–डॉ. सौ.अनुराधा भागवत.–
आयुष्य म्हणजे एक कोडेच आहे, न सुटणारे कोडे. आजवर कितीतरी विचारवंतांनी यावर पुष्कळ लिहिले आहे, कविंनी आपल्या कल्पना कवितेतून मांडल्या आहेत. कुणी सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले,
” जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे “म्हटले आहे, कुणी वेगवेगळ्या प्रकारच्या ‘ घटां’मधे आयुष्यातील दैवाचे खेळ सामावायचा प्रयत्न केला आहे, ” मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ” असा अनुभव वर्णिलेला आहे. ” आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे” ही अलिकडची कविकल्पना. कुणासाठी आयुष्य हे नंदनवन आहे तर कुणासाठी वैराण वाळवंट. मला वाटतं आयुष्य म्हणजे खरंतर एक प्रवासच आहे.
हा प्रवास आपल्या जन्माच्या आधीपासूनच सुरू होतो. मागे पडणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर आयुष्य पुढे जात असते. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. आपण कुठे जातो आहोत हे कुणालाच माहिती नसते. इथे समर्थांच्या एका वचनाची आठवण होते,
” नदी वाहते तेव्हा तिच्या जवळ नकाशा नसतो समुद्र कुठे आहे हे दाखवणारा पण ती सागरापर्यंत पोचतेच.तसंच आपलं.नकाशा जगन्नियंत्याकडे तयार आहेच, आपण फक्त पुढे जात रहायचं. ” नदी सपाट भूमिवरून संथ वाहते, दऱ्याखोऱ्यांतून,दगडगोट्यातून खळाळत धावते नागमोडी वळणावरून झुळझुळ वाहते.आपल्या आयुष्यातही असे चढ उतार येतात. नागमोडी वळणं येतात, दऱ्याखोऱ्यांतून, खाचखळग्यातून रस्ता जातो, कधी रस्ता धुक्यात हरवतो, रानवेलींच्या जाळ्यात गुरफटतो कधी उन्हात तापतो तर कधी अंधारात लोपतो.मागे पडणाऱ्या प्रसंगांच्या आठवणी व अनुभवांची शिदोरी घेऊन आपले आयुष्य पुढे जात राहते.
आईच्या कडेवर, वडिलांच्या खांद्यावर बसून सुरु झालेला हा प्रवास घरपरिवाराच्या,जातिधर्माच्या रूढ परंपरांची वहिवाट पकडतो. या वाटेवर अनुभव सिध्द सूचना फलकही दिसतात, जसं,” तरूणपणाच्या रस्त्यावरचं पहिलंच वळण मक्याचं ” बालपण संपता संपताच हे सुचवते की तरुणपण किती आव्हानात्मक आहे, वेगवेगळ्या संधि तुमची वाट पहात आहेत, अनेक पाऊलवाटा तुम्हाला खुणावत आहेत, आजवर सरळ वाटणाऱ्या रस्त्याला अनेक फाटे फुटतील, नागमोडी वळणे लागतील, हे तर पहिलंच वळण आहे. यापुढे किती?कशी?हे अगदी मोक्यावर आहे, फार जपून पार करावं लागेल कारण हे तुमचे पुढील सर्व आयुष्य बदलून टाकते. इथेच पाऊल चुकीचे पडू शकते,वाट निसरडी असेल आकर्षणाच्या भोवऱ्यात भुलभुलैय्याच्या चकव्यात सांपडाल,म्हणून कवि सावध करतो,
” तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलंच वळण मोक्याचं। सोळावं वरीस धोक्याचं।।” लावणीचा ध्वनित अर्थ कांहीही असो पण आजच्या ” उच्च शिक्षण व करीयर “मधिल स्पर्धेच्या युगात हे वळण खरंच धोक्याचही आहे व मोक्याचही.काळजीपूर्वकच नाही तर विचारपूर्वकही ओलांडावं लागते. किंवा पालकांना मुलांचा हात धरून हे वळण पार करवाव लागतं.
इथपर्यंतचा रस्ता पुष्कळसा सरळ व कमी खाचखळग्यांचा असतो, नव्हे आजकाल तो प्रयत्नपूर्वक तसा बनवला आहे.नदीच्या धारेत जसे लहान मोठे झरे येऊन मिळतात तसेच बाल्यावस्थेत दोन रस्ते मुख्य रस्त्याला येऊन मिळतात. एक ‘ आरोग्याचा ‘व एक ‘शिक्षणाचा.’आजकाल जन्माला येताच बाळांचा या मार्गावर प्रवास सुरु होतो. डॉक्टरांनी याला छान समर्पक नाव दिले आहे ‘ रोड टू हेल्थ ‘.यावरचा निर्धारित आलेख वर वर चढत जातो. यासाठी आवश्यक जी.पी.एस.आईजवळ तयारच असते. इथे प्रत्येक स्टेशनात बाळाचं वजन केले जाते व ठरलेल्या स्टेशनवर ठरलेली लस टोचली जाते. निरोगी गुटगुटीत बाळाला अलगद या रस्त्याने पुढे नेले जाते. आमच्या पाचवीला हे पूजलं नव्हतं. ज्या ‘ अशक्तं दुर्बलम् ‘अवस्थेत जन्माला आलो त्याच अवस्थेत आरोग्याच्या मार्गावर आम्ही रांगू लागलो, उभे राहिलो रडत खडत पुढे निघालो. अशक्तच आहे, गोरी कसली फिक्कट आहे असे शेरे पचवतच आम्ही पुढे गेलो. डांग्या खोकला, गोवर,कांजिण्या असे आजार….’ आता चाळीत एकाला झालं म्हणजे होणारच ‘ अशा विचाराने घरात स्विकारले जात होते. क्वारेंटाइनची फैशन तेव्हा नव्हती. हा शब्द तेव्हा आयांच्या शब्दकोशात नव्हता. शिवाय मधे काही झालं तर ‘ द्रुष्ट लागली ‘यावर घरात आई-आजीचं एकमत असे. अशाच ठाम समजुतींच्या आधारे प्रवास चालू होता. त्यात आमच्या सामान्य ज्ञानाची, मैत्रिणीच्या सल्ला मसलतींची भर घालत आम्ही कोरोनाच्या राज्यात पोचलो आहोत.
असाच आणखी एक प्रवास ‘ शिक्षणाचा ‘.हा मात्र सटवाईने आमच्या भाळी लिहिला होता. आजच्या इतका तो जटिल व अवघड नव्हता.बराचसा आटोपशीर होता. मुलींना शिकवणे बहुतेक पालकांना मान्य होते, त्यामुळे हा प्रवास खडतर व संघर्षाचा नव्हता थोडा सक्तीचाच होता शिक्षणातील आमची प्रगति मार्कांच्या अट्टाहासाने, अति अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेली नव्हती पण पुष्कळशी आर्थिक स्थिती, घरगुती अडचणी, पालकांची इच्छा यामुळे जखडलेली होती. या रस्त्यावर आम्ही जास्तीत जास्त उंच जाऊन उच्च स्थान प्राप्त करू शकलो तर पुढचा प्रवास पुष्कळच सुकर व सुस्थितीत होण्याची शक्यता असे पण याची जाण व भान पुष्कळांना नसे.मुलींची गाडी लग्नाच्या यार्डात व मुलांची नोकरीच्या गैरेजमधे जाऊन थांबत असे.
इथून पुढे हा प्रवास एकट्याचा न राहता जोडीदाराच्या साथीने, सोबतीने सुरु होई.अग्नीच्या साक्षीने सप्तपदीच्या सात पावलांनी हा प्रवास चालू होतो. अग्नि सारख्या दाहक जगाचा अनुभव घेत सुखदुःख, संकटं झेलत हा प्रवास सर्व करत असतात. नजरेच्या टप्प्यांत दिसतोय तेवढा सरळ मुख्य रस्ता व कडेच्या किंचित खोलगट भागातून बरोबर जाणारा कच्चा-पक्का ‘ सर्विस रोड ‘ही आपली या रस्त्याची सर्वमान्य सांस्कृतिक परिभाषा आहे. मुलांना या रस्त्यावर पोचवले की आईवडिलांना समाधान वाटे ‘ मुलं मार्गी ‘लागल्याचं. म्हणजे आयुष्य हा प्रवास असल्याचा विचार पिढीजाद मुरलेलाच आहे. मुलीच्या वाढत्या शिक्षण व नोकरीतील यशस्वी कर्तृत्वामुळे हा जोडरस्ता आता महामार्ग बनला आहे. आता या एकेरी वाहतुकीच्या महामार्गावरही ‘ रोड डिव्हायडर ‘आहेत, अटींचे, अपेक्षांचे, गैरसमजुतींचे ‘ टोल बूथ ‘सजले आहेत.
या महामार्गावर पोचेपर्यंतचा मार्ग अजून पर्यंत बराचसा सुटसुटीत होता आता मात्र तो तसा नाही. एक रस्ता कुठे संपतो, दुसरा कुठे सुरु होतो,कुठे वळायचं?कुठे थांबायचं?रस्ता चुकला तर नाही?बदलायचा कां?कांहीच ठरत नाही सगळी एकात एक गुंतागुंत आहे, आणि कुणी कुणाला रस्ता विचारतही नाही ” धावत्याला शक्ति येई,आणि रस्ता सांपडे ” या धर्तीवर प्रत्येक जण आपला मार्ग स्वतःच ठरवून धावतोच आहे. मुक्कामाला पोचताय कां?सुटकेचा मार्ग दिसतोय?मागे फिरु शकता?का सुटका नकोच आहे? ” कोठुनि आलो ,कोठे जातो हे नच स्मरते। सुटकेलाही मन घाबरते ” अशीच अवस्था आहे.
आयुष्यात वेळच्या वेळी ‘ मार्गी ‘लागलेले मात्र बऱ्यावाईट प्रसंगातून संकटातून, धक्के खात अडखळत सावरत,मुक्कामाला पोचायची धडपड करत असतात, बहुशः पोचतातही.प्रवास आनंददायक बनवायचा प्रयत्न सर्वच करतात. भोगावी लागणारी दुःख,वंचना, संकटे सोसतांना होणाऱ्या जखमा, त्यांचे व्रण काळजाला सलत राहतात, हे समजून घेणारा, सांत्वना देणारा याचा साक्षीदार मिळावा असं वाटतं. कुणी शायर ही व्यथा बरोबर शब्दात पकडतो,
” कौन कहते है मुसाफिर जख्मी नहीं होते,
रास्ते गवाह है,कमबख्त गवाही नहीं देते। ” भूतकाळातील आठवणी, अनुभव, प्रवास खूप क्लेशकारक बनवतात. तसंही प्रवासात सामान कमीच असावे. नको असलेल्या आठवणींची ओझी रस्त्यावर मागेच सोडून द्यावीत, भविष्यातील उद्दिष्टं व सुखाची स्वप्नं डोळ्यात सांठवून पुढे चलावं,तेव्हाच आयुष्य एक ‘ आनंदयात्रा ‘ठरेल.
