समुद्रमंथन
समुद्रातला सगळ्यात मोठा प्राणी आहे निळा देवमासा. समुद्रातलाच कशाला हा आपल्या ग्रहावरचा सगळ्यात वजनी प्राणी आहे १९० टनाचे हे महाकाय धूड २८ मीटर पर्यंत वाढू शकते. छोट्या छोट्या समुद्री प्राण्यांना, क्रिल्सना खाऊन स्वतःला पोसतो पण खाणं केवढं अफाट, अबब! दिवसाकाठी चार टन म्हणजे ४०० किलो खातो.
आठ महिन्यांचे होईपर्यंत याची पिल्ले आईच्या सकस दुधावर वाढतात.
देवमासे आणि डॉल्फिन्स हे सस्तन प्राणी असल्याने प्राणवायूसाठी त्यांना थोड्या वेळा करता का होईना पाण्याच्या वर यावंच लागतं
पण यातले काही जण आपला श्वास पाण्यात दोन तासांकरता रोखून धरू शकतात.

एरवी डॉल्फिन्स हे आपल्याला माहिती असलेले प्रेमळ मासे असले तरी त्यांची किलर व्हेल ही जात फार क्रूर आहे.
ते आपल्या भक्षाला (बहुतेकदा छोटे सील मासे) खेळवून, हवेत फेकून ,मारून मग खातात. नाव देवमासा आणि कृत्य बघा!
डॉल्फिन्स आणि देवमासे पाण्यात आपापल्या बांधवांशी सुरेल गाण्यांनी संपर्क ठेवतात. नॅशनल जिओग्राफिक चॅनलने मध्यंतरी या आवाजाच्या रेकॉर्डसही बाजारात आणल्या होत्या. त्यात त्यांचे वेगवेगळ्या कारणाकरता केलेले वेगवेगळे कॉल्स रेकॉर्डेड आहेत.ऐका कधीतरी.
हत्ती सील्स नावाचे सील मासे ध्रुव प्रदेशातील थंड समुद्रात जास्त आढळतात. नावाप्रमाणेच हत्ती एवढे जड असतात .काही काही सिल्स साडेतीन टन म्हणजे 350 किलोहून जास्त वजनी असतात. पण प्रणयाराधनाच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर बसून इतर नर सिल्सशी झुंज देताना जवळपास निम्म वजन उतरवतात. काय पण वेट रिडक्शन यांचे!
लेपर्ड सील मासे झोपेत शिट्ट्या मारतात ,गाणी म्हणतात. वा! वा !क्या बात है!
समुद्रातले ऑटर्स झोपेत वाहून जाऊ नये म्हणून झोपायच्या आधी स्वतःला समुद्री पाणवनस्पतीनी बांधून ठेवतात.

समुद्री कासवे फक्त अंडी घालायला किनाऱ्यावर येतात आणि अंडी फुटल्या क्षणी यांची बारकी पिल्ले वाळूतून पाण्याकडे धाव घेतात हिरव्या कासवांची मादी एका वेळेस जवळपास १०० ते ११५ अंडी घालते आणि एका वर्षात साधारण ८००अंडी देते.
चामडी पाठीची कासवे ही समुद्रातली सगळ्यात मोठी कासवे .चार मीटर पर्यंत लांब असू शकतात आणि जेवण खाण्यासाठी १२०० मीटर पर्यंत समुद्रात खोल जाऊ शकतात.
पट्टेरी पाणसाप सगळ्यात विषारी समुद्री साप आहेत .

ते जमिनीपाशी येऊन अंडी घालतात ,तर पिवळ्या पोटाचे समुद्र साप सरळ पाण्यातच छोट्या पिल्लांना जन्म देतात. जन्मल्याबरोबरच ही पिलावळ पोहू लागते .
समुद्री सापांचे विष हे जमिनीवरच्या सापांच्या विषाहून अजून खूप जास्त तेज व विखारी असते.
अँगलर माशाच्या डोक्यावर एक फिशिंग रॉड असतो तोच फक्त पाण्यात चमकत असतो आणि बाकी सगळे शरीर काळे किंवा तपकिरी असते ,जे समुद्रात आरामात लपते, या रॉडकडे छोटे मासे आकर्षिले जातात आणि अँगलर त्यांना गट्टम करतो .अँग्लर माशाची मादी १२० सेंटीमीटर एवढी लांब असते तर नर अगदीच पिटुकला म्हणजे फक्त ३-६ सेंटीमीटरचा असतो (त्यांच्याबद्दल अधिक माहिती नक्की वाचा) . स्त्रीशक्ती जिंदाबाद!
खोल समुद्राच्या पोटात अंधार असतो अशा ठिकाणी माशांच्या दीड हजार जाती स्वतः उजेड निर्माण करतात .आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात दिवे लावतात lanturn.माशाचं पूर्ण शरीरच चमकत. ड्रॅगन मासे व कुकी कटर माशांच्या बाजूंना व पोटाकडील बाजूला लाईट चमकतात .काही मासे दुसऱ्या माशांना बिस्किटांच्या आकारात खातात म्हणून त्यांना कुकी कटर म्हणतात.
वायपर फिश ला सापासारखे तीक्ष्ण दात असतात जे समुद्राच्या पाण्यात दिसत नाहीत .हे मासे तोंडाचा मोठा आ करून फिरतात, भक्षाला त्याचं तोंड बंद झाल्यावरच कळतं की आपण आता आत मेलो.

ट्यूबवर्म हे खोल समुद्रातल्या ज्वालामुखीच्या भोवती उगवतात .ते आपल्या कार्स एवढे देखील उंच वाढू शकतात.
धुलाई सफाई तज्ज्ञ मासे आहेत ‘ रॅसे ‘.मोठे मोठे मासे या छोट्या माशांना भेटी देतात स्वतःला स्वच्छ करण्यासाठी.
हे छोटे मासे मोठ्यांच्या अंगावरचे पॅरासाईट आणि इतर अस्वच्छ भाग खाऊन स्वच्छ करतात आणि तीच त्यांची भरपूर फी असते.
बास्किंग शार्क्स एक हजार टन पाणी एका वर्षात स्वतःच्या शरीराने चाळतो आणि आपले अन्न मिळवतो .
ग्रेट व्हाईट शार्क्स हे समुद्रातले सगळ्यात भीतीदायक आणि क्रूर प्राणी आहेत.30 किलोमीटर वेगाने फिरणारे हे मासे हल्ला चढवून कितीही मास खाऊ शकतात.

टायगर शार्क्स ४० पिल्लांना एकावेळी जन्म देऊ शकतात आणि ही पिल्लं लगेच आपलं अन्न मिळवून खायला शिकतात बघा किती स्वावलंबन ना!
सस्तन प्राण्यांमध्ये सगळ्यात जास्त जे मायग्रेशन करत असतील ते समुद्रातील ग्रे व्हेल्स! वीस हजार किलोमीटर ते एका वर्षात पोहत पार पाडतात .
लॉगर हेड कासवे, जपानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ जन्म घेतात आणि मेक्सिकोपर्यंत दहा हजार किलोमीटर पार करून येतात .पाच वर्ष तिथे घालून परत जपानला अंडी घालण्यासाठी परततात .
काय बाई हौस ही फिरण्याची!
ईल मासे आणि प्रसिद्ध सालमन मासे हजारोंनी किलोमीटर अंतर पार करून समुद्रातून आपल्या जन्मस्थान असलेल्या नदीकडे परततात, परत नव्या जीवांना जन्म देण्यासाठी.
कसे कळत असेल ना यांना त्यांची जन्मभूमी!

सगळ्यात जोरात पोहू शकणारा पक्षी आहे जेंटू पेंग्विन .हा ताशी सत्तावीस किलोमीटर इतक्या वेगाने पोहू शकतो.
पेंग्विनच्या पिसांखाली चरबीचा एक मोठा साठा असतो ज्याने त्यांचे ध्रुवीय थंडीपासून संरक्षण होते. पेंग्विन्सच्या बाबांना फारच काम असतं! ते म्हणजे आपल्या पायांवर पोटाच्या उबेत ,दोन महिने उपाशी तापाशी राहून अंडे सांभाळणं. पण पिल्लू अंड्यातून बाहेर पडल्यावर मात्र आई-बाबा दोघेही बाळाची काळजी घेतात.
एखादा छोटासा वाळूचा कण जर शिंपल्यात गेला तर तो आतल्या मऊ प्राण्याला खूप टोचू लागतो म्हणून मग तो नॅकर नावाचा एक चिकट स्त्राव आपल्या शरीरातून त्या वाळूकणावर चढवत राहतो आणि त्यातून तयार होतो आपला टपोरा मोती .आता जाणीवपूर्वक खडे टोचून समुद्री कालवांपासून मोती तयार करून घेण्याचे बिझनेस सुरू झाले आहेत हे आपल्याला माहिती आहेच.

जेवणाच्या ताटा एवढे डोळे असणारा समुद्री squid १५ मीटर पर्यंत वाढतो आणि लोक त्याला समुद्रातला राक्षस समजून घाबरतात.
आपल्या पृथ्वीचा २/३हून जास्त भाग व्यापलेल्या या महासागरांमध्ये कितीतरी गुपिते लपलेली आहेत २१ हजाराहून जास्त तर नुसत्या समुद्रातल्या माशांच्या जाती आहे ,तशा तर ३४००० गोड्या पाण्यातल्या धरून.
किती सांगायचं? किती लिहायचं? कितीतरी गोष्टी आपल्याला अजून कळलेल्याच नाहीत. पुराणात समुद्रमंथनातून नवरत्न बाहेर पडली !
तशी अजून कितीतरी गुपिते बाहेर पडायचीच आहेत .त्याची वाट पाहूया आणि या अद्भुत सागरसफरीतून आता मात्र बाहेर पडू या!
विद्या पळसुले
