सनविवि अनुभव,साहित्योन्मेष अविस्मरणीय अनुभव -मधमाश्यांच्या कहर

अविस्मरणीय अनुभव -मधमाश्यांच्या कहर

–वर्षा सबनीस–

 प्रवास आणि त्यातून जर रोमांचक, साहसी आणि उत्कंठा वर्धक असेल तर मी नेहमीच एका पायावर तयार असते. गिर्यारोहण आणि तत्सम adrenaline rush देणारे अनेक प्रकार आहेत .  दुर्गम, काळया, करड्या कातळावर चढून जाणे हे नेहमीच मला खुणावत असत . अशीच एक आमच्या गिर्यारोहकांची सहल ठरली होती .  बंगलोर जवळ साधारण 50 किलोमीटर अंतरावर सावन दुर्ग नावाचा एक डोंगर आहे. तिथे जायचे ठरले.

आम्ही आठ जण खूप उत्साहाने सकाळी लवकरच निघालो . दोन गाड्या होत्या . प्रत्येकाची बॅग पाठीवर अडकवून ,गॉगल, टोपी, पाण्याची बाटली आणि दुपारचे जेवण असा सरंजाम घेऊन मंडळी निघाली.

 सावन दुर्ग तसा चढायला अवघडच आहे, त्यातून आम्ही सगळे हौशी गिर्यारोहक. कुणाला फारसा अनुभव नव्हता . आमचा म्होरक्या त्यातल्या त्यात जरा अनुभवी होता .त्यामुळे आम्ही सगळे त्याच्या सूचना शिरसावंद्य मानून, त्याच्या मागोमाग निघालो. चढताना त्रास होऊ नये म्हणून अगदी हलका नाश्ता करून निघालो . सूर्य बऱ्यापैकी माथ्यावर आला होता पण प्रखर ही नव्हता. 

थोडी दमछाक होत होती पण सगळे मजेत होते .तसेही एकत्र ,ग्रुप मध्ये असल्याने , एकमेकांची ऊर्जा मिळत होती . सगळे हसत खेळत चढत होते . काही ठिकाणी बराच चढाव होता .हळू हळू आम्ही माथ्यावर  पोहोचलो . सगळे खुश होतो . एव्हाना सूर्यही डोक्यावर आला होता . डोंगर माथ्याच्या उजव्या बाजूला थोडी खाली सपाट जागा होती .तिथे सगळ्यांनी आराम करायचा असे ठरवले. थोडी झाडाची सावलीही होती .

 सगळे खांद्यावरच्या बॅगस् बाजूला ठेऊन, बुट काढून आरामात बसले. बरोबर आणलेले खाद्य पदार्थ काढून पोटपूजा केली. पाणी पिऊन जरा आडवे झाले.  तासभर विश्रांती घेऊन परतीच्या मार्गावर जाऊ असे ठरले . 

 तासाभराने बूट घालून निघायची तयारी झाली. तिघे  मित्र थोड चढून डोंगर माथ्यावर चढले .सगळे यायची वाट बघत होते. तेव्हढ्यात त्यांना काही मधमाश्या घोंघावत येताना दिसल्या. आमच्या म्होरक्याला आलेल्या संकटाची कल्पना आली. “ जिथे आहात तिथेच पोटावर झोपा. हलू नका “ त्याने ओरडुन सांगितलं . ते तिघेही तिथेच निश्चल झोपले . कुणीतरी डिवचले असावे किंवा मधमाश्यांच्या पोवळ्याळा दगड मारला असावा . मधमाश्या चवताळून चालून आल्या .आम्हाला काय होत आहे हे कळायच्या आधीच शेकडो मधमाश्या आमच्यावर चालून आल्या. आम्ही सुचने प्रमाणे पोटावर झोपलो , पण मधमाश्या  आम्हाला चावतच होत्या. कानात, नाकात जिथे शक्य आहे तिथे शिरकाव करून डंख मारणे सुरूच होते. आम्ही अगदी अगतिक झालो . मधमाश्यांपासून बचाव कसा करावे काही कळत नव्हते.

 माझी कॅप बरीच मोठी होती. त्यांनी मी कान झाकून घेऊन शक्य तेव्हढी निश्चल राहायचा प्रयत्न करत होते. तेव्हढ्यात वाऱ्याने माझी टोपी उडून गेली. बुडत्याची काठी होती ती. उडणारी टोपी पकडायला मी उठले. माझी हालचाल बघून, मधमाश्या माझ्यावर तुटून पडल्या. काही वेळाने माझी सहनशक्ती संपली. हतबल होऊन ,”चावा किती चावायचे ते “असे म्हणत मी पडून राहिले . बहुतेक मला ग्लानी आली असावी.

मधमाश्यांचे हे थैमान किती वेळ सुरू होते कुणास ठाऊक . जेंव्हा भानावर आले, तेंव्हा अगदी शांतता होती. मधमाश्यांचे घोंगवणे नव्हते.   शेकडो मधमाश्यांचा डंख एव्हाना आमच्या शरीरात भिनला होता. माझ्यात उठायचेही त्राण नव्हते. तेंव्हा जाणवलं की अंगात ताप आहे. सगळी शक्ती एकवटून उठून बसले. आजूबाजूला कुणी नव्हते . इथे मी एकटी कशी ?सगळे मला सोडून गेले की काय ? अंग ठणकत होतं, आगआग होत होती, मळमळत होतं. एकाकी पणाच्या कल्पनेने मला खूप रडू आले. डोळ्यासमोर घर दिसू लागले, मुलं दिसू लागली . मुलांचा विचार येताच एक वेगळीच ऊर्जा आली .सगळे अवसान गोळा केले आणि उठले . मी आजूबाजूला शोधू लागले. मित्रांना, माझ्या नवऱ्याला हाका मारू लागले. तेव्हढ्यात कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला .जवळ जाऊन बघितले तर माझा नवराच होता. मधमाश्या चावल्या मुळे चेहरा इतका सुजला होता की ओळखू येतं नव्हता. माझा नवरा सुद्धा माझ्यासारखाच तापाने फणफणत होता. 

 एकेक करत सगळे सापडले .सगळे मधमाश्यांच्या डंखामुळे सुजले होते. सगळ्यांना उलट्या, ताप आणि जुलाब सुरू झाले होते. आमच्या जवळ असलेले पाणी संपले. सगळ्यांना dehydration झाले होते.

अश्या अवस्थेत आता खाली कसे उतरायचे हा मोठा प्रश्न होता . एव्हाना उन्हं उतरायला लागली होती . सगळ्यांची शारीरिक आणि मानसिक अवस्था दयनीय होती. झालेला प्रकार इतका अनपेक्षित आणि भयंकर होता कि सगळे उमेद हरवून बसले होते . शरीरात अजिबात त्राण उरले नव्हते.अश्या वेळी खंबीर राहून सगळ्यांना खाली नेणें गरजेचे होते .रात्री वन्य श्वापदे हिंडतात, त्यामुळे अंधार होण्यापूर्वी खाली उतरणे अत्यावश्यक होते . 

दोघे मित्र कसेबसे उतरून खाली गेले. गावकऱ्यांना घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिली. गावकरी देवासारखे मदतीला धाऊन आले . आठ,दहा जण पाणी आणि दिवट्या घेऊन ते डोंगर चढून वर आले. एकेकाला आधार देऊन हळू हळू खाली आणले .

 आता अंधार पडला होता . एव्हाना आम्ही घरी परत पोहचायला पाहिजे होते . घरी सगळे काळजी करत होते . तेंव्हा सगळ्यांकडे आजच्या सारखे मोबाईल फोन ही नव्हते .आता प्रश्न होता की गाडी कोण चालवणार. सगळेच उलट्या, जुलाबानी हैराण झाले होते.

 एका मित्राने घरी फोन करून सगळी हकीकत सांगितली आणि मदतीची यंत्रणा वेगाने सुरू झाली. दोन गाड्या, ड्रायव्हर्स आले. येण्यापूर्वी एका हॉस्पिटल मध्ये सगळ्यांना admit करायची सोय झाली .

पुढचे चार दिवस हॉस्पिटल मध्ये काढले . मधमाश्यांचे काटे पुढे कित्येक दिवस निघतच होते. अंगावर असलेल्या सुजेमुळे एकमेकांना ओळखू शकत नव्हतो. सगळ्यांना ताप , उलट्या सुरूच होत्या .  कानात मधमाश्यांचा आवाज कानात घुमत होता . 

त्या सहलीपासून मधमाश्यांची मनात भीतीच बसली आहे . तेवढेच नाही, कुठेही ट्रॅकिंग ला जायचे म्हटले की मधमाश्या आठवतात आणि थरकाप होतो. नुसता अविस्मरणीयच नाही तर अंतर्बाह्य हलवून टाकणारा प्रसंग होता तो .

त्यानंतर  मात्र प्रत्येक प्रवासात काही नियम, खूणगाठ बांधून ठेवले आणि  त्याचे पालन करायचे असेही ठरवले . निसर्ग , वन्य प्राणी आणि पर्यावरण यांचा आदर करायचा . इंग्रजी भाषेतली म्हण आहे ना. Live and  let live.. अगदी तंतोतत खरी आहे . पर्यावरण जितके तुमचे आहे तितकेच इतर प्राणिमात्रांचे ही आहे . विनाकारण कुठल्याही प्राण्यांना त्रास देऊ नये ही खूप मोठी शिकवण मिळाली .

मधमाश्यांची भिती मात्र कायम मनात घर करून राहिली आहे .

1 thought on “अविस्मरणीय अनुभव -मधमाश्यांच्या कहर”

  1. बापरे! भयंकर प्रसंग!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *