शनैश्वर मंदिर, मुरैना, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश

प्रसन्न मनाने आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करणारा भक्त नि शनिदेवांचा भक्त ह्यांची जातकुळी थोडी वेगळीच!! कात्रीत सापडलेला, चिंतेने ग्रासलेला हा भक्त शनिवारी तिळाचं तेल वहायला शनिदेवांच्या दरबारात हजेरी लावतो. ते का, त्याची कथा ही अशी…
रामसेतू बांधण्याचं काम जोरात चालू होतं. प्रभू रामचंद्रांना सीतामाईला सोडवण्यासाठी लंकेत जाण्याची घाई होती. सेतूचं काम लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी हनुमानावर टाकली होती आणि तिथे त्रास द्यायला कोण यावं? तर साक्षात शनिदेव! कुठल्याही कामात अडथळे आणायचे हीच तर शनिदेवांची खासियत. त्यामुळे सेतू बांधायचं कामही लांबणीवर पडायला लागलं. शनिदेवांनी हनुमानाच्या शक्तिबद्दल केवळ ऐकलेलं होतं पण अनुभवलेलं नव्हतं. बरं हनुमानाला रामाचं ध्यान तरी धडपणे करू द्यावं तर तिथेही शनिदेवांची भूणभूण. वैतागलेले हनुमान महाराज शेवटी शनिदेवाला शेपटीत बांधतात आणि रामसेतूच्या देखरेखीच्या कामावर हजर होतात.
ही शनिदेवांची अवस्था विपरीतच झाली. चालताना हनुमानाची शेपटी खालीवर होत गेली. त्यात बांधलेल्या शनिदेवांचं शरीर एवढं ठेचकाळलं की ज्याचं नाव ते! हनुमानाच्या प्रचंड ताकदीला ओळखण्यात आपण चूक केली हे शनिदेवांच्या लक्षात आलं. त्यांनी हनुमानाकडे क्षमायाचना केली. रामभक्तांना कधीही त्रास द्यायचा नाही ह्या अटीवर हनुमान महाराजांनी शनिची सुटका केली आणि ठेचकाळलेल्या अंगावर तेलही ओतलं.
तेव्हापासून शनिच्या वक्रदृष्टी पासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर आधी तेल ओतून शनिची पीडा कमी करा तर तो आपल्याला कमी पीडेल अशी वदंता तयार झाली.
शनिचं स्वत:चं स्वतंत्र असं खास मंदीर आहे, ग्वाल्हेर जवळच्या मुरैना भागांत. इथे तो जागृत आहे आणि भक्तांना पावतो असा समज जनमानसात आहे.
तिथे दिसायला देखण्या, भरघोस मिशा असलेल्या शनिच्या मूर्तीवर तेलाची संतत धार आहे. तेल घालून झालं की त्याला प्रेमाने मिठी मारायची पद्धत आहे.
शनिदेव इथेच वास्तव्याला का आले ह्याचीही एक कथा आहे. दुराग्रही रावण सर्व ग्रहांना लंकेला घेऊन जातो आणि कैदेत टाकतो. सर्व ग्रहांनी त्याच्या इच्छेप्रमाणे वागावे आणि कुंडलीत त्याने सांगितल्या ठिकाणी बसावे ही त्याची आज्ञा. स्वतंत्र बुद्धिचा शनि ह्याला काय तयार होणार? तो ह्याला साफ नकार देतो. शिक्षा म्हणून रावण शनिला उलटं टांगून मोकळा होतो. जेव्हा हनुमान लंका जाळायला लागतात, तेव्हा इतर ग्रह पळून जाऊ शकतात; पण उलटं टांगून ठेवलेल्या शनिला पळून जाणं शक्य होत नाही. मला इथून सोडव आणि लंकेच्या बाहेर घेऊन जा अशी विनंती शनिदेव हनुमानाला करतात. हनुमानाकडे वेळ थोडा नी सोंगं फार! तो शनिदेवाला शेपटीतून सोडवतो नी जोरात लांबवर भिरकावून देतो. तो जिथे पडतो तिथे उल्का पडावी तसा खड्डा पडतो. तेच हे शनिचं जागृत ठिकाण. मुरैनातलं शनिचर मंदीर किंवा शनैश्वर मंदिर. त्यातला छोटासा तुकडा जिथे पडला ते आहे शिर्डीजवळचं शनिशिंगणापूर.
मुद्दाम वाकडी वाट करून नव्हे, पण मध्य प्रदेशातली मीटावली, ही ऐतिहासिक इमारत बघायला जाताना, वाटेत आपल्याला हे मंदिर लागतं.
मिटावलीच्या आराखड्यावरून आपल्या जुन्या संसदभवनाचा आराखडा घेतला गेलाय, हा शोधही आपल्याला लागतो. तिथे वाटेत थोडं थांबून शनिदेवांची भेट घ्यायला काहीच हरकत नाही. जत्रेखेरीज तसा तिथे शुकशुकाटच असतो.
ओम शनिदेवाय विदमहे,
छायादेवाय धीमहि
तन्नो शनी: प्रचोदयात
नेहा भदे
-x-x-x-x-x-x-x-

जय शनैश्चर. ग्वाल्हेरपासून किती दूर आहेत ही ठिकाणे? सध्या आकाशात शनी महाराज दिसत आहेत तेव्हाच हा माहितीपूर्ण लेख आला हे छान झाले!