सनविवि ललित,साहित्योन्मेष भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे?

भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे?

  —– सौ. ऋचिता बोधनकर दवंडे —– 

 

          भाषा हे समस्त प्राणीमात्रांना मिळालेले एक वरदान आहे. परस्परांशी संवाद साधण्याचे, आपल्या भावना पोहचवण्याचे माध्यम म्हणजे भाषा. माणूस बोलून, लिहून, कृतीतून किंवा हावभावातून एकमेकांशी संवाद साधतो. इतर प्राणी आवाजातून संवाद साधत आपल्या भावना पोहचवत असतात. म्हणूनच भाषेमध्ये बोलणे, वाचणे ह्याबरोबरच हावभाव, आवाज / ध्वनी , कृती  ह्यांचा देखील समावेश होतो

                    अक्षर, शब्द, वाक्य, व्याकरण ह्यांच्या योग्य वापरातून भाषा तयार होते. बोलताना किंवा लिहिताना आपण ह्याचाच उपयोग करून आपले म्हणणे बोलतो किंवा लिहीत असतो. भाषा मग ती बोलताना असो की  लिहिताना शुद्धच असली पाहिजे. म्हणूनच शुद्धबोली आणि शुद्धलेखन फार महत्वाचे आहे. भाषा शुद्ध असली तरच आपण आपले म्हणणे योग्य पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचवू शकतो. बोलताना आपली बोली शुद्ध असली तर समोरच्या व्यक्तीवर त्याचा नक्कीच प्रभाव पडतो. शुद्ध भाषा कानाला ऐकायलाही चांगली वाटतेभाषा शुद्ध असली तर सरळ आणि सोपी होते. शुद्धबोली प्रमाणे शुद्धलेखनही तेवढेच महत्वाचे आहे. शुद्धलेखनात आकार, उकार, र्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विरामचिन्हे, वाक्यरचना अशा सर्वच बाबींचा अंतर्भाव होतो. लेखनात ह्यापैकी काहीही  इकडे तिकडे झाले तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. शब्दांचे अर्थ बदलतात. वाक्ये तयार करताना वाक्यातील अनेक घटकांचा एकमेकांशी योग्य समन्वय साधला गेल्यास निरर्थक किंवा व्दिअर्थी वाक्ये तयार होतात. म्हणूनच लहानपणापासून आपल्याला शुद्धलेखनाची सवय लावली जाते. शुद्धलेखनामुळे अक्षरही वळणदार होते. त्यामुळेच भाषेच्या शुद्धतेला किंवा शुचितेला अग्रक्रम द्यायलाच हवा. भाषा हे केवळ संपर्काचे साधन नसून भाषेच्या माध्यमातूनच  शिक्षण पण दिले जाते. त्यामुळे ती भाषा शुद्धच असायला हवी. अन्यथा  आपल्या पुढील पिढीला भाषेचे मूळ स्वरूप माहितीच होणार नाही. म्हणूनच कोणतीही भाषा जर जतन करायची असेल तर त्या भाषेची शुचिता अत्यंत महत्वाची ठरते आणि ह्या सगळ्यात जर संवाद साधण्याला दुय्यम स्थान मिळाले तरी त्यात काहीही वावगे नाही.

          संवादाला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. संवाद म्हणजे आपल्या विचारांची, मतांची केलेली देवाण घेवाण. ह्यासाठी भाषेचा वापर केला जातो. पण संवाद साधताना आपले म्हणणे किंवा आपले विचार दुसऱ्यापर्यंत व्यवस्थित पोहचले की मग भाषेची शुचिता महत्वाची नसते. भाषा शुद्ध नसली तरी आपण अंदाजाने समोरच्या व्यक्तीला काय बोलायचे किंवा लिहायचे आहे हे नक्कीच समजु शकतो. कधी कधी तर केवळ नजरेतून, खुणा करून किंवा हावभावांवरून आपल्याला काय सांगायचे आहे हे दुसऱ्या व्यक्तीला कळू शकते. त्यामुळे इथे तर भाषेचा आणि भाषेच्या शुचितेचा काही संबंधच राहत नाही. संवाद योग्य रीतीने झाला तर भाषा शुद्ध नसली तरीही त्या दोन जणांमध्ये वैचारिक देवाण घेवाण होऊच शकते. पूर्वीच्या काळी माणसाला जेंव्हा भाषेचे पुरेसे ज्ञान नव्हते तेंव्हा तो  खाणाखुणांचा आणि आवाजांचाच वापर संवादासाठी करायचा.केवळ मनुष्यच भाषेचा वापर करून संवाद साधतो. इतर प्राण्यांसाठी मात्र आवाज हेच संवादाचे माध्यम असते. तिथे तर भाषेच्या शुचितेला महत्वच उरत नाही. ज्या लोकांना बोलता येत नाही असे लोकही ओठांच्या हालचाली करून किंवा खाणाखुणा करून संवाद साधतात. अशा वेळेस भाषेचा संबंधच येत नाही. फक्त संवाद महत्वाचा ठरतो. कधी कधी माणूस स्वतः स्वतःशीच संवाद साधत असतो. म्हणजे प्रसंगानुरूप त्याच्या मनात विचार येत असतात आणि त्यावर तो आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार निर्णय घेत असतो. ह्यामध्ये संवादाच्या कुठल्याही माध्यमाचा उपयोग होत नाही. त्यामुळे अशा प्रसंगी भाषा किंवा तिची शुचिता ह्याला अर्थच राहत नाही. संवाद साधणे ही एक कला आहे. ह्यातून सुसंवाद किंवा विसंवाद जरी झाला तरी तो केवळ बोलण्याच्या, लिखाणाच्या किंवा खुणांच्या माध्यमातून होईल. ह्यात भाषेची शुचिता गौण ठरते. तेंव्हा परस्परांमध्ये संवाद साधताना तुमच्याकडील संवाद कौशल्य  महत्वाचे आहे भाषेची शुचिता नाही.                                                                                                              

                               

                                                                                                          सौ. ऋचिता बोधनकर दवंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *