माण झाली. 

लेखनाची आवड असली, मनात काही विषय घोळत असले, तरी त्या विषयांवर प्रत्येक वेळी लिहून होतंच असं नाही, हा अनुभव प्रत्येकालाच असेल. ’दिसामाजि काहीतरी ते लिहावे’ असं समर्थांनी सांगितलं असलं, तरी लिहिण्याचा आळस केला जातो ही गोष्ट खरी आहे. साहित्योन्मेषच्या निमित्ताने दर महिन्याला किमान एक लेख हातून लिहून झाला. आता स्पर्धा संपली असली, तरी यापुढेही आवर्जून नियमितपणे लिखाण चालू ठेवण्याचा निश्चय मी मनाशी केला आहे. 

महाराष्ट्राबाहेर रहात असताना प्रामुख्याने उणीव जाणवते, ती मराठी साहित्याची आवड असणार्‍या, मराठी संस्कृतीवर प्रेम असणार्‍या समानशील माणसांची. महाराष्ट्र मंडळासारखी संस्था ही उणीव विविध कार्यक्रम आणि उपक्रमांमधून भरून काढते. ’साहित्योन्मेष’च्या निमित्ताने साहित्यप्रेमी आणि स्वतः चांगलं लेखन करणार्‍या मंडळींची एकमेकांशी ओळख झाली, एकमेकांचं लेखन वाचायला मिळालं. एकमेकांकडे स्पर्धक म्हणून न पाहता मित्रत्वाच्या नात्याने पाहिलं गेलं.   

 २०२२ हे वर्ष कोविडच्या विळख्यातून बाहेर पडण्याचं वर्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. कोविड काळातल्या कटु आठवणी मागे टाकून पुढे जाताना, वेगळ्या, आनंददायी विषयांवर विचार करण्याची, त्यासंबंधी लिहिण्याची संधी साहित्योन्मेषमुळे आम्हाला मिळाली. 

अशी उत्कृष्ट स्पर्धा (की उपक्रम?) आयोजित केल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ बंगळूर आणि सनविवि यांचे मनापासून आभार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *