— वैशाली चौधरी —
” आशा, अगं ए आशा…येतेस कि नाही? मी निघाले गायी म्हशींना रानात घेऊन,” उषाताई अंगणात उभी राहून आशाला हाक मारत होती.
“आले आले, दोन मिनिट थांब,” आशा.
“लवकर ये, नाहीतर निघालेच बघ मी आता तुला सोडून,” उषा वैतागून म्हणाली.
“काय ग ताई, असे काय करतेस? तुला माहित आहे ना मला किती आवडते गायी, म्हशी आणि आपल्या शेळीला चरायला घेऊन जायला? मग मला सोडून का चाललीस,” आशा.
“तुला काय? तू रोजच जातेस यांना घेऊन. मी तिकडे सासरी दिवसभर काम करते. आता नाही मला तुझ्यासारखे असे रानात फिरायला मिळत, तेवढेच ८ दिवस मौज करून घ्यावी म्हटले,” उषा.
“लग्न झाल्यावर खरेच इतके काम असते का ग ताई?” आशा घाबरून म्हणाली.
“कळेलच तुला. आता तुझाच नंबर आहे,” उषा.
“नाही ग ताई, मी नाही इतक्यात लग्न करणार. चांगली मोठी शिकून कलेक्टर होणार आहे,” आशा.
“”हाहाहा, बरं बरं, आली मोठी कलेक्टरीणबाई..चल आता जाऊ,” उषा.
आशा आणि उषा दोघी सख्या बहिणी. त्यांना २ मोठे भाऊ. आशा सोडून सर्वांची लग्न झालेली. ती सर्वात लहान. ती ४ वर्षांची असतानाच तिची आई देवाघरी गेली, त्यामुळे आप्पा आणि सगळे मोठे भाऊ बहीण यांनी मिळून आशाचा सांभाळ केला. आशा सर्वांची खूपच लाडकी होती. आप्पांची तर एकदम लाडूबाई. ती जे मागेल ते लगेच आप्पा तिच्यासाठी घेऊन येत.
आप्पा कुस्ती खेळायला जात होते. त्यात मिळणाऱ्या पैशावरच काय तो त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच होती. पण तरीही आप्पा सर्व मुलांचे जमेल तसे लाड पुरवत. आशाला शिकवून तिला चांगली नोकरी मिळावी असे त्यांना मनोमन वाटे.
ताईचे लग्न झाल्यावर घरची बरीच जबाबदारी आशावर पडली होती. सकाळी घरकाम उरकून दुपारी ती शाळेत जायची. संध्याकाळी आल्यावर थोडा वेळ गायी म्हशी आणि शेळीला रानात चरायला घेऊन जायची. तिथेच थोडा अभ्यासही करायची. नंतर काही दिवसांनी त्या शेळीला एक गोंडस पिल्लू झाले. आशाला खूप खूप आनंद झाला. त्या पिल्लाचे तिने “मिली” असे नाव ठेवले. आशा येता जाता मिलीबरोबर खेळायची, खूप गप्पा मारायची. तिची जणू एक जिवलग मैत्रीणच बनली होती. त्या दोघींनाही एकमेकींचा खूप लळा लागला होती. आशाचा दिनक्रम असाच सुरु होता.
एके दिवशी अचानक एका कुस्तीत खेळताना आप्पांचा एक हात मोडला. सर्वांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. कुस्तीत मिळणारी कामे आता बंद झाली, त्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची झाली. दोन्ही भाऊ जमेल तसे घराला हातभार लावत होते. पण म्हणावी तितकी अशी कमाई नव्हती. याचा परिणाम आशाच्या शिक्षणावर होऊ लागला. शाळेची फी भरता येईना. आशाचे दहावीचे वर्ष होते.
“आप्पा, मला एवढं वर्षं तरी पूर्ण करू द्या,” तिने कळवळीने विनंती केली.
“पोरी, मी माझ्या परीने खूप प्रयत्न करतो आहे. तू तर पाहत आहेस ना, पुढची फी भरल्याशिवाय तुला परीक्षेला बसता नाही येणार.”
आशाला खूप दु:ख झाले. मिलीसमोर मन मोकळे करून आशा खूप रडली. मिलीसुद्धा अगदी आशाचे सांत्वन करीत असल्यासारखी, तिच्या कुशीत शिरली. असेच दिवस सरत होते. आणि अशाच एका दिवशी आशाला एक स्थळ आले. मुलगा सरकारी नोकरीत होता. त्याकाळी, सरकारी नोकरी मिळणे खूप भाग्याचेच होते. आप्पांना खूप आनंद झाला. त्यांनी आशाला स्थळाबद्दल सांगितले. आधीच शाळा सोडावी लागणार या दुःखात असलेल्या आशाला अजून एक धक्का बसला.
“मिली, तुला माहित आहे ना, मी काय काय स्वप्ने पाहिली होती. पण बघ ना आता काय होत आहे. तूच सांग मला कि मी काय करू?” नेहमीप्रमाणे आशा मिलीबरोबर गप्पा मारत स्वतःचे मन मोकळे करीत होती.
मिली शांतपणे आशाच्या बाजूला येऊन बसली. जणू काही ती आशाला धीर देण्याचा प्रयत्न करत होती.
“तू तरी काय सांगणार ना मला. नशिबाचा खेळ दुसरे काय. परिस्थितीपुढे आता हात टेकावे लागणार मला,” आशाने मिलीला कुरवाळले.
बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. आपल्या धाकट्या बहिणीच्या लग्नासाठी उषाताई चार दिवस आधीच माहेरी आली होती. आई नसल्यामुळे, ताईने लग्नातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीत जातीने लक्ष घातले होते. आशाला तिने स्वतः तयार केले. तिच्या डोळ्यात आपल्या बोटांनी रेखीव काजल घातले. खरंच, आईनंतर मोठी बहीणच काय ती आईसारखी माया लावू शकते. लग्नविधी चालू असता आशा खूप खूप रडत होती…
लग्नविधी संपले. सासरी जायची वेळ आली. आप्पा, दोन्ही भाऊ, वाहिनी, त्यांची मुले, ताई, मैत्रिणी, नातेवाईक, असे एकेक करत आशा सर्वांना निरोप देत होती.
“बाळ, आता निघायची वेळ झाली आहे, सगळे वाट पाहत आहेत,” आप्पा स्वतःचे अश्रू पुसत बोलले.
“एक मिन थांबा आप्पा,” असे म्हणत आशा अंगणाकडे वळली, इकडे तिकडे पाहू लागली,
“काय झाले बाळ, नक्की काय शोधते आहेस?” आप्पा.
“आप्पा, मिली कुठे आहे? मघापासून शोधतीये मी, पण दिसत नाहीये,” आशा कावरीबावरी झाली.
आप्पांनी मान खाली घातली. त्यांनी दिलेले उत्तर ऐकून आशा निःशब्द झाली आणि तिच्या डोळ्यातील अश्रू अखंड वाहतच राहिले. लग्नात होणाऱ्या खर्चाला हातभार लागावा म्हणून मिलीला, त्या गोंडस बकरीला विकले होते.
