यशोगाथा

दांडेलीचे दिवस

दांडेली हे कारवार जिल्ह्यातील एक निसर्गरम्य गाव!  हे गाव इथला कागद कारखाना आणि काळी नदी वरती सुपा या गावी बांधलेल्या बांधाऱ्याकरता प्रसिद्ध आहे. दांडेली चहुबाजूनी दाट जंगलांनी वेढला गेला आहे.

या कारभार जिल्ह्यात जंगलात अनेक वनवासी लोकांचे पाडे आहेत. ह्या जंगलात धनगर,गवळी, कुणबी, सिद्दी,हालकी गौडा आणि कुमरी मरठी हे लोक आढळतात. हे लोक खूप मागासलेले आहेत आणि नागरी समाजापासून लांब राहिलेले आहेत. त्यामुळे आता सरकार व अनेक संघटना या लोकांना मुख्य समाजात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी एक संघटना आहे,’वनवासी कल्याण कर्नाटक’. ही संघटना कर्नाटकातील मुलांच्या शिक्षणाकरता कारवार, मंगळूर व मैसूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी वसतिगृहे चालवत आहे.

सुमारे 30 वर्षांपूर्वी दांडेली येथे मुलींचे वसतिगृह सुरू झाले. मी २०१४ च्या जुलैमध्ये इथे मुलींचा अभ्यास घेण्याकरता रुजू झाले व २०२५ मार्च पर्यंत तिथे राहिले. मी दांडेलीला गेले तेव्हा श्रीमती विजया तिथल्या व्यवस्थापिका होत्या, जाताना आपण ह्या सर्वस्वी वेगळ्या वातावरणात कशा राहू…मुली आपल्याला स्वीकारतील का… विजयाशी माझं जमेल का अशा अनेक शंका कुशंका मनात होत्या. श्रीपादजी (तेव्हाचे वनवासी कल्याणचे अध्यक्ष) यांनी मला तुम्ही केव्हाही आपल्या घरी जाऊ शकता, केव्हाही हे काम सोडूनही जाऊ शकता असं सांगितल्यामुळे मी निर्धास्त झाले व हा प्रयोग करून बघायला तयार झाले.

आता मागे वळून बघताना जाणवतं की पहिला महिना खूपच कठीण गेला. मी आठवी व नववीच्या मुलींना शिकवायचं ठरवलं, वेळही ठरली पण मुली वेळेवर यायच्या नाहीत,आल्या तरी थोड्या वेळात काहीतरी काम काढून निघून जात किंवा बसल्या तरी माझ्याकडे पेन नाही, कंपास नाही, पुस्तक शाळेतच राहिलं वगैरे सांगत. हा एक प्रकारचा असहकारच चालू होता. यात विजयाने लक्ष घालायची गरज होती पण ती कळून न कळल्यासारखी वागत होती. तिला पण कोणा एका जास्त शिकलेल्या शहरी बाईला आपल्या डोक्यावर आणून बसवले असं वाटत असावं.

मी खूपच धीराने परिस्थिती हाताळली. कोणी संस्थेचे मोठे लोक आले, तरी कुणापुढे काही तक्रार केली नाही. हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. विजयाला माझ्या स्वभावाचा अंदाज आला असावा. मुलींनाही माझ्या शिकवण्याचा अंदाज आला असावा. मुलींचं आणि विजयाचं वागणं बदलत गेलं. माझे आणि विजयाचे संबंध खूपच प्रेमाचे आणि मैत्रीचे राहिले (अजूनही आहेत).  नंतर ११ वर्षात सुनिता, सरस्वती, गीता धारवाडकर, ज्योती वगैरे व्यवस्थापिकांशी खूपच छान संबंध राहिले. मी एक पथ्य पाळलं, माझं लक्ष शिकवण्यापुरतच मर्यादित ठेवलं. त्यांच्या कामात लुडबुड केली नाही. त्यांनी विचारल्याशिवाय सल्ले ही दिले नाहीत.

हॉस्टेलमध्ये अभ्यासाच्या हॉलमध्ये दोन कुलूपं लावलेली काचेची कपाटं होती. त्यात पुस्तक होती. मी एकदा विजयाजवळ या कपाटांचा विषय काढला. त्यांनी किल्ल्या शोधून कपाटं उघडली. कपाटात मला पुस्तकांचा खजिनाच सापडला.

कपाटात कुवेंपू,शिवराम कारंथ, चंद्रशेखर कंबार अशा अनेक लेखकांची मुलांची पुस्तके होती. त्यात श्यामची आई (कन्नड) पण होतं. मी मग रोज रात्री जेवणानंतर गोष्टी सांगायला, पुस्तक वाचून दाखवायला सुरुवात केली. मुलींना पण पुस्तक वाचायला उद्युक्त केलं.

हळूहळू मला मुलींच्या, त्यांच्या पालकांच्या आणि त्या समाजाच्या समस्या समजू लागल्या. मुलींना मी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवू शकले. मुली तिथल्या एका aided शाळेमध्ये शिकत होत्या.  मुलींचा निकाल चांगला नसायचा. शाळेच्या मॅनेजिंग कमिटीने तुमच्या मुली आमच्या शाळेत नकोत असं म्हणायला सुरुवात केली होती. मी गेल्यावर मुलींचे निकाल सुधारले. शेवटची पाच वर्ष तर आमच्याच मुली ९०% पेक्षा जास्त मार्क घेऊन शाळेत पहिल्या येत असत.

दांडेलीच्या वास्तव्यात आमच्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांशी जवळून संबंध आले. श्री. प्रकाश कामत यांनी सुरतकल रीजनल इंजीनियरिंग कॉलेज मधून गोल्ड मेडल मिळवलेले होते. इंजीनियरिंग झाल्यावर ते आरएसएस मध्ये गेले. १९८७ मध्ये त्यांनी वनवासी कल्याण कर्नाटक ही संस्था स्थापन केली. त्यांचा श्री. अशोक साठे यांच्याशी चांगला परिचय होता. श्री.अशोक दादा व पद्मा मावशी यांनी वनवासी संस्थेला मोठ्या प्रमाणात मदत केली. 

श्री. प्रकाश कामत हे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा देहांत झाला. वनवासी कार्यकर्ते कृष्णमूर्ती, श्रीपादजी, श्रीनिवासजी, श्री. शांताराम सिद्दी,रवींद्र हेगडे असे अनेक लोक व दांडेलीच्या हॉस्टेलची सुरुवात करणाऱ्या कौशल्या माताजी, सुमंगला माताजी, वेदावती हेगडे, विजया, गौरी भट अशा अनेक कार्यकर्त्यांशी जवळून संबंध आला.

त्यांची निष्ठा,श्रम आणि त्याग यांना तोड नाही.

माझ्या दांडेलीच्या वास्तव्यात अशा लोकांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. मुलींचं निर्व्याज प्रेम, त्यांच्या जडणघडणीत हातभार लावायची संधी व खूप समाधान मिळालं याकरता मी अत्यंत कृतज्ञ आहे.

—- नीता जोशी —-

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *