–उज्वला तायडे–
एक पत्र निसर्गाला…..
प्रिय निसर्गा,स.न. वि. वि.
कसा आहेस?काय झालं रागावलास ना आमच्यावर, तुझा पारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. आम्हीच आहोत रे तुझ्या तापमानात वाढ होण्यास कारणीभूत.हल्ली पत्र संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर असतांना तुला आज पत्र बघून आश्चर्य सुद्धा वाटेल. आजकाल आयुष्यभराच्या आठवणी सुध्दा एका सेकंदात बोटाने डिलीट होतात. म्हंटलं तुझी नि आमची साथ तर जन्मोजन्मी ची आहे.तुझ्याविषयी कधी कृतज्ञता व्यक्त केलीच नव्हती.खूप मोठी संधी मिळाली आहे तुझे ऋण पत्रातूनच व्यक्त करण्याची .बा निसर्गा ,तू आम्हाला ज्ञान देत अज्ञानाच्या अंधारातुन ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणतो . आमच्या सभोवताली असलेला सूर्य ,चंद्र, नदी ,झाडे ,पशू-पक्षी ,समुद्र ही सर्व सृष्टी म्हणजे निसर्गा तू. जसे झाड आम्हाला सावली ,फळे, फुले देते . किलबिलणारे पक्षी आम्हाला आनंदी करून टाकतात .
आम्ही तुझ्या सान्निध्यात,निसर्गरम्य ठिकाणी उत्साही होतो. तू माणसाचे मन मोहून टाकणारे एक साधन आहेस. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तुझ्या सारखा, सखा मिळाला आहे. तू आम्हाला हवा ,पाणी, अन्नधान्य सर्व काही देतो ,गरजा पुरवतो.
बदल्यात मात्र कोणतीच मागणी करत नाहीस . तू खूप मोठा दिलदार आहेस . जवळ असलेले सर्व काही तू माणसांसाठी उधळून देतो. पूर्वीच्या साधुसंतांनी आपले संपूर्ण जीवनच तुझ्या सानिध्यात घालवले . संत तुकाराम महाराजांनी निसर्गाला म्हणजे तुला वृक्षवल्ली सगेसोयरे म्हटले आहे. तुझ्यातील घटक आम्हाला कृतज्ञ बनवतात.
झाडांच्या कत्तली करून आम्ही दुष्काळाच्या नावाने बोंबा ठोकू लागलो. पावसाने पाठ फिरवली तेव्हा आम्ही जमिनीचे पोट सुद्धा फाडले तिच्या गर्भात यंत्र लावून अमाप पाणी शोषून घेतले,तिच्या सर्वांगाची चाळनी करून भूजल पातळी कमी करण्याचे पातकही आम्हीच केले. शेती करताना अधिकच्या उत्पन्नासाठी विषारी किटकनाशके, संकरीत बियाणे, रासायनिक खते यांचा अवाजवी अविचारी वापर केला अन मातीची उत्पादन क्षमता, सुपीकता कमी केली.
फुलांकडडून आनंद देणे,नदीकडून शांत रहाने शिकतो. पक्षीआम्हाला संकटावर मात कशी करायची शिकवतात.आम्ही सर्वांनी तुझ्या सुंदर रुपाला जपण्याचा निश्चय केला पाहिजे.
पहिल्या पावसाची वाट शेतकरी मोठ्या आतुरतेने पाहत असतो चातकप्रमाणे.
. पावसामुळे पर्यावरणाच्या सौंदर्यात भर पडते. माती पोषित होते आणि झाडांना नवीन जीवन मिळते. आकाशात रंगीबेरंगी इंद्रधनुष्य तयार होते ही पृथ्वीवरील सर्वात सुंदर घटनांपैकी एक आहे. मोर पावसाळ्यात आपले पंख पसरवतात आणि पाण्याच्या थेंबाच्या तालावर नाचतात. सूर्य ढगांच्या मागे लपतो.श्रावणाचा आनंद घेता येतो.
पावसाळ्यात धबधबे ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे.
वसंत, ग्रीष्म , वर्षा , शरद , हेमंत आणि शिशिर ऋतू असतात. सहा ऋतूचे सहा सोहळे.
जेव्हा पृथ्वीवर पाऊस पडतो तेव्हा निसर्गाचा कायापालट होतो. पावसामुळे पृथ्वीवरील तापमान संतुलित होते. हे हवामान खूप आनंददायी आणि थंड करते. पावसाळ्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात आणखी भर पडते, हिरव्यागार वृक्षांनी सजावट केली असते.
अंगणी बरसला घननीळा सावळा हिरव्या ऋतूचा थेंब कोवळा निसर्ग भासे जणू स्वर्गापरी उन्हात न्हाऊन येती श्रावणसरी”
आम्हाला सर्वच ऋतू आवडतात .प्रत्येक ऋतूंचे सौंदर्य वेगळे . निसर्गा किती रे तुझी ही किमया आणि जादूगरी.
वसंतातील कोवळ्या पालवीची ती सळसळ, वातावरण खूप प्रसन्न असते आणि दिवसभर मस्त वारा वाहत असतो.वसंत ऋतु तर ऋतुराज आमचा.
रानात, बागां मधे फुले येऊ लागतात आणि आपल्या वातावरणात आपला सुगंध पसरवतात.
या ऋतूमध्ये वातावरण इतके प्रसन्न असते आणि आम्हाला फळांचा राजा आंब्या सारखे स्वादिष्ट फळ खायला मिळतात.
माणूस आणि प्राणी यांच्यात काही नातं असतं . मायेचे प्रेम दिल्याने प्रेम वाढतं हे माणसाने सिद्ध केले आहे. आमचे खूप सण प्राणी आणि वनस्पती वर अवलंबून आहेत . या परंपरेतून माणूस निसर्गाच्या जवळ जातो आणि निसर्गाचे आपण एक घटक आहोत ही जाणीव ठेवतो .
या भुतालावर माणूस एकटे जीवन जगू शकत नाही त्याला सहकारी आवश्यक असतो . आपल्या मनातील बोलणे ऐकणारा आपला सखा शोधात असतो मग कधी माणसाच्या वेगवेगळ्या नात्यामधून तर कधी प्राणी आपलेसे करून तो शोध घेतो. माणसाच्या आतल्या माणसाला हे जग खूप आवडते .
आणि त्यासाठीच तू पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात जैवविविधता निर्माण केलीस ,खूप उपकार आहेत निसर्गा तुझे आमच्यावर.
जेव्हा माणूस माणसापासून दूर जातो , तेव्हा माणसाला निसर्ग जवळ करतो. झाडे ,प्राणी त्याच्यावर प्रेम करतात आणि माणसाचा एकांतवास संपवतात त्याला जगण्याची नवी उमेद देतात. आपण या जगात आलो तेव्हापासून आपले सारे रक्षण हा निसर्ग करत असतो.
आम्ही नैसर्गिक गोष्टी नष्ट करून कृत्रिम आकर्षणे तयार केली, पर्यावरणाशी छेडछाड करत निसर्गालाच डिवचू लागलो. नद्या दूषित केल्या, डोंगर विकले, पहाड खोदले, समुद्र प्लॅस्टिकने भरले, वृक्षतोंड करून गगनचुंबी इमारती बनवण्यात मश्गुल झालो.
त्याचेच परिणाम म्हणजे गेल्या दोन वर्षात छोट्याश्या विषाणू मुळे आम्हाला फुकट मिळणारा ऑक्सिजन विकत घ्यावा लागला.एवढं करुनही तू आमच्यावर आनंदाचा वर्षाव करतोस, तुझे मानावे तितके आभार कमीच आहेत. तुझ्या विविध घटकावर नदी, ओढे, धबधबे,पाऊस, झाडे, फुलं, पान, पक्षी, प्राणी, फुलपाखरे अश्या कित्तीतरी घटकांवर कविता, गाणी, लेख लिहितो आम्ही.
जिथे आम्हा मनुष्य प्राण्यांच्या जीवाची उन्हामुळे लाही लाही होते, तिथे पळस, गुलमोहर, बहावा सारखे आणि इतरही रानफुले सौन्दर्याची उधळण करत असतात.
आम्हाला मान्य आहे आमच्या स्वार्थासाठी आम्ही तुझ्यातील साधनसंपत्ती ओरबाडून टाकली. आता आमचे डोळे उघडले आणि आम्ही ती जतन करण्याचा प्रयत्न करतोय हल्ली.
मोठया मनाचा तू, आम्हाला माफ कर.म्हणतात ना एका दिव्याने हजारो दिवे उजाळू शकतात. आम्हाला सुद्धा एक संधी दे, नक्कीच कोटी वृक्ष लावून तुझ्या संवर्धनात हातभार लावू.
तुझीच पर्यावरण स्नेही
उज्वला तायडे, अकोट
खूप छान निसर्गाला पत्रलेखन
निसर्गाशी मैत्री प्रत्येक व्यक्तीने जपायला हवी हे पत्रातून छान मांडले.