— मनीषा जोशी —
“राम हराळ” ने सायकल रस्त्याच्या कडेला लावली व घाईघाईने तो आपल्या शेताकडे वळला, लगेच त्याने त्याच्या झोपडीच्या बाजूला प्लास्टिकच्या पोत्यांचे एक सतरंजी वजा अंथरले व आमच्या स्वागतासाठी उभा राहिला.
चार दिवसांपूर्वीच “राम हराळ” आमच्या घरी येऊन आम्हाला टरबूज (कलिंगड) खाण्यासाठी त्याच्या मळ्यात येण्याचं आमंत्रण देऊन गेला होता. ह्या आमंत्रणात फक्त आम्ही घरचे लोकच नव्हतो तर आमच्या आजूबाजूला राहणारे लहान-मोठे असे बरेच जण होते . त्या सर्वांना त्यानी मळ्यात येण्याचा आग्रह केला. एकूण पंधरा ते वीस जण झाले. पण सगळेजण जाणार कसे कारण शेत बरंच दूर होतं…मग सगळ्यांनी ट्रॅक्टर मधून जायचं ठरवलं…
ट्रॅक्टरला मोठी ट्रॉली लावण्यात आली त्यात एक सतरंजी पसरण्यात आली आणि मग स्टूलवर चढून एक एक जण ट्रॉलीत बसला. आणि अशा प्रकारे
आम्ही सर्वजण ट्रॅक्टर मध्ये बसून कलिंगड खाण्यासाठी “राम हराळ” च्या मळ्यात गेलो होतो .
त्याचा आग्रहच तसा होता.
यावर्षी त्याच्या मळ्यात टरबूजाच खूप पीक आलं होतं. टरबूजा च्या वेली सगळीकडे पसरल्या होत्या .त्याला मोठमोठाली टरबूज लागलेली होती. शेत सगळीकडे हिरवगार झालं होतं जणू काही धरणीमातेनं हिरवा शालू परिधान केला होता. काळ्या मातीने “राम हराळ” च्या कष्टाचं सोनं केलं होतं. खूप कष्ट केल्यानंतर या वर्षी टरबुजाचे पीक खुप आले होते.त्यामुळे “राम हराळ” चांगलाच आनंदात होता .धरणी मातेनं आणि काळ्यामातीनं त्याला भरभरून जे पिक दिलं होतं ते आधी लोकांना भरभरून खाऊ घालावं आणि मग विकावं असा त्याचा मानस होता.
“राम हराळ” हा एक शेतकरी आहे त्याच्या मळ्यात यावर्षी टरबुजाचे पीक लावलं होतं.
राम हराळ कडे जवळपास वीस एकर शेती आहे त्यात त्याने टरबुजाचा एक मळा बनवला होता ह्या मळ्यात टरबूजा सोबतच काकडीही लावली होती. त्याच्या झोपडीच्या बाजूलाच गाई-म्हशींचा गोठा ही होता. एक बैल जोडी उभी होती. बाजूलाच बैलगाडी ही होती.
एवढे पशुधन व भूधन असलेला हा शेतकरी मात्र पुर्वीच्या काळातील शेतकर्या सारखा सधन नव्हता .फक्त काबाडकष्ट करणे हेच हल्ली च्या काळात त्याच्या नशिबी राहिलेले होते. पण तरीही जे देवाने दिलेले आहे व जे दैवाने काळ्या मातीत पिकवले आहे त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी “राम हराळ” ने
आपल्या मळ्यातील टरबुजं (कलिंगडं) खाण्यासाठी मोठ्या अगत्याने आम्हा सर्वांना बोलावले होते . गावातील आम्ही जवळपास पंधरा ते वीस जण त्याच्या मळ्यात टरबूज खायला आलो होतो .
त्याने भराभर टरबूज तोडून आमच्या समोर आणून ठेवली आणि तो आम्हाला चिरून देऊ लागला. आमच्या सोबत लहान मुलेही होती. सगळ्या मुलांना टरबुजाच्या फोडी देऊन गोड आहे का विचारू लागला , जर गोड नसेल तर राहू द्या दुसरे टरबूज चिरतो असे म्हणून परत दुसरे चिरू लागला, सगळ्यांना टरबूज पोटभर खा असे सांगून टरबूज खाण्याचा आग्रह करू लागला . तेवढ्यात बाजूच्या मळ्यात काम करून संध्याकाळी घरी परतणाऱ्या काही बायका “राम हराळ” च्या बायकोला दिसल्या त्या तिच्या मैत्रिणी होत्या तिने त्यांनाही घरी जाता जाता गोड टरबूज खाण्याचा आग्रह केला. बघा म्हणजे दोघे शेजारधर्म ही पाळताहेत. घासातला घास देणारा हा मनाचा श्रीमंत शेतकरी “राम हराळ” व त्याची बायको “सारजाबाई”….
तर, आम्ही सर्वांनी पोटभर टरबूज खाल्लं . खाणे झाल्यावर आमच्यासोबत घरी देण्यासाठी प्रत्येकी एक असे कितीतरी टरबुज तो मळ्यातून घेऊन आला त्यानंतर त्याने मळ्यातील काडीकचरा गोळा करून तिथे शेकोटी सारखे पेटवले. त्यावर त्याने गव्हाच्या ओंब्या भाजल्या व त्या स्वच्छ करून एका ताटलीत घेऊन आला. ओंब्या खाण्याचा आग्रह करून थोड्या ओंब्या सोबत दिल्या. टरबूज खाताना मी त्याला सहज म्हणून विचारले की ही टरबूज तुम्ही काय किलोने विकता , तर तो म्हणाला की त्याला जास्त भाव मिळत नाही ताई , जास्तीत जास्त सहा ते सात रुपये किलो अशा किमतीने घेतात आणि आम्ही ठोक विक्रेते असल्यामुळे याच्या पेक्षा जास्त भाव आम्ही सांगू शकत नाही मग हे लोक आमच्याकडून स्वस्त दरात टरबूज खरेदी करून वीस ते बावीस रुपये किलो नी बाहेर बाजारात विकतात. म्हणजे जो पिकवणारा आहे तो बिचारा मेहनत करून , एवढे काबाडकष्ट करून आणि स्वकष्टाचा पैसा शेतीत घालूनही शेवटी त्याला नफा हा फार मिळतच नाही. तरीही दरवर्षीपेक्षा यावर्षी भरपूर पिक आलेलं आहे याचं समाधान त्याच्या चेहर्यावर ओसंडून वाहत असतं…
पण त्याच्या मनाचा मोठेपणा बघा एवढे काबाडकष्ट करूनही एवढ्या आनंदात तो राहतो आणि एवढ्या आपुलकीने आणि अगत्याने सर्वांना बोलावून मोठ्या प्रेमाने टरबूज खिलवतो . ही खरी *मनाची श्रीमंती* नाही का?
“राम हराळची” दोन मुले आहेत त्यातील एक मुलगा हा देशसेवेसाठी सैन्यात भरती झालेला आहे तर दुसरा मुलगा शाळेत शिक्षक आहे म्हणजे “राम हराळचं” हे कुटुंब आहे ते सर्वार्थाने देश सेवेत आहे . एक मुलगा देशाचा रक्षण करतो आहे तर एक मुलगा विद्यार्थ्यांना विद्यादान करतो आहे. स्वतः “राम हराळ” हे शेती करून धरणी मातेची सेवा करत आहेत. “राम हाराळची” लक्षुमी त्यांची पत्नी त्यांच्या पाठीशी उभी असते शेतीच्या कामात त्यांना मदत करते. मळ्यातच एक छोटीशी झोपडी बनवून त्यात दोघे राहतात. आणि हेच त्यांचे फार्महाऊस आहे. त्या छोट्याशा झोपडीत एक छोटसं देवघर आहे, लहानशी चूल आहे , थोडीशी भांडी आहेत . सकाळीच दोघे मळ्यात येतात , दिवसभर काबाडकष्ट करतात वेळ पडली तर संध्याकाळी फार्महाऊस असलेल्या छोट्याश्या झोपडीत राहतात . नाहीतर मग गावात असणाऱ्या त्यांच्या घरी परत जातात . “राम हराळ”
मनाचा मोठेपणा हा त्याच्या कडून शिकावा.कष्ट करून शेतात राबणारा पैशाची श्रीमंती कमी असेल पण मनाची श्रीमंती फार असणारा “राम हराळ”… माझ्या गावातील एक श्रीमंत व्यक्तीमत्व!!!