सनविवि अनुभव मागच्या वर्षीचा साधारण नोव्हेंबर महिना

मागच्या वर्षीचा साधारण नोव्हेंबर महिना

वैशाली प्रसन्न सुळे

मागच्या वर्षीचा साधारण नोव्हेंबर महिना. बंगलोर महाराष्ट्र मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या सनवीवी मासिकातर्फे बारा महिने बारा लेखक अशी अभिनव स्पर्धा घेण्यात येणार अशी माहिती मिळाली. पहिल्यांदाच अशा नवीन स्पर्धेबद्दल वाचत, ऐकत होते. खूपच उत्सुकता होती. अर्थातच विविध विषय विविध साहित्य प्रकार आणि विविध लेखक यांमध्ये असणार त्यामुळे आपला साहित्य प्रवास समृद्ध होईल याची खात्री होती. म्हणून लगेच या स्पर्धेमध्ये भाग घेतला. सुरुवातीला विषय स्वातंत्र्य दिले गेले. अर्थातच आपल्या कम्फर्ट झोन प्रमाणे मी लेखन केले .जानेवारी महिना. नवीन वर्षाची सुरुवात .सगळेजण काही ना काही संकल्प या महिन्यात करतातच म्हणून सुरुवातच संकल्प या विषयाने केली.आवडता विषय स्वातंत्र्यवीर सावरकर .त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यावरचा लेख .मार्च महिना म्हटला की अधोरेखित होतो तो महिला दिन. त्यामुळे महिला दिनावरचा लेख लिहिला .आता मात्र उत्सुकता लागली की आयोजकांकडून काय विषय मिळतात? खरोखर खूपच विषय वैविध्य आणि साहित्यप्रकार या स्पर्धेमुळे हाताळले गेले. वाचल्या गेले. कथापूर्ती हा विषय जेव्हा दिला त्यावेळी वाटलं की नाही आता मी नाही लिहू शकत. कारण यापूर्वी कथा लिहिलीच नव्हती .पण सहजासहजी हार मानायची वृत्ती नाही. त्यामुळे प्रयत्न करायला काय हरकत आहे असं म्हणत विचार चक्र सुरू झाले डोक्यात. स्वातंत्र्यसंग्राम आवडीचा विषय. त्यामुळे सहाजिकच स्वातंत्र्यलढ्याची सांगड त्या विषयाशी घालून कथा लिहिली आणि काय आश्चर्य !सनशविविचा तो अंक ज्यांना ज्यांना पाठवला त्यांनी कथा अतिशय आवडल्याचे आवर्जून सांगितले .सह स्पर्धकांनी पण वैयक्तिक मेसेज करून कथेचे कौतुक केलं. या स्पर्धेने मला दिलेली पहिली गोष्ट म्हणजे कम्फर्ट झोन सोडून दुसरे काही करण्याचा आत्मविश्वास. आणि मी कथाही उत्तम लिहू शकते याची खात्री! आता दर महिन्याला काय विषय असेल आणि अंक कधी येईल याची उत्सुकता माझ्याबरोबरच नव्हे माझ्यापेक्षाही जास्त माझ्या वर्तुळातल्या लोकांना लागलेली असायची. फेब्रुवारी महिन्याचा लेख तर अशा परिस्थितीत लिहिला की अजूनही तो प्रसंग आठवतो .सेटची परीक्षा, तोच दिनांक शेवटचा, लेख पाठविण्याच्या मुदतीचा होता.परीक्षा देऊन दुपारी घरी आले .घरी आई, बाबा सासू-सासरे अशी सगळी मंडळी आलेली. कोरोनाच्या नवीन प्रकाराचा नुकताच जन्म झालेला .त्याच्या तडाख्यात घरातले बहुतेक जण सापडलेले .आता माझाही नंबर लागणार अशी परिस्थिती होती. तरीही रात्री नेटाने लेख पूर्ण केला .काही महिन्यां नंतर मात्र खरोखरच कठीण परिस्थिती निर्माण झाली .घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृती, मुलीचं महत्त्वाचं वर्ष ,कुटुंबात घडलेल्या काही  अप्रिय , धक्कादायक घडामोडी यामुळे शारीरिक मानसिक दृष्ट्या खूप अस्वस्थ झाले .वेळही मिळेना. आणि डोक्यात  विचार ही सूचेनात. त्यामुळे लिहिणं जवळजवळ बंद झालं. तरी सुद्धा सनविवीचा अंक वाचत होते .तुम्हा सगळ्यांचे विचार वाचायला आवडत होते. आता आपल्या पुरती ही स्पर्धा जवळजवळ संपली असं वाटत असतानाच सलग तीन महिने लेख नाही बघून एक दिवस स्मिताताईंचा मेसेज आला,’ सगळे ठीक ना ?काळजी वाटते म्हणून विचारते’. खरंच त्या वेळेच्या भावना सांगायला शब्द नाहीत. कितीतरी किलोमीटर अंतर. कधीही प्रत्यक्ष भेटलेलो नाही पण आपली कुणीतरी काळजी करून आवर्जून चौकशी करतो ही भावना खूपच स्पर्शून गेली मनाला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली .आधी सगळ्यांची काळजी घ्या ,तुमची काळजी घ्या स्पर्धा पुढेही होतच राहतील असा त्यांचा आश्वासक संदेश आला. त्यावेळी जाणवलं स्पर्धक आयोजक नातं केव्हाच मागे पडलेय. एक अनामिक बंधन तयार झालं आहे सगळ्यांमध्ये. त्यावेळीच ठरवलं, शेवटचा लेख नक्की लिहायचा. या स्पर्धेने मला दिला निखळ आनंद. तुम्हा सगळ्यांची सह स्पर्धक होण्याचा. प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्याचा. पुढेही अशा स्पर्धा आयोजित करून आम्हा सगळ्यांना सनविवि एकत्र बांधेल अशी आशा नव्हे खात्री आहे. खरोखर संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद.

वैशाली प्रसन्न सुळे वडोदरा गुजरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *