---मानसी तांबेकर---
द्राक्ष लांब आहेत म्हणून त्याला आंबट घोषित करणारा कोल्हा,लेकीकडे निघालेल्या बिचाऱ्या म्हातारीला 'म्हातारे,म्हातारे कुठे चाललीस ?'असं विचारून जेरीस आणणारे जंगली प्राणी, पाठीवरचे ओझे कमी व्हावे या हेतूने पाण्यात डुबकी मारून मालकाला 'गाढव' बनवण्यात अयशस्वी ठरलेले 'गाढव', टोपीवाल्याच्या टोप्या चोरून त्याला सतावणारी माकडे या अशा अनेक इसापनितीतील प्राणिवर्गाच्या गोष्टी ऐकून बालपणी एकंदरीत माझे समस्त प्राणिवर्गाबद्दल फारसे सकारात्मक मत नव्हते; म्हणायला मी काही प्राण्यांकडून 'चतुरपणा'तेवढा शिकले. पुढे जाऊन एकदा रस्त्यावरचा एक चवताळलेला कुत्रा चावल्याने घ्याव्या लागलेल्या इंजेक्शनची कळ सोसल्यावर ‘घरात प्राणी पाळणे नाही’ या मतावर मी ठाम होते. आणि एक दिवस ‘ती’ मला भेटली.
सोलापूरला आमच्या शेजारच्या वाड्यात एक नवीन कुटुंब राहायला आले होते -डॉ. सदानंद पाठक. त्यांची लेक 'करुणा' साधारण माझ्याच वयाची, माझ्याच शाळेत, त्यामुळे आमची लवकर गट्टी जमली. पण हळूहळू मला लक्षात आले की रस्त्यावर एखादा प्राणी अडचणीत सापडलेला दिसला की हिच्यातील 'करुणा'जागी होत असे. शरणार्थी कपोताचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे मांस कापून देणारा शिबी राजा,आपल्या चुलतभावाने पक्ष्याला बाण मारून जख्मी केल्यावर त्याच्यावर औषधोपचार करणारा सिद्धार्थ हे हिचे आदर्श. मी 'मांसाहारी' आहे हे कळल्यावर खरंतर आमची दोस्ती धोक्यात येतांना दिसत होती पण मी ही 'निसर्गांतील अन्नसाखळी’ टिकवण्यासाठी माझे मांसाहार करणे कसे जरुरी आहे? हे चतुरपणे तिच्या गळी उतरवले. मात्र त्यानंतर मला शाकाहारी बनवण्याचा नाद तिने सोडला.
एकदा चक्क हिने वडिलांना पेशंटचा दात काढतांना पाहून त्याच चिमट्याने कुत्र्याचा दात काढण्याचा धाडसी प्रयत्न केला. तरीही तिला कुत्रा चावला नाही याचे एकाच वेळेस नवल आणि हेवा मला वाटला. नाही म्हणायला कुत्र्याने तिला थोडेसे ओरबडले पण तिच्या या उपद्व्यापापायी जास्त चावा तिच्या आई-बाबांनी घेतला. त्या बिचाऱ्या कुत्र्याची शिळी चपाती खायची धडपड पाहून हिने त्याच्या दातात प्रॉब्लेम असला पाहिजे असे निदान करून उपचार केल्याचा कबुलीजवाब दिला. ‘मूक’ प्राण्यांवर दया करायला निघालेल्या तिला- ‘प्राण्याचे फेस रिडींग बंद कर’ अशी मिळालेली दटावणी तिने मूकपणे ऐकली. या प्रकरणात रेबीजची पाच इंजेक्शन मिळूनसुद्धा हिचे भूतदयेचे 'भूत' काही उतरले नव्हते.घरी प्राणी पाळायला सक्ती असल्यामुळे शाळेतून येता-जाता ती आपले आदर्श समोर ठेवून गायींना चारा घालणे ,आईने दिलेल्या डब्यातला सुका खाऊ-बिस्किटं रस्त्यातल्या कुत्र्या-मांजरांना खाऊ घालणे,त्यांना लडिवाळपणे गोंजारणे आणि सर्वात महत्त्वाचे; माझ्या मनात प्राण्याविषयी ओढ निर्माण करणे हे काम बजावण्यात कुठेही कसर सोडत नव्हती. अर्थात या मागे तिचा हा स्वार्थ दडलेला होता की माझ्या घरी बंधन नसल्यामुळे तिच्या हौशेखातर मी किमान एखादे कुत्रा-मांजर पाळावे; पण माझी ही प्राणी न पाळण्याची ‘भीष्मप्रतिज्ञा’ आहे हे तिला कालांतराने कळून चुकले. या मतभेदांची गदा आमच्या मैत्रीवर चालली नाही हे विशेष.
बैलपोळा, नागपंचमी, वसुबारस असे सण आले की हिच्या उत्साहाला भरतं यायचं. दरवर्षी तान्ह्या पोळ्यात 'बैल सजवा' स्पर्धेत तिच्या सजवलेल्या बैलांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्यावर जणू ‘विश्वसुंदरी’ किताब मिळाल्याच्या रुबाबात ती स्टेजवर जायची. एक वर्ष नागपंचमीचा दिवस होता.तिची आई मागच्या आळीतल्या गोडसे काकूंकडे मंगळागौरीच्या पूजेसाठी गेली होती. एक गारुड्याचा छोकरा करंडी घेऊन ‘नागोबाला दूध घ्या पंचमीची ओवाळणी द्या’ म्हणत आला. आजच्या दिवशी नागोबाचे दर्शन घेतले की पुण्य लाभतं असं करुणेने ऐकलं होतं.तिने गारुड्याला दूध-दक्षिणा यांचे आमिष दाखवून गोडसे काकूंच्या घरी चलण्याची आणि आईला अंगणात येण्याची विनंती केली. गारुडी तिच्या पाठोपाठ गेला पण पूजेत व्यस्त असलेली तिची आई अंगणात आली नाही. नागपंचमीच्या दिवशी नागदर्शन अंतरणे करुणेला प्रशस्त वाटेना .त्यावर तोडगा म्हणून बाहेर येऊन तिने ती गारुड्याची टोपली उचलली आणि माजघरात धूम ठोकली. तिचे हे खटले पाहून भटजींची दातखिळी बसली, एकच गोंधळ उडाला आणि त्या गडबडीत करुणाही भेदरली.तिच्या हातून टोपली निसटली आणि नागोबा वळवळत बाहेर पडले. फणा काढलेल्या नागोबाला पाहताच पाय जागच्या जागी खिळले. सर्वांचे चेहरे भीतीने पांढरे फटफटीत पडले. करुणा मात्र नागोबावर टोपलीचे झाकण घालण्याचा प्रयास निर्भयपणे करत होती. शेवटी गारुड्याने आपले जनावर कब्जात घेतले. पण या प्रकरणानंतर आमच्या गावात करुणा 'प्राणीमित्र' म्हणून ओळखू जाऊ लागली.
प्राण्यावर आधारित असलेला एकही चित्रपट पाहण्याची संधी ती सोडत नसे. 'हाथी मेरे साथी' हा तिचा आवडता चित्रपट. 'शोले' सारख्या प्रथितयश सिनेमात हिला भावलेली व्यक्तिरेखा नव्हे प्राणिरेखा म्हणजे 'धन्नो.' गावात रघूकाकांच्या मुलीचे लग्न होते. मंडपाबाहेर वरातीसाठी टांग्याची व्यवस्था केली होती. वरपक्षाकडील मुलांनी टांगा गच्च भरलेला.करुणा मला घेऊन टांग्यापाशी आली. टांगेवाला वाजंत्र्यांबरोबर गप्पा मारण्यात गुंतलेला. इकडे टांग्याची दशा काय झाली आहे याची त्याला शुद्धही नव्हती. थोडी रेटारेटी करत करुणाने पुढे प्रवेश केला;जिथे चाबूक खोवून ठेवला होता.चाबूक हातात आल्यावर तिने थेट हेमामालिनीच्या आविर्भावात त्याला फडकावून ,तोंडाने चक-चक् आवाज काढत तिच्या धन्नोला हलकेच एक फटकारा लगावला ! त्यानंतर गब्बर व त्याची गॅंग पाठी लागल्यासारखे बेफ़ाम सुटलेले घोडे,टांगा आपल्यावर येईल म्हणून भयभीत होऊन सैरावैरा पळणारे लोक, 'करुणा'ची महती माहित नसलेली वरपक्षाकडील भेदरलेली पोरं, तरीही कडीला गुंडाळलेल्या रेन्सच्या वाद्या आपल्या हाती घेऊन घोडयांना थांबवण्याचे धैर्य दाखवणारी करुणा ! आज तिने ‘शोले’ मधला सीन आम्हांला ‘याची देही याची डोळा’ दाखवला होता. आमचे नशीब चांगले की तेव्हा नॅशनल जिओग्राफी सारखे चॅनल नव्हते.नाहीतर ते पाहिल्यावर हिच्या ज्ञानात आणि उद्योगात अजूनच भर पडली असती यात शंकाच नाही.
‘पशुचिकित्सक’ बनून आपली प्राणी-जिज्ञासा भागवता येते व प्राणी-सेवाही घडते असे मौलिक सल्ले बऱ्याचदा मी तिला दिले. पण प्राणी-सेवेसाठी डोक्याला ताण देणारे शिक्षण घेऊन कुठचेही अतिरिक्त प्रयत्न हे तिचे ध्येय नव्हते. म्हणून आपल्या कुवतीनुसार;अनुभवातून, प्राणी-प्रेमातून,कुत्रे -मांजरी पाळून ती त्यांचे छान संगोपन करू लागली. पाळीव प्राण्यांबरोबरच जंगली प्राण्यांचा ही सहवास लाभावा या उदात्त हेतूने तिने एका वनाधिकाऱ्याला आपला जोडीदार निवडला. योगायोग असा की तिच्या नवऱ्याचे नाव ही 'चेतक.' 'हे जंगलचि माझे घर' या उक्तीला साजेसा संसार तिने जंगलातच थाटला. नदीकाठी पाणी प्यायला आलेला वाघ, लहानपणी शिकल्याप्रमाणे पावसात थुई-थुई नाचणारा मोर,कळपाने गवत चरणारी हरणं,झाडाला वेटोळे घालून बसलेला अजगर,जंगलातल्या तलावात आंघोळ करायला आलेले हत्ती पाहून तिच्या डोळ्याचे पारणे फिटले होते.
आज खूप वर्षांनी तिला भेटायचा योग आला होता. तिच्या फार्महाऊस वर पोहोचले.अपेक्षेपेक्षा एक वेगळंच प्राणिसंग्रहालय पहायला मिळाले...जिथे 'माकडचेष्टा' करून तिला पळता-भुई करून सोडणारी तिची दोन मुले होती, वस्तू सापडत नाही म्हणून मध्येच 'वाघाची डरकाळी' मारणारा नवरा होता,सासू-सासऱ्यांच्या रूपात दोन थकलेले प्राणी होते. आणि या सर्वांचे प्रेमाने करणारी माझी मैत्रीण ‘करुणा.’ तिच्यात मात्र मला 'बिचारी शेळी'दिसत होती.
माझी मैत्रीण
Categories:
