–सौ.ऋचिता बोधनकर दवंडे–
आपण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रवास करत असतो. प्रवासात आपल्याला वेगवेगळी माणसे भेटतात, निरनिराळे अनुभव येतात. पण काही प्रवास मात्र त्यात भेटलेली माणसे, प्रवासातील ठिकाणे किंवा प्रवासादरम्यान आलेले अनुभव अशा कारणांमुळे नेहमीसाठी आपल्या लक्षात राहतात. मलाही अशाच एका प्रवासात आलेला हा अनुभव ………….
ही घटना जवळजवळ सोळा सतरा वर्षांपूर्वीची आहे. तेंव्हा मी बी.एस.सी.च्या द्वितीय वर्षाला होते. मी आणि माझी आई आम्ही दोघी खाजगी बसने एका जवळच्या नातेवाईकांकडे लग्नाला इंदोरला गेलो होतो. लग्न आटोपल्यावर आम्ही इंदोर – नागपूर हा परतीचा प्रवास देखील खाजगी बसनेच करत होतो. इंदोरहून बस निघाली तेंव्हा दुपारचा एक वाजला असेल. बस सुटल्यानंतर काही अंतरावर त्याचे चाक पंक्चर झाले. चाक बदली केल्यानंतर बस सुरु झाली. थोडे अंतर पार करत नाही तर पुन्हा बस बंद पडली. चालक आणि वाहकाने दुरुस्ती करून बस सुरु केली. मात्र ह्या दोन्ही घटनांमुळे इंदोर शहरातून बाहेर पडायलाच दुपारचे तीन वाजले. आतातरी कोणतीही अडचण ना येता सुरळीत प्रवास होवो असे विचार मनात चालू होते. पण पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याची कल्पना त्यावेळेस बसमधील एकाही प्रवाशाला नव्हती.
आमचा पुढील काही तासांचा प्रवास सुरळीत सुरु होता. इंदोरहून नागपूरला जातानाचा काही प्रवास हा मेळघाटच्या जंगलातून होतो. आमची बस पण जंगल परिसरातून जात होती आणि जवळपास रात्री आठ वाजता भर जंगलात बस पुन्हा बंद पडली. वाहक चालकाने उतरून काय झाले आहे ह्याची पाहणी केली पण आता नक्की काय झाले आहे हे त्यांनाही कळत नव्हते. पुष्कळ प्रयत्न करूनही बस काही सुरु झाली नाही.जंगल परिसर असल्याने जास्त वेळ खाली राहणे देखील धोकादायक होते. शेवटी त्यांनी बसमध्ये येऊन सर्व प्रवाशांना ह्याची कल्पना दिली. अख्खी रात्र भर जंगलात बसमध्ये काढावी लागणार की काय ह्या एका कल्पनेने सर्वच घाबरले. बसमध्ये लहान मुले होती, ज्येष्ठ नागरिक होते, महिला देखील होत्या. तरुण मुलगी सोबत असताना अशा परिस्थितीत काय आणि कसे होईल ह्या विचाराने माझ्या आईचे तर हात पायच गळाले.
इतरही काही वाहने येत जात होती पण कोणाकडूनही योग्य ती मदत मिळत नव्हती. इंदोरहून निघायच्या आधीच बस नीट पहिली का नाही असे म्हणत काही प्रवासी वाहक चालकावर चिडले. काहींनी थोडा गोंधळ देखील केला. पण असे करून उपयोग नव्हता काहीतरी करावेच लागणार होते.
जंगल आहे तेंव्हा इथे वनविभागाचे कार्यालय तर असेलच तेथे काही मदत मिळेल तर पाहावी असा विचार काही लोकांनी मांडला. चालक आणि वाहकाला विचारपूस केली असता काही अंतरावर वनविभागाचे कार्यालय आहे अशी माहिती कळली. पण कार्यालयापर्यंत जाणार कसे हा प्रश्न होता. शेवटी चालक, काही तरुण पुरुष मंडळी असे सात आठ जण एकमेकांचा हात धरुन कार्यालयाकडे जाण्यास निघाले. त्यांनी तिथे जाऊन वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सगळी परिस्थिती कथन केली. ताबडतोब तेथील अधिकारी काही कर्मचारी आणि त्यांच्या येथील एक मेकॅनिक तसेच प्रवाशांना घेऊन वनविभागाच्या गाडीने बसपर्यंत आले. मेकॅनिकने पाहणी केली असता बसच्या इंजिनचा एक भाग निकामी झाला आहे आणि तो बदलल्याशिवाय बस सुरु होणार नाही असे जाहीर केले. बसच्या इंजिनचा तो भाग आणायला परतवाड्याला जावे लागणार होते आणि ते इतक्या रात्री शक्य नव्हते. इंदोरहून बदली बस मागवायची म्हटली तरी त्यालाही सकाळ उजाडणार होती. तेंव्हा आता अख्खी रात्र बसमध्येच काढावी लागणार हे निश्चित होते. दरम्यान चालकाने बसच्या इंदोर कार्यालयात फोन लावून बदली बस पाठवण्याची सूचना केली. ती सकाळी आठच्या आधी येणार नव्हती. बस सुरु होण्याची आशा पूर्णतः मावळली होती. त्यात रात्रीची वेळ,आजूबाजूचा काळोख आणि रस्त्यावर बंद पडलेल्या बसमध्ये लहान मुले, वयस्कर माणसे, महिला, तरुण मुली ह्यांना घेऊन जंगलात कशी काय रात्र निघणार ह्या विचाराने प्रत्येक प्रवासी अस्वस्थ होता. कारण रात्री वन्यप्राण्यांची भीती होती. बसमधील परिस्थिती पाहून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला शांत केले. आमचे आठ दहा कर्मचारी आज सशस्त्र रात्रभर तुमच्या सोबत असतील ह्या त्यांच्या वाक्याने सगळ्यांनाच धीर आला.
खरोखरच काही वेळात वनविभागाचे दहा सशस्त्र कर्मचारी आमच्या बसजवळ हजर होते. अधिकाऱ्यांनी प्रवाशांसाठी पाण्याच्या बाटल्या देखील पाठवल्या होत्या. “आम्ही सगळे रात्रभर तुमच्या बसबाहेर उभे राहणार आहोत. तुम्ही अगदी निश्चिन्त राहा. फक्त खिडक्या तेवढ्या लावून घ्या” असे म्हणत लगेच सर्व कर्मचारी बसच्या आजूबाजूला तीन-तीन आणि पुढे मागे दोन-दोन अशा तऱ्हेने आपापल्या जागी उभे राहिले. ह्या सगळ्यामध्ये रात्रीचे साडे अकरा झाले होते. भूक कोणालाच नव्हती पण तरी प्रत्येकाने स्वतःजवळ जे काही खायला होते ते एकमेकांसोबत वाटले. पहारा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना खायचे पदार्थ घेण्याचा आग्रह केला असता तो त्यांनी अदबीने नाकारला. एका प्रसंगाने एकमेकांना पूर्णतः अनोळखी असणारे प्रवासी म्हणजे जणू एक कुटुंबच झाले होते. गाढ झोप तर येणार नव्हतीच पण तरीही कसेतरी अर्धवट झोपत जागत आम्ही सर्वानी ती रात्र काढली. वनविभागाचे कर्मचारी मात्र रात्रभर प्रामाणिकपणे हातात बंदूक घेऊन आमच्या बसला पहारा देत आमचे संरक्षण करत होते.
सकाळी बरोबर सहा-साडे सहाच्या दरम्यान तेच अधिकारी स्वतः हजर झाले. त्यांनी जातीने आमची विचारपूस केली. तसेच येताना त्यांनी सगळ्यांसाठी थोडा थोडा का होईना पण चहा देखील आणला होता. चहा पिऊन आम्ही प्रवासी आणि पहारा दिलेले कर्मचारी सगळेच थोडे ताजेतवाने झालो. काही वेळात इंदोरहून येणारी बदली बस पण हजर झाली. आम्ही आपआपले सामान घेऊन त्या बस मध्ये जाऊन बसलो. बस सुटण्यापूर्वी मात्र बसमधील प्रत्येकाने त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. भर जंगलात रात्रभर केवळ तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित होतो ह्या आमच्या बोलण्यावर त्या सगळ्यांनी हसून “जंगल परिसरात तुम्ही अडचणीत होता तेंव्हा हे आमच्या वनविभागाचे तसेच आम्हा सर्वांचे कर्तव्यच होते” अशा शब्दात मोठेपणा घेणे टाळले आणि आमची रजा घेतली. आम्ही देखील त्या सर्वांच्या कर्तव्यदक्षतेला मनोमन सलाम करत आमचा पुढचा प्रवास सुरु केला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेने आणि माणुसकीने हा प्रवास माझ्या कायम स्मरणात राहील ह्यात शंका नाही.
