— ओंकार संगोराम–
बऱ्याचदा “नाट्यसंगीत संपत आलेलं आहे” असा सूर ऐकायला मिळतो. पण वसंतोत्सव ऐकल्यावर खात्री झाली की नाट्यसंगीताचा हा संपन्न वारसा पुढच्या अनेक पिढ्या सुरु राहणार !
बेंगळुरुमधील वसंतोत्सवात श्रोतृवर्गामध्ये बुजुर्ग होते, मध्यवयीन होते आणि अगदी १०-१५ वर्षांची मुलेही होती. या सर्वांनी जवळ-जवळ तीन तास वसंतोत्सव मनसोक्त अनुभवला.
वसंतोत्सवाच्या केंद्रस्थानी होते आपल्या सर्वांचे लाडके तरुण पिढीतील प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे. आपले आजोबा कै. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राहुल वसंतोत्सव सादर करतात.
या वसंतोत्सवात राहुल यांना समर्थ साथ होती प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे आणि अतिशय निष्णात वादकांची.
रवि मी, दिलकी तपिश आणि घेई छंद या नाट्यगीतांबरोबर सादर केलेली सुगम गीतेही रसिकांना आवडली.
वसंतोत्सवात “मी वसंतराव” या चित्रपटाची झलक पाहण्यास मिळाली. या चित्रपटात राहुल वसंतरावांची भुमिका साकारत आहेत. विशेषतः या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन राहुल यांचे आहे.
वसंतोत्सवामध्ये “मी वसंतराव” या चित्रपटातील गाणी सादर झाली. संगीतकार म्हणून राहुल यांचे अनुभव, त्यांचे विचार ऐकायला मिळाले.
त्याचबरोबर दोन सादरीकरणामधील राहुल आणि प्रियांका यांच्या बोलण्यातून किंबहुना अनौपचारिक गप्पांमधून रसिकांबरोबर छान संवाद साधला गेला.
कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये मंडळाने रुचकर खाद्यपदार्थांची सोय केली होती. त्यामुळे उत्तम गाण्याबरोबर आणि छान खाण्याचाही आनंद घेता आला.
एकंदर, गेल्या दोनेक वर्षानंतर प्रथमच आम्हाला एक छान कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.
जेव्हा मोठ्या संख्येने रसिक एकत्र येऊन अश्या सुंदर कार्यक्रमाचा आनंद घेतात तेव्हा आपसूकच एक सकारात्मक वातावरण बनतं आणि ते आम्ही अनुभवलं !
सर्व कलाकारांना धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे, विशेषतः अजित आणि मंजिरी एदलाबादकर यांचे मनापासून आभार.
