अभिप्राय

कमलाबाई मराठे एकांकिका स्पर्धा

नाटक हा मराठी माणसाचा वीक पॅाइंटआहे असं म्हणतात आणि बंगळूरूमध्ये रंगभूमीवर मराठी नाटक फारसे पाहायला मिळत नसल्याने आम्हांला कुठेतरी चुकल्याचुकल्या सारखे वाटत होते, परंतु ही उणीव महाराष्ट्र मंडळ बंगळूरूने बऱ्याच प्रमाणात भरून काढली असे म्हणता येईल. 

          निमित्त होते कमलाबाई मराठे एकांकिका स्पर्धा….अत्यंत अटीतटीने तरीही खेळीमेळीच्या वातावरणात होत असलेली ही स्पर्धा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. आपुलकी, मैत्री, आजी आजोबा क्लब, स्नेहधारा, युवा आणि MMBS अशा सहा संघांनी यात भाग घेतला होता. प्रत्येक संघाला नाटकाचा सेट लावून पडदा पडेपर्यंत सव्वा तासांचा अवधी देण्यात आला होता जो पुरेसा वाटला.

          संघांचे लेखक, दिग्दर्शक, सर्व कलाकार आणि त्यांना मदत करणारी प्रत्येक संघाची सहाय्यक टीम या सर्वांचे अथक परिश्रम इथे दिसून आले. कारण संघांनी रंगमंचावर लावलेले सेट्स हे व्यावसायिक नाटकांच्या दर्जाचे होते, तसेच कलाकारांची संवादफेक आणि अभिनयदेखील सहज आणि उत्स्फूर्त होते. उदाहरण द्यायचे झाले तर मैत्री संघाच्या ‘अपघात’ नाटकातील पारितोषिक विजेता सेट हा खरोखरच उत्कृष्ट होता. युवा संघाच्या सर्वच कलाकारांचा अभिनय सहज तरीही ताकदीचा होता. स्नेहधाराने रंगमंचावरील वास किंवा गंध हा प्रेक्षकांमध्ये पोहोचवून कल्पकता दाखवली. MMBS ने सादर केलेल्या ‘भ्रमणांती परमेश्वर’ या नाटकातील देव झालेल्या कलाकारांचा नेत्रदीपक पोषाख डोळ्यांना खरंच सुखावणारा होता.

          आता थोडे विषयाबद्दल….एकांकिकांचे विषय हे सध्याच्या काळाला सुसंगत आणि विचारप्रवर्तक होते. सहापैकी तीन एकांकिकांमध्ये मानसिक आरोग्य, सध्या सर्वांना असलेला स्ट्रेस किंवा ताण आणि त्याचे होणारे परिणाम मांडले गेले होते. हा सध्याच्या काळातील सर्वांसाठी महत्त्वाचा असा विषय असल्याने आणि त्याची वेळेवर आणि प्रभावी अशी हाताळणी करणे आवश्यक असल्याने नकळतच याचे प्रतिबिंब या स्पर्धेतील विषयांवर पडलेले दिसले. एक एकांकिका रहस्यमय तर दुसऱ्या दोन एकांकिका या हलक्याफुलक्या अशा होत्या ज्याने प्रेक्षकांचा ताण कमी झाला…असो….

          आम्ही स्पर्धा खूपच एन्जॉय केली, प्रत्येक दिवशी तीन एकांकिका असे दोन दिवस सलग स्पर्धा असली तरीही सर्व एकांकिकांना सभागृह पूर्ण भरले होते आणि प्रत्येक एकांकिकेनंतर स्पर्धेची रंगत उत्तरोत्तर वाढत होती. निकालाची उत्कंठा तर आम्हा सर्वांनाच होती. 

मंडळाने नाट्य क्षेत्रातील तज्ञ परीक्षक आमंत्रित केले होते, तरी त्यांच्यासाठीही स्पर्धेचा निकाल लावणे ही सोपी गोष्ट नव्हती एवढे सुंदर सादरीकरण आणि एवढा अटीतटीचा सामना होता….परीक्षकांनी सर्व संघांना मौलिक मार्गदर्शन केले आणि कशाच्या आधारावर आपण हे परीक्षण आणि निकाल जाहीर करीत आहोत त्यावर भाष्य देखील केले जे आम्हाला नक्कीच पटण्यासारखे वाटले.

लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय कौशल्य आणि सर्वोत्कृष्ट एकांकिका अशा सर्व बाजूंवर बक्षिसे देण्यात आली आणि वर म्हटल्याप्रमाणे भक्कम अभिनय आणि दिग्दर्शन असलेली आणि आम्हालाही खूप आवडलेली युवा संघाची ‘सुरवंट’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट म्हणून जाहीर झाली. 

          येथे सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही की संघांसाठी केवळ पारितोषिक हे एकच या स्पर्धेत भाग घेण्याचे कारण नव्हते, तर संघभावना तसेच आपण रंगमंचावर काही सादर करीत आहोत, ही अं          तस्थ उर्मी आणि एकांकिका व्यवस्थित पार पडल्यावर दिसलेले त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान…या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक वर्षी जुने आणि नवीन कलाकार आणि हे संघ कित्येक वर्षे ही स्पर्धा यशस्वी करीत आले आहेत. अजूनही अनेक वर्षे ही एकांकिका स्पर्धा अशीच पार पडत राहो आणि आणखी संघांची त्यात भर पडो ही सदिच्छा…

– समीर प्रधान

-x-x-x-x-x-x-x-

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *