सनविवि ललित,साहित्योन्मेष साहित्योन्मेष स्पर्धेसाठी लेख : १० विषय : भाषेचे सौन्दर्य बोलीभाषेच्या वापराने वाढते किंवा कमी होते ?

साहित्योन्मेष स्पर्धेसाठी लेख : १० विषय : भाषेचे सौन्दर्य बोलीभाषेच्या वापराने वाढते किंवा कमी होते ?

—– प्रतिभा बिलगी “प्रीति”—–

 

आपल्या समाजातील सोयीनुसार एकमेकांना बोलण्यास आणि संवाद साधण्यास एकदम सोयीस्कर पडेल अशी भाषा म्हणजे बोली भाषा! दैनंदिन जीवनातील व्यावहारिक भाषेला आपण बोली भाषा म्हणू शकतो. भाषा ही प्रत्येक व्यक्ती बरोबर बदलत असते. कारण प्रत्येक व्यक्तीचे उच्चारण भिन्न असतात. ‘प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते!’ असे म्हणण्यापेक्षा भाषा ही प्रत्येक व्यक्तीगणिक, जात, धर्म, वास्तव्याचे ठिकाण, स्त्री-पुरूष, मुले आणि व्यवसाय या सर्वांनुसार बदलते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

 

संपूर्ण देशात पूर्वपिढीपासून विविध भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रात विविध प्रदेशांत फिरल्यावर असे जाणवते की एकच भाषा कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. प्रादेशिक भाषा या बऱ्यापैकी बोली भाषा असतात. तेथील लोकांची वाणी आणि आवाजाचा चढउतार, स्वर हा वेगवेगळा असू शकतो. लोकभाषा मौखिक परंपरा, सांस्कृतिक व सामाजिक मूल्ये जोपासत असतात. ही भाषा सतत बदलत असते आणि हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. रुढी-परंपरेचा अविष्कार आपण बोलीभाषेतूनच करत असतो. या बोलीभाषेतील नवनवीन शब्दच प्रमाण भाषेत वापरात येत असतात. बोलीभाषेचा स्वीकार केल्यास मराठी भाषा अधिक समृद्ध होईल.

 

भाषा कोणतीही असो, ती माणसाला जोडत संवाद साधत असते. विशिष्ट प्रदेश वा विशिष्ट संस्कृतीतील समुहाची व्यवहाराची भाषा म्हणजे बोली भाषा. अशा सगळ्याच बोलीभाषा स्थानिकांच्या मातृभाषा असतात. बोली भाषेतून जास्त आपलेपणा आणि गोडवा अनुभवता येतो. बोलीभाषा बोलणाऱ्यांना त्यांच्या भाषेबद्दल आपुलकी असते. ती भाषा त्यांच्या बालपणच्या मित्रांबरोबर खेळण्याची, बागडण्याची, घरातील माणसांशी संवादाची असते. कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, मालवणी, झाडीबोली, आगरी, वऱ्हाडी, वसईची वाडवळी, नगरची नगरी अशा अनेक बोलीभाषा महाराष्ट्रभर बोलल्या जातात. अशा प्रकारे मराठीला बोलीभाषांचा समृद्ध वारसा लाभलेला असल्याचं पाहायला मिळत. 

 

मुख्यतः महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, अलिबाग तसेच गुजरातमधील उमरगाव, दादरा नगर हवेली आणि गोव्यात त्याच़बरोबर संपूर्ण कोकणातील किनारपट्यांवर सर्रास कोळी भाषा बोलली ज़ाते. महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. मराठवाडा प्रदेशात ठसकेबाज मराठी भाषा वापरली ज़ाते. नांदेड जिल्ह्या तेलंगणा राज्याला लागून असल्याने एक वेगळाच़ हेलका धरला ज़ातो. तर महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात थोडी वेगळी भाषा बोलली ज़ाते. 

 

बोली भाषेचा संबंध जन्मत: मातृभाषेशी अर्थात, मायबोलीशी आहे. बोलीभाषा ही सर्व संस्कारांचा खजिना असते. बोलीभाषेचा संबंध जन्मत: मातृभाषेशी असतो. त्यामुळे बोलीभाषेचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही, किंबहुना ते अबाधित राहते. त्यामुळे बोलीतला संवाद हा गावंढळ, संस्कृतीहीन, खेडूत व असभ्य मानला जाणे हे अत्यंत चुकीचे आहे. बोलींची सांस्कृतिक जडणघडण पिढ्यान्‌पिढ्या सुरू आहे.

१२५ वर्षांपूर्वीची तुकारामाची कविता त्यांच्या बोलीभाषेत निर्माण झाल्यामुळे आज प्रसिद्ध आहे. बुद्धांनी बोलीभाषेतून आपले चिंतन मांडून जगभर बौद्धधर्माचे विस्तारीकरण केले. शाहिरांनी बोलीभाषेचा वापर जनजागृतीसाठी केला. अशिक्षित असलेल्या बहिणाबाईंच्या कविता अहिराणी या लोकभाषेतूनच तयार झाल्या. बोलींमुळेच मराठी साहित्य सकस झाले आहे. काही लोकांना असं वाटतं की बोलीभाषा म्हणजे अशुद्ध, अडाणी, मागास भाषा! अशा संकुचित विचारांमुळे आजच्या काळात बोलीभाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत.

 

प्रमाण भाषा ती असते जी लिहिली आणि बोलली जाते. बोलीभाषा ही फक्त बोलली जाते. म्हणूनच प्रमाण भाषा ही बोलीभाषेचे एकत्रितपणे सजवलेले रूप आहे, असे म्हणायला हरकत नाही. आजच्या घडीला प्रमाण भाषा म्हणजे श्रेष्ठ किंवा नागर लोकांची भाषा आणि बोलीभाषा म्हणजे कनिष्ट किंवा गावाकडील आम लोकांची भाषा अशी भाषाविषयक समजुत निर्माण झाली आहे. भाषा हे विचार व भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. त्याला व्याकरणाची शिस्त नसेल तर भाषा भरकटत जाण्याची भीती असते. वैचारिक लेखन, कायदेशीर कागदपत्रे, सरकारी कामकाजासाठी एका प्रमाण भाषेची, लिपीची आणि शुद्धलेखनाच्या नियमांची गरज असते. परंतु ललित लेखन मात्र बोलीभाषेतून केल्यास त्याला अधिक गोडी लाभते. कारण त्यामध्ये स्थानीय अलंकार आणि तेथे रुजलेली संस्कृती यांचे प्रतिबिंब आढळते. मराठी भाषेने इतर भाषांनाही आपल्यात सामावून घेतले आहे. यामुळेच गुजराती, प्राकृत, संस्कृत, फ्रेंच, पोर्तुगीज, पर्शियन, अरेबिक या सर्व भाषांमधील शब्द मराठीत आले आहेत.

 

खूप पूर्वीपासून प्रमाणभाषा ही शिक्षण, राज्यकारभार, वर्तमानपत्रे ह्यांसारख्या माध्यमांशी संबंधित असलेली भाषा आहे. भाषा मौखिक ध्वनींची बनलेली असते. परंतु, ती लेखनबद्ध करण्यासाठी नियमांची आवश्यकता असते. कारण समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, वाङमय निर्मितीसाठी हे गरजेचे आहे. हीच भाषा कालांतराने प्रमाण भाषेचे रूप धारण करते. ही भाषा शिष्टसंमत असते. म्हणून वृत्तपत्रे, शिक्षण, ग्रंथलेखन, शासकीय कामकाज इत्यादी व्यवहारात या भाषेला मानाचे स्थान मिळते. स्वबोलीकडून पोटभाषेकडे, पोटभाषेकडून प्रमाण बोलीकडे आणि प्रमाण बोलीकडून प्रमाणभाषेकडे असा हा भाषेचा प्रवास सातत्याने चाललेला असतो. या सर्व गोष्टींचा परिणाम समाज जीवनावर होत असतो. यासाठीच सर्व समाजाशी विनिमय साधू शकणारी भाषा वापरली जाते. म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषिक व्यवहार हा समान पद्धतीने व्हावा या कारणास्तव शासकीय, कार्यालयीन, व्यावसायिक, शैक्षणिक, आर्थिक व्यवहार इत्यादी  सर्व क्षेत्रात प्रमाणभाषा वापरली जाते. कारण प्रमाणभाषेमध्ये बोली भाषेप्रमाणे सहसा परिवर्तन होत नाही. पण भाषिक वृद्धी अवश्य होते. 

 

या सर्व कारणांमुळे बोली भाषा ही भाषेचे सौंदर्य वाढवण्याचे काम करीत असते. साहित्य क्षेत्रात बोली भाषा ही त्या त्या क्षेत्र, काळ, परंपरा, रूढी, समाजाचा एक प्रकारे आरसा असतो, जो पिढ्यानपिढ्या जतन केला जातो. परंतु व्यावहारिक जगतात मात्र बोली भाषेचा वापर एक अडचण ठरू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे बोली भाषा भावनिक संवाद साधू शकते परंतु व्यावहारिक संवाद तितक्या सहजपणे साधू शकणार नाही. कारण प्रदेशागणिक बोली भाषा बदलत जाते. तिचा उच्चार, लकब, शब्दयोजना, स्वर, सूर सगळयात विभिन्नता आढळते. यामुळे संवाद साधताना गैरसमज होऊ शकतो किंवा गोंधळ उडू शकतो. बोली भाषेचे काही शब्द वापरताना तितकी सहजता वाटणार नाही जितकी व्यवहारातील प्रमाण भाषा. म्हणून यामुळेच कधी या शब्दांमुळे भाषेचे सौन्दर्य वृद्धिंगत होते तर कधी लोप पावते. 

 

© प्रतिभा बिलगी “प्रीति”

प्राध्यापक, बेंगळुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *