सनविवि आठवणी,साहित्योन्मेष कडुलिंबाच्या गोड आठवणी…

कडुलिंबाच्या गोड आठवणी…

 — देवश्री अंभईकर धरणगांवकर–

दोन दिवसांपासून सुखदा गप्पगप्पच होती. उदासपणे रोजची कामे करीत होती. नवऱ्याच्या – शैलेशच्याही हे लक्षात आले पण कामाच्या व्यापात त्याला विचारायला वेळ मिळत नव्हता. मुलगाही अभ्यासात व्यस्त. सुखदाच्या मनात काही रुतले होते. स्वतःला समजवायचा प्रयत्न ती करत होती तरीही सतत जुन्या आठवणी येत होत्या. झाले असे की तिच्या माहेरच्या गावी नातेवाईकाच्या लग्नाला ती दोन दिवसांपूर्वी गेली होती. ‘माहेरचे गाव’ असे आता नावापुरते होते. गावाकडचे घर बिल्डरला विकून आई-वडील केव्हाच तिच्या भावाकडे पुण्यात राहायला गेले होते. बिल्डरने बरीच वर्षे जागेत काही बदल केला नव्हता. सुखदाही मोठया शहरात स्थायिक झालेली. प्रत्येक वेळी काही कारणाने गावी जाणे झाले की सुखदा आवर्जून ऑटोरिक्षा त्या जुन्या घरासमोरून घ्यायला लावे. क्षणभर सारं न्याहाळून घेई व ‘अजून तरी आहे’, म्हणून हायसे वाटून घेई. 

 यावेळी तिने पाहिले की बिल्डरने सगळे घर नुसते पाडलेच नाही तर अक्षरशः सपाट केले. पाण्याची हापशी, नारळाचं झाड, तुळशीवृंदावनही काढले आणि तिचा लाडका कडुलिंबाचा महावृक्षही कापून टाकला. तिला ते दृश्य पाहून खूपच गलबलून आले. कडुलिंबाच्या भुईसपाट बुंध्याकडे पाहून तर डोळ्यात टचकन पाणी आले. ती परत आली परंतु हळहळ तिच्या मनातून जात नव्हती. कोणाला विचित्र वाटू शकते पण हळवी माणसं निसर्गाच्या – झाडांच्याही प्रेमात पडू शकतात. सुखदा तर स्वभावाने फार हळवी; कविता करणारी, शांत, संवेदनशील मनाची.  अखेर नवरा व मुलगा आपापल्या कामाला गेल्यावर सुखदा लिहायला बसली. मनातल्या कडूलिंबाच्या गोड आठवणी तिच्या लेखणीतून झरझर शब्दबद्ध व्हायला लागल्या. सुखदाच्याच रोजनिशीतून

 “…शेवटी बिल्डरने घर आणि कडुलिंबाला तोडले. त्या कडुलिंबाशी माझी जिवाभावाची मैत्री होती. सर्व वृक्षांमध्ये कडुलिंब मला बेस्ट-फ्रेंड वाटायचा. कडुलिंबाच्या आठवणी सांगण्याआधी जिथे तो होता त्या घराबद्दल थोडी कल्पना देते. आमचे हे एकमजली घर – वरच्या भागात आम्ही व खाली भाडेकरी राहत. जिना मागच्या बाजूला गच्चीतुन होता. जिन्याच्या मागच्या बाजूने असलेल्या अंगणात कुंपणाजवळ कडुलिंबाचा पूर्ण वाढलेला वृक्ष होता. त्या कडुलिंबाचा विस्तार खूप मोठा होता. शेजारचे व मागचे अंगण व आमच्या गच्चीचा काही भाग त्याच्या सावलीत येत. घराला एका रांगेत एकेक पायरी असलेली दोन दारे होती; दोन्ही गच्चीत उघडत. तिथे बसून कडुलिंब हातात येईल असा इतका जवळून दिसायचा. या कडुलिंबाच्या छायेत माझी जवळपास तेवीस वर्षे गेली. 

 कडुलिंबावर खूप पक्षी येत. घरामागे दोन किलोमीटरवर असलेल्या राष्ट्रीय महामार्गापर्यंत वनखात्याची गर्द झाडीची जागा होती. आमच्या छोट्या शहरावरचे एकमेव ‘ग्रीन-कव्हर’! कधी कुणी अवैधपणे सरपणासाठी किंवा होळीच्या वेळी लाकडांसाठी झाडं तोडायला घुसले की आम्ही आरडाओरडा करून हाकलून लावत असू. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…’ यावर आमचे घरी एकमत होते. त्या बाकीच्या झाडोऱ्यामुळे कडुलिंबावर विविध पक्षी व खारी येत. शिशिरात पानगळीमुळे सर्वत्र पिवळ्या पानांचा खच पडे. पावसाळ्यात आधी हिरव्या व नंतर गाभुळलेल्या पिवळ्या लिंबोण्या पडत. 

 कडुलिंब मला घरचाच हक्काचा सदस्य वाटे. गुढीपाडव्याला गूळ घालून कडुलिंबाच्या पानांची चटणी आई करीत असे व आम्हाला ‘शास्त्र असतं’ म्हणून खायला लावे. त्याचे औषधी महत्त्व हळूहळू कळले. कुणाला ताप येऊन गेला की बरं वाटल्यावर पहिली अंघोळ कडुलिंबाची पाने उकळून त्या पाण्याने असे. त्याच्या एका फांदीला शेजाऱ्यांनी लाकडी फळीचा झुला बांधला होता. तेव्हा मला तो वृक्ष थोडा नाराज भासला. त्याच्या फांदीला जरा जास्तच भार झाला. कुर्रकुर्र आवाज यायला लागल्यावर त्यांनी काढून टाकला झुला. कितीतरी वादळवारे, पावसाळे त्या वृक्षाने सोसले. कितीतरी काटक्या, छोट्या फांद्या वाऱ्याने तुटल्या पण कधीच कोणाच्या डोक्यावर पडल्या नाहीत. उन्हाळा सोडला तर बाकी आठ महिने रोज संध्याकाळी खालचे काका शेणाच्या गवरीवर थोडी कडुलिंबाची पाने, ऊद व राळ घालून धूर करीत. सर्व अंगणभर पसरलेला तो धूर आमच्या घरात हवेने आपसूकच येई. धुराने डोळे चुरचुरत, क्वचित ठसका येई पण डास मरत व वातावरण शुद्ध होई. असा तो वृक्ष त्याच्या परीने आमची मदत करीत असे. 

 गच्चीत ठेवलेल्या पलंगावर उताणे पडून पानांची सळसळ ऐकत कडुलिंबावरच्या पक्ष्यांकडे, खारींच्या धावपळीकडे, निळ्या सुंदर आकाशाकडे, कधी शुभ्र ढगांचे आकार व त्यातून फाकणारी सूर्याची मावळतीची किरणं बघत सुट्टीच्या दुपारचे तासनतास निघून जात. फार छान विरंगुळा असे. पक्ष्यांसाठी आई कुंडीत पाणी भरून ठेवी. सूर्यास्तानंतर सर्व शांत होई.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 

 वारा पडल्यावर कडुलिंब मूर्तीवत् स्तब्ध असे. दाराच्या पायरीवर बसून वृक्षसख्याशी माझा नकळत संवाद घडे… माझे विचार, बालसुलभ जिज्ञासा, नंतरची तारुण्यसुलभ मन:स्पंदने, मनातले भविष्यातील बेत, स्वप्ने, वास्तवातले प्रश्न… असे कीतीतरी मी त्याच्याजवळ  मनातल्या मनात व्यक्त करीत असे. तो ही शांतपणे ऐकून घेई. मैत्रिणी आल्या की कडुलिंबाच्या छायेत गच्चीत किंवा जिन्यावर बसून आम्ही कधी मोठमोठ्याने तर कधी कुजबुजत गप्पा करायचो. परीक्षा असल्या की उजळणीही तिथेच कडुलिंबापाशी. कडुलिंबावर मी एक कविताही केली होती ती अशी..

दारी वसल्या कडुलिंबाकडे पाहुनी मजला ऐसे वाटे… 

विशाल हरित शतशाखांनी कवेत घ्यावे मज लडिवाळे||

मम एकाकी तप्त जीवनी, सखा भासतो वृक्ष असूनही|

गुजगोष्टी मी करी त्या सवे, तो ही बोलतो मूक राहुनी||

माझ्या संगे हर्षित होई, देई आशीष पाने हलवूनी| 

मज दुःखी, उदास पाहोनी धीर देई तो स्तब्ध राहुनी||

किती उन्हाळे, किती हिवाळे, किती पर्जन्ये गेले सरुनी| 

कायम आहे सोबत आमुची वादळवारा सर्व सोसूनी||

औषधी-गुणयुक्त असे हा देई सघन, शांत सावली| 

पशुपक्ष्यांचा प्रियाश्रय हा अमृतमयी जणू कुणी माऊली|| 

माणसांच्या सीमित, शंकित, कपटी, खोट्या मैत्रीहूनही 

मज भावे जिवलग निस्वार्थी, निसर्गसाथी हरित मनोमनी|| 

एकाच इच्छा असे प्रभूकडे, असू दे कायम अशीच प्रीती 

वृक्षाची मज मनुजेवरती अन् माझी त्या वृक्षावरती||

काल कितीही सरला तरीही शाश्वत असती निसर्ग-नाती… 

अंतर्मुख मज नेहमीच करिती कडुलिंबाच्या गोड आठवणी …                

                          …त्यानंतर उच्चशिक्षण, नोकरी व अखेर लग्नामुळे घराबाहेर पडले पण निघताना अंतःकरण जड झाले. झाडेही आपल्याला लळा लावतात हेच खरं. वाटत असे की त्या वृक्षालाही माझी आठवण येत असेल; तो आशीर्वाद देत असेल. त्या वृक्षाला दीर्घायुष्य मिळावे, कुणी कधीच त्याला तोडू नये यासाठी मी प्रार्थना करीत असे पण प्रत्येकाचं जीवन नश्वर आहे. यावेळी मात्र तो कडुलिंब निर्दयपणे कापून टाकला होता.   

आजही इथे दूर शहरात माझ्या स्वप्नात कडुलिंब, त्याची सावली, पानांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट, पायरीवर बसून मैत्रिणीशी केलेल्या गुजगोष्टी सारे काही येते. कोणाला अविश्वसनीय वाटेल पण एखाद्या जवळच्या व्यक्तीची साथ सुटल्यावर जशी हळहळ वाटते तशी त्या कडुलिंबाची साथ सुटल्याने वाटते. त्या कडुलिंबाने आम्हां भावंडांचं बालपण पाहिलं, शाळा-कॉलेजचे किस्से ऐकले, मैत्रीच्या गप्पा, घरातले विवाद – संवाद ऐकले. अश्रूंचा-आनंदाश्रूंचा तो मूक साक्षीदार होता. आजही जेव्हा कुठे कडुलिंबाचं झाड दिसतं तेव्हा मला माझ्या माहेरच्या परसातील तो कडुलिंब आठवतो…”

 रात्री शैलेश घरी आला तर सुखदाला झोप लागली होती. आज तिची वही शेजारी उघडीच दिसली. उत्सुकतेने त्याने सहज वाचले आणि तिच्या गप्प असण्याचं कारण त्याला कळलं. चार दिवसांनी सुखदाचा वाढदिवस आला. नेहमीप्रमाणे सकाळचा चहा घेऊन ती खोलीत आली तर टेबलावर काहीतरी नाजूक ठेवलेले दिसले. सुखदासाठी शैलेश व मुलाकडून वाढदिवसाची भेट होती… 

                        ते होते कडुलिंबाचे एक रोप. 

सोबत चिठ्ठी होती- “एक नवी सुरुवात, आपल्या अंगणातून… हॅपी बर्थडे!”

ते पाहून सुखदा समाधानाने हसली.

सुखदा-शैलेश त्यानंतर अर्थार्जन सांभाळून महावृक्षांच्या पुनर्रोपण (रीप्लांटेशन / ट्रान्सप्लांटेशन) व संगोपनासाठी कार्यरत पर्यावरणवादी संस्थांसाठी ‘निसर्गमित्र’ म्हणून काम करायला लागले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *