सनविवि अनुभव साहित्योन्मेष स्पर्धेने काय दिले

साहित्योन्मेष स्पर्धेने काय दिले

सौ. उज्वला किसन तायडे

जीवनाच्या सर्वच क्षेत्रात स्पर्धेचे युग आले आहे. कोणत्या क्षेत्रात स्पर्धा नाहीत? असे एकही क्षेत्र शिल्लक उरलेले नाही की जेथे स्पर्धा नाही.

 

सर्वप्रथम साहित्योन्मेष ,सनविवीचे खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून.

 

साहित्योन्मेष चा भाग होण्याचे भाग्य मला लाभले ते आपल्या समूहातील पुरूदत्तदांचे त्यांनी आमच्या दुसऱ्या समूहात म्हणजे संवेदना नावाचा जो समूह आहे त्यावर आपल्या साहित्योन्मेष स्पर्धेचे एक माहिती पत्रक टाकले होते, तीच माझी साहित्योन्मेष ला जुळण्याची पहिली पायरी.गेल्या दोन,वर्षांपासून फक्त विज्ञान विषयावर लिखाण सुरु होते .परंतु ‘साहित्योन्मेष’च्या माध्यमातून  वैविध्यपूर्ण विषयांवर लिखाण करता आले.आपण चाकोरिबद्ध न रहाता त्यापलीकडे जाऊन लिखाण करू शकतो हा एक आत्मविश्वास निर्माण झाला.

 

साहित्योन्मेष ने सृजनशीलता दिली.सृजनशीलता ही जीवनाच्या सर्व क्षेत्रात अवतरते. मग ती रंगरेषांनी चित्र काढण्याचा, रांगोळ्या काढण्याचा माध्यमातून असो,शब्दांतून व्यक्त होणारा गीतकार असो, चाली बांधणारा संगीतकार असो,सर्जनशीलतेतून ताजमहल निर्माण झाले. असेच नवनवीन विषयावर लिहिणारे लिखाणाचे नवनिर्माते  साहित्योन्मेषने तयार केले.

 

वर्षभराच्या कालखंडाने आपणा सर्वांना एका गोष्टीचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवले; ते म्हणजे समाजमाध्यमांवर सर्जनशील हुकूमत असणे ही आता काळाची गरज आहे.आता बोटांनी मोबाईल वर बोटे फिरवून नवे धडे गिरवायचे आहेत.साहित्योन्मेषने  सर्जनशीलतेची नवीन पाऊलवाट गेल्या बारा महिन्यात दिली आहे.

 

पूर्वी माणूस आदिम अवस्थेत शिकार करत, कंदमुळे खात जगत होता. पुढे त्यालाअग्नीचा शोध लागला. मग चाकाचा.नंतर शेती करून पशुधन सांभाळू लागला. असे करताना तो उत्क्रांत होत गेला, त्याने त्याची संस्कृती निर्माण केली, आणि नवनिर्माणशील झाला.आज मानव संगणक युगात वावरतोय, चंद्रापासून मंगळपर्यंत पोहोचला.मानवाची ही जी प्रगती झाली ती थक्क करणारी आहे.या प्रगतीचे कारण म्हणजे सतत नाविन्याचा शोध घेण्याची हौस, सृजनशीलता.हीच सृजनशीलता साहित्योन्मेषने प्रत्येक महिन्याला नवनवीन विषय देऊन जागृत करण्याचा प्रयत्न केलाय सनविवीने.

 

साहित्योन्मेष च्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या लेखक मंडळीशी लिखाणाच्या माध्यमातून संवाद साधताआला. वैविध्य पूर्ण अश्या लिखाणाचे विषय दर महिन्याला दिल्यामुळे स्पर्धेत सहभागीच्या  लिखाणातील विविध पैलू अनुभवायला मिळाले. कुणाच्या लेखणीतून निसर्गाची विविध रूपे अनुभवायला मिळाली, कलाकलाने जसा चंद्र वाढत  जाऊन आणखीन मोहक दिसत जातो तशीच लेखणी मोहक होताना दिसली,क्षितिजावर उमटलेले इंद्रधनुष्य, पौर्णिमेच्या चंद्राचे शीतल चांदणे, समुद्राला येणारे उधाण, सर्वच काही लेखकांच्या लेखणीतून वाचायला, वाचताना अनुभवायला मिळाले.

 

मला तर वाटते जर ‘साहित्योन्मेष’नसते तर इतर पशुपक्षाप्रमाणे माझीही लेखणी जशी त्यांची बुद्धी मर्यादित आहे तशीच विज्ञानापूर्तीच असती.

 

चिमणी वर्षानुवर्षे घरटे बांधते आहे, पण त्या घरबांधणी त पुढची प्रगत अवस्था दिसत नाही.जे चिमणीच्या बाबतीत तेच कोळ्याच जाळ विणण्यात, मधमाश्यांच्या पोळं बांधणीत आणि मुंग्यांच्या वारूळ बांधणीत दिसून येते.असंच काहीसं माझंही झालं असतं कदाचित साहित्योन्मेष नसतं.

 

कलेचा आस्वाद घेणे ही मानवाची उपजत प्रवृत्ती आहे. सुंदर चित्र, सुंदर शिल्प, उत्कृष्ट नाट्य, सुंदर देखावा पाहून अगदी अरसिक माणूसदेखील हरखून जातो.जसं बागेतील सुंदर फुले पाहून मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो तसाच आनंद ‘साहित्योन्मेष’मोबाईल स्क्रीनवर दर महिन्याला आले म्हणजे व्हायचा.

 

आधुनिक जग हे प्रचंड धावपळीच झालेलं आहे.परंतु आता स्मार्ट मोबाईल म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे अपत्य, हे अपत्य आज नको तसा धुमाकूळ घालत आहे.करोना महामारीच्या काळात,किंबहुना तेव्हापासून केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगात ह्या विज्ञान तंत्रज्ञाच्या अपत्याला खूप मागणी आली.देशातील प्रत्येक नागरिकाने ह्या मोबाईल चा पुरेपूर वापर केला, करत आहेत. ज्यांना वाचनाची आवड आहे परंतु साहित्य पुस्तक रुपात किंवा तत्सम रुपात उपलब्ध नाही तेव्हा आपल्या इ- सनविवी सारखे इ मासिक,मोबाईल, संगणक च्या माध्यमातून वाचकांची वाचनाची भूक भागवण्यासाठी उपयोगी पडते.त्याहीपलीकडे जाऊन आता इ सनविवी चे रेडिओ सुध्दा खूपच नाविन्यपूर्ण असा उपक्रम की ज्यांना वाचायला त्रास होतो, डोळ्यांची समस्या किंवा इतर काही त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे.

 

लेखांचे केलेले अभिवाचन ही सुद्धा अभिनव कल्पना आवडली.

 

साहित्योन्मेषने दर महिन्याला अत्यंत  वैविध्यपूर्ण विषय दिले.स्पर्धेतील पहिला लेख लिहिताना केवढी तारांबळ उडाली होती.पाच परिच्छेद दिले होते त्यातील एका वर लिखाण करायचे होते.

 

 हाती लेखणी घेतल्यावर सर्वच विषय एकत्र येऊन स्वप्नात पिंगा घालू लागले.  शेवटी त्यातील एका विषयावर लिखाण केले.नंतर मात्र थोडं थोडं लिहिणे जमायला लागलं.खूपच विविधता असलेले विषय पुढे पुढे मिळत गेले.

 

प्रवास एक गंमत,सुट्टीची खादाडी,सुट्टी मुलांची, परीक्षा पालकांची,सुट्टीचे आत्मवृत्त,सुट्टीतल्या छंदवर्गांचे बोकाळलेले प्रस्थ! पावसाळा! त्यावर

 

*पत्रलेखन किंवा कविता*,माझे मित्र..विनोदी लेख 

 

 बिघडले ते घडले कसे…विनोदी लेखन 

 

 सध्याची परिस्थिती..चिंतन

 

 Work from home की home work ?? 

 

( विनोदी, विडंबन, प्रहसन)

 

 पन्नाशीनंतरचे वेळापत्रक…अनुबोधपर.

 

अन् माझे/त्याचे/तिचे आयुष्यच बदलले..

 

असा एक खरा किंवा काल्पनिक प्रसंग त्यावर कथा/ लेख-आज मी जो/जी काही आहे ….हे त्यामुळेच 

 

असे शीर्षक असणाऱ्या प्रसंगावर कथा/लेख

 

भाषेचे सौंदर्य बोलीभाषेच्या वापराने  वाढते किंवा कमी होते?

 

 परभाषेतून आलेल्या शब्दांची सरमिसळ असावी की नसावी?

 

 भाषेची शुचिता महत्वाची की संवाद साधणे महत्वाचे?

 

बाल दिनानिमित्त खास वेगळे..

 

 छोटुकली पण धिटूकली 

 

छोट्या मुलांसाठी वीरबाला/बालक पदक विजेत्या मुलांच्या गोष्टी लिहिणे.

 

 पाल्य आणि पालक संबंध मैत्रीपूर्ण असावेत की  शिस्तबद्ध?आणि शेवटी साहित्योन्मेष ने काय दिले.

 

नाही म्हटले तरी गेल्या वर्षभरापासून मी साहित्योन्मेष च्या सहवासात आहे.आपण समूहातील सदस्य कधीही एकमेकांना प्रत्यक्षात भेटलो नाही तरीही असे वाटते की आपण वाचन साहित्यातून एकमेकांना भेटलो.आपण सर्वांनीच एकमेकांच्या लेखणीचे वाचन केले मूक वाचनातून.वाचनाच्या आनंद घेण्याच्या, आनंद वाटण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात.त्यानुसार आपली अभिरुची ठरत जाते किंवा बदलत जाते.

 

असेच अत्यंत वैविध्यपूर्ण विषयावर लिखाण करायचे होते .त्यामुळे साहजिकच सर्वच विषयात सर्वच लेखकांच्या लेखणीची ओळख होऊन खूप काही शिकायला मिळाले.इंटरनेट आणि सोशल मीडियातून अभिव्यक्तीच्या अनेक शक्यता निर्माण झाल्या. मराठी साहित्य म्हणता येईल असं  सकसपणे पुढे आलं.

 

 शेवटी ,सहित्योन्मेष स्पर्धेने मला काय दिले!तर एक नवी ओळख. वेगवेगळ्या धाटणीच्या विषयावर लिखाण करण्याची अभूतपूर्व अशी संधी,प्रचंड आत्मविश्वास,नवे पंख, नवे आकाश.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चांगल्या लेखक मंडळींचा सहवास.मी टीम सनविवीच्या लक्षणीय कामाला  सलाम करून आभार व्यक्त करते.

 

सर्वांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *