सनविवि ललित,साहित्योन्मेष सध्याची परिस्थिती एक चिंतन…….

सध्याची परिस्थिती एक चिंतन…….

उज्वला तायडे—

21वे शतक मानवी इतिहासातील एक विलक्षण क्रांतीचे शतक म्हणावे लागेल. कारण याच शतकाचे विविध पैलू आहेत. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण, उदारीकरण, व्यापार व वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान असे या शतकाचे अनेक पैलू सांगता येतील. आज असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथे माहिती तंत्रज्ञानाचा समावेश झालेला नाही.माहिती तंत्रज्ञान आणि संगणक क्रांतीने सक्षरतेची व्याख्याच बदललेली आहे. एक काळ असा होता, ज्याला लिहिता वाचता येते त्याला साक्षर समजले जायचे.आता मात्र ज्याला संगणक, मोबाईल हाताळता येतो त्यालाच साक्षर म्हणण्याची वेळ आली आहे. महाजालाने हव्या त्या माहितीचा स्रोत उभा आहे.

          गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. मानवाच्या संशोधक वृत्तीने जग प्रचंड जवळ आल्यामुळे मानवी जीवनाच्या जगण्याचे संपूर्ण निकषच बदलून गेले आहेत हे आता नव्याने सांगायची गरज नाही; परंतु या तंत्रज्ञानाचा फायदा घ्यायचा, की नाही हे सर्वस्वी मानवाच्या हाती असले तरी हल्लीच्या काळात समाजमनावर याचा विघातक परिणाम होताना दिसत आहे, विशेषकरून शालेय विद्यार्थ्यांमध्ये. अगदी लहानथोरासहित सर्व जण या छोट्या स्क्रिनला चिकटून बसलेले असतात. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजेप्रमाणे आजमितीला स्मार्टफोन हा मनुष्य जीवनातील अविभाज्य घटक झालेला आहे.स्मार्टफोन मुळे व इंटरनेट मुळे वास्तव जग हे आभासी जगाच्या आहारी जात असल्याने आम्ही आभासी जगाचा अविभाज्य भाग बनलो आहोत अनेक पालकांना आपल्या मुलाचे टी.व्ही.,मोबाईलचे व्यसन कसे सोडवावे याची चिंता लागलेली असते; पण सर्वांची परिस्थिती’कळतंय पण वळत नाही’अशीच काहीशी होऊन गेली आहे.

कोव्हीड-१९च्या साथीच्या रोगकाळात ‘शाळा बंद शिक्षण सुरु’या संकल्पनेचा अवलंब करून शिक्षणकार्य अविरत चालू ठेवण्याची नैतिक जबाबदारी शिक्षकांवर होती. मग काय ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेताना मुलं मोबाईल च्या जास्त आहारी गेले.

डिजिटल तंत्रज्ञानातील टेक्नोसॅव्ही हा शब्द रूढ होत असतानाच आता एका नव्या शब्दाची भर पडली आहे. तो म्हणजे’स्क्रिन टाईम’.म्हणजे काय?तर आपण म्हणजे मोठे किंवा लहान मुले ज्या ज्या वेळेला टी.व्ही.,मोबाईल,  लॅपटॉप,टॅबसारखे काही उपकरणे असतात, ज्याचा बराच वेळ वापर करत असतो, त्या वेळेला स्क्रिन टाईम असे म्हणतात. हाच स्क्रिन टाईम सर्वांचाच इतका झपाट्याने वाढत गेला की कोणाच्या लक्षातच आले नाही. संपूर्ण नवी पिढी या वेगवेगळ्या उपकरणांच्या नादी लागून जगाचे भान विसरायला लागली आहे व याचा परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमता कमी होताना दिसत आहेत. कुटुंबातील नात्यांमध्ये अंतर वाढत चाललंय, प्रत्यक्षातील जग आणि आभासी जग यातला फरक समजेनासा झाला आहे. प्रत्येकाला वास्तवातील मित्र मैत्रिणी पेक्षा समाजमाध्यमातील मैत्री जास्त आवडायला लागली आहे.(व्हाट्स अप, फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम इ.)मुलांना यापासून दूर करण्यासाठी जगभरातील पालक चिंताग्रस्त झालेले आहेत. मुलं वेगवेगळ्या माध्यमातून फोटो घेऊन फेक अकाऊंट बनवत आहेत.

बऱ्याच वेळा सोशल मीडिया मध्ये सायबर गुन्हेगारी सुद्धा वारंवार आढळून येत आहे. क्रेडिटकार्ड,एटीएम,यासंबंधीची माहिती ओटीपी, पासवर्ड इत्यादी खासगी माहितीचा वापर करताना नकळत लिक होऊन सायबर भामट्याकडे जाते व बऱ्याच वेळेस बँकखाती रिकामी झाल्याचे पहावयास मिळते. गाव खेड्यात निसर्गाच्या सानिध्यात असणारी किशोरवयीन मुले ह्या गोष्टीच्या जास्तीत जास्त आहारी गेलेली दिसून येतात. मुले भलतीकडेच भरकटून आपला वेळ वाया घालताना दिसत आहेत. अयोग्य लिंक हाताळताना दिसत आहेत. शहरातील पालकवर्ग थोडा सजग असल्याने पाल्यांच्या अश्या समस्या साठी डॉक्टर्स, कौन्सिलरकडे नेऊन समुपदेशन करून खेळ, वाचन, आवडते छंद याकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.मुले सतत तासनतास टी .व्ही.,मोबाईल समोर बसल्याने त्यांचा लठ्ठपणा वाढत आहे, डोळ्यांचा नंबर वाढत आहे, रेटिनावर ताण पडत आहे.मुले अतिचंचल, हिंसक बनत आहेत. जे स्क्रिनवर पाहतात तेच आपल्या दैनंदिन जीवनात अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुलांमध्ये डिप्रेशन, हायपरटेन्शन,अश्या प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेत. ज्या वयात इतरांशी संवाद साधून मेंदूची वाढ होते, प्रश्न विचारण्याची जिज्ञासा असते, तीच आता संपत आहे. आणि ही चिंतन करण्यासारखी बाब आहे;पण मग यावर काहीच उपाय नाही का?तंत्रज्ञानाने निर्माण केलेले टी .व्ही.,मोबाईल वाईटच आहे का?की याचे कुठलेच फायदे नाहीत?असे प्रश्न निर्माण होतात; ही बाब सुद्धा चिंतनशील आहे.

जश्या नाण्याच्या दोन बाजू असतात तशाच यालपण आहेतच.पण म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की आपण त्याचा नेमका वापर कसा करतो; यावर त्याचे फायदे तोटे अवलंबून असतात.आजकाल मोबाईल म्हणजे तो अल्लाद्दीनचा जादुई दिवाच आहे.मग यावर उपाय काय?तर  पालकांनी मुलांचा हा स्क्रिन टाईम कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्यावे. आणि हे करत असताना स्वतःचाही स्क्रिन टाईम कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्यावे.

एक उदाहरण आहे एकदा संत तुकाराम महाराजांकडे एक बाई तिचा मुलगा दररोज गूळ खात होता तीने महाराजांकडे यावर उपाय सांगण्याची मागणी केली. परिस्थिती गरीब असल्याने ती मुलाला दररोज गूळ देऊ शकत नव्हती.

आलेल्या बाईला महाराजांनी,”तुम्ही माझ्याकडे आठ दिवसांनी पुन्हा या.”असे सांगून पुन्हा आल्यावर उपचार करतो म्हणून स्वतः गूळ सेवन करण्याचे बंद करून समजावले. कारण तुकाराम महाराज स्वतः जास्त गूळ खायचे. आधी केले मग सांगितले!अर्थातच आपणच  वडीलधारी माणसे या सर्व स्क्रिन चे अधीन असू तर मुले आपोआप स्क्रिनव्हिक्टिम् होणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर तुकोबांच्या अभंगाप्रमाणे ,भ्रमणध्वनी म्हणजे जेथे’जातो तेथे तू माझा सांगाती.’अशी अवस्था आहे.आणि खरोखरच चिंतनिय अशी आहे सध्याची परिस्थिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *