सनविवि कथा,साहित्योन्मेष सार्थक               

सार्थक               

                    

–विशाखा पेंडसे -पंढरपुरे

दिवस कलता कलता बैलगाडी पाचाडजवळ पोचली. गाडीत लवंडलेला येसाजी गाडीच्या कठड्याचा आधार घेत उत्सुकतेने हळूहळू उठून बसला आणि समोर बघू लागला. दिवसभराच्या प्रवासाने कंटाळलेली त्याची नातही आता हुशारली आणि आज्याच्या मागून त्याला बिलगून समोर बघू लागली. गाव माणसांनी फुलून गेला होता. येसाजीची कारभारीण धर्माला म्हणाली, ” धर्मा, ल्येका, त्या झाडाच्या बुडाशी सोड गाडी. बैलास्नी पानी पाज. आज लय दमलीत बैलं. तिकडं हीर हाय बग.” धर्माने मान हलवली. गाडी झाडाखाली आल्यावर बैलांना चुचकारून खाली उडी मारत तो म्हणाला, ” मामी, तू चूल मांड पलीकडं. म्या पानी आनतू.” त्याने गाडीतली घोंगडी घेतली आणि दुहेरी घडी घालून पारावर अंथरली. येसाजीला आधार देत त्याने त्याला खाली उतरवलं आणि हळूहळू चालवत घोंगडीवर नीट झाडाच्या बुंध्याला टेकवून बसवलं. तो येसाजीला म्हणाला, “मामा, म्या पानी आनतू. मामी चूल पेटवंल. गरम गरम पानी घ्या अंगावर. म्हंजी बरं वाटंल. लय दमलात आज.” येसाजीच्या चेहर्‍यावर हसू उमटलं. तो म्हणाला, “आज म्या धा-ईस वर्सांनी जवान झालोय ल्येका. आता दमबीम कसला?” धर्माचा चेहराही समाधानाने खुलला आणि तो म्हणाला, “म्या गावात दादाची चवकशी बी करतू. त्यो गडावर हाय का नाय ते इचारतू.” आपल्या कर्तबगार लेकाच्या आठवणीने येसाजीचा चेहरा आणखीनच उजळला. त्याची नात उत्साहाने जिकडेतिकडे बागडत होती. येसाजीलाही तिच्यासारखंच बागडावंसं वाटत होतं. आता शरीर साथ देत नसलं, एक पाय गमावला असला म्हणून काय झालं? मनाने तो शिवाजीराजाचा तरणाबांड सैनिकच होता. पाठमोर्‍या धर्माकडे बघत तो आठवू लागला. किती वरसं जाली? सतरा-अठरा? व्हय. त्याच्या डोळ्यासमोर तो काळ उभा राहिला. 

 

“येसा, हायेस का घरात?”

 सकाळी सकाळी बाजीचा आवाज कानावर पडताच येसाजीला आश्चर्य वाटलं. त्याने मागे वळून आवाज दिला, ” काय रं बाजी?” येसाजी सुतार होता. सकाळी उठून तो हत्याराला धार लावत होता. बाजी समोर येऊन बसला. त्याच्याकडे बघत येसाजीने विचारलं,” येवड्या लौकर काय काम काडलंस आज?” बाजी म्हणाला,” गडावर काम कराया येतूस काय?” 

“कंच्या गडावर?” 

“म्हंजे तुला म्हाईतच नाय व्हय? आरं शिवाजीराजा गड बांदनार हाय ह्या आपल्या भोरप्या डोंगरावर !”

येसाजी म्हणाला,” आसंल बाबा.”

बाजी म्हणाला,” आसंल न्हाई, हायेच. राजाला चांगला कारागीर पायजे, तुज्यासारका.” 

येसाला काम मिळालं, तर हवं होतंच. त्याने बाजीबरोबर गडाच्या कामावर जायचं ठरवलं. बाजी पूर्वी चंद्रराव         मोर्‍यांकडे होता, पण आता तो शिवाजीराजाला आपलं दैवत मानत होता. येसाजी कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपलं काम नि आपण, असं त्याचं सूत्र होतं. पण शिवाजीराजाने जावळी घेतल्यापासून परिस्थिती सुधारली आहे, हे त्यालाही मनोमन पटलं होतं. आता कुणाची जोर-जबरदस्ती चालत नव्हती. चोराचिलटांचं भय कमी झालं होतं. वतनदाराची मुजोरी कमी झाली होती, हे खरं. शिवाजीराजा काम देत असेल, तर जाऊ डोंगरावर, असा विचार करून तो आपलं सुतारकामाचं साहित्य घेऊन बाजीबरोबर भोरप्या डोंगर चढून गेला. खरोखरच वर कामाची गडबड उडाली होती. तोही त्यात सामील झाला. हळूहळू तो तिथे चांगला रुळला. स्वतः मोरोपंतांना त्याचं काम पसंत पडत होतं.

 

येसाजी कष्टाळू तर होताच, पण निधड्या छातीचाही होता. जावळीचं जंगल चांगलंच दाट होतं. एकदा संध्याकाळच्या वेळी  डोंगर उतरत असताना त्याला खालच्या बाजूने गुराख्यांचा आरडाओरडा ऐकू आला. येसाजी धावतच तिकडे गेला. एका अस्वलाने गुराख्यांपैकी एकाला धरलं होतं. येसाजीने मागचापुढचा विचार न करता त्वेषाने आपल्या हातातल्या करवतीने अस्वलावर वार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने अस्वल बिथरलं आणि पळून गेलं. गुराख्याचा जीव थोडक्यात वाचला. 

ही हकीगत मोरोपंतांपर्यंत आणि नंतर शिवाजीराजांपर्यंत पोचली. गडाचं काम आता संपत आलं होतं. शिवाजीराजे एकदा गडावर आले असता त्यांनी येसाजीला बोलावून घेतलं. ते येसाजीला म्हणाले, “तुझं सुतारकाम तर चांगलं आहेच, पण तू शूर आहेस. अस्वलावर हल्ला करण्याचं धैर्य तुझ्यात आहे. आमच्या सैन्यात सामील हो. तुझ्या धैर्याला साजेसं काम तुला देतो.”

त्या दिवशी येसाजीचं आयुष्य बदलून गेलं. तो तलवारबाजी शिकला, भाला फेकायला शिकला. शिवाजीराजे त्याच्यावर प्रसन्न होते. गड बांधून त्याचं नामकरणही झालं होतं-प्रतापगड. विजापूरचा सरदार अफझलखान शिवाजीराजांना पकडून घेऊन जाण्यासाठी येणार, अशा बातम्या येऊ लागल्या होत्या.

प्रचंड सैन्य घेऊन अफझलखान आला खरा, मात्र शिवाजीराजांच्या सैन्याने त्या सैन्याची धूळधाण उडवली. खुद्द अफझलखान मारला गेला. येसाजीने प्रतापगडाखालच्या लढाईत मोलाची कामगिरी बजावली. परंतु त्यात त्याचा पाय गमावला. पायाची जखम बरी व्हायला बरेच दिवस लागले. बरा झाल्यावर तो परत जमेल तसं सुतारकाम करू लागला. शिवाजीराजांनी त्याची नीट व्यवस्था लावून दिली होती. येसाजीचा मुलगा मोठा झाला, तसा त्याने त्यालाही शिवाजीराजांकडे धाडून दिला. तोही येसाजीसारखाच शूर होता, राजांचा लाडका होता. शिवाजीराजांशी एकदा झालेल्या भेटीने त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं होतं. 

 

“मामा, भाकर खाऊन घ्या.” धर्माच्या हाकेने येसाजी भानावर आला. अंधार पडायला लागला होता. अजून चार दिवसांनी शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक होणार होता. त्या सोहळ्यासाठी येसाजीला मानाने बोलावणं आलं होतं. आपापल्या गावाहून येसाजीसारखे कितीतरी जण रायगडाकडे आले होते, येत होते. सगळीकडे एखाद्या उत्सवासारखं वातावरण होतं. 

जेमतेम अर्धी भाकर खाऊन येसाजीचं पोट भरलं. त्याला आत्ताच्या आत्ता गडावर जाऊन महाराजांना डोळे भरून बघावं असं वाटत होतं. कधी नव्हे, ते त्याला आपल्या अपंगत्वाचा राग येत होता. 

याच अस्वस्थतेत रात्र कशीबशी सरली. पहाट झाली. येसाजीचा डोळा लागला. त्याला जाग आली, ती कारभारणीच्या हाकेने.

येसाजीसाठी आणि त्याच्यासारख्या सगळ्यांसाठी गडावरून पालख्या येणार आहेत, असा निरोप होता. येसाजीचं मन भरून आलं. डोळे तर कालपासून सतत भरून येतच होते. ठेवणीतले कपडे करून येसाजी तयार झाला. पालखी आली. धर्माचा हात धरून येसाजी पालखीत बसला. पालखी उचलली गेली. धर्मा, येसाजीची कारभारीण आणि त्याची नात पालखीबरोबर चालू लागले. सामान्यांमधले असामान्यत्व जागवणार्‍या त्यांच्या राजाकडे. 

 

         

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *