३१ जानेवारीला संध्याकाळी चारूमावशींच्या निधनाची बातमी समजली आणि मोठाच धक्का बसला. आधी खरंच वाटलं नाही, पण अशा बातम्या दुर्दैवाने क्वचितच खोट्या ठरतात.
चारूमावशींशी माझी ओळख साधारणपणे पाच वर्षांपूर्वी झाली. माझ्या मुलाला शाळेत कन्नड भाषा अनिवार्य होती आणि त्याचा अभ्यास घेणं माझ्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं. एका मैत्रिणीकडून मुलांसाठी कन्नडचे क्लासेस घेणार्या चारूमावशींबद्दल समजलं आणि मी त्यांना भेटायला गेले. कन्नड शिकवणार्या, पण मराठीतून बोलणार्या, मुलांसाठी आजीच्या वयाच्या, छान स्वभावाच्या शिक्षिका मिळणं हा आम्हाला अलभ्य लाभच होता. आमच्या घरापासून चारूमावशींचं घर अजिबात जवळ नव्हतं, तरीही धावपळ करून पूर्ण वर्षभर मी मुलाला त्यांच्याकडे नेत राहिले, कारण त्याला खरोखरच खूप फायदा होत असलेला मला जाणवत होता. नंतर माझ्या धाकट्या मुलालाही मी त्यांच्याकडे नेत होते. एरवी अभ्यास करायचा म्हटल्यावर टाळाटाळ करत असला, तरी चारूमावशींकडे जायला मात्र तो आनंदाने तयार असायचा.
मुलांना शिकवणं हा त्यांचा छंदच होता असं म्हटलं तरी चालेल. आपल्याकडे असलेल्या मोकळ्या वेळाचा आणि शिकवण्याच्या कौशल्याचा त्या अतिशय छान उपयोग करत होत्या. त्या हे क्लासेस व्यवसाय म्हणून, आर्थिक उत्पन्नासाठी घेत नसल्या, तरी व्यवसायात जी निष्ठा आणि जो प्रामाणिकपणा लागतो, तो मात्र त्यांच्याकडे भरपूर होता. मुलांना विषय समजला पाहिजे, ही त्यांना स्वतःची जबाबदारी वाटायची. त्या प्रेमाने तर शिकवायच्याच, पण आवश्यक तिथे धाकही दाखवायच्या. एकाच वेळी वेगवेगळ्या इयत्तांमधल्या सहासात मुलांना, गणितापासून कन्नडपर्यंत सगळे विषय शिकवणं त्यांना सहज जमत होतं.
चारूमावशींबरोबर असलेल्या उणीपुर्या पाच वर्षांच्या, काहीशा मर्यादित ओळखीतूनही मला त्यांच्या प्रसन्न, प्रेमळ आणि मदत करण्यासाठी नेहमी तयार असणार्या व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडलं. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि अचानक बसलेला हा दुःखद धक्का सहन करण्याचं बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
-विशाखा
१९९८ मधे आम्ही संजयनगरला रहायला आलो, तेव्हापासून चारू माझी मैत्रीण आणि माझ्या मुलींची चारु मावशी होती. माझ्या मुलींना घरी एकट्या ठेऊन आम्ही जेव्हा जात होतो त्यावेळी चारू आहे म्हणून आम्हाला काळजी नसे.
अतिशय शांत स्वभाव आणि प्रत्येकीला मदत करायला नेहमीच तयार असणारी चारू आमच्यात नाही हे मानायला मन तयारच नाही, पण नियती पुढे कुणाचेच चालत नाही हेच खरे.
पूर्वी ती महाराष्ट्र मंडळात पण खूप ॲक्टिव होती. एकांकिका आणि नृत्य बसविणे तिला खूप आवडत होते.महाराष्ट्र मंडळाच्या जुन्या सभासद मैत्रिणींना तिच्या मैत्रीचा लाभ मिळाला होता.
ती ‘स्वकृता’ची सदस्या होती तसेच काही वर्षे स्नेहधाराची पण सदस्या होती.
आम्ही दोघींनी मिळून संजयनगरला ‘हितगुज मंडळ’ सुरू केले होते.अशा माझ्या मैत्रीणीचे वयाच्या ६८व्या वर्षी निधन झाले.
देव तिच्या आत्म्याला शांती देवो हीच इच्छा.
-आरती रानडे.
