—निवेदिता शिरवटकर
ह्याच मिलिटरी इस्पितळात तिची अन् त्याची शेवटची भेट झाली होती. इतकी वर्षे उलटून गेली पण त्याचे ते शब्द अजूनही जसेच्या तसे तिच्या कानात गुंजत होते .
” माझी ….माझी शप्पथ आहे तुला ….काहीही झाले तरी तुला मात्र तुझे आयुष्य भरभरून जगायचे आहे….अगदी एक एक क्षण ….वाट नको पाहुस माझी ! पण मी नेहमीच तुझ्यासोबत आहे आणि केवळ तुझाच आहे. ”
तिने पुढे काही बोलायच्या आत पाठीमागे वळून न पाहता तो तिच्या डोळ्यासमोरून नाहीसा झाला ! रुबाबदार सैनिकी गणवेशातील त्याची पिळदार शरीरयष्टी , ऐटदार पाठमोरी चाल आजही जशीच्या तशी तिच्या डोळ्यासमोर होती .
त्याक्षणी पायाखालची धरणी अचानक दुभांगल्यागत वाटलं होतं तिला . असह्य वेदना काळीज चिरत गेली आणि किंचित भोवळ देखील आली .
होय ! का होऊ नये तिची अशी अवस्था ?
अगदी निष्पाप….भाबडं होतं तिचं प्रेम ! नव्हे जीवच ओवाळून टाकला होता त्याच्यावर . तेही अगदी पहिल्या भेटीतच . पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती ही खुळी . मागचा पुढचा विचार न करता ओतप्रोत न्हाऊन निघाली होती त्याच्या प्रेमवर्षावात. त्या धुंदीत असताना एकदाही असा पुसटसा विचारदेखील कधी तिच्या मनाला शिवला नाही की तो तर तिचा कधीच होऊ शकणार नव्हता . कारण त्याने त्याचे आयुष्य कधीच देशसेवेसाठी समर्पित केले होते.….!
कोणत्याही क्षणी सीमेवरून निरोप येताच हा पठ्ठ्या धावून जाणार होता तिथे . मग बोल लावणार तरी कोणाला अन् कशाला ?
शेवटी तो दिवस उजाडला आणि डोळ्यातून एकही अश्रू ढळू न देता , स्थितप्रज्ञ चेहऱ्यानं त्याने तिला निरोप दिला सुद्धा !
काय करू शकत होती ती ? त्याला त्याचे कर्तव्य बजावायचे होतेच . मग कशी काय त्याच्या आड येऊ शकली असती ती ?
‘ पण…. पण असे वियोगाचे दुःख माझ्या नशिबी का यावे ? जर आमच्या दोघांच्या नशिबात एकत्र येणे शक्य नव्हते तर आमची अशी भेट तरी त्या विधात्याने घडवून का आणावी ? ‘ हा एकच प्रश्न तिच्या डोक्यात रात्रंदिवस धुमाकूळ घालत असे .
त्यानंतर साधारण दीड एक महिन्यातच ती कटू बातमी धडकली . कश्मीर खोऱ्यात झालेल्या दशहतवादी हल्ल्यात त्याला वीरमरण आले होते .
आपले सर्वस्व गमावल्याच्या भावनेने कधीही तळ न गाठणाऱ्या खोल दरीत तिला ढकलून दिले .
आता मात्र तिचे आयुष्य पार बदलून जाणार होते . ती आता पूर्वीची ‘ ती ‘ राहिली नव्हती .
इतके सोपे नव्हते त्याच्याशिवाय जगणे . त्याच्या प्रेमात पडून स्वतःला पूर्णपणे हरवून बसली होती ती . त्या
‘हरवलेल्या तिला ‘ पुन्हा कसं शोधायचं ?
काही दिवस तर सर्व संवेदना बधीर झाल्यागत वाटत होत्या . कधी रात्री दचकून जाग येत असे . सरींवर सरी कोसळत आसवांच्या . रात्र सरता सरत नसे अन् चुकून माकुन डोळा लागलाच तर फटफटित उजाडल्यावर पुन्हा एकदा तेच भकास वास्तव भानावर येत असे. कधी त्याच्या आठवणीत होरपळलेला तिचा जीव आक्रंदून उठत असे. तर कधी रोजची दिनचर्या करण्याचे सुद्धा त्राण उरत नसे आणि तिचे ते सुजलेले , लालबुंद चरचरीत डोळे ? ते दाद देतील तर शपथ ! आजकाल आरसा सुद्धा नको वाटे. कारण त्यात ‘ ती ‘ नाही तर दुसरेच कोणी असल्याचा भास होई. स्वतःची प्रतिमा जणू पार गायब झाली होती कुठेतरी.
आता फक्त त्याचे शेवटाले शब्द काय तो तिचा एकमेव आधार होते.
” तुला तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण भरभरून जगायचा आहे ….माझी शप्पथ आहे तुला ! “
तिने ओसांडणाऱ्या भावनांना आवर घातला आणि बजावले स्वतःला .
‘ अंह ! नाही .…असं राहून चालणार नाही मला . मलाच माझे घाव भरून काढायला हवेत. ‘
तिने दिनचर्या बदलली . शारीरिक व मानसिक संतुलनासाठी नियमित योग ,साधना करू लागली.
ते करत असताना सोबतच अध्यात्माची तिला आपसूकच गोडी लागली. शरीर , मन आणि आत्मा याचे संतुलन किती महत्वाचे आहे हे तिला कळून चुकले आणि खऱ्या अर्थाने ती आयुष्यासाठी जागरूक, सजग झाली.
‘ आजवर चढाओढीच्या रश्शीखेचीत , तारेवरची कसरत करीत आयुष्य जगत आले मी . कधी कधी यश अपयश ह्यांमध्ये दोलायमान असताना वास्तव आणि भ्रम ह्यातला फरक करण्याची क्षमता हरवून बसले होते का ? हेच का ते संसाराचे मायाजाल आणि त्यात फसल्यावर तो कधीही न संपणारा संवेदनांचा खेळ ? …… चक्रव्यूहच जणू . एकदा अडकलो की बाहेर पडणे अशक्य ! ‘
असे अनेक विचार सतत घोळत असत तिच्या मनात .
अध्यात्म हा तिच्या जीवनशैलीचा महत्वाचा भाग बनला.
‘ शेवटी ही एक अशी साधना आहे की ती करीत असता चित्त एकदा का स्थिर ठेवता आले की आपल्याच अंतरंगीच्या खोल डोहापर्यंत पोहोचता येतं. सर्व गुपिते तिथेच दडलेली असतात अन् उत्तरे सुद्धा…. आजवर झालेल्या जखमांचे व्रण खोलवर तिथपर्यंत पोहोचलेले असतात. म्हणून त्या सुप्त , अचेतन मनापर्यंत पोहोचता आहे पाहिजे . आपल्याच आत्म्याशी एकरूप होता आले पाहिजे. सातत्य आणि नियमित प्रयत्नांनी सर्व काही शक्य आहे. ‘
जसजसे तिचे मानसिक संतुलन होऊ लागले तसतशी एका शांत , स्थिर चित्ताची अनुभूती आपोआप होत होती . काळजाला दडपवणारी ती जीवखाऊ पोकळी आता कुठे गायब झाली होती . रोज सकाळी एका नव्या उमेदीने जाग येत असे . आयुष्यातील हरवलेले ते सर्व रंग पुन्हा बहरू लागले .
खरच ! आता प्रत्येक क्षण भरभरून जगू लागली होती ती . सर्व जगाकडे , आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोनच पालटला होता . स्वतःवर प्रेम करू लागली होती ना आता ती ….तेवढ्याच उत्कटतेने ! स्वतःच्या प्रेमात पडल्यावर भोवतालचे जग देखील तेवढेच सुंदर भासू लागले होते का आता ?
जवळच एका अनाथाश्रमाला ती रोज भेट देत असे. त्या निरागस मुलांच्या डोळ्यात पाहता अगदी तेच उत्कट प्रेम तिच्या हृदयात उमडत असे की जे एके काळी ‘ त्याच्यासाठी ‘ तिला वाटे…..
‘ हेच असावे का ते खरे निरपेक्ष प्रेम ? की ज्याला फक्त भरभरून देणेच माहित आहे ? खरच ! ही अनुभूती किती निराळी आहे ! ‘
त्या आई बापाविना वाढणाऱ्या मुलांच्या आयुष्यातील पोकळी दूर करताना ….त्यांना मायेने कवटाळताना ….. उरात अगदी तसेच प्रेम उचंबळून येत असे आणि तनामनात एक असीम शांती ती अनुभवू लागली .
आज इतक्या वर्षांनी कोण्या एका नातेवाईकांना भेटण्याच्या निमित्ताने त्याच मिलिटरी इस्पितळात जाण्याचा योग आला….. ज्या व्हरांड्यात त्याने शेवटचा निरोप दिला होता तिथे काही काळ ती घुटमळली . त्याची पाठमोरी प्रतिमा दिसल्याचा भासही क्षणभर झाला . पण आज ती वेदना , ती पोकळी तिला जाणवली नाही . कारण त्याने त्याचे वचन पूरेपूर निभावले होते . तो आजही तिच्यासोबतच होता , तिचा आधार बनून एका आगळ्या वेगळ्या आयुष्याची नवी दिशा दावत होता ! हा वियोग नव्हे तर एक अद्भुत संगम होता.
