-- पूजा सोनवणे --
वेलकम अबोर्ड!ह्या वाक्याने मला १० हत्तीचं बाळ आल्यासारखे वाटते. प्रवासाला जाणे, भटकंती ह्याने मला इतका आनंद मिळतो, तोच शब्दात मांडणे अवघड आहे. कधी पासून हा किडा मला चावलाय कोणास ठाऊक? माझे आजोबा गावो गावी जायचे पण देव दर्शनाला, माझे मोठे काका आणि माझे वडीलही फिरायचे पण कामामुळे. कदाचित त्यामुळे असेल ? तर उत्तर माहिती नाही, पण नुसता, ‘फिरायचा प्लॅन करूयात’ ह्या वाक्याने मला जी काही ऊर्जा मिळते ना, साधारण १ आठवडा मी आरामात काढू शकते.
मी फिरायला जाते ते म्हणजे आरामला नाही, जिथे जाते ती जागे पूर्णपणे पालथी घालायला. जो काही आराम करायचा तो मी घरीच करते आणि माझी फुल बॅटरी चार्ज करून प्रवासाला निघते. मला जर कोणी पैशांची बॅग देऊन सांगीतले, की ह्या पैशात तू काहीही विकत घेऊ शकत नाही, काय करू शकतेस तर फक्त भटकंती. उड्या मारत-मारत तयार होईल मी. मला नेहमी वाटते, एका आयुष्यात जितकं फिरता येईल तितकं फिरा. प्रवास हा एक चालता बोलता गुरु आहे आणि त्या गुरुची माफक गुरूदक्षिणा आहे. ती माफक गुरूदक्षिणा कदाचित काही लोकांसाठी महिन्या भराची कमाई असेल. प्रवास म्हणजे विलक्षण असे जगा वे वेगळ्या अनुभवांचा साठा. अनुभवांची समृद्धी म्हणजे आयुष्य भराची कमाई. असे अनुभव ज्यांच्या आठवणी ही वेगवेगळ्या. कधी गोड गुलाबजाम तर कधी गोल गोल जिलेबी, तर कधी तिखट चटणी किंवा झणझणीत ठेच्याचा ठसका. कधी आंबट दही तर कधी कडू कारलं. प्रत्येक शहर, गाव इतकं काही अनाहूतपणे देऊन जातं, त्या आठवणी मनाच्या कोपर्यात कायम जिवंत राहतात. फिरायला जाणे म्हणजे फक्त बकेट लिस्ट टिक करणे नसून त्या जागेचे वेगळेपण, सौंदर्य, वैभव अनुभवणे. अनेक विविध पैलू असलेल्या गोष्टी बघायला मिळतात. प्रत्येक जागेचा एक इतिहास आहे, ती जागा तिचे वेगळेपण कशी जपत असेल हे त्या इतिहासात दडलेले असेल कदाचित. तिथले लोक, प्रवासी ह्यांना न्याहाळताना जाम भारी वाटते. म्हणजे कॉफी शॉप मध्ये बसून, रेल्वे, मेट्रो किंवा बस मध्ये बसून मी लोकांचे निरीक्षण करत असते. कितीतरी अकथित गोष्टी, दुमडून ठेवल्या कहाण्या असतात. सगळे किती सारखे तरीही किती वेगळे!
मी ३ वर्ष भरता बाहेर होते, ती माझी परदेशात राहण्याची पहिलीच वेळ. त्या प्रवासात खूप चांगले मित्र जोडले गेले. तो प्रवास इतका अविस्मरणीय आहे, इतकं आपलं सं केलाय त्या छोट्या गावाने की पुन्हा संधी मिळाली तर सोडणार अजिबात नाही मी. स्विंडन हे गाव आहे जे लंडन पासून दिड तासावर आहे. तिथे राहणारे लोक म्हणतात त्या गावात काहीही नाही, ना नाईट लाईफ ना करिअरच्या संधी. पण मला ते गाव आजही तितकंच लोभस वाटत. कुठेही पायी पोहोचू शकतो अगदीच पायी नसेल तर बस आहेतच. रोजच्या जगण्याला ज्या गोष्टी हव्या त्या सगळ्या तर मिळतातच पण जीव लावणारी, मदतीला धावून येणारी माणसे आहेत तिथे. स्विंडन मुळे शक्य झाले युरोप फिरणे. फ्रान्स, इटली, डेन्मार्क, बेल्जियम आणि बराच काही. अजून खूप फिरायचे राहीले आहे. बघूयात ते कधी होतंय. तिकडे होतो तेव्हा वर्षातून २ युरोप वाऱ्या आणि उरलेल्या वेळात इंग्लंड पर्यटन विभागाची आर्थिक प्रगती करून देण्याची जबाबदारी सांभाळणे हे आम्ही तिथे ३ वर्ष केले.
अनेक लोक भेटले, अनेक ओळखी झाल्या पण नशीब चांगले म्हणावे की लोकं चांगली म्हणावी? कारण मी भारतात असो किंवा परदेशात कधीही वाईट अनुभव आले नाही. कधी चोरी नाही, कोणी लुबाडले नाही. तशी मी खूपच सावध असते, कुठलीही गोष्ट शक्य तो गहाळ होत नाही माझ्याकडून आणि मुळात सामान कमी घेऊन प्रवासाला निघते. सामान कमी सांभाळावे लागते. माझा नवरा त्या बाबतीत कटाक्षाने लक्ष देतो. एक मित्र आहे तो आणि मी बंगलोर मध्ये राहून पण फक्त विमानतळावर भेटतो. एकदा तर हाईट झाली, आम्ही Brussels मध्ये संध्याकाळी भटकत होतो. तेव्हा आम्ही दोन मुलींना मराठी बोलताना ऐकलं आणि आवाजाच्या दिशेने मान वाळल्यावर हा आमचा मित्र दिसला. आम्हाला सगळ्यांना इतकं नवल वाटलं, की एका शहरात राहून तिथे कधीच भेटणे होत नाही पण मणी ध्यानी नसताना तोच व्यक्ती आम्हाला परदेशात भेटला. अजून एक मज्जा म्हणजे २०१५ मध्ये स्विंडन ला असताना एक जोडपं त्याच वेळेस तिथे होतं आणि ते पूर्ण वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो ही नाही. नवरे आमचे एकाच बिल्डिंग मध्ये काम करूनही. मग २०१७ ला आम्ही भेटलो, सख्खे शेजारी झालो. बोलता- बोलता कळले ती आमच्या बंगलोर च्या मित्राची कॉलेजातली मैत्रिण. असेच अजून कितीतरी ओळखी निघाल्या आणि प्रत्येक वेळेस हे प्रकर्षाने जाणले पृथ्वी गोल आहे, कोण कुठे आणि कधी भेटेल ह्याचा नेम नाही. कोण वर्षानुवर्षे बरोबर असून अनोळखीच राहतील आणि कोण काही क्षणात आपुलेसे करून घेतील.
मी फिरायला लागल्या पासून माणूस म्हणून घडत गेले. सगळ्या परिस्थितीचा सारासार विचार करायला शिकले. प्रत्येक नाण्याला जश्या दोन बाजू असतात तश्या प्रत्येक देशात चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. भटकायला लागल्या पासून जे जसे आहे ते स्वीकारायला जमले. खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता घेता चांगले काय वाईट काय हे ही अनुभवले. प्रत्येक अडचणीला तिसर्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून वाघाचे कसे तेही उमगले. बाबा नेहमी म्हणतात माणूस वाईट नसतो, वेळ वाईट असते हे फिरण्यामुळे पटले.
ज्याला जे आवडेल ते करा पण थोडा वेळ थोडा वेळ काढून मस्त भटकून या. बघा तुम्ही पुन्हा स्वतःच्या नव्याने प्रेमात पडाल.
मी ह्या माझ्या लाडक्या प्रवासा विषयीच्या सुविचाराने आपला निरोप घेते: “Traveling – it leaves you speechless, then turns you into a storyteller” – Ibn Battuta
छान! प्रवास आवडणे आणि जिथे जाऊ तिथे आराम करत न बसता भयंकर उनाडणे ह्या गोष्टी माझ्या ही बाबतीत खर्या असल्याने तुझा लेख एकदम भावला. साहित्योन्मेष स्पर्धेसाठी शुभेच्छा!