सनविवि अनुभव सहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले

सहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले

रसिका राजीव हिंगे

चला चला रे धावत सगळे

सनविविचे आले आमंत्रण

साहित्ययज्ञात लेख समिधा

अर्पिण्यास दिले  निमंत्रण

     

     सहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले यापेक्षा काय नाही दिले हे जास्त मला माझ्यापुरसे योग्य वाटतं. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी लेख लिहिणे आणि ते ही दिलेल्या विषयावर, म्हणजे थोडं दडपण आले होते. कारण लिहिता तर प्रत्येकालाच येतं.  साहित्य काय आहे, प्रतिभा म्हणजे काय हे जरी माहित असले तरी ती जागवावी लागते, कोणीतरी तिला पुश करावे लागतं. हे काम साहित्योन्मेष ने केलं आहे. माझ्यासारख्या ह्या क्षेत्रात बालवाडीत असलेल्या साहित्यप्रेमींना यापरीस काय हवे! विशेष म्हणजे लेख लिहिणे हेच मोठे आव्हान होते माझ्यासाठी.

      सहित्योन्मेष च्या स्पर्धेची नोटीस वाचली तेव्हा वाटलं ही नव्हतं की स्पर्धेतला बारावा लेख लिहू शकेल म्हणून. कारण जमेल की नाही इथूनच मला धाकधूक होती.पण ठरवले सहजच भाग तर घेऊ. नाही जमले तर नाही, पण प्रयत्न तर करून बघू असा विचार करून स्पर्धेत सहभागी तर झाले. मध्येच सोडता येईल का वगैरे रेवती ताई कडून कन्फर्म करून घेतले. 

      स्पर्धा! वास्तविक पाहता स्पर्धा ही पुरातन काळापासून आहे. अगदी देवादिकांच्या काळापासून सुद्धा स्पर्धा असायच्याच. स्पर्धा असावीच त्याशिवाय जगण्याला अर्थच राहणार नाही. हे जग चालणार नाही. मोठ्या वृक्षांच्या आधाराने जरी लता वेली वाढत असतील तरीही सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी त्या वृक्षाच्याच आधाराने पण कुठूनतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतातच. स्पर्धा म्हणजे चैतन्य, उत्साह. काहीतरी करून दाखविण्यासाठी मिळालेले आत्मबळ, आतला हुंकार,आवाज म्हणजे स्पर्धा. स्पर्धा असणे म्हणजे स्वतः स्वतःला पारखणे, स्वतचं मूल्यमापन आपोआप होत राहतं स्पर्धेमुळे. स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकच धडपडत असतो. कुणाशी तरी सतत स्पर्धा सुरू असते. स्पर्धेत उतरायचं ते स्वतःला आजमावण्यासाठी, जिंकणे किंवा हरणे हे महत्वाचे असले तरी स्पर्धा निकोप असावी. अर्थात स्पर्धा म्हटली की अटीतटी ची चुरस असणारच. असावी, पण खेळीमेळीच्या वातावरणात. उगाच कुरघोडी नको. हरले तरी खचून न जाता पुढच्या वेळेस जीवतोड मेहनत करण्याची तयारी असावी. लहानपणापासून स्पर्धा आणि त्याविषयीचे मला असेच माहित होते, आणि खरे ही आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरवातीला स्पर्धा वाटणारी  सहित्योन्मेष ची कधी साहित्य जत्रा झाली कळलेच नाही. एकसे बढकर एक लेखक, साहित्यिकांची मांदियाळी येथे भेटली. भाषेवर प्रभुत्व असलेले, सर्वांगीण ज्ञान असलेले स्पर्धक पाहिले अन् मन भारावून गेले.  एकाच विषयावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करता येतो, त्यावर असलेले प्रत्येकाचे मत, लिखाण वाचून मी स्वतःला भाग्यवान समजू लागले. कारण एकतर सनविवीची टीम सतत प्रोत्साहन द्यायला, कडक नियमावलीचा बडगा न दाखवता स्पर्धकांना सोईचे आणि लिहिण्यास योग्य असे वातावरण निर्माण करून दिले. स्पर्धेत यशस्वी होईल की नाही हा मुद्दाच नाही, जे मिळाले ते भरभरून मिळाले आहे. 

      जसे वागण्याचे, बोलण्याचे, आपल्या घराण्याचे, स्वतःचे संस्कार असतात तसेच लिहिण्याचे पण संस्कार आहेत. पिढ्यानपिढ्या ते चालत राहतीलच असे नाही पण कुठेतरी आत दडले असतातच. सनविवी सारखे गुरू भेटतात अन् पुन्हा सुरू होतो साहित्य यज्ञ. लेखणी हातात घ्यायला प्रोत्साहित करतात.

     सुरवातीच्या तीन महिन्यात स्वतः विषय निवडीचे स्वातंत्र्य असल्यामुळे ज्याविषयी माहित आहे म्हणण्यापेक्षा लिहिता येईल ते विषय घेऊन लिहिले. त्यामुळे थोडे बळ मिळाले स्पर्धेत टिकून राहण्याचे. पण नंतर खरी कसोटी सुरू झाली. दर महिन्याचा विषय आव्हान द्यायला लागला लिहायला. आपसूकच त्याविषयी वाचन, मनन, चिंतन होऊ लागलं, अन् ज्ञानात भर पडत गेली. जे वाचलं, वेचलं, आवडलं आणि गवसलं ते सगळं आपल्या शब्दात, आपल्या कुवतीप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न होत गेला. अर्थात मी प्रतिभा आहे असे म्हणणार नाही, कारण जी.ए. कुळकर्णी म्हणतात प्रतिभा हा शब्दच भरजरी पैठणी सारखा आहे. मी तो उच्चारला जरी तरी फरशी पुसायच्या कापडासारखे वाटेल. पण लिहिण्याची जी सवय झाली, किंवा लागली ती सहित्योन्मेषमुळे. 

     मराठी भाषेची अस्मिता जोपासत ऑनलाईन मासिक सुरू करून सनविवीने जी मराठी भाषेची पूजा मांडली आहे ती खूप कौतुकास्पद आहे. केवळ पूजा मांडून थांबले नाही तर जे येतील त्यांनी त्यांचा प्रसाद आणावा आणि सगळा एकत्र करून गोपाळकाला करावा तसेच सनविवी ने आम्हाला त्यांच्यात सामावून घेतले, आमच्या बोबड्या लेखणीसह. ही किती मोठी जमेची बाजू आहे आमच्यासाठी. केवढे हे धारिष्ट्य, स्पर्धा आयोजित करून सगळेच लेख आपल्या मासिकात प्रकाशित करण्याचे. सनविवीचे सगळेच सदर उत्तम दर्जाचे, प्रतिभा असलेल्या साहित्यिकांनी लिहिलेले असेच आहेत. नवनवीन प्रयोग करून मराठी भाषा जपण्याचा उपक्रम म्हणजे चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत कवी एकनाथ, संत तुकाराम, वामन पंडित, मोरोपंत यांनी केलेल्या मराठी भाषा प्रसाराचा वारसा पुढे नेणे होय.

     बारा महिने बारा लेख स्पर्धेचे शिर्षकच सगळ्यांना दीर्घ काळ बांधून ठेवणारे आहे. बारा महिन्याचा काळ म्हणजे खूप मोठा कालावधी झाला. पण बघता बघता गेला की हो निसटून. निसटून गेला पण झोळीत भरभरून दान टाकून गेला. खूप शिकवून गेला, जो पुढे या वाटेवर चालताना  मार्गदर्शक ठरणार आहे. सहित्योन्मेष स्पर्धेने गुरू म्हणून बोट धरलं आहे हे नक्कीच.

     . आता पुढच्या महिन्यात कोणता विषय असेल ही उत्सुकता पण होतीच. वेळेचं बंधन पाळत एकेक लेख पाठवत असताना एकदम आता बारावा लेख म्हणजे या स्पर्धेतला शेवटचा लेख लिहित असताना मन भरून आले. नवे मित्रमैत्रिणी जोडल्या गेलेत, प्रत्यक्ष भेट नसली तरी भाषेच्या माध्यमातून धागे विणले गेले. वाचायला लागले की कळायला लागत हा लेख साधारण कोणाचा असेल.कारण प्रत्येकाची भाषाशैली परिचयाची झाली. सनविवी ने हे एक छान गिफ्ट दिलं आहे मैत्रीचे. 

     मनात असंख्य विचारांचे कल्लोळ माजले आहे. पुढे काय? कोणता विषय ही उत्सुकता नसली तरी मन भरल्यासारखे वाटते आहे. लिहिता येईल हा आत्मविश्वास सहित्योन्मेषने जागवला आहे. 

     मन भारावले आहे तरी

     ऋण स्मरते सनविविचे

     राहू दे ऋणात यांच्या

     नको सोहळे आभाराचे 

 

रसिका राजीव हिंगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *