–माणिक नेरकर–
2020 च्या साधारण सुरुवातीच्या काळात आपल्या संपूर्ण देशात आणि जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्यात “कोरोना” नामक एका अनाहूत राक्षसाने अगदी अनपेक्षितपणे प्रवेश केला आणि बघता बघता ह्या राक्षसाने थोड्याच कालावधीत उग्र अवतार धारण केला. आता ह्या कोरोनामुळे कुणा कुणावर आणि कशा कशावर कसले चांगले-/वाईट दूरगामी परिणाम झालेत ह्यावर भरपूर चर्चा-विनिमय झालंय सगळीकडेच.
आपण जरा वातावरण हलकं करणाऱ्या कोणत्या गोष्टी घडल्या त्याचा विचार करूया
सुरुवातीच्या “लॉक डाउन ” काळातले काही गमतीशीर अनुभव——–
परवा एका गृपवर विद्याचा मेसेज आला, ‘सखाराम बाईंडर’ नाटक पाहिलं, यू ट्यूब वर म्हणून. जबरदस्त अभिनय .सर्वच कलाकारांचा. नाटक संपल्यानंतरही आपण बराच काळ त्या नाटकाच्या प्रभावाखाली रहातो वगैरे — मग सुनीता, दिप्ती पण म्हटल्या की आम्ही पाहिलंय हे नाटक, खूपच जबरदस्त आहे. अजून काहींनी रिमार्क दिले. मग अर्थातच मलाही इच्छा झालीच पहायची. खरं सांगायचं तर मला स्वतःला मोबाईल च्या त्या पिटुकल्या स्क्रीनवर नाटक, सिनेमा, सिरीयल काहीच पहायला मजा येत नाही; पण काय करणार ना? नाईलाज को क्या ईलाज? एकतर “सद्यस्थितीत ” सतत चिंता, निराशा, वैताग ह्या सर्व दुष्ट ग्रहांच्या सावलीत राहून स्वतःला आणि पर्यायाने कुटुंबाला त्रास करून घेण्यापेक्षा हे बरं आहे ना. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेणं, त्यांच्यासोबत स्वतःलाही आनंदी ठेवणं, घरकामात , साफ सफाईत, किचन मध्ये (इच्छा असो वा नसो) मन गुंतवणं— ही सगळी तारेवरची कसरत करणं ह्यात तर आपण म्हणजे बायका “माहीर” झालो आहोत. असो.
तर मला ह्या ठिकाणी नाटकाचे समीक्षण अजिबात करायचे नाहीये. कारण तसेही तेंडुलकरांची नाटके, त्यांचा विषय हा सर्वसामान्यांना झेपणारा आणि पचनी पडणारा नाहीच. सोनाली, चिन्मयी, सयाजी हे कलाकार बाकी खरोखर ग्रेट. मला गम्मत वाटली माझ्याच मनाची. नाटकाची लिंक ओपन केली आणि नाटक “प्ले” व्हायच्या तयारीत असतांना लगेच खाली नजर जाते.
“झटपट ढोकळा बनवण्याची सोपी पद्धत”
” बनवा घरच्या घरी, गव्हाच्या पिठापासून टेस्टी नाश्ता”
“झायका का तडका”
“बिना यीस्ट के पाव बनानेका आसान तरीका”
देवा रे, आता काय करू मी? हे नाटक पाहू की एखादी झटपट रेसिपी करून पाहू? कारण ती रेसिपी इतकी सोप्पी वाटते आणि त्याहूनही इतकी यम्मी दिसते की लगेच तोंडाला पाणी सुटते ,मग वाटते करूनच पाहूया. मनाच्या चल बिचल अवस्थेत 2 ते 3 ब्रेक मध्ये नाटक संपते एकदाचे. त्या दरम्यान एखादी तरी रेसिपी (फसलेली) “try” करून झालेली असते.
मग परत कुणाचा तरी मेसेज येतो, अरे, तो अमिताभ चा निःशब्द सिनेमा पाहिला, यू ट्यूब वर. काय सिनेमा आहे! काय अभिनय केलाय अमिताभ ने! कमाल! कमाल! मग मला तो सिनेमा पण पहायची इच्छा होतेच. पण परत तोच सिलसिला सुरू होतो राव— सिनेमा ची लिंक ओपन केली रे केली की ते ” अवॉर्ड विनर व्हिलन्स” अंगावरच यायला लागतात अक्षरशः.
” आज आपण पाहूया, जिलेबी बनवण्याची इझी कृती”
“लॉक डाउन के समय मे घरपेही बनाये, रसदार, रसगुल्ले “
“बटर कुकीज, नान खटाई, बनवा, 5 मिनिटात”
अरे यार, किती अत्याचार हे कोवळ्या मनावर? मग तो सिनेमा बघायच्या आधीच “काहीतरी तरी करूनच पाहू” ची जबरदस्त उर्मी उसळून येते. त्यात वेगवेगळ्या गृपवर सातत्याने सुगरणींचे अतिशय विहंगम, नेत्र सुख देणारे फोटो येतच असतात. कुणी टरबूज ची पाठ धरून तर कुणी खरबुजाचे पोट फाडून काही बाही पण सुरेख बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. बरे, हे झाले फक्त खाण्याच्या पदार्थांच्या बाबतीत. इतर गोष्टीत देखील इतके ऑप्शन्स असतात, की डोकं गरगरायला होतं. च्यायला, आयुष्य सुखकर आणि आनंदी होण्यासाठी इतके सारे “पर्याय” असतील , ये तो कभी सपनेमेभी सोचा न था. कधी कुणी म्हणतं, ते अमेझॉन prime वर वेब सिरीज भन्नाट असतात, तर कुणी अजून दुसऱ्याच वेबसाईटवर जायला सांगतात. असंच एकदा एका मैत्रिणींचे ऐकून मी माझ्या लेकाला म्हटलं, अमुक एक वेबसाईट ओपन करून दे तर त्याने सौम्य शब्दात मला माझी बघण्याची आणि समजण्याची क्षमता, ह्या दोन्हीची जाणीव करून देत मी बघू शकेन किंवा मला समजतील आशा सिरीज असलेली कुठलीतरी वेबसाईट ओपन करून दिली. अर्थात त्यातही मी फारशी डोकावले नाहीच. मधेच कुणी सुचवते, ते अमुक तमुक app डाउन लोड करून घ्यावे, मस्त पैकी गाणी ऐकता येतात, स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून बघता येतात, आणि अर्थातच स्वतःलाच ऐकवता येतात. कुणी fb वरच्या काही नवीन कार्यक्रमसंबंधी सांगतो तर कुणी यू ट्यूब वरच्या—- काही लाईव्ह–खास ह्या लॉक डाउन पिरियड साठी सुरू केलेले— कुठे कविता तर कुठे अभिवाचन—- माय गॉड! एक अकेली नन्ही सी जान कहा कहा दौड लगा पायेगी भला सगळंच करायची, पहायची, ऐकायची इच्छा असते, पण शरीर आणि मन दोन्ही नी साथ दिली पाहिजे ना? कामाने थकल्यावर विश्रांतीही गरजेची असतेच. त्यात आवडीच्या पुस्तकांचे वाचनही करायचे असतेच. लिखाणाची “उर्मी” आली की तीही गप्प बसू देत नाही. फावल्या वेळात (मिळाला तर) आवडीच्या गृपवर उडत उडत का होईना चक्कर टाकायची असतेच. कुठे कोडी तर कुठे जनरल नॉलेज(नसलेल्या) विषयी गहन चर्चा सुरू असते.काय करू न काय नको करू ह्या नादात मग कधी कधी काहीच केले जात नाही, अर्थात,रोजच्या कामाव्यतिरिक्त. आता तुम्हीच सांगा, मंडळी, कनफ्यूज व्हायला होणार नाही तर काय? तुम्हालाही होत असेल ना असेच, कनफ्युजायला? होते की नाही? माझा जसा गोंधळ होतो, मनाचा, तसा तुमचाही होतो ना? खरं खरं सांगायचं बरं का.
अर्थात, हा सगळा मजेशीर अनुभव सुरुवातीच्या लॉक डाऊन काळातला बरं का.
तुमच्या पोतडीत देखील असणारच असे काही किस्से. हो ना?
