सनविवि अनुभव साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले!

साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले!

 मानसी तांबेकर 

बेंगळुरूच्या महाराष्ट्र मंडळाने एक स्पर्धा आयोजित केली–‘साहित्योन्मेष’ १२ महिने …१२ लेख ! आता स्पर्धा म्हटलं की आयोजक आले, स्पर्धेची मांडणी झाली, नियमावली ठरली, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ बंगलोर मधूनच नाही तर चक्क भारतातल्या काही राज्यातून स्पर्धक त्यात सहभागी झाले. मी ही अशीच एक स्पर्धक. स्पर्धेसाठी नाव देऊन मोकळी झाले आणि माझ्या व्हॉटसॅप ग्रुप मध्ये अजून एका ग्रुपची भर पडली. प्रत्येकाने ग्रुप वर आपली संक्षिप्त ओळख करून दिली.  कुणाचे भाषेवर प्रभुत्व होते तर काहींचे वाचन अफाट, तर कुणाची लेखनाची कारकीर्द वाखाणण्याजोगी… तरी आपण मनापासून लिहायचा प्रयत्न करायचा हा माझा विश्वास मात्र ठाम होता. 

          आमची आमच्या लेखणीशी मैत्री व्हावी म्हणून की काय आयोजकांनी पहिले तीन महिने स्वतःच्या आवडीच्या विषयावर लेख, कविता, कथा लिहायची मुभा दिली.  कोरोनाचे सावट असणाऱ्या त्या काळात माझ्यासाठी एक अभूतपूर्वक अनुभव म्हणजे ‘ऑनलाईन शाळा. तोच मी माझ्या पहिल्या लेखातून वाचकांसमोर मांडला. जेव्हा अंक प्रकाशित झाला तेव्हा ग्रुप मध्ये किंवा वैयक्तिक मिळालेल्या चांगल्या प्रतिक्रियेमुळे एक नवीन हुरूप आला.

         दर महिन्याच्या विषयात खूप नाविन्य होतं.उन्हाळी सुट्टी विशेष लेख लिहितांना किंवा वाचतांना सर्व बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. उन्हाळी सुट्टीत मी सुट्टीचे मनोगत जाणले, घरबसल्या इतरांच्या लेखणीतून साकारलेले देशो-देशीचे प्रवास आणि त्यातील गमती-जमती अनुभवल्या. सोबत ‘सुट्टीतली खादाडी’ या विषयावरचे लेख वाचून दोन-चार पदार्थ बनवून खाल्ले. ऋचित दवंडें ह्याच्या लेखाने प्रेरित झालेल्या मी घरी ‘रसना’ सरबताची पार्टीही केली. पावसाळ्याची चाहूल लागताच आमचा अंक हिरव्यागार निसर्गराजाने नटला. कुणी पत्रातून त्याला साद घातली तर कुणी कवितेतून. त्या अंकाचं वाचन केल्यावर मन प्रसन्नतेने ओलंचिंब झाले. पावसाची चिकचिक वाटणाऱ्या मी यंदा बाल्कनीत बसून पाऊस अनुभवला. अजिता पणशीकर यांनी त्यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे त्याच्याशी ‘संवाद’ साधायचा प्रयत्न केला आणि मी या साहित्यन्मेषची एक सदस्य आहे या विचाराने मन थुई -थुई नाचू लागले. जसजसे वेगवेगळे विषय मी हाताळत गेले तसतश्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा लेखातून, कथेतून, पत्रातून साकारत गेले. मग त्यात मला शुक्राच्या चांदणीत हरवलेला माझ्या गूढकथेतला हिरो ‘मोहित’ मला भेटला. घरच्या-दारच्या प्राण्यांवर प्रेम करणारी माझी मैत्रीण ‘करुणा’ सापडली. आज मी जो काही आहे ते त्यामुळेच….. असं ठाम विश्वासाने सांगणारा ‘लठ्ठ-लुटठ गौतम’ लेखणीतून साकारताना मजा आली. पहिल्या बक्षिसाचा माझा अविस्मरणीय प्रसंग कागदावर उतरवताच मन आठवणीत हरपलं. तेच वर्षा सबनीस यांनी लिहिलेल्या ‘मधमाशांचा कहर’ हा अविस्मरणीय प्रसंग वाचून मन थर्र कापलं. आणि पर्यावरण जितके आपले आहे तितके प्राणिमात्रांचे हा विचारही पटला. त्याच महिन्याच्या अंकात छापून आलेला ‘माकडा -माकडा हुप्प ‘हा विनोदी लेख वा  वधूवर संशोधनाचे मजेशीर अनुभव  वाचून मात्र गालात हसूही फुटलं. बालदिनाच्या निमित्त्ताने कथा लिहितांना जेव्हा छोट्या वीर बालकांच्या कामगिरीचा शोध सुरु केला तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा करता इतरांचे प्राण वाचवणाऱ्या त्या चिमुकल्यांचे खूप कौतुक वाटले जे शब्दात उतरवणे कठीण होते. पालक आणि पाल्य यांचे संबंध मैत्रीपूर्ण असावे की शिस्तबद्ध या सारखे विषय जेव्हा समोर आले तेव्हा मुलाच्या विविध वयोगटातल्या समस्या, त्याच्यावर उपायही सापडले. या निमित्ताने माझे माझ्या मुलीबरोबर असलेल्या संबंधांचे आत्मचिंतनही झाले. पन्नाशीच्या उंबरठयावर असणाऱ्या माझ्या मिस्टरांना ‘पन्नाशीनंतरचे वेळापत्रक’ या विषयावरील लेखातून खूप छान माहिती मिळाली. त्याचबरोबर मनाने नेहमी तरुण राहायचं हा संदेशही आम्हाला मिळाला.  

       साहित्योन्मेष म्हणजे एक साहित्य मेजवानी होती कारण तिथे ज्याप्रमाणे विषयांचे वैविध्य होते त्याचप्रमाणे त्या विषयांना आपल्या विचारात व्यक्त करणाऱ्या लेखक -लेखिकांचे ही वैविध्य होते. हेच सर्वजण मग परिचयाचे होत गेले आणि साहित्योन्मेषच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणीत भर पडली. खूप मोकळ्या मनाने अभिप्राय मिळू लागला. कधी कौतुकाची पोचपावती मिळाली. सणा-सुदीला शुभेच्छांची देवाणघेवाण झाली.या स्पर्धेच्या निमित्ताने मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांशी नातं जुळलं. विविध विषयाच्या माध्यमातून मी इथे अनेक भूमिका जगले कधी कथाकार बनले, कधी कवयित्री, कधी वाचक तर कधी समीक्षक. या स्पर्धेच्या आयोजिका स्मिता बर्वे यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे- ‘स्फुल्लिंग चेतविण्यासाठी एक फुंकर आवश्यक असते’, आमच्यातील प्रतिभा जागृत आणि लिखित करण्यासाठी साहित्योन्मेष हे एक निमित्त होते.’ 

       सर्व व्याप सांभाळून, साहित्योन्मेष नावाचे हे ‘व्रत’ पूर्ण करायचे एक आव्हान मी स्वीकारले होते. माझ्यासारख्या नवोदित लेखिकेला खूप काही शिकण्याची ही एक संधी होती. आज मागे वळून पाहताना मला असं जाणवतं की या व्रतामुळे माझी लेखनशैली समृद्ध झाली. ज्ञानात भर पडली. मराठी वाचन वाढले. बोलीभाषेचे सौंदर्य उमजले, भाषेच्या शुचितेचे महत्त्व कळले. माझ्या माय-मराठी वरचे प्रेम दुप्पट झाले. काही लेख लिहितांना वा वाचतांना आयुष्याकडे पहायचा दृष्टिकोन बदलला. ‘मैत्री’खातर उचललेल्या लेखणीने एक आत्मविश्वास दिला, सकारात्मक विचार दिले.  आनंद,दुःख ,समाधान ,हास्य ,नैराश्य ,चीड ,तिरस्कार या मानवी भावनांचे कोरीव काम करणारे शिल्पकार म्हणजे मी व माझे लेखक मित्र -मैत्रिणी.प्रत्येक अंकातून या भावना प्रवाहित ठेवण्याचे काम आम्ही चोख बजावले आणि हा साहित्याचा झरा बारा महिने अखंड वाहत राहिला. 

   साहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले! हे थोडक्या शब्दात सांगायचे म्हणजे –  

               वैविध्यपूर्ण विषयातून ओसंडले भाव 

            कथा,कविता,लेख, अभिप्राय यांचा झाला वर्षाव.

             संपली जरी स्पर्धा,आठवणी राहतील शेष 

             खरंच अनुभवला त्या निमित्ताने ‘साहित्योन्मेष’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *