सौ. उज्वला तायडे
16नोव्हेंबर म्हणे फास्टफूड डे आहे म्हणे आज, लवकर काहीतरी नवीन बनव ब्रेकफास्ट ला असं जेव्हा मुलगा म्हणाला तेव्हा कळलं फास्टफूड डे पण असतो
त्यावर उपाय म्हणून मग मी त्याला पोळी fryankie करून दिली.यामध्ये गव्हाच्या पोळी मध्ये सर्वच भाज्या खाल्ल्या जातात.
एकविसाव्या शतकात वेगवान आयुष्याच्या नावाखाली माणसाला एक वाईट सवय जडली आहे, फास्ट फूड खाण्याची. चाट, वडापाव आणि बर्गर अगदी कमी वेळात बनवून मिळतो.खाणाऱ्यांच्या जिभेला देखील चांगले लागतात.
आता हे फास्ट फूड म्हणजे काय? तर असे अन्नपदार्थ जे लवकर तयार करून लगेच खायला देता येते आणि खाणाऱ्या ग्राहकालाही ते पटकन किंवा उभ्याने देखील खाता येतात. अगदी गाडी चालवताना, चालता-चालता, शाळेत मधल्या सुटीत पटकन खाता येतील असे पदार्थ म्हणजे फास्ट फूड.
जिथे आरामात बसण्याची गरज भासत नाही, काटे चमचे प्लेट्स यांचीही फारशी गरज नसते, अशी व्यवस्था म्हणजे फास्ट फूड शॉप! आपल्याकडे गल्लोगल्ली आढळणाऱ्या वडापाव, पाणी-पुरी, भेळपुरी, चायनीज यांच्या टपऱ्या म्हणजेच फास्ट फूड शॉप्स!
फास्ट फूड हे सहसा तळलेले किंवा गोड असते. आपल्याकडे जे पदार्थ टपरीत किंवा हातगाडीवर बनवले जातात ते त्याच तेलात वारंवार तळतात. असे वारंवार तळलेले पदार्थ आरोग्याला फारच हानिकारक असतात. कारण त्यात आरोग्याला घातक असे ट्रान्स-फॅट असतात. शिवाय हे पदार्थ अधिक काळ टिकविण्यासाठी त्यात मीठ किंवा साखर जास्त प्रमाणात घातली जाते. त्यात जीवनसत्वे खनिजे आणि इतर पोषक घटक फार कमी प्रमाणात असतात कारण फास्ट फूडमध्ये भाज्या किंवा फळे नसतात किवा असली तरी जास्त शिजवल्या किंवा तळल्यामुळे त्यातले पोषक अन्नघटक नष्ट झालेले असतात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे फास्ट फूडमध्ये आरोग्यास उपयुक्त असा चोथा आणि प्रथिने कमी आणि आरोग्यास हानिकारक असणाऱ्या ट्रान्स-फॅट आणि कॅलरीज मुबलक प्रमाणात असतात.चोथा आणि प्रथिने कमी असण्याचे कारण म्हणजे त्यामध्ये कडधान्ये अभावानेच असतात. फास्ट फूडमध्ये असलेल्या अतिरिक्त उष्मांकांमुळे (कॅलरीज मुळे) लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी यांसारख्या दुर्धर व्याधी जडतात. आपल्याला हे रोग व्हावेत असं तुम्हाला वाटतं का? नाही ना? मग फास्ट फूड, जंक फूड टाळण्यास पर्याय नाही!
जंक फूड या शब्दाचा अर्थ “कचरा अन्नपदार्थ” असा होतो. जे शरीराला उपयुक्त नाही परंतु खावेसे (किंवा हवेहवेसे) वाटते आणि ज्यात पोषक द्रव्ये नसतात किंवा अल्प प्रमाणात असतात असे पदार्थ म्हणजे जंक फूड! प्रत्येक जंक फूड फास्ट फूड असते पण प्रत्येक फास्ट फूड हे जंक फूड असेलच असे नाही. उदा. चिक्की किंवा भाजके चणे हे फास्ट फूडच्या व्याख्येत येतात पण त्यांना जंक फूड म्हणता येणार नाही.
उलट हे दोन्ही पदार्थ विशेषतः लहान मुलांसाठी पोषक आहेत. जंक फूड आणि फास्ट फूड असा भेद करता येणे अवघड असले तरी कोणते पदार्थ टाळायचे हे लक्षात घेतल्यास आपले जगण्यासाठी खाणे सोपे होईल.
पर्याय नसतो म्हणून किंवा आवड असते म्हणूनही आजकाल फास्ट फूड टाळता येत नाही. पण ते खायचंच असेल तर त्याचे दुष्परिणाम माहीत असायला हवेत आणि ते आरोग्यदायी करण्याचे मार्गही माहीत असायला हवेत.
कधी वेळ नाही म्हणून, कधी जरासा चेंज हवा म्हणून, तर केव्हा तरी पार्टी आहे, म्हणून आपण सतत फास्ट फूड पोटात ढकलत असतो. आजच्या फास्ट लाइफमध्ये फास्ट फूडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जे मिळेल ते आणि वेळ मिळेल तेव्हा खायचे, ट्रेन व बसने ऑफिसला पळायचे व मिळेल तेवढा वेळ झोपायचे, हे असे जीवन आज बरेच जण जगत आहेत याची आपल्याला कल्पना आहेच. अशा वेळी बाहेर खाणे हा एकमेव पर्याय असतो. बऱ्याच लहान मुलांना पालक सांगतात, आपले अन्न सकस असावे, वेळेवर जेवावे. पण मोठय़ांचे काय? त्यांनाही नाइलाजाने का होईना या पदार्थाचा आसरा घ्यावा लागतो. एकटे राहणारे किंवा नवरा बायको नोकरी करणारे असल्यामुळे वेळेअभावी सतत बाहेरचे अन्न खावे लागते. झटपट तयार होणारे पदार्थ आणि त्यांची जिभेवर रेंगाळत राहणारी चव यामुळे फास्ट फूड न आवडणारा मनुष्य शोधूनही सापडणार नाही.
आता इथे सांगितलेल्या उल्लेख केलेल्या आधुनिक जीवनशैलीचा थेट परिणाम होतो तो आहारावर .आधीच आपण खात असलेले अन्न हे रासायनिक जंतुनाशके आणि खतांवर पोसलेले असल्यामुळे त्याचा दर्जा खालावलेला असतो त्यात वातावरणातील प्रदूषणामुळे शरिराला अनेक अन्नघटकांची कमतरता भासत असते .त्यात भर म्हणून आत्यंतिक सोयीच्या ,सहजपणे उपलब्ध असणाऱ्या ,खिशाला परवडणाऱ्या आणि जिभेला सुखवणाऱ्या जंक फूड चा मारा शरीरावर होत असतो. उघड्यावर मिळणाऱ्या पदार्थांच्या स्वछतेकडे सोईस्करपणे काणाडोळा केला जातो. मग पदार्थ शिजवण्यासाठी लागणारी अल्युमिनियम ची भांडी ,निकृष्ट दर्जाचा कच्चा माल(विशेषतः तेल),कृत्रिम रंग,गंध याकडे दुर्लक्ष केले जाते. या महत्वाच्या बाबींचा विचार केला जात नाही.
जगाच्या पाठीवर भारत हा असा एकमेव देश आहे जेथे अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. या घरगुती पदार्थांमुळे व गृहिणी ज्या ममतेने हे पदार्थ करतात त्यामुळे हे खाण्यास योग्य असतात .ऋतुमानानुसार विशिष्ट प्रकारचे पदार्थांचे प्रमाण वाढवले जाते.जसे जानेवारी महिन्यात थंडी वाढलेली असते, तेव्हा तिळाच्या वड्या, गुळाची पोळी यासारखे पदार्थ हमखास बनवले जातात.
घरामध्ये विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ मिळत असूनही किंवा इतर काही कारणांमुळे तसेच जाहिरातींच्या प्रभावामुळे आपल्याकडे जंकफूड खाण्याचे प्रमाण हे धोकादायकरीत्या वाढलेले आहे.
कोणतीही गोष्ट प्रमाणातच योग्य असते पण ती जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होऊ लागते तेव्हा त्यामुळे खुप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. तसेच फास्ट फूड देखील प्रमाणातच आपल्या शरीरासाठी योग्य असते. जर फास्ट फूड चे सेवन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आपल्या शरीरासाठीदेखील ते हानिकारक आहे.
इडली, उपमा, डोसा इत्यादी लापशी, खीर (साखर बेताची असावी),थालीपीठ, पराठा,भाजके चणे, शेंगदाणे (कच्चे असल्यास उत्तम), चिक्की
ओल्या शेंगा (भुईमूग), हिरवा वाटाणा, मक्याचे कणीस
काकडी, सफरचंद, केळी, कलिंगड इत्यादी
नेहमीचे घरगुती जेवणाचे पदार्थ: चपाती, भाकरी, पिठले, डाळ, दही इत्यादी
जास्त चोथायुक्त पदार्थ
डाळी / कडधान्य, वाटाणे, हरभरे, डाळ, उसळ इ.
मोड आलेली कडधान्यं (मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.)
हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, टोमॅटो, काकडी, कांदा, कोबी
पपई, पेरू, बोरे, कलिंगड, सफरचंद, डाळिंब यांसारखी फळे
आख्खी कडधान्ये- उदा. मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.
कुरमुरे, भाजलेले चणे, मक्याचे कणीस, ओला हिरवा मटार इ.
गहू, बाजरी, ज्वारी यांच्या पिठांच्या पोळ्या/भाकऱ्या
पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या मिश्रपिठांच्या भाकऱ्या
पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या रव्याची खीर किंवा उपमा
व्होल व्हीट ब्रेड पासून बनवलेले व्हेज सॅंडविच हे पदार्थ नियमितपणे खावेत, शक्यतो घरीच बनवले असावे.हे खाण्यायोग्य पदार्थ आहेत तर पिझ्झा, बर्गर, रोल वगैरे फास्ट फूडचे सर्व प्रकार वडे, समोसे, बाकरवडी, भजी, कांदा-भजी, इत्यादी तळलेले पदार्थ ,केक, पेस्ट्री, टोस्ट, बटर, खारी ,नानकटाई इत्यादी बेकरीचे पदार्थ
सर्व प्रकारची बिस्किटे (अगदी मारी सुद्धा!)
पेढे, बर्फी, जिलेबी, रसगुल्ले, गुलाबजामून, रसमलाई, लाडू इत्यादी मिठाया ,सर्व शीत पेये ,
आईस्क्रीम, कुल्फी इत्यादी.शक्यतो हे पदार्थ कटाक्षाने खाणे टाळावे किंवा वर्षातूनएकदा, दोनदा खावे.
म्हणजे फास्टफूड च्या मोहापासून दूर होता येईल.
आता आपल्यालाच ठरवायचे आहे की फास्टफूड/जंकफूड खायचे की घरगुती फूड.
आहे न ‘कुतूहल’फास्टफूड चे…….
