–वर्षा सबनीस —
सकाळी जाग आली. डोळे किलकिले करून डोकं पांघरुणा बाहेर काढलं .अजून उजाडलं नव्हतं .परत पांघरूणात गुरफटून घेतलं आणि झोपूया असं ठरवलं .तेव्ह्ढ्यात आईची हाक आली,”अग, उठ किती वाजले बघितलेस का ? साडे आठ वाजून गेले. “…अरेच्या ,अजून उजाडलं ही नाही आणि साडे आठ कसे वाजतील ? “काय ग आई, उगीच काहीतरी सांगतेस ..बाहेर बघ अजून अंधारच आहे …” आई म्हणाली, “अग,आज सुट्टी आहे सूर्याला ….” काय ..? सुट्टी ..? सूर्याला सुट्टी..? म्हणजे आज सूर्य उगवणारच नाही ? सूर्य उगवायचे विसरणार ? शक्यच नाही .
मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात ना अगदी तसच झालं . लहानपणापासून मला सूर्या बद्दल खूप उत्सुकता, जिज्ञासा आहे आणि नेहमीच मनात येतं की जर कधी तरी सूर्य उगवलाच नाही तर …? तर ह्या सृष्टीचं काय होणार ? आणि तेच नेमकं मला स्वप्नात दिसलं . ते स्वप्न होतं कळल्यावर काय हायसं वाटलं म्हणून सांगू ?
साधारणपणे 400 करोड वर्षानंतर आपला सूर्य शांत होणार .तेंव्हा आपल्या पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी नष्ट होणार . असे भाकीत वैज्ञानिकानी वर्तविले आहे .खरचं जर असं झालं तर जीवसृष्टीचे काय होणार ? सर्वप्रथम ,पृथ्वीचे तापमान कमी होणार.त्या थंडीमुळे पृथ्वीवरून प्राणी आणि मानव नाहीसे होणार . सुर्यप्रकाशा शिवाय झाडे त्यांचे अन्न तयार करू शकणार नाही. परिणामी प्राणवायुची निर्मिती बंद होणार. बापरे ! नको ती कल्पना .
सूर्य ..आपल्या सूर्यमालेचा केंद्रबिंदू .पृथ्वीतलावर सृष्टी निर्माण करणारा आपला तारा. पहिल्या किरणापासून चराचराला चैतन्य देणारा. सूर्योदय होताच आळोखे पिळोखे देत सृष्टी जागी होते. ताजीतवानी होते.कळ्यांची फुलं होतात, पक्षी किलबिलाट करून जगाला पहाट झाल्याची बातमी देतात. प्राणिमात्र आपल्या दैनंदिन कामाला लागतात.
सूर्याच्या लहानपणी ऐकलेल्या अनेक गोष्टी आहेत . हनुमानाच्या गोष्टीतला सूर्य.. उगवत्या सूर्याला बघून त्या सोनेरी चेंडू शी खेळू बघणारा वायुपुत्र हनुमान, तर कधी त्याला आंबा समजून खायला धावणारे मारुतीराय. मला नेहमीच मजा वाटायची. नंतर त्याच
सूर्याच्या वरदानाने आपला आकार बदलू शकणारे मारुतीराया.. मोठी झाल्यानंतर मृत्युंजय कादंबरी वाचली. सूर्याच्या तेजात विरघळून, दुर्वास ऋषींच्या वराने ,कर्णाची झालेली कुमारी माता कुंती..सगळंच अचंबित करणारं होतं. आयुष्यभर सूर्योपासना करणारा कर्ण ..नेहमीच सूर्यासारखा तेज:पुंज होता.
तर असा हा सूर्य मला नेहमीच भुरळ घालतो. त्याचे आकारमान, त्याचा दाह ,त्याच्या भोवती घिरट्या घालणारे ग्रह, दिवस रात्रीच्या ,ऋतूंच्या चक्रात अडकलेली वसुंधरा ..सगळे
कळूनही अनाकलनीयच. सूर्य आणि पृथ्वी एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणाने बांधले गेले आहेत. स्वतः भोवती फिरता फिरता सुर्याभोवतीही फिरते आहे आपली वसुंधरा. परिणामी, पृथ्वीवर दिवस, रात्र, ऋतु बघायला मिळतात. कविवर्य कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत ह्या कवितेचा इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो.
युगा मागुनी युगे चालली
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्यामी
कितीदा करू प्रीतीची याचना
खरच किती सुंदर कल्पना आहे न ही ?
आपल्या पृथ्वीपासून १५ करोड किलोमीटर दूर असूनही त्याची प्रखरता आपल्याला जाणवते. दर सेकंदाला ६० करोड टन हैड्रोजन आणि हेलियम यांचे fusion होऊन ऊर्जा उत्पन्न होते .पृथ्वीवर जीवसृष्टी चा मूलभूत आधार ही ऊर्जा आहे. ह्या सौरऊर्जेचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. कारखाने, इस्पितळे सौर ऊर्जेचा वापर करतात.घराघरात सोलार हीटर्स असतात.सौरऊर्जेवर घरात लाईट्स लावतात .सरकार सौरऊर्जेचा उपयोग करण्यासाठी आर्थिक सहाय्य, तांत्रिक साहाय्य देते .
जगभर सूर्यावर प्रचंड संशोधन सुरूच असते. त्यात विशेष उल्लेखनीय असे NASA चे parker solar probe जे २०१८ ला पृथ्वीवरून निघाले ते डिसेंबर २१ मध्ये सूर्याच्या वातावरणात पोचले . वैज्ञानिकांची ही मोठीच कामगिरी ठरली आहे. ह्या सूर्य याना कडून खूप महत्वपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे .
सकाळी उगवतो ती पूर्व दिशा आणि मावळतो ती पश्चिम दिशा, असा प्रवास सूर्य रोज करतो. कधीपासून ..? तर ४५० ते ५०० करोड वर्षांपासून त्याचा हा प्रवास अविरत सुरूच आहे . वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार सूर्य अजून ४५०ते ५०० करोड वर्षांपर्यंत असाच प्रवास करत राहणार, आपल्याला ऊर्जा देत राहणार. येणारा प्रत्येक दिवस नवीन आशा, नवीन आकांक्षा घेऊन येणार.
कुणास ठाऊक सूर्यही शापग्रस्त आहे की काय ? जन्म-मृत्यूच्या चक्रात सापडलेले आत्मे असे कित्येक योनीमधून जाऊन आपली कर्मे भोगीत असतात.सूर्याला सुद्धा देवाने अशीच काहीशी शिक्षा दिली आहे की काय ? रोज सकाळी उगवायचं, सर्वांना प्रकाश द्यायचा, ऊब द्यायची आणि संध्याकाळी अस्ताला जायचं.
पण सूर्य कधी हा विचार करत नाही की मी जो प्रकाश, ऊर्जा मानवाला देतो आहे ,त्याचे हा मानव काय करतो आहे ? तो बिचारा इमाने इतबारे आपलं काम करतच असतो . असाच विचार आपण का करत नाही ?सुर्याप्रमाणे अविरत द्यायचे, घ्यायचे काहीच नाही . सर्वांना एकसारखाच प्रकाश द्यायचा.ना कुणाला कमी, ना कुणाला जास्त . सुर्यासारखा सर्व समभाव आपण का अंगिकारत नाही ?
मला तर सूर्याचा हा प्रवास आणि मानवी आयुष्यात खूप साम्य वाटतं. सकाळचे कोवळे ऊन निरागस बाळासारखं वाटतं,नेहमी अगदी फ्रेश , ताजतवानं. बारा वाजता माथ्यावर आलेला सूर्य प्रखर, दाहक असतो. हा मानवी जीवनाचा सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळण्याचा, अर्थार्जनाचा काळ. त्यातले ताण,तणाव,काळज्यांची प्रखरता सहन करत,हळूहळू स्थैर्य येत आयुष्यात. पश्चिमेकडे कललेल्या सुर्याचं तेज सुद्धा असंच मावळत. मावळत्या सूर्याचा केशरी रंग डोळ्यात साठवत , समुद्रकाठी बसून सूर्यास्त बघताना मनात एक उदासीनता येते .संसारात ही आता काळज्या जरा कमी होऊन वार्धक्य डोकावून पाहत असतं, उभारी कमी होते ,तारुण्याची गुर्मी कमी होते.म्हणजे अस्ताला जायची तयारीच नाही का?
आपल्या भारतीय संस्कृतीत सूर्याला देवाचे स्थान आहे. आपल्या पौराणिक कथेनुसार सूर्य हा काश्यप ऋषी आणि अदिती यांचा पुत्र आहे.सूर्याची उपासना हा भारतीय संस्कृतीचा एक मोठा घटक आहे. आपल्या पुराणात गायत्री मंत्रासारखा तेजस्वी मंत्र लिहिला गेला .12 सूर्यनमस्कार करून ,सूर्याची उपासना करून,
आयुरारोग्य मिळवायची परंपरा आपल्या योगाभ्यासात पूर्वापार चालत आलेली आहे.
कोणार्कच्या सुर्यमंदिराबद्दल जर काही संदर्भ आला नाही ,तर माझे सूर्य पुराण अर्धवटच राहणार . सूर्य देवतेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते, ते एका रथाचे असते,ज्याला सात घोडे असतात. याच धर्तीवर कोणार्क सूर्य मंदिराची, तेराव्या शतकात स्थापना झाली होती. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून,कोणार्क सूर्य मंदिराची गणना होते. त्याचा खूप भाग परदेशी आक्रमणांनी उध्वस्त झाला आहे. सद्यस्थितीत असलेले सूर्य मंदीर,त्याच्या पूर्वस्थितीची, त्याच्या भव्यतेची, साक्ष देते. सूर्याच्या रथाचे सात घोडे ,सूर्यप्रकाशात असलेल्या सात रंगांचे द्योतक आहेत.
सूर्यप्रकाशात असणारे व्हिटॅमिन डी , हाडांच्या बळकटीला खूप आवश्यक असते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी , सूर्यप्रकाश प्रमुख कामगिरी बजावत असतो. वृक्ष वल्लरी सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने अन्न तयार करतात ,त्याला photosynthesis असे म्हणतात. ही क्रिया होत असताना वातावरणातील carbon di oxide शोषून घेऊन प्राणवायु तयार होतो . म्हणजे सूर्यप्रकाश नसला तर प्राणवायूची निर्मिती अशक्य आहे.
आपल्या शरीरात, Seratonin हे एक संप्रेरक म्हणजे hormone आहे . त्याला happiness हॉर्मोन असेही म्हणता येईल, कारण आपली मानसिक स्थिती नियंत्रण करण्याचे खूप महत्वाचे काम हा स्त्राव करत असतो . संशोधनांती असे आढळून आले आहे की सूर्यप्रकाशात हा स्त्राव वाढवण्याची शक्ती आहे . म्हणून सकाळी बाहेर उन्हात फिरून आलं की उत्साही वाटतं .
अशी ही सूर्याची महती . सूर्य ४५०-५०० करोड वर्षानंतर शांत होणार, ही कल्पनाच मला सहन होत नाही . कुणास ठाऊक, निसर्गाची काही वेगळीच योजना असणार . आम्हा पामरांना निसर्गाचे नियोजन कसे कळणार ? पंच महाभूता पासून बनलेल्या ह्या नितांत सुंदर पृथ्वीचा शेवट असा नक्कीच व्हायला नको. मग आपल्या पृथ्वीची काळजी आपणच घ्यायला हवी ना ?
चला तर, आजपासून प्लास्टिक चा वापर कमी करू या, पाण्याचा गैरवापर टाळू या, आपल्या आजूबाजूच्या झाडांची काळजी घेऊ या ,वृक्षारोपण करू या, आपल्या नद्यांचे ,हवेचे प्रदूषण टाळू या .
आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही आपली काळजी घेईल आणि आपला सूर्य कायम आपल्या बरोबरच राहील .
