– देवश्री अंभईकर धरणगांवकर —
गेली दोन वर्षे जगावर कोरोना रोगाचे संकट आले आणि काही काळ घरात राहणे अपरिहार्य झाले. यामुळे प्रवास शक्यतो टाळावे लागले. यादरम्यान खरे तर आपल्या आयुष्यात प्रवासाचे किती महत्त्व आहे हे कळले. पूर्वी किती, कुठे व कसा प्रवास केला, त्या आठवणी ताज्या झाल्या…
गाव-खेड्यांमध्ये प्रवासाची एक वेगळीच मजा असते. पावसाळ्यात रस्ते खराब असले तर त्रासही असतो. बस असो वा टमटम (सहा आसनी रिक्षा) लोक दाटीवाटीने पुढेमागे कसेबसे सांभाळून बसतात व प्रवास पार पाडतात. थोडी गैरसोय झाली तरी लोक तक्रार करीत नाहीत. मोबाईलमध्ये घुसलेले, कानाला इअरफोन लावून आपल्याच तंद्रीत गाणी ऐकत शेजारच्यांशी एक शब्दही न बोलणारे प्रवासी अगदी ग्रामीण भागात सहसा कमीच दिसतात. मोकळेपणी हवा-पाण्याच्या, उद्योग-धंद्याच्या वगैरे कसल्याही विषयांवर सहप्रवास्यांशी गप्पा करणारे जास्त दिसतात. अगदी थोड्या परिचयावरही आस्थेने खाजगी चौकशी करणारेही असतात. आपल्या गावात कोणाकडे तरी आलेला शहरी पाहुणा आपलाच पाहुणा असल्याप्रमाणे आपुलकीने बोलणारे लोक असतात.
कोणत्याही प्रवासात असंख्य प्रकारची वेगवेगळी माणसे पाहायला मिळतात. सतत कोणीतरी कुठूनतरी कोठेतरी जात-येत असतात. माणसांचे हावभाव, राहणी, स्वभावाची झलक पाहायला मिळते. अशा वेळी गप्पा करायला ओळख लागत नाही तर कधी प्रवासात झालेल्या ओळखीचे पुढे घट्ट मैत्रीत रूपांतर होऊन लोक एकमेकांशी जोडले जातात. प्रवासातून बरेच शिकायला मिळते. सहनशक्ती वाढते. प्रवासाने जग कळते. शहाणपण वाढते. व्यवहारज्ञान येते. थोडा सराव केला तर चेहऱ्यावरून माणसे वाचण्याची कला प्रवास शिकवतो. प्रवास करून शरीराला तात्पुरता शीण येत असला तरी अनेक ठिकाणचे अन्न-पाणी, हवा खाऊन रोगप्रतिकारक्षमताही वाढते म्हणून तर काहीवेळा वैद्य हवापालट करण्याचा सल्ला देतात.
हल्ली सहजशक्य झालेला विमान व कॅबचा चकचकीत प्रवास करताना कधी पूर्वीचे काही प्रवास आठवतात. एकदा महाविद्यालयात असताना मैत्रिणीच्या गावी स्वयंचलित दुचाकीवर (स्कुटी) गेलो होतो. काही मैलांचेच अंतर होते. तुरळक रहदारीचा रस्ता, दुतर्फा शेती, झाडे आणि रस्त्याला समांतर अशी रेल्वेलाईन गेली होती. तेवढ्या वेळात एक गाडी गेली तेव्हा सर्वात शेवटी गार्डच्या डब्यात दारात उभे असलेल्या रेल्वे-गार्ड काकांना आम्ही मजेने टाटा केलेला. तो छोटासा दुचाकीवरचा प्रवास फार गंमतीशीर झाला. मैत्रिणीच्या गावी पोहोचल्यावर तिथून पुढे काही किलोमीटरवर त्यांची शेती होती. तिथे शेतात जायला बैलगाडीतुन प्रवास केला. बैलगाडीत मागे बाहेर पाय सोडून बसून पिकलेली लाल बोरे खात आम्ही दोघीही इतक्या हसत होतो की आजही ते आठवून हसू येते. शेतातून येताना आमच्या सोबत आणखी एक बैलजोडी चालत होती. कोणत्याही कासऱ्याशिवाय ते बैल आमच्या मागे नीट चालत येत होते. मुक्या प्राण्यांची ती प्रवास करण्याची हुशारी पाहून कौतुक वाटले. शिदोरी म्हणून भाकरी, ठेचा, कांदा व घट्ट दही आणि बैलगाडीतला प्रवास. कधी कधी सुख म्हणजे एवढेच तर असते, असे वाटते. अशीच गंमत टांग्याच्या प्रवासातही येते. खान्देशातील एका छोट्या गावात मावशीकडे जाताना पूर्वी रेल्वे स्थानक ते गाव असा प्रवास टांग्यातून करावा लागत असे. त्याची फार मजा येई. घोड्याच्या टापांचा टाकटूक टाकटूक आवाज ऐकत जाताना उगीच राजेशाही वाटत असे. मामाच्या नवीन फटफटीवर (बाईक) आजोळी जाताना मामा व मामेबहीणीसोबत ट्रिपल सीट केलेला प्रवास अजून आठवतो. खेड्यांतील शेतांमधल्या छोट्या रस्तांवरचा तो प्रवास मजेशीर झाला. एका शेतात थांबून विहिरीवर थंड पाण्याने हातपाय धुतले. त्या शेतकऱ्याने प्रेमाने कैऱ्या दिल्या.
प्रत्येक वाहनाच्या वा प्रकारच्या प्रवासाची स्वतःची वेगळी गंमत असते. एकदा विद्यापीठात असताना आम्ही दहा-पंधरा मुले-मुली एका वर्गमित्राच्या गावी गेलो होतो तेही ट्रॅक्टर-ट्रॉलीतून…मित्राचे वडील सधन शेतकरी. त्यांनी आम्हाला आणायला ट्रॅक्टर-ट्रॉलीच पाठवली. खेड्यातील बाया आमच्या गोंगाटाला हसत होत्या. पावसाळ्यातील हिरवीगार शेत-शिवारे डोळ्यांना सुखावणारी व मनाला आल्हादक वाटणारी. काळीशार सुपीक जमीन अशा प्रवासात जवळून पाहता येते. शेतातील मऊसूत मातीत जेव्हा हातपाय माखतात तेव्हा मातीच्या त्या स्पर्शातला जिव्हाळा जाणवतो… शहरात वाढून-राहूनही आपल्या मातीशी आपले किती घट्ट नाते असते ते अशा प्रवासात कळते.
रेल्वेच्या प्रवासातील अनेक मजेशीर अनुभव प्रत्येकाकडे असतात. एकदा एका लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीने आम्ही प्रवास करीत असता संध्याकाळी एक लग्नाचे वऱ्हाडच डब्यात चढले. आमचा अपवाद वगळता त्यांनी पूर्ण बोगीच आरक्षित केली होती. एकदाची निजानीज झाली. एकदम टाळ, पेटी, ढोलकीच्या आवाजाने खडबडून जाग आली. पाहतो तर वऱ्हाडी मंडळीतील काही स्त्रिया पहाटे मोठमोठ्याने भजने गात होत्या. त्या भजनांना चाली हिंदी चित्रपटांतील काही गाजलेल्या गाण्यांच्या होत्या. ते ऐकून भक्तिरसात दंग व्हावे की नेमके मूळ हिंदी गाणे कोणते हे आठवावे अशी आमची दोघांची स्थिती झाली. रेल्वेच्या प्रवासात कोणी किती सतत खाऊ शकते ह्याचेही मजेशीर उदाहरण आम्हाला त्या प्रवासात पाहायला मिळाले. गाण्यांच्या भेंड्या, पत्ते खेळणे, हास्य-विनोद यात त्यांच्यासोबत आमचेही मनोरंजन झाले. आमच्या स्थानकावर आम्ही उतरलो तेव्हा त्या लोकांच्या आपसूक मिळालेल्या सोबतीने आमच्या चेहऱ्यावर हसू होते.
एकदा बसने रात्रीचा प्रवास करताना गंमतच झाली. मागच्या चाकातील हवा गेली असे वाटल्याने चालक व वाहक दोघेही खाली उतरले. पाठोपाठ काही प्रवासीही उतरून पाय मोकळे करून आले. चाक तपासल्यावर चालक त्याच्या जागी बसला. बाकी प्रवासीही चढले व बस सुरु झाली. आम्ही सर्वात मागे बसलो असल्याने खिडकीतून आम्हाला एक माणूस बसमागे धावताना दिसला. तो हातवारे करत आम्हाला बस थांबवायला सांगत होता. काही मिनिटांत इतर वाहनांच्या उजेडात तो माणूस म्हणजे आमच्याच बसचा वाहक असल्याचे लक्षात येताच आम्ही चालकाला सांगून बस थांबवली व वाहक परत आत आला. रस्त्याला चढ होता म्हणून बस वेगात नव्हती म्हणून वाहकाला बस गाठता आली.
पूर्वी रात्रीच्या प्रवासात जंगलातून, घाटातून जाताना अनेकदा काजवे दिसत. गाडी एखाद्या छोट्या ग्रामीण स्थानकावर थांबली तर रानमेव्याची चव चाखता येई. बोगद्यातुन गाडी गेली की मजा वाटे. पावसाळ्यात खडकाळ भागात डोंगरकपारींमधून स्वच्छ पाण्याचे छोटे झरे-ओहोळ दिसतात. अजूनही क्वचित हरणांचे कळप वा माकडांच्या टोळ्या दिसतात.
समुद्री प्रवासाची गंमत निराळी. कन्याकुमारीला विवेकानंद स्मारकाकडे मोठ्या होडीने जात असता पाच मिनिटांचा प्रवास असला तरी भारताच्या मुख्य भूमीपासून आपण दूर जात असल्याची एक हुरहूर मनाला जाणवली. त्या सागरी खडकावरून भारतभूमीचे दर्शन मनाला वेगळाच अनुभव देऊन गेले. तसेच उडुपीला समुद्रात दूर असलेल्या सेंट मेरी बेटावर एका साध्या होडीने जातानाचा प्रवास थरारक अनुभव देणारा होता. सिंधूसागराचे (अरबी समुद्र) अथांग पाणी, त्यावर हेलकावे खाणारी होडी… एकीकडे सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन तर दुसरीकडे दूर जाणारा, एक रेषमात्र दिसणारा मुख्य भूमीचा किनारा…त्यावर पौर्णिमेचा चंद्रोदय. निसर्गाचे ते चित्र अत्यंत चित्ताकर्षक होते.
मला वाटते सर्वात वेगवान प्रवास आपले मन करीत असते. आपण एखाद्या ठिकाणाचे किंवा व्यक्तींचे स्मरण केले की मन क्षणार्धात तेथे पोहोचलेले असते. सासरी गेलेल्या मुलीचे मन क्षणात माहेरी जाते. आपले जीवनसुद्धा एक प्रवासच आहे परंतु तो एकदाच करता येतो. त्यात कितीही वाटले तरी परत फिरता येत नाही. फक्त पुढे जाता येते. आपण फक्त प्रवास करायचा… पुढे कोण भेटणार, काय घडणार, कुठे थांबणार… सर्वच गूढ! जीवनप्रवासाकडे तटस्थपणे बघता आले तर कदाचित त्यातली गंमत कळू शकेल. प्रवास कोणताही असो तो किती केला यापेक्षा कसा केला किंवा कसा झाला हेच महत्त्वाचे असते. एकंदरीत पुढे काय होणार हे कोणत्याही प्रवासात सांगता येत नाही; तेव्हा मनाला त्रास करून घेण्यापेक्षा कान व डोळे उघडे ठेऊन सजगपणे प्रवास केला तर कोणताही प्रवास एक गंमत म्हणून अनुभवता येईल.
