–कल्याणी आडत–
कालपरवाच कुठेतरी सायकल चालवण्याचे फायदे यावर लिहिलेली एक पोस्ट वाचली, आणि मनात आठवणींची सायकल वेगात फिरू लागली. काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या स्मृतींना अशा फक्त एका छोट्याशा गोष्टीची गरज असते, की लगेच भूतकाळात आपण हरवून जातो.
साधारण दहा वर्षांपूर्वी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मला वडिलांनी नवीकोरी लेडी बर्ड सायकल घेऊन दिली होती. जांभळ्या रंगावर पहिल्यापासून जीव असल्याने, आणि लेडी बर्डचे गुलाबी रंगाचे मॉडेल खूप प्रचलित असल्याने जांभळ्याच रंगाची सायकल मला घ्यायची होती. छान चमकदार रंग, पुढे छोटीशी डिकी, वजनाला इतर लेडी सायकलच्या तुलनेत किंचितशी जड असणारी ती सायकल म्हणजे माझ्या त्यावेळच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होती. ही सायकल दुकानातून घरी आणत असताना ती आणायची कशी हादेखील एक प्रश्नच होता. तेव्हा पुढे दुचाकीवरून वडील, आणि मागे ती नवी कोरी, पुठ्ठ्याचे कागद लावलेली सायकल कशीबशी चालवत मी, हे मजेशीर दृश्य मला आजही आठवते.
त्याआधी बरीच लहान असताना एक लहान मुलांची असते तशी सायकल होती माझ्याकडे, त्याला साईड-व्हील्स लावून पडत धडपडत मी सायकल चालवायला शिकलेले. त्यावेळी मी सायकलवरून पडण्याला प्रचंड घाबरायचे, म्हणून माझी भीती कमी व्हावी याकरिता मला घरच्यांनी सांगितले होते, “एकदा दोनदा पडल्याशिवाय सायकल चालवायला येतच नाही.” त्यानंतर जेव्हा मी सायकलवरून पडले, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला, का ? तर, आता मी पडले, म्हणजे आता मला सायकल चालवायला हमखास येणार, अशी माझ्या बालमनाची समजूत!
थोडी मोठी झाले, आणि मग ह्या ‘लेडी बर्ड’चा ताबा पूर्णपणे माझ्याकडे आला. शाळा, शिकवणी, संगीताचा वर्ग, सगळ्या ठिकाणांसाठी आमची ही एकुलती एक सवारी असायची. चढावरून जात असताना उभे राहून चालवताना दम लागायचा, तर उतारावर मजेत पॅडलवर पाय ठेवून वाऱ्यासोबत गुणगुणत सायकल घुमवताना फार मजा यायची. समोरच्या डिकीत कधी शाळेची डब्याची पिशवी असायची, तर कधी दूध, पेपर किंवा इतर सामान. मागच्या कॅरेजवर बाकीच्या लोकांसारखे आपण सुद्धा काहीतरी अडकवावे याची खूप हौस असायची. तिथे एक-दोनदा शाळेचे दप्तर अडकवण्याचा फसलेला प्रयत्न करून पाहिला. पण ते दप्तर वह्या-पुस्तकांनी एवढे भरलेले असायचे, की कधी त्या कॅरेजवर बसूच शकले नाही. नाजूक आवाज करणारी सायकलची ती घंटी, त्या निरागस गोड क्षणांसारखी अजूनही कानात घुमत राहते.
कधी कधी सायकल पंक्चर व्हायची किंवा चाकामधली हवा जायची. मग मात्र फार चिडचिड व्हायची. आपल्या गरजेला सतत हजर असणाऱ्या व्यक्तीला किंवा वस्तूंना आपण किती गृहीत धरतो, नाही ? त्यांनी कधी थोडी जरी कुरबुर केली, तरी ती आपल्याला खपत नाही. मग ती सायकल घेऊन चौकातल्या पंक्चर काढणाऱ्या काकांकडे आमची स्वारी निघायची. दोन रुपयांना दोन्ही चाकांत हवा मारून मिळायची. दिवसभर पंक्चर काढून कळकट-मळकट झालेल्या हातांनी काका ते दोन रुपये घ्यायचे आणि तशाच कळकट-तेलकट सदऱ्याच्या खिशात ठेवायचे. तेव्हढ्याशा कमाईत ते काय करत असतील, हा प्रश्न दरवेळी तिथून निघताना चटका लावून जायचा. मध्यंतरी हवा मारायचा एक छोटा पंप आम्ही घेतला होता. पण का कोण जाणे, तरीही त्या काकांकडे जाऊनच मी सायकलच्या चाकांमध्ये हवा मारून घ्यायचे.
शाळेमध्ये घडलेले अनेक किस्से, मैत्रिणींसोबतच्या गप्पा, गॉसिप, अभ्यासाचा ताण, परीक्षा झाल्यानंतरचा निवांतपणा हे सर्व माझ्यासोबत माझी सायकलसुद्धा अनुभवायची. सायकलच्या चाकांसारखे कालचक्र भरभर पुढे सरकत राहिले. दहावी झाली, आणि सायकलसोबतचा संबंध आपोआप संपुष्टात आला. ती सायकल नंतर त्याच पंक्चरवाल्या काकांना त्यांच्या मुलीला वापरायला म्हणून दिली. सायकल आयुष्यातून निघून गेली, आणि तिच्यासोबत ती निरागसता, ते बालपण, आणि तो निवांतपणासुद्धा हळूच आयुष्यातून गायब झाला. नंतर गाडी घेतली, प्रवासाच्या वेगासोबत जीवनाची गती आणि धावपळ सुद्धा वाढत गेली. पण माझ्या निखळ आनंदाच्या क्षणांनी गच्च भरलेली माझ्या सायकलची डिकी अजूनही आठवते. सायकल आता सोबत नसली तरी तिच्या त्या छोट्याशा डिकीमध्ये मला जन्मभर पुरेल इतका आठवणींचा सुगंध सामावलेला आहे.
– कल्याणी आडत
डिकीमधल्या आठवणी