सनविवि ललित,साहित्योन्मेष माणूस म्हणूनि जगेन मी

माणूस म्हणूनि जगेन मी

 –डॉ. सौ.अनुराधा भागवत–

                                                                                                            

  नुकतंच ऐकलं, एक ख्यातनाम सर्जन लता मंगेशकर यांना श्रध्दांजली देतांना म्हणाले,” आज लता मंगेशकर नहीं है,लेकिन उसकी वो चीज जिसने उसे लता मंगेशकर बनाया वो हमेशा रहेगी,वो अमर है। “काय आहे ती गोष्ट? हे सर्जन पुढे म्हणतात, ” माणूस व जनावरांच्यात हा फार मोठा फरक आहे. जनावरांच्या जवळ फक्त जिस्म, Physicalityहोती है,लेकिन इन्सानके पास Intellect, Emotions, व Spirituality होती है। “बुद्धी, भावना व आत्मिक शक्ति, मनुष्याला जनावरांपासून वेगळे करणाऱ्या या तीन मिति आपल्या आयुष्याचा भाग आहेत. या तिन्हीची एकत्रित अभिव्यक्ति हीच ती गोष्ट आहे जी माणसाला अमर बनवते, जनावरांपासून वेगळे करते. त्यांचे हे विचार मनाला स्पर्शून गेले. वरवर नविन वाटणाऱ्या या विचारांनी मला आठवण करून दिली शाळेत शिकलेल्या एका श्लोकाची,

                                                         साहित्य, संगीत, कला विहीनः।

                                                           साक्षात् पशुः पुच्छ विषाण हीनः।

  अर्थात् साहित्य, संगीत किंवा कुठचीही एखादी कला ज्याच्या जवळ नाही तो मनुष्य कसला?शिंग व शेपूट नसलेला पशूच आहे. यातील एक तरी गोष्ट प्रत्येकाजवळ असलीच पाहिजे.पण खरंच प्रत्येक जण असा असतो?कलावंत असे किती असतात समाजात?बोटावर मोजण्या इतकेच.मग बाकी सगळे? ती काय माणसं नसतात?पशु असतात?लिहायला वाचायला यायला लागले की साहित्याशी सर्वांचा परिचय होतोच, अगदी वाङ् मयीन जाण नसली तरी वाचक म्हणून सहभाग असतोच ना?पुष्कळांना लिहता वाचता येत नाही, त्यांचे काय?एवढी जुनी सनातन संस्कृति आपली तेव्हा कुठे सर्वांना लिहता वाचता येत होते?स्त्रियांना व शूद्रांना तर अधिकारच नव्हता शिक्षणाचा, वेद,उपनिषदांतील ज्ञान जाणून घेण्याचा सुद्धा. हा श्लोक ही पुरातन काळापासून असणार आणि आपल्या ऋषींनी काय एवढ्या मोठ्या समाजवर्गाला पशु ठरवलं असेल?

   मनाला पटत नाही. वाटत माणसांना साहित्य, संगित, कला याबाबतीत जागरूक करण्यासाठी, त्यासाठी प्रेरित करण्यासाठी आपल्या आयुष्यातील त्यांचे स्थान, महत्त्व पटवण्यासाठी हा श्लोक लिहिला गेला असावा. आपल्या धर्माप्रमाणेच साहित्य, संगित कला आपल्या संस्कृतिचा भाग आहेत. या श्लोकात संगित व त्याच्या अंतर्भूत येणाऱ्या सर्व गोष्टींना बाकी कलांपासून वेगळे केले आहे.हस्तकला या सदरांत मोडणाऱ्या सर्व प्रकारच्या कलांसाठी ‘ कला ‘हा शब्द वापरला आहे. चौसष्ट कला आहेत आपल्याकडे. या कला म्हणजे हस्तलाघव,सौंदर्यदृष्टी, निसर्ग अथवा परिस्थितीमुळे मनावर उठणारे तरंग, विचारांची आवर्तने व सुप्त आत्मिक शक्तिची उत्कट अभिव्यक्ति. आणि ही अभिव्यक्ति आपण सतत जपली पाहिजे. आपल्यातील ही कला फुलवली पाहिजे, तिला न्याय दिला पाहिजे. या कला मनुष्याच्या कुशलतेची प्रतिभेची साक्ष आहे. हे नुसते मनरंजन किंवा स्वांतः सुखाय असले तरी त्यात नवनिर्मितीचा आनंद आहे, आपल्या स्रुजनशक्तिची ओळख आहे. या सर्व कला इहलोकातीलच असाव्यात, मानवीय आहेत.

                मी या कलांना ‘ मानवी ‘ म्हणते कारण संगित तर स्वर्गीय म्हणावे लागेल, ती निश्चित देवदत्त देणगीच आहे. गायन,वादन नर्तन हे सर्व स्वर्गात आहेच. आपल्या देवादिकांच्या मनरंजनाचाच नव्हे तर आराधनेचा,साधनेचा तो एक भाग आहे. गायन,वादन,नर्तन आदि कलांमध्ये यक्ष,गंधर्व, अप्सरा निपुण होते. नारद,तुंबराचे गायन,व अप्सरांचे नाच हे इंद्रसभेचे वैभव आहे. शारदेच्या हातांतील वीणा, शंकराचे डमरू हेच दर्शवतं की संगित ‘ स्वर्गीय ‘आहे–श्रीकृष्णाची बांसरी हा अपवाद म्हणावा लागेल. संगित देवाचा प्रसाद आहे, त्याच्या क्रुपेचा वर्षाव आहे, म्हणून कदाचित या श्लोकात संगिताला इतर कलांपेक्षा वेगळे स्थान दिले आहे. तशीच कांहीशी गोष्ट साहित्याची. साहित्य म्हणजे कथा, कविता, कादंबरी वगैरेंची निर्मिती. आपल्या विचारांना, भावनांना शब्दरूपाने व्यक्त करणे, वाचकांना, समाजाला रूचेल,पटेल अशा रंजक स्वरूपात मांडणे म्हणजे साहित्य. आमच्या साहित्याचा जन्म देवतातुल्य ऋषिमुनींच्या प्रतिभेतून,प्रासादिक वाणीतून झाला. आमच्या ऋषींनी शापवाणी उच्चारली,

                            मा निषाद प्रतिष्ठाम् त्वमगमः शाश्वती समः।

                            यत्क्रौंचमिथुनात् एकमवधीः काममोहितुम्।।     आणि एका अजरामर महाकाव्याचा जन्म झाला. फार पूर्वीपासून आपल्याकडे सर्व ज्ञान भांडार श्लोकबध्द स्वरुपात पिढ्यानपिढ्या जतन करुन ठेवले आहे. केवढा संपन्न वाङ्मयीन ठेवा आहे हा. संस्कृत भाषेतील हा ठेवा जनसामान्यांसाठी मराठीत आणण्याच फार मोठे कार्य आमच्या संतांनी केले. संतवाङमय मराठीसाहित्याचे वैभव आहे. आमचे संत तरी कोण होते… कुणी घटाघटाला वेगळा आकार, सौंदर्य देणारे कुंभार होते, फुलांच्या बागा फुलवून निसर्गाचे सौंदर्य खुलवणारे सावतामाळी होते, शिंपी होते. आयुष्यात व्यवसाय रूपाने भेटलेल्या या कला जोपासत फुलवत त्यांनी आपले अनुभव अभंग, ओव्यातून गुंफले आणि ही परंपरा अव्याहत चालू आहे.

      ‘ दळिता,कांडिता,तुज गाईन अनंता।। ‘         म्हणत भक्तिमार्गावर चालणारी जनाबाई असो,

                 ‘ धनरषांच्या चिऱ्यांनी तळहात रे फाटला।

                   देवा, तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला। ‘    म्हणणारी कर्ममार्गावरील बहिणाबाई असो,किंवा ‘ साहित्यलक्ष्मी ‘म्हणून गौरवलेली ‘ स्म्रुतिचत्रे ‘सारख्या गद्य लेखनाची लेखिका असो.लहानमोठ्या लोककलांमधून उदरनिर्वाह करणाऱ्या कलाकारांनी संगिताचे बोट धरून साहित्यात मोलाची भर घातली आहे. तिन्ही गोष्टींचा उत्तम मिलाफ इथे दिसतो.

                   साहित्य, संगित, कला आपल्या धर्माइतकाच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आळंदीच्या साहित्य संमेलनाचे उद् घाटन स्व.लता मंगेशकर यांनी केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या,

‘ साहित्य, संगित, कला ही शिवाच्या हातातील त्रिशुळाची तीन अग्रे आहेत, ही जीवनभाष्याची तीन धारदार माध्यमे आहेत आणि यांत कुणीही

दुसऱ्याला आकसाने अनादराने पाहू नये.’      ही तिन्ही माध्यमे अर्थातच तुल्यबल आहेत. आपल्या भोवतालचा निसर्ग हातर एक महान कलाकार आहेच. फुलापानांचं सौंदर्य, त्यांची विविध प्रकारची नक्षी, रंगसंगति हा निसर्गाचाच कलाविष्कार आहे. फुलं घराच्या सजावटीतही भर घालतात. जपानी ‘इकेबाना ‘मुळेतर विविध पुष्परचनांना एका श्रेष्ठ कलेचा दर्जा मिळाला आहे. अंगणात, देवापुढे काढलेल्या रांगोळ्यातून,कपड्यांवरील कशिद्यातून,विणकामातून,चित्रकलेतून अगदी पाककृतीतील पदार्थातूनही सरळ आणि वक्ररेषांतील हस्तलाघव प्रगट होते.

                      सध्याचे युग विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे युग आहे, भौतिक सुखसुविधांची रेलचेल आहे. बाजारात विकत मिळणाऱ्या गोष्टींनी सर्वजण घर भरत आहेत,सजवत आहेत.घरी बनवलेल्या वस्तुंनी घर सजवण्यात आता कमीपणा वाटतो, मागासलेपणा वाटतो या हस्तकौशल्याकडे हेय द्रुष्टीने बघितलं जाते. विकतच्या चमकदार वस्तु ही आज प्रतिष्ठेची बाब ठरते आहे. आपल्या आयुष्यात जिथे कलाविष्काराला जागा असेल तिथे डोळसपणे पाहता आले पाहिजे, या जागा शोधल्या पाहिजेत. यातील नवनिर्मितीच्या समाधानासाठी, छोट्या छोट्या आनंदासाठी वेळ दिला पाहिजे. दैनंदिन व्यवहारातून आपल्या भेटीला येणाऱ्या या कलांना आपण जोपासलं पाहिजे, त्यांना न्याय दिला पाहिजे, कारण हेच आपल्याला पशुंपासून वेगळी ओळख देतं,मनुष्य बनवतं,याचं भान सतत ठेवले पाहिजे. यासाठी आजच्या तांत्रिक युगात प्रत्येकाला लढावं लागेल. स्वतःशीच लढावं लागेल. ‘ माणूस ‘म्हणून जगण्यासाठी,’ माणूस’कीचा हक्क हवा असेल तर स्वतःशीच पदोपदी लढावं लागेल ,मनाशी निर्धार करावा लागेल

                            ‘ माणूसकीचा हक्क मिळाया,

                                                                 माणूस म्हणूनि लढेन मी।

                                          माणूस म्हणूनि जन्मा आलो,

                                                                       माणूस म्हणूनि जगेन मी। ‘ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *