चकवा

--मनीषा जोशी --

कॉलेजातून घरी आल्यावर, जेवण करून गावाबाहेरच्या देवीच्या मंदिरात जाणे हा प्रभाकर चा दैनंदिन कार्यक्रम होता.आजही नित्याप्रमाणे हात पाय धुऊन जेवण केले व पायात चपला सरकवून तो भराभर देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाला . मंदिराकडे जाताना आंब्याची दाट आमराई, पिंपळाची खूप झाडे व शेतं होती .नेहमीप्रमाणे आपल्याच विचारात मग्न होऊन प्रभाकर चालू  लागला. चालता चालता अचानक मागून कुणीतरी येत असल्यासारखा भास त्याला झाला. मागे वळून बघता कोणीच दिसेना. तो मनाशीच हसला व परत चालू लागला. परत बाजूच्या झाडीमध्ये काहीतरी सळसळल्या सारखं झालं. त्याने आजूबाजूला बघितलं नीरव शांतता होती, कुणीही दिसत नव्हतं ,तसा तो परत चालू लागला पण परत मागे कुणीतरी चालत असल्यासारखा भास झाला. प्रभाकर एकदम थांबला. आजूबाजूलाही कुणी दिसेना , तसा तो परत पुढे गेला तर अचानक मागून कोणीतरी आवाज दिला. त्याने वळून बघितले, मागे धोतर नेसलेला पगडी बांधलेला एक माणूस उभा होता..तो प्रभाकरशी काहीतरी बोलायचं अशा आविर्भावात उभा राहिला . त्याने प्रभाकरला विचारलं कुठे चाललास ? प्रभाकर ने मंदिरात जातोय असं सांगितलं. 

तुम्ही कोण ? हा प्रभाकरने प्रश्न केला..चालताना मला दिसला नाहीत , असेही म्हणाला तसा तो माणूस म्हणाला मी तुझ्या मागेच होतो तुझे लक्ष नाही….

मंदिरात जाण्यापेक्षा माझ्या सोबत ये ….

 तो माणूस प्रभाकरला म्हणाला. प्रभाकर ही अचानक भारावल्यासारखा त्याच्या मागे चालु लागला .देवीच्या मंदिरा मागे भारद्वाज ऋषींची तप:स्थली आहे अशी आख्यायिका होती. पण आतापर्यंत त्या बाजूला कुणी गेले नव्हते. एक छोटे दगडी मंदिर व त्यावर एक भगवा झेंडा असलेले दुरुन दिसायचे. पण कुणी तिकडे कधी फिरकले नव्हते. दरीत वाघ येतात असे जुनी, वृध्द मंडळी सांगायची…. 

तप:स्थली एका दरीमध्ये होती. मंदिराच्या मागे दरीत उतरण्याचा रस्ता होता. प्रभाकर त्या व्यक्तीच्या मागे दरीत उतरू लागला .पायाला मोठ मोठाले दगड व काटे टोचत होते. दरीत बरेच खाली उतरल्यावर आजूबाजूचा व मंदिराच्या परिसरातला येणारा आवाज कमी कमी होऊ लागला …

हळूहळू प्रभाकर त्या व्यक्तीच्या मागे दरीत खोलवर उतरला ….

नीरव शांतता पसरली होती…

दरीत अगदी खोलवर उतरल्यावर तो व्यक्ती प्रभाकरला एका समोर असणाऱ्या गुहेत घेऊन गेला. प्रभाकर पूर्णपणे भारावलेला होता .आपण कुठे जातो आहोत, कुणाच्या सोबत आहोत ,काय करणार आहोत, हे त्याला काहीही कळत नव्हतं..गुहेत शिरल्यावर समोर त्याला एक धूनी पेटत असलेली दिसली. काय घडते आहे हे प्रभाकरला काहीही कळत नव्हते . धुनीचा प्रकाश गुहेत पसरलेला होता. त्या मंद प्रकाशात धुनीच्या समोर एक साधू  डोळे बंद करून बसलेले त्याला दिसले. त्यांच्या बाजूलाच महादेवाची एक मोठी पिंड होती ,त्यावर एक मोठा नाग वेटोळे घालून बसलेला होता .एवढा मोठा सर्प पाहून प्रभाकर एक क्षण दचकला. पण भारावलेल्या स्थितीत असल्यामुळे त्याला काय घडते आहे काही कळेना…

त्याला इथे घेऊन आलेल्या व्यक्तीने समोर बसलेल्या साधूच्या पाया पडायला सांगितले .एखाद्या पुतळ्या प्रमाणे प्रभाकर ने साधूंना नमस्कार केला व हात जोडून पिंडी कडे तोंड करून उभा राहीला. त्याला इथे आणलेल्या व्यक्तीने प्रभाकर ला खाली बसायला सांगितले .

प्रभाकर साधू महाराजांच्या समोर बसला ,साधूने हळूच डोळे उघडले, प्रभाकर कडे एक कटाक्ष टाकला व त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले “तुम्हे यहां आने के लिए और बहोत समय है, पर बच्चा कुछ याद आया?”

प्रभाकरला काही आठवेना, काही कळेना, तेव्हा साधू महाराज त्याला म्हणाले “तुम पिछले जनम मे मेरे शिष्य थे और तुम्हारा नाम महेश्वर था| मेरे साथ हिमालय मे तपस्या कर रहे थे | पर किसी एक क्षण मोहवश होने के कारण तुम्हे दोबारा मनुष्यबस्ती मे जनम लेना पडा|”

नंतर साधू महाराज त्या व्यक्तीकडे बघून म्हणाले 

“इसे वापस छोड आवो,अभी समय नही है| फिर से जनम लेना पडेगा , फिर आ जाना”….. 

प्रभाकर अजूनही भारावलेला होता. इथे आणलेल्या व्यक्तीने परत त्याच रस्त्याने त्याला मंदिराच्या मागच्या बाजूला आणले .

काय घडते आहे हे प्रभाकरला कळत नव्हते मंदिराच्या मागच्या बाजूस दोघेही उभे राहिले. त्या व्यक्ति ने प्रभाकर कडे एक कटाक्ष टाकला आणि त्याला म्हणाला “जावो बच्चा मै फिर आऊंगा”…. 

प्रभाकर प्रदक्षिणा घातल्या प्रमाणे देवीच्या मंदिराच्या समोर येऊन उभा राहीला .परत मंदिराच्या मागे जाऊन, मागून दिसत असलेल्या भारद्वाज ऋषीच्या दरीकडे बघून परत फिरला. मागे वळून बघतो तर ती व्यक्ती ज्याने त्याला भारद्वाज ऋषी च्या दरीत नेले होते ती कुठेच दिसेना,,,

प्रभाकर एक क्षण गोंधळला आपल्या सोबत काय घडलं हे त्याला काहीच कळत नव्हतं..

आपल्यासोबत जे घडलं ती एक दैवी शक्ती होती की चकवा होता ह्याचा विचार करत तो क्षणभर तिथे उभा राहिला, 

देवीला नमस्कार करून तो ज्या रस्त्याने आला त्याच रस्त्याने  घराकडे परत फिरला……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *