सनविवि Uncategorized,माहितीपूर्ण लेख आपुलिया हितासी , असे जो जागता , धन्य माता-पिता , तयाचिया

आपुलिया हितासी , असे जो जागता , धन्य माता-पिता , तयाचिया

पंकज पंडित

मानवी शिशु: सर्वात असहाय आणि परावलंबी पहिली दहा  वर्षे  मानवी शिशु  शारीरिकरित्या सर्वस्वी असहाय, दुबळे  असतो. मानव सोडला तर इतर प्राण्यांची पिल्ले , लवकर आत्मनिर्भर होतात; स्वतःच्या पायावर (किंवा पंखावर) उभे राहतात त्यांच्यावर जगण्यासाठी संस्कार अंतःप्रेरणेने (instictively) होतात याउलट माणसाच्या मुलावर  पालकांनी जाणीवपूर्वक संस्कार करावे लागतात 

अजाण  बालक म्हणजे कोरी पाटी: शिशुचा मूळ स्वभाव सोsहम-रुपी आनंदी; असतो तो लिंग, वर्ग , वर्ण , जाती असा कोणताच भेद करत नाही नवजात अर्भकाचा जन्म झाल्याबरोबर, तहान-भूक, झोप (आणि मातेच्या स्पर्शावाटे मिळणारे प्रेम) या मूलभूत गरज भागल्यानंतर, बालक भोवतालच्या गोष्टीचे निरीक्षण करतो आणि कोऱ्या पाटीवर, कळत नकळत संस्कार व्हायला सुरवात होते . 

” पहिल्या ५ वर्षात प्रामुख्याने बालकाचा उजवा मेंदू  कार्यरत असतो” माणसाचा मेंदू, दोन समभागामध्ये विभागला गेला आहे ; डावा भाग गणित, तार्किक(लॉजिक), विश्लेषणात्मक अशा एक-रेषीय विचारांचं तर उजवा भाग हा दृश्य, कला, प्रतिभा, कल्पना-शक्ती, अशा अमूर्त, गोष्टीचे केन्द्र आहे. पहिल्या पाच वर्षात, पाच इंद्रियाद्वारा , शाब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या संदेश ग्रहणातून बालकाच्या उजव्या मेंदूची झपाट्याने वाढ होते या संस्कारक्षम वयात, मिळालेल्या अनौपचारिक शिक्षणातून बालक, पहिले प्रथम. मातेची बोली-भाषा (“मातृ”भाषा!) शिकतो या काळात, बालक, विविध भाषा बोलायला सहज शिकू शकतो ; 

“मुलगा त्याच्या मामावर  जातो; मुलगी तिच्या आत्यावर जाते”. हा केवळ नैसर्गिक योगायोग? बालपणाच्या काळात, ज्यांचा निकटचा सहवास बालकाला लाभतो, अशा जवळच्या नातेवाईकामधून, बालक आपले “आदर्श-व्यक्तिमत्व” (role model) निवडतो, या काळात, भोवतालच्या, दृक्श्राव्य गोष्टीमधून अनाहूतपणे, मुलांवर कळत नकळत झालेल्या संस्कारातून, बालकाची मूल्य-व्यवस्था, आदर्श तयार होते, कधीही बदलणाऱ्या, काळ्या दगडावरच्या रेघेसारखी.! तज्ज्ञांच्या मते, बालकाच्या मेंदूची ८५%-९०% वाढ , पहिल्या पाच वर्षातच पूर्ण होते बुद्ध्यांक (Intelligence quotient ) आणि भावनांक ( Emotional quotient) बाल्यावस्थेतच घडत असतो. पुढील काळात, शाळा कॉलेजात मिळणारे औपचारिक शिक्षण हे एक-रेषीय विचार करणाऱ्या डाव्या मेंदूचा विकास करते. 

पाच वर्षानंतर पाल्याला शिस्त लावणे आवश्यक आहे 

 

या संस्कृत सुभाषितांचा अर्थ असा आहे , पहिली पाच वर्षे मुलाचे लालन(लाड, प्रेम) करावे. नंतर, दहा वर्षापर्यंत , त्याला शिस्त लावण्यासाठी, वेळ प्रसंगी मारावे! मात्र सोळाव्या वर्षानंतर, मुलाला मित्राप्रमाणे वागवावे.” प्रत्येक पालकाने कधी गोडी गुलाबीने तर कधी धाक दाखवून, शिस्त लावणे जरुरी आहे,  “छडी लगे छमछम विद्या येई घमघम” अशी म्हण, आता कालबाह्य झाली आहे. आता  मुलांना घरी किंवा शाळेत  मारणे हे क्रूरपणाचे लक्षण मानले जाते

कुंभारासारखा गुरु, नाही रे जगात! कुंभार ओल्या मातीच्या,कच्च्या मडक्याला आकार देताना, त्याला हलकया हाताने , फटके मारतो परंतु दुसऱ्या हाताने , मडके फुटणार नाही याची काळजी घेतो, अगदी तसेच मुलांना शिस्त लावावी; त्यांच्या आत्मसन्मानाला कोणतीही  इजा  न करता. मडके भाजल्यानंतर मातीला आकार देता येत नाही,  तसेच मोठे झाल्यावर शिस्त लावता येत नाही.  

प्रलोभन-दंड पद्धती (Carrot or stick ) चांगल्या सवयी  लावण्यासाठी, बक्षीस देऊन किंवा शिक्षा करून, उद्युक्त करता येते. मुलाची जाहीर प्रशंसा करणे(Good Boy!) शाबासकी देणे हे सुद्धा एक बक्षीस तर शाब्दिक कांनउघाडणी, मानसिक शिक्षेसारखी असते शहाण्याला शब्दाचा मार  पुरेसा असतो. जास्त शिक्षा केल्याने दुष्परिणाम होतात ; कोडगेपणा येऊ शकतो किंवा भीतीमुळे, स्वभाव दुबळा होऊ शकतो. 

शिस्त म्हणजे काय ? एक व्यापक अर्थ; प्रेयस आणि श्रेयस या सार -असार,  निवडीसाठी पाल्याची मानसिक तयारी करणे

१ प्रेयस (प्रिय वाटणाऱ्या) पण हितावह नाहीत, त्या गोष्टीचा मोह टाळणे(उदा. लहानपणी जास्त चॉकलेटे खाणे; टीव्ही , मोबाईल बघणे पुढे वाईट व्यसने (तंबाखू , दारू) सारखी  लागणे  

२ श्रेयस (हितावह पण अप्रिय) गोष्ट करण्यास उद्यक्त करणे, (उदा. रोजचा शाळेचा अभ्यास करणे पाढे पाठ करणे, श्लोक म्हणणे, नियमित  व्यायाम करणे, कोणतेही वाद्य शिकण्यासाठी सतत प्रयत्न ) सवयीने श्रेयस हे प्रिय वाटू लागते. हितावह सवयी लावायला  अवधी लागतो. याउलट प्रिय वाटणाऱ्या वाईट सवयी.

*( टीप  १  पहा) 

बाल्यावस्थेतून  पौगंडावस्थेत पदार्पण बालकांसाठी त्याची आई-वडील महानायिका-नायक असतात मात्र पौगंडावस्थेत, प्रेम, भीतीयुक्त आदर, अशा “इडिपस”( टीप २ पहा) गंडातून तयार झालेल्या या प्रतिमेला तडा जाऊन, पाल्याची पालकांशी एक सूक्ष स्पर्धा सुरु होते. आत्तापर्यंत आई वडिलांसमोर मान खाली घालून बोलणारी मुले आता, डोळ्याला डोळा देऊन, वाद  घालतात; बंडखोरी, करून आई वडिलांना आव्हान देतात. पिता-पुत्र, माय-लेकींमध्ये दरी निर्माण होऊन, मुलांच्या मनात आई वडिलांबद्दल अढी राहू शकते. 

कळतंय पण वळत नाही शाळेतून महाविद्यालयामध्ये प्रवेश करताना, मुलांचे आदर्श,  मूल्ये आमूलाग्र बदलतात. आता त्यांच्यावर संगतीचा, सहाध्यायी मित्र-मैत्रिणींचा, खूप प्रभाव पडतो. आई वडिलांनी लहानपणी बळजबरीने, मारून मुटकून लावलेली शिस्त, मोठेपणी उलट परिणाम करू शकते. मोठी झालेली मुले, आपले न ऐकता, चुकीच्या मार्गाने जात असलेले पाहताना, आई बापांना विलक्षण हतबलता येते

“मोहाचे क्षण पुढे ढकलणे” या परीक्षणासाठी “मार्शमेलो” नावाची एक परीक्षा आहे . मुलांना एक चॉकलेट  दिले जाते हे चॉकलेट , पुढील दोन तासात न खाल्ल्यास, आणखीन दोन चॉकलेट देण्याचा वायदा केला जातो काही मुले दिलेले चॉकलेट लगेच खाऊन टाकतात पण काही मुले मात्र चॉकलेट खाण्याच्या मोहावर मात करून , अजून चॉकलेटसाठी थांबतात. अशा संयमी मनोनिग्रहाला भावनिक अंक(EQ) असे नाव आहे. बुद्ध्यांक(IQ) आणि भावनांक मिळून जो अंक बनतो त्याला अध्यात्मिक अंक(SQ) असेही म्हणतात 

मुलांचे पालकत्व; निष्काम कर्मयोग मोहाचे क्षण पाल्याच्या मोठेपणीसुद्धा येतात., “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” अस संत तुकाराम सांगतात. आमच्या वेळेस “मी सायकलने १० मेल कॉलेजला जायचो! घरचा पोळी-भाजीचा डबा खात असे” हे खरे असले तरी आजच्या सुखवस्तू मुलांना दिखाऊपणाची सवय झाली आहे ! पालक आपला अनुभव कोणालाही देऊ शकत नाही प्रत्येकजण स्व-अनुभवातूनच, टक्के-टोणपे खात, जीवन कसे जगायचे,  ते शिकत असतो या प्रवासात चुका होणारच पण एकच चूक पुन्हा होऊ नये यासाठीची जागरूकता पालक देऊ शकतील. 

पालकांनी आपली स्वप्ने, मुलांच्या मार्फत पुरी का करावी ? स्वतःचे आयुष्य समरसून जगायचे बंद झाले की मग मुलांच्या आयुष्यात हस्तक्षेप सुरु होतो “ पालकांनी स्वतःचे आयुष्य , मुलांच्याशिवाय, आनंदाने जगायला पाहिजे” असे “त्रयस्थपण” आपल्याला पाश्चिमात्य देशातील लोकांकडून शिकायला पाहिजे. आपल्या  मुलांवर सर्वच आईवडील प्रेमाची पाखर घालतात परंतु नदीच्या उलट्या प्रवाहाप्रमाणे, मुलांच्याकडून अशी अपेक्षा ठेवणे फोल आहे.

“आपला तो बाब्या, असे अति लाड नको; मुलांना आर्थिक , भावनिक मानसिक दृष्ट्या , स्वतःच्या  पायावर  उभे करण्यासाठी “कठोर प्रेम” (Tough Love) जरुरी असते आई बापंचे छत्र, मुलांना जन्मभर कसे लाभणार? चिमणा-चिमणी पिल्लाला , मोठे झाल्यावर, घरट्याबाहेर ढकलून सांगतात “आता तू तुझं दुसरे घरटे बनव”  असे कठोर प्रेम किती भारतीय पालक करू शकतील? 

आपुलिया  हिता, जो असे जागता , धन्य माता पिता तयाचिया ” असे स्वयं-शिस्त, सात्विक पाल्य, ज्याना लाभले, ते पालक धन्य आहेत, त्यांचा हेवा,  देवांनासुद्धा वाटतो (*३)  ! 

—————————————————————————————————————————

  “Children begin by loving their parents; as they grow older they judge them; sometimes they forgive them.” Oscal Wilde. 

२. मनोविकार तज्ज्ञ सिगमंड  फ्रोऊंड याने इडिपस गंड ही कल्पना मांडली, 

आपुलिया  हिता, जो असे जागता | धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक , तयाचा हरिख वाटे देवासंत तुकाराम यांचे वचन आहे. 

Email contact panditpank@gmail.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *