—-प्रतिभा बिलगी —
पन्नाशी नंतरचे आयुष्य कसे असते म्हणजे मध्यान्हीचा सूर्य मावळतीकडे जायला लागल्यावर जश्या सावल्या लांब जाऊ लागतात तसे ! तरुणाईत ज्या कामाची सुरुवात केली त्याला पूर्णविराम देऊन आयुष्याच्या पूर्णविरामाकडे वाटचाल सुरू करण्याच्या अगोदरचा टप्पा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही!
पन्नाशी नंतरची सर्वात फलदायी गोष्ट म्हणजे आपल्या अंगात जी कला आहे, ती विकसित करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. इतकी वर्षे कामामुळे ज्या गोष्टी साध्य झाल्या नाही, अश्या अनेक आवडत्या गोष्टी करण्यसाठी मन तयारी करते. कामाचे व्याप थोडे कमी झाल्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देता येते. आहार, नियमित व्यायाम, चालणे, फिरायला जाणे इ. गोष्टी ज्या मन आनंदी राहण्यास उपयुक्त ठरतात, त्यांना आयुष्यात प्राधान्यता दिली जाते. कामाचा ताण म्हणावा तेवढा रहात नाही. एकमेकांची विचारपूस करून नातेसंबंध अजून घट्ट करून जवळीक निर्माण करता येते. आध्यात्माची आवड असल्यास देवाचे नामस्मरण, पूजापाठ सारख्या गोष्टी करता येतात कारण मनुष्य जीवनात मनःशांती सगळ्यात आवश्यक बाब आहे. आपल्या सोयीनुसार पर्यटन करता येते. अशा अनेक छोट्या -मोठ्या गोष्टी पन्नाशी नंतरही आनंदी व सुखी जीवन अनुभवण्यासाठी फलदायी ठरतात.
पन्नाशीत पाउल ठेवताना असे वाटते कि आपल्या हातात अजून दहा सक्रिय वर्षे आहेत. या कालावधीत आपल्याला कितीतरी गोष्टी करता येतात. उदाहरणार्थ आवडीचे शिक्षण, छंद, भटकंती आणि असे बरेच काही जे संसाराच्या, नोकरीच्या धावपळीत राहून गेले होते. ते सर्व आता आरामात करता येते. यामुळेच जगभरात जीवनाच्या ह्या कालखंडाकडे बघण्याचा दृष्टिकोण हळूहळू बदलत आहे. व्यवस्थित नियोजन केल्यास पन्नाशी नंतरसुद्धा आरोग्यदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि भावनिकद्र्ष्ट्या अतिशय छान, आनंदी जीवन जगणे सहज शक्य आहे. यासाठीच ५० वर्ष झाल्यानंतर आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहे. आपल्या दिनक्रमात थोड्या व्यायामाचा समावेश करून निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य आपण जगू शकतो.
गंमत म्हणजे पन्नाशीतील स्त्री-पुरुष आजच्या काळात सर्वात तरुण असतात. अनुभवांची शिदोरी गाठीशी असते म्हणून जास्त धीट असतात. कुरकुरणाऱ्या गुडघ्यांकडे दुर्लक्ष करत लहान मुलांबरोबर लहान होतात. आपल्या मुलांचे मित्र बनतात. संसारात राहून आपली स्वतःची स्वतंत्र जागा जपतात. गाणी, गोष्टी, सिनेमा, नाटक सारख्या करमणुकीच्या ठिकाणी हजेरी दर्शवतात. सप्तसुरांचे संगीत मनाला भुरळ पाडते. पु.ल., गदिमा, कुसुमाग्रज… सारे जवळचे वाटायला लागतात. परंतु सर्वानाच हे जमते असे नाही. पण जे लोक हे जमवून आणतात ते सगळयात जास्त ताणरहित आणि समाधानी आयुष्य जगतात.
पन्नाशी नंतर खऱ्या अर्थाने आयुष्यातला एक नविन टप्पा सुरू होतो. नव्याने स्वतःला शोधण्याचा श्री गणेशा झालेला असतो. ही सुरुवात सहज व आनंद देणारी असावी. यातून हृदयाला जगण्याची नवी उमेद मिळावी. कारण या वळणावर पोहोचल्यावर बुद्धी आणि मन सतत आयुष्यात आपण काय कमावले आणि काय गमावले याचाच विचार करत राहते. यामुळे आजवरच्या आयुष्यात आपल्या वाट्याला आलेले ज्ञान, कौशल्य , सन्मान, धन, प्रसिद्धी ही पुंजी उरलेल्या आयुष्यात पुढच्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरेल ही काळजी आपण घेतली पाहिजे. तरच आपल्या बद्दल सर्वांना प्रेम व आदर वाटेल.
जे आहे त्यात आपण समाधानी राहिलो तर अनेक प्रश्न आपोआप सुटतात, कारण आनंद आणि समाधान पैशांनी विकत घेता येत नाही. आजवर आयुष्यात जे मिळाले नाही त्यासाठी निराश न होता, जे आपल्याजवळ आहे त्यात समाधान मानणारी व्यक्ती ही या जगात सर्वात सुखी आढळून येते. प्रत्येक गोष्टीस नशिबाला जबाबदार ठरवणे योग्य नाही.
पन्नाशी पासून पिकलेले केस, टक्कल, सुरकुत्या यांनी रूपावर आक्रमण केलेले असते. साधारणपणे या वयात येईपर्यंत मुले मोठी होऊन नोकरी, लग्न, संसार या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेली असतात. काका, काकू, मावशी असणारे आपण अचानक आजी आजोबा श्रेणीत पोचतो. जोडीला रक्तदाब, कोलेस्टेरॉल, थायरॉईड, संधिवात सारख्या व्याधी सुरू होतात. यासाठी खाण्यापिण्यात आता आवश्यक ती पथ्ये पाळावी लागतात!
पन्नाशी नंतर असे वाटायला लागते की संसारासाठी, मुलांसाठी जगता-जगता स्वतःसाठी जगायचे राहूनच गेले ! आपण जन्मभर ज्या मुलांच्या मागे धावतो ती आपापल्या मार्गानी उडून जातात. हे जाणवू लागते की आपला उमेदीचा काळ संपला. कारण आता आयुष्याची खऱ्या अर्थाने संध्याकाळ झालेली असते! केसांवर रुपेरी छटा डोकावत असते. म्हणून पन्नाशी नंतरचा काळ हा प्रापंचिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून जोडीदाराबरोबर जगायचे राहून गेलेले क्षण जगण्याचा काळ असतो !जोडीने सकाळच्या चहा नाश्त्यापासून परदेशवाऱ्यांपर्यंत सगळीकडे एकत्र राहायची हीच ती संधी म्हणायला हरकत नाही ! आयुष्यभर ज्या जोडीदाराने साथ दिली त्याला साथ देण्याची ही वेळ !
पन्नाशी उलटल्यावर आपल्या शरीराची आणि मनाची ताकद कमी होत चाललेली असते. पण हे जाणवत जरी असले तरी सहजासहजी आपण स्वीकारत नाही. परंतु हे वय सत्य स्वीकारून आपल्या अनुभवांनी पुढील उर्वरित आयुष्य सुगम करणे हा आहे. आपण अनुभवलेले खाच खळगे दुसऱ्यांना मार्गदर्शक बनतील यावर लक्ष देणे. शेवटी आयुष्याची ही सेकेंड इनींग समजून त्यानुसार जीवनाची रूपरेषा आखली तर पन्नाशी नंतरचे आयुष्य खूप समाधानी असेल यात दुमत नाही.म्हणून पन्नाशी नंतरचे वेळापत्रक असे असू द्या जेणेकरून आपले शरीर आणि मन स्वस्थ निरोगी राहील. आपल्या वागण्याचा, बोलण्याचा कोणाला त्रास न होता मदत होईल. आपल्याकडून दुसऱ्यांना चार मोलाच्या गोष्टी शिकावयास मिळतील. अश्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिल्यास आपल्याला पन्नाशी कधीच एक ओझं वाटणार नाही !
“ पन्नाशी हा आयुष्याचा एक टप्पा जणू
कधी सुख तर कधी समस्यांशी लडू
उमेद नवी कायम असू दे मनाशी
हरलो जरी एकदा पुन्हा आशेने जगू “
