प्रवास एक गंमत.

— वैशाली प्रसन्न सुळे —

आमच्या दोघांच्याही कुंडलीतला प्रवास योगाचा ग्रह अगदी उच्च स्थानी असावा.त्यामुळे भरपूर प्रवास घडला-घडतोय.त्यातले बरेचसे सहज ,सरळ म्हणून स्वाभाविकपणे विस्मरणात गेलेले.काही मात्र वैशिष्ट्य पुर्ण;म्हणुनच अविस्मरणीय!असाच एक प्रवास -अंदमान बेटांचा पार वरचं टोक असलेल्या डिगलीपुरला ,पोर्ट ब्लेअर हुन केलेला.त्याचीच ही हकीकत.

मार्च २०१६.अंदमानात येऊन वर्ष झालेलं.वर्षभरात जवळपास सगळी पर्यटनस्थळं बघुन झालेली.डिगलीपूर फक्त तेवढं उरलेलं.पोर्ट ब्लेअर-डिगलीपुर प्रवासाबद्दल खुप ऐकलेलं.घनदाट जंगल ,दुर्मिळ प्रजातींच्या आदिवासी जरावांची वस्ती, दोनदा गाडी बोटीमध्ये चढवून समुद्रातून प्रवास अशी वर्णनं ऐकल्याने ती अनुभवायची उत्सुकता खुपच होती. अनायासे शनिवार-रविवार, होळी अशी जोडून सुट्टी आलेली. प्रसन्न (यजमानांच्या) ऑफिसच्या सहकाऱ्यांनी दिग्लीपुर सहलीचा बेत आखला .सहलीच्या दिवशी भल्या पहाटे उठून भराभर आवरले .सकाळी सहाला निघायचं होतं. तीन गाड्या मिळून आमचा प्रवास सुरू झाला .अंदमान म्हणजे रस्त्यांच्या चकल्या. त्यातून दाट धुकं. यामुळे हळूहळू गाडी चालवत सगळे एका ठिकाणी जमलो. इथे का थांबलो आहोत म्हणून चौकशी केली तर कळले की इथून पुढे घनदाट जंगल सुरू होतं .म्हणजे एका दुर्मिळ प्रजातींच्या जरावा आदिवासींची वस्ती सुरू होते त्यामुळे इथून पुढे हे जंगल संपेस्तोवर मुक्त वाहतूक नाही. किमान शंभर गाड्यांचा ताफा एकत्र एकदम सोडतात. तेही दिवसातून फक्त ठराविक वेळेसच. ती वेळ साधली तर वेळ वाचणार नाही तर बसा वाट बघत! आम्ही पोहोचलो तेव्हा वाहतूक सुरू व्हायला तासभर अवकाश होता .सगळ्यांची ओळख करून घेणे, नाश्ता, गप्पा ,फोटो यामध्ये तो भूरकन उडून गेला. फाटक उघडल्या गेलं. समोरच मोठा फलक होता .त्यावर खूप सूचना लिहिलेल्या होत्या. वाटेत थांबू नका, फोटो काढू नका, गाडीच्या काचा खाली करू नका, अगदी गाडी बिघडली तरी सुद्धा दार उघडू नका, जरावांच्या जवळ जाऊ नका इत्यादी इत्यादी अनेक. अर्थात पुढे असेच फलक अगदी पावलापावलावर लावलेले होते. त्यामुळे जरा धास्तीच वाटत होती. समोर, मागे ,मध्ये मध्ये पोलिसांच्या गाड्या .बाजूने बाईकस्वार ,हेल्मेट घातलेले पोलीस असा आमचा ताफा निघाला. इतके सूचनाफलक ,ते पोलिस बघून केव्हा एकदा हे जंगल संपतं एकदाच, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आलो या सहलीला ,असे अनेक विचार माझ्या मनात डोकावू लागले .बाकीची मंडळी गप्पा करत होती. आजूबाजूचं जंगल बघत होती. मला मात्र आपली गाडी बंद पडली तर ?जरावा नरभक्षक तर नसतील ना ?नाही तर इतकी खबरदारी घेण्याचे कारण काय? इत्यादी नाना कुशंका सतावत होत्या. त्या तास-दीड तासाच्या जंगल प्रवासात मी दोन वर्षांच्या राघवला मांडीवर एका हातानं आणि तिसरीतल्या गौरीला दुसऱ्या हातानं घट्ट धरून बसले होते. खरोखर निबिड म्हणतात तसंच जंगल होतं .अवाढव्य बुंध्यांचे महावृक्ष ,त्याला लपेटलेल्या लांबरुंद वेली .काही वृक्ष इतके उंच आहेत की त्यांचा शेंडा पार झोपून बघितला तरी दिसणार नाही. दोन्ही बाजूंना नजर ताणून ताणून कुठे जरावा दिसताहेत का ते बघत होतो .नंतर कळलं की सुरुवातीच्या फक्त एक-दोन गाडयातल्या लोकांना ते दिसता.त नंतर त्यांना कळतं की वाहतूक सुरू झालीय मग ते दडी मारतात. आमची गाडी बरीच मागे होती. त्यामुळे जरावा दिसण्याची शक्यता मावळली. शेवटी एकदाचं जंगल संपलं. मध्ये दोनदा गाडी बोटीवर चढवून समुद्र प्रवास झाला .अगदी चिंचोळा, अरुंद रस्ता, वळणं वळणं, आजुबाजुला दाट झाडी, विरळ वस्ती असा एकूण पुढचा प्रवास होता .सुमारे बारा तासांनी तीनशे किलोमीटरचा प्रवास करून आम्ही दिग्लीपुरला पोहोचलो. हा खरंतर राष्ट्रीय महामार्ग आहे. पण फक्त नावालाच. एकमार्गी वाहतूक सुद्धा अवघडच आहे. सगळे दमल्याने निजानीज झाली .दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळ्यांमध्ये उत्साह संचारला कारण आज आम्ही रौस आणि स्मिथ या जुळ्या बेटांना भेट देणार होतो. हिरवेकंच रौसआणि स्मिथ समोरासमोर. जणू मोठाले पाचू! सभोवताल निळेशार चकचकीत स्वच्छ पाणी .ओहोटीच्या वेळी दिसणारा रौस आणि स्मिथला जोडणारा पांढऱ्याशुभ्र वाळूचा पुल .आणि वर छान निळं पांढरं पुंजक्यांचं आकाश. स्वर्ग याहून सुंदर असेल ?नक्कीच नाही!! निसर्गसौंदर्याचा भरभरून आनंद घेऊन आम्ही परतलो.  संध्याकाळी आशिया खंडातला एकमेव चिखलाचा जिवंत ज्वालामुखी बघितला .ओल्या सिमेंट सारखा गोलाकार ,त्यातून सारखे बुडबुडे निघत असतात .

दुसऱ्या दिवशी आणखी एक चित्तथरारक प्रवास केला .बारातांग बेटावरच्या चुनखडीच्या गुहा बघायला जातानाचा, दाट जंगलातून !मुळात बेट हे एक जंगल .त्यातलं समुद्रातलं जंगल !आजूबाजूला निळा, हिरवा समुद्र वर आकाश आणि दाट हिरवीकंच मेनग्रुव्हची झाडे. त्यातून फक्त बोटीतले आम्ही . बाकी नागरी जीवनाचा लवलेशही नाही .निसर्गाचा चमत्कार असणाऱ्या त्या गुहा बघितल्या. इतक्या आत मध्ये ही,बेटातल्या बेटात चाळीस पन्नास माणसं झोपड्या बांधून ,भाजी, फळं तिथेच पिकवून रहात होती .दुपारी 4 नंतर त्यांचा जगाशी संपर्क तुटतो, कारण पर्यटकांच्या बोटी यायच्या बंद होतात. त्यांचे जीवन बघून मनोमन देवाचे आभार मानले” देवा खरचं खूप दिलंस आम्हाला!” आज होळी होती. परतीच्या प्रवासात पांढरा ,पिवळसर ,पूर्ण गोलाकार, मोठा चंद्र आणि नारळाच्या झाडांच्या सावल्या खळाळत्या समुद्रा सोबत आमची साथ करत होते .रात्री मुक्काम करून उरलेला अर्धा प्रवास उद्या करायचं ठरलं .आज राघव चा दुसरा वाढदिवस! खरं तर रात्री पार्टी देऊन सगळ्यांना सरप्राइज द्यायचं आमचं ठरलं होतं .पण गौरीने सकाळीच गुपित फोडलं .मग सगळी मंडळी धावपळ करुन केक घेऊन आली. रंगात या तुरळक वस्ती असलेल्या गावात एका हॉटेलमध्ये आम्ही सगळे आणि त्या हॉटेलचा स्टाफ असा राघवचा आगळावेगळा वाढदिवस साजरा झाला .इथे इतक्या दूर एक मराठी बोलणारा वेटर भेटला. तो काही वर्ष पुण्याला राहून आलेला .इतक्या दूर माय मराठी कानावर पडली. खूप आनंद झाला!दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही निघालो .जंगलाची हद्द सुरू झाली. आता मात्र आमची गाडी अगदी पहिलीच .त्यामुळे जरावांचं अख्खं कुटुंब समोर दिसलं .शिसवी,काळेकभिन्न .कमरेला लाल धाग्यांचं झिरमिळ्यांचे वस्त्र. हातात तीरकमठा. त्यांचे भाले म्हणे फार विषारी असतात .अनिमिष नेत्रांनी त्यांना बघितलं. गाडी थांबवायची नव्हतीच .स्पीड सुद्धा कमी करायचा नव्हता. धावत्या गाडीतून, बंद काचेतून जे दिसले तेवढेच. पुढे इकडचे प्रसिद्ध छोटे हत्ती पण दिसले. लाकडाची वाहतूक करताना. संध्याकाळी पोर्ट ब्लेअरला सुखरूप परतलो. निसर्गसौंदर्याची, आनंदाची भरपूर शिदोरी घेऊन! खरंतर आठ दिवसांनी मी आणि मुलं आमच्या आवडत्या ,सुरक्षित ,सर्व सुविधायुक्त अशा गांधीनगरला, गुजरातला परतणार होतो. पण डिगलीपुरचा प्रवास करून आल्यानंतर, पोर्टब्लेअर ,वर्षभरात पहिल्यांदाच, मला सुरक्षित वाटलं. पोर्ट ब्लेअरला असताना तिथली वैशिष्ट्य असणाऱ्या वस्तूंच्या सरकारी दुकानात, सागरिकामध्ये आम्ही बरेचदा जायचो. तिथे चकाकत्या शिंपल्यांच्या तुकड्यां पासून काळया पार्श्वभूमीवर बनवलेला अंदमान निकोबार बेटांचा एक नकाशा प्रसन्न ला फार आवडायचा. परत येताना तिथली आठवण आणि प्रसन्नसाठी भेट म्हणून मी आणि गौरी तती नकाशाची फ्रेम  सागरीकातून घेऊन आलो. आता दिग्लीपुर सहलीच्या आठवणी निघाल्या किंवा लॅपटॉपवर कधी फोटो बघत असलो की तेव्हा केवळ दोन वर्षांचाच असलेला राघव पटकन त्या नकाशाच्या फ्रेम जवळ जाऊन दिग्लीपुर जवळ बोट ठेवून म्हणतो,” मला पण इथे जायचंय, कारण तुम्ही गप्पा करताय ते मला काही आठवतच नाही!” यावर आम्ही तिघं खळखळून हसतो. अर्थात आम्हाला पण खरंच जायचंय, अगदी मनापासून तिथे पुन्हा एकदा !तुम्ही येताय??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *