सनविवि कथा २६जानेवारी २०२० चा दिवस

२६जानेवारी २०२० चा दिवस

मानसी तांबेकर

२६जानेवारी २०२० चा दिवस , आज झेनने केलेल्या धाडसी कामाबद्दल, तिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणार होता. तिचा हा पराक्रम आणि होत असलेले कौतुक पाहून आईवडिलांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. चारी बाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पण १२ वर्षाची झेन मात्र या सर्वाने हुरळून न जाता यापुढे अशा प्रसंगी काय सावधगिरी बाळगायला हवी हे आपल्या मुलाखतीत सांगण्यात दंग होती. तिच्याच परळ येथील क्रिस्टल टॉवर या बिल्डिंग मध्ये १५व्या मजल्यावर राहणाऱ्या देशमुख काकू  तिचा हा कौतुकसोहळा पाहण्यासाठी टी.वी. समोर डोळे लावून बसल्या होत्या. तसं तर त्या झेनला अगदी बालपणापासून ओळखत होत्या. पण आजचा दिवस खास होता.  ‘झेन’ …डॉ. गुणवंत सदावर्ते आणि जयश्री सदावर्ते यांचे हे कन्यारत्न. वय वर्ष १२. मध्यम बांधा ,सावळा रंग पण डोळ्यात विलक्षण चमक, स्वतंत्र विचाराची आणि ध्येयाने झपाटलेली. डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी. लहानपणापासूनच चुणचुणीत, वाचनाची भयंकर आवड असलेली. देशमुख काका-काकूंच्या मदतीला सदैव तयार. तिचा तो कौतुक सोहळा पाहत असतांना  काकू परत भूतकाळात गेल्या आणि तो दिवस आठवू लागल्या- तो दिवस…. २२ऑगस्ट ,२०१८.

     ‘सकाळ रोजचीच पण आज आमच्यासाठी विशेष होती. तब्बल दोन वर्षांनी आपली लेक अमेरिकेहून येणार म्हणून रात्रभर डोळाच लागला नव्हता. मी पहाटे लवकर उठून कामाला लागले. तिच्या रूमची आवरासावर करून मग मी स्वयंपाकघरात घुसले. लेकीच्या आवडीचे काय-काय पदार्थ करायचे ही यादी एव्हाना पाठ झाली होती. मधुराचे बाबाही चक्क सकाळी वर्तमानपत्र बाजूला ठेवून  लेकीच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात गुंतले होते. रेडिओ एफ. एम.(FM) वर छान मराठी गाणी चालू होती. सकाळी साडेआठचा सुमार आणि एकदम कोलाहल ऐकू आला. धावा …. धावा …पळा …पळा … आग…आग. गॅलरीत येऊन पाहतो तर आगीच्या धुराचे लोट वर येतांना दिसू लागले. क्षणभर पायाखालची जमीन सरकली. हातपाय गळाले. मग मुख्य दरवाजाकडे धाव घेतली तर तिथे कुणीतरी –‘१२व्या मजल्यावर आग लागली आहे….  पळा….  जीव वाचवा स्वतःचा ….’ असं म्हणत ओरडत, किंचाळत, खाली पळत जातांनाही दिसले.’ क्रिस्टल टॉवर’ ही आमची परेल पूर्व मधील हिंदमाता परिसरातील सतरा मजली इमारत. त्यात आमचं घर 15 व्या मजल्यावर. या अशा प्रसंगी काय करायचं काहीच सुचत नव्हतं.पाहता पाहता मजल्यावर काळ्या धुराचे साम्राज्य पसरले ,त्यामुळे जीव गुदमरू लागला. श्वास घेणे अवघड होत होते . असं वाटलं साक्षात यमदूत दाराशी येऊन ठाकला आहे. लेकीला न भेटताच आपण मरणार या विचाराने मन थर्र कापले. मनात देवाचा धावा सुरु केला. तेवढ्यात त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी 16व्या मजल्यावर राहणारी ‘झेन’ नावाची देवदूत आली. ती स्पष्ट दिसत नव्हती पण तिचे शब्द कानी पडत होते-घाबरून जाऊ नका.. लिफ्टचा उपयोग करू नका… माझ्या पाठी या..’ का कुणास ठाऊक; पण त्या दहा वर्षाच्या मुलीच्या बोलण्यात एक आत्मविश्वास जाणवला आणि म्हणूनच पावलं आपोआप तिच्या मागे वळली. खरं तर तिचं घर ही धुराने भरलं होतं पण पोरीने हिम्मत हरली नव्हती. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिच्या पाठी जाणाऱ्या आम्हा १७ जणांना तिने कमी धूर असलेल्या ठिकाणी नेले. मेन स्विच बंद केला. लगबगीने अग्निशमन दलाला ही फोन केला. त्यांना पोहचायला किमान अर्धा -एक तासाचा अवधी अपेक्षित होता. पसरलेल्या धुरामुळे डोळे व शरीराची आग होत होती आणि मुख्य म्हणजे श्र्वासोच्छ्‌वास करणे कठीण होत होते. यावरही छोट्या झेनने तोडगा काढला. तिसरी इयत्तेत असताना ‘नेहल’ नावाच्या तिच्या लाडक्या बाईंनी विज्ञानात  शिकवलेला धडा तिला आठवला. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आल्यास त्यावर कशी मात करायची याचा अभ्यास तिने केला होता. आता घेतलेल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करण्याची वेळ येऊन ठाकली होती.  ओल्या कपड्यात धुरातील कार्बन शोषला जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो हे शास्त्रशुद्ध तंत्र तिने वापरलं. त्याला अनुसरून, प्रसंगावधान राखून तिने घरातील कपडे जमवून फाडले आणि जमिनीवर पाणी टाकून त्याला ओले केले.मग ते ओले कपडे नाकाशी धरून श्र्वासोच्छ्‌वास करण्याचा सल्ला तिने आम्हाला दिला. हा आमच्यासाठी तिने बनवून दिलेला एक जीवनदायी मास्क  होता ;ज्याच्या वापरामुळे दूषित हवा व धूर आमच्या नाकातोंडात गेला नाही. ही सर्व धडपड चालू असताना दुरून अग्निशमन दलाचा सायरन ऐकू आला तेव्हा थोडं हायसं वाटलं .अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच इमारतीमध्ये अडकलेल्या आम्हा सर्वांना हायड्रोलिक शिडी आणि क्रेनच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढलं.. पण आमचे प्राण खऱ्या अर्थाने झेनने वाचवले होते कारण तिचा सल्ला न मानता लिफ्टचा वापर करणाऱ्या काही लोकांना प्राणास मुकावे लागले; हे त्यांचे दुर्दैव.झेन’ हे एक जापनीस नाव आहे.असं म्हणतात की समुराई वर्गाला अधिक शूरवीर आणि आज्ञाकारी बनवण्यासाठी ‘झेन’ संप्रदायाची सुरुवात झाली होती.  त्या वीरबालेने शूरपणा दाखवून आपले नाव सार्थ केले होते.     

       ज्या दिवशी तिचे नाव‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कारा’साठी घोषित झाले तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून आला कारण आमच्यातल्या अनेक जणांनीयाची देहि,याची डोळामृत्यु पाहिला होता. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, नव्हे… झेनने तिच्या धाडसीपणा व प्रसंगावधानाने ती येऊच दिली नाही. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी माझी लेक अमेरिकेहून आली. तिला पाहताच त्या क्षणी असं वाटलं की एका लेकीला भेटायचं माझं स्वप्न जणू या दुसऱ्या लेकीने आपल्या जीवाची पर्वा न करता पूर्ण केलं.’

      तेवढ्यात झेनच्या नावाची घोषणा झाली. देशमुख काकू भानावर आल्या.त्याचे डोळे आनंदाने पाणावले आणि त्यांनी तिला मनोमन भरभरून आशीर्वाद दिले.

                                                       

                                                   मानसी तांबेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *