—अजिता पणशीकर
सेल्वी खूपच शांत शांत होती. अनेकांनी खोदून खोदून विचारलं, पण ती बोलायलाच तयार नव्हती. डोळे सारखे भरून येत होते. काहीतरी खोल जखम झाली होती हे नक्की!
तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील, नलमपल्ली नावाच्या केवळ ७५०० वस्तीच्या खेड्यातून आलेली मुलगी ती. चेन्नईसारख्या मोठ्या शहरात येऊन आधीच ती बुजल्यासारखी झाली होती. त्यात तिला गावातील तिच्या मैत्रिणींना सोडून आता अनोळखी लोकांकडे रहावं लागणार होतं. तरुण मुलीला एकटं गावी रहाणं शक्य नव्हतं त्यामुळे पर्यायच नव्हता. लक्ष्मी स्वतः वेंकटरामन ह्यांच्या घरी २४ तास राहून स्वयंपाक आणि घरकाम करत होती. वेंकट आणि मधु ह्यांना लक्ष्मीची कोंडी दिसत होती. त्यांनी आपुलकीने मुलीला घरात घेतलं, पण सेल्वी खोलीतच उदास बसून राही.
सेल्वीला सारखं तिचं गाव आठवत होतं. अप्पा आणि ती किती मजेत राहत होते! तिचे वडील सुरेख चादरी बनवत आणि तीही घरचं सांभाळून त्यांना नवीन-नवीन नक्षी करायला मदत करे. तिथल्याच गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये छान मार्क मिळवून बारावी झाली तेव्हा त्यांनी तिच्यासाठी खूप सुंदर बॅग विणली होती. आईच्या प्रोत्साहनाने आणि पैशाच्या मदतीने, सेल्वीने करस्पॉन्डन्स कोर्स द्वारा एम.ए., बी.एड. केलं. तिला मॅथ्स टीचर व्हायचं होतं. गावातल्या मुलांना शिकवावं, खूप मोठं करावं असं तिचं स्वप्न होतं. मात्र त्या एका घटनेने तिचं सारं आयुष्यच बदलून गेलं! का बरं तिचे अप्पा असे वागले असतील? नकळत तिचे डोळे पुन्हा पाणावले.
ते दृश्य पुन्हा-पुन्हा अगदी स्पष्ट दिसत होतं तिला. तिच्या वडिलांना पंख्याला फास लावून लटकतांना पाहून तिला प्रचंड धक्का बसला होता. डॉक्टरांनी डिप्रेशनमुळे झालं असं सांगितलं…. ह्याबद्दल तर तिने कधीच ऐकलं नव्हतं. वडिलांचं विनाकारण रडणं, चिडणं, एकटं तासंतास बसणं, अवेळी झोपणं …. हे सर्व इतकं गंभीर असेल असं तिला वाटलं नाही. त्याआधीही त्यांनी एकदा झोपेच्या खूप गोळ्या खाल्ल्याने दवाखान्यात न्यावं लागलं होतं ते आठवलं. तिने वेळच्यावेळी डॉक्टरांना हे सांगितलं असतं तर…...? मग पुढे काय काय झालं, आईला कोणी बोलावून घेतलं, वडिलांचं सर्व कोणी केलं, त्या दोघी चेन्नईला कशा आल्या……खूप विचार करूनही अंधूकच आठवत होतं.
माझी मैत्रीण मधु ही स्वमग्न मुलांसाठी एक विशेष संस्था चालवत असे. त्यात ऑटिझम, डाउन सिन्ड्रोम, मतिमंद, डिस्लेक्सिया ह्यासारख्या मानसिक अपंगत्व असलेल्या मुला-मुलींसाठी आनंदी वातावरण निर्माण करणं, स्वतंत्र राहणं व अभ्यास शिकवणं, वेगवेगळ्या थेरपी देणं, असे अनेक उपक्रम ती चालवत असे. त्यांच्या पालकांना देखील आपल्या ह्या मुलांचा मनापासून स्वीकार करायला मार्गदर्शन करत असे. तिने सेल्वीची मानसिक स्थिती ओळखली. हिला जर वेळच्यावेळी तिच्या कोषातून काढलं नाही तर एवढी चांगली शिकलेली मुलगी आपला आत्मविश्वास गमावून बसेल हे तिने जाणलं. दुसऱ्यांसाठी जीव ओतून करण्यात आपलं दुःख मागे पडतं हे मधुने पाहिलं होतं, अनुभवलं होतं. म्हणून तिने प्रेमाने बोलून, समजावून सेल्वीला संस्थेमध्ये तिच्या बरोबर नेलं.
सुरुवातीला नुसतीच शून्यात बघत बसणारी सेल्वी हळू-हळू त्या मुलांमध्ये रमू लागली. त्यांच्या टीचर्सशी तिची दोस्ती होऊ लागली. उंच, सावळी, आणि रेखीव असलेल्या सेल्वीमध्ये देखील त्या टीचर्सना मुलांसारखाच निरागसपणा दिसू लागला. ती नव्या वातावरणात, नव्या मैत्रिणींबरोबर मिसळू लागली. मुद्दाम लक्ष घालून, वेळ देऊन, मुलांच्या स्थितीबद्दल त्यांच्याकडून समजावून घेऊ लागली. कधी ती त्यांच्यातलीच एक होऊन मुलांना शिकवू लागली, संस्थेत जायला उत्सुक होऊ लागली ते तिच्या लक्षातच आलं नाही! सेल्वी आता स्वतःदेखील कमावू लागली. तिच्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात तिचा आत्मविश्वास डोकावत होता. लक्ष्मीच्या नजरेतूनही तो सुटला नव्हता. मधुचे मनोमन आभार मानून घरचं काम अधिकच नेटाने करू लागली. स्वभावाने लाघवी आणि बोलण्यात मार्दव असल्याने वेंकट आणि मधुलाही तिचा लळा लागत चालला होता.
बघता-बघता दोन-अडीच वर्ष होऊन गेली. सेल्वीचं रूपांतर एका कर्तबगार पंचविशीच्या तरुणीत झालं होतं. खरं तर सेल्वीच्या लग्नाची चर्चा वडील गेले तेव्हा चालू झालीच होती. त्यांच्यात मुलगे शिकत नाहीत म्हणून कुणी पटतच नव्हतं तिला. त्यात वडिलांच्या आत्महत्येनंतर तर कोणीच त्यांच्या दिशेला बघेना. एकीकडे लेकीचा अभिमान तर दुसरीकडे लक्ष्मीला तिची काळजी वाटू लागली होती. तिच्या चिंतेचा अंदाज मधुला आलाच होता. जेवणं झाल्यावर रात्री सहज गप्पा मारता-मारता तिने वेंकटला ह्याविषयी सांगितले. सकाळी बघते तर वेंकट लवकरच उठून कॉम्पुटरपाशी बसून काहीतरी करतांना दिसला. मागून डोकावून पाहिलं तर एका मॅट्रीमनी साईटवर तो सेल्वीची सर्व माहिती अगदी तन्मयतेने भरतांना दिसला. तिचं एक छानसं प्रोफाइल लिहिलं होतं ज्यात तिच्या गावाची, जातीची, शिक्षणाची वगैरे माहिती घातली होती. फोटो तेवढा अपलोड करायचा राहिला होता. मधुला वेंकटचं कौतुक वाटलं, पण त्याच्या ह्या प्रयत्नांना कितपत यश येईल याची शंकाही आली.
असं म्हणतात की लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधलेल्या असतात. गवताच्या भाऱ्यातून एक बारीकशी सुई शोधणंही एकवेळ शक्य होईल पण ह्या परमेश्वराला जगाच्या एवढ्या मोठ्या पाठीवर तुमचा नेमका एक जोडीदार कसा बरं सापडतो? ह्या इंटरनेट नावाच्या देवाने मात्र कमाल केली. एका आठवड्यातच दोन स्थळं आली, आणि मग अजून चार आली. त्यातलंच एक होतं राघवचं. सेल्वीहून पाच वर्षांनी मोठा, लवकर नौकरीला लागलेला. पहिल्यांदा चेन्नईला प्रायव्हेट कंपनीत जॉब करून मग आपल्या हिमतीवर आयरलँडला गव्हर्नमेन्टमध्ये कामाला लागला. आता डब्लिनला पाच वर्ष राहून चांगला जमही बसवला होता. दोन भाऊ, दोघी वहिन्या, एक बहीण हे सर्व चांगले शिकलेले होते. एकूण चेन्नईतील त्यांचं कुटुंब सुसंकृत आणि सुखवस्तू होतं. लक्ष्मीने जरा घाबरून नकोच म्हंटले; जरा कमी शिकलेला पण भारतातला बरा असा तिचा बापडीचा विचार! पण वेंकटने पुढाकार घेऊन अधिक माहिती काढली, फोना-फोनी केली, विडिओ कॉल लावला, राघवच्या वडिलांशी बोलला, आणि गाडी पुढे सरकली! सर्वेतोपरी योग जमून आला होता. हल्लीच्या मुलांना मोबाइलमुळे एकमेकांशी बोलण्यासाठी प्रत्यक्ष भेटायची वाट पाहावी लागत नाही. मग सेल्वी-राघव तरी अपवाद कसे असतील? आवडी-निवडी, अनुभव ह्यांची देवाण-घेवाण झाली आणि मनं जुळली!
राघव भारतात आला तेव्हा वेंकट-मधुकडे दोघांची भेट ठरली. मधुने लक्ष्मीला त्यांच्याबरोबर बसायला सांगितले, आणि ती सर्वांसाठी चहा घेऊन आली. नवीन नाती ही विश्वासाच्याच पायावर भक्कम उभी रहातात हे मानणाऱ्या मधुने लक्ष्मीला तिची परिस्थिती स्पष्ट सांगायला लावली, कुठलाच आड-पडदा न ठेवता. सगळी बोलणी झाली. राघव सुधारक वृत्तीचा असल्याने हुंड्याचा प्रश्नच नव्हता. आयर्लन्डला सेल्व्हीला नेईन आणि पुढे तिला हवं तेव्हा नौकरीसाठी मदत करीन असं वचनही दिलं. लग्नाचा मुहूर्त ठरला आणि मुक्त हस्ताने, मोठ्या मनाने, वेंकट-मधुने सेल्वीचं लग्न लावून दिलं. त्यानंतर तिचे, त्यांचे असे अनेक आनंदी फोटो मी मधुकडे पाहिले. लग्न होऊन दीड-एक वर्ष झालं असेल. लक्ष्मी लेकीच्या बाळंतपणासाठी डब्लिनला गेल्याचं मधुकडून कळलं.
आज अचानक मला सेल्व्हीला मुलगा झाल्याची बातमी मिळाली, आणि तिच्या आयुष्यात आलेली अनेक अकल्पित वळणं आठवत गेली. प्रत्येक वळण तिला घडवत गेलं, समृद्ध करत गेलं. नलमपल्लीतल्या खेड्यातून एक साधी मुलगी इथवर पोहोचते, स्वतःच्या मेहेनतीने इतकी सक्षम बनते, तिचं स्वतःचं असं एक वेगळंच विश्व दूरदेशी फुलवते, हे सारंच किती विलक्षण आहे! दैवाचा प्रसाद तर सेल्वीला मिळालाच, पण त्याहून मौल्यवान असा मधु-वेंकटच्या चांगुलपणाचा, माणुसकीचा वरदहस्त मिळाला….
……अन् तिचं आयुष्यच बदललं…..!